प्रीती.. पर्व दुसरे! भाग -७९

कथा सोनियाची.. तिच्या प्रीतीची!

प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -एकोणऐंशी.



"म्हणजे आबा, मोहन परत आला म्हणून मी तुम्हाला नकोशी झाले होय?" शालिनी स्फून्दू लागली.

"ओ वेडाबाई, रडू नकोस. मोहन माझा मुलगा असला तरी तू माझ्या लेकीपेक्षा कमी नाहीस. उलटपक्षी मोहनपेक्षा तुझ्यावर जीव जास्त आहे माझा." तिला जवळ घेत ते म्हणाले.

"पण मी काय गं? पिकले पान कधी गळेल काही नेम नाही. मग त्यानंतर असं एकटे किती दिवस राहशील?"

"आबा?"

"शालू, योग्य तेच बोलतोय गं मी. तुझ्या आत्याने तुला आईविना पोर म्हणून माया लावली आणि त्या बदल्यात तू तुझे संपूर्ण आयुष्य आमच्यासाठी समर्पित केलेस. मोहनकडून नवऱ्याचे सुख मिळणार नाही हे माहित असूनही केवळ आत्या बरी होईल या उद्देशाने तू त्याला लग्न करायला भाग पाडलेस." बोलता बोलता ते क्षणभर थांबले.

"पोरी, या जगात सगळे स्वार्थी असताना तू दुसऱ्यांचा विचार करत आलीस, आता तुला तुझा विचार करण्याची वेळ आली आहे. जर मिहीररावांसारखा तुला आयुष्याचा सोबती मिळणार असेल तर नकार द्यायचा प्रश्नच उरत नाही." तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत ते म्हणाले.

"आबा पण.."

"आता पण बिन काही नाही. तुला सून बनवण्याच्या नादात तुझ्या आत्यामुळे आमच्या सर्वांच्या हातून चूक घडली. ती सुधारायची एक संधी दे. वरून बघत असणाऱ्या तुझ्या आत्याला अपराधीपणाच्या ओझ्यातून मुक्त कर." त्यांच्या डोळ्यात पाणी होते.

"आबा, डोळ्यात पाणी नका ना आणू. मला विचार करायला वेळ हवा. असे अचानक निर्णय नाही घेता येणार मला." शालिनी हळवे होत म्हणाली.


"हवा तेवढा वेळ घे की. आपल्याला घाई नाहीच आहे. " माही प्रेमाने तिच्या जवळ येऊन म्हणाली. "फक्त तू पॉझिटिव्हली विचार करावेस, एवढीच अपेक्षा आहे." ती म्हणाली, त्यावर शालिनीने एक मंद स्मित दिले.


"गाईज, एक घोळ झालाय." लॅपटॉपवर काही काम करत तिथे येत प्रीती म्हणाली. "आज एक इम्पॉर्टंट मिटिंग असल्यामुळे मी कोल्हापूरला येऊ शकत नाही. मिहीर अंकल तुम्ही मॅनेज करू शकाल काय? म्हणजे आबा, देवकीआई आणि शालिनीआँटीला तुम्ही सोडून देऊ शकाल काय?"

"कशाला?" अचानक शालिनी म्हणाली. "आम्ही आमचे जाऊ की."

"अजिबात नाही. असं कसं? तुम्ही आमच्या गेस्ट आहात." शालिनीच्या बोलण्यावर माही म्हणाली. "मिहीर, तुला काही अडचण नसेल तर तू यांच्यासोबत जा आणि त्यांना त्यांच्या घरापर्यंत अगदी सेफली पोहचवण्याची जबाबदारी तुझी. ओके?" माहीने मिहीरकडे बघून जणू काही आदेशच सोडला, त्याला तो नाही म्हणू शकला नाही.

********

विमानामध्ये मिहीर शालिनीच्या बाजूने बसला होता. त्याच्याजवळ बसताना तिला तिथे उगाचच अवघडल्या सारखे वाटत होते. कोल्हापूरच्या एअरपोर्टवर तेथील सोनप्रीतच्या ब्रांच मधील कर्मचाऱ्यांची गाडी त्यांना रिसीव करायला आली होती. देवकीला तिच्या घरी सोडून नंतर मग आबा आणि शालिनीला घेऊन गाडी पुनाळला पोहोचली. या एक दीड तासाच्या प्रवासात मिहीर शालिनी सोबत होता. शालिनी मात्र त्याच्याशी फारसे बोलत नव्हती.


"बरं आबा निघतो मी." त्यांना घरी पोहचल्यावर मिहीर म्हणाला.

"मिहीरराव, इथवर आलाच आहात तर आता घरचा पाहुणचार तरी घेऊन जा की." आबा त्याला म्हणाले.

"पाहुणचार वगैरे नको आबा. पाणी तेवढे द्या." शालिनीकडे एक नजर टाकून मिहीर म्हणाला.

"चहा टाकलाय, तेवढा घेऊन जा." त्याला पाणी देत शालिनी बोलली.

स्वयंपाक घरातून सोनप्रीतच्या चहाचा सुगंध दरवळत होता.

"तुम्ही सोनप्रीतची प्रोडक्ट्स वापरता काय?" चहाचा पहिला घोट घेतल्याक्षणी मिहीरने विचारले.

"हो. मागे प्रीती आली आणि तेव्हा तिच्याकडून सोनप्रीत बद्दल कळलं. मग ठरवलं ही माणसं तर आपल्या आयुष्यात नाहीत, किमान मला त्यांची उत्पादन तरी वापरून बघू दे." ती मंद हसून म्हणाली.


"हसताना खूप गोड दिसतेस तू." मिहीर म्हणाला. त्याच्या अशा अचानक दिलेल्या कॉम्प्लिमेंटमुळे शालिनीचा चेहरा गोरामोरा झाला.

"तुमचे आपले काहीतरीच." ती लाजेने खाली मान घालून म्हणाली.

"नाही गं. मला खोटं नाही बोलता येत." तिच्यावर नजर रोखून तो म्हणाला. "आणि ऐक ना, मी तुला असे एकेरी बोलल्यावर तू देखील मला असं बोलू शकतेस." त्याची नजर तिच्यावरच होती.

"तुम्ही एवढ्या मोठ्या हुद्द्यावर आहात. इतकी मोठी कंपनी सांभाळता. तुम्हाला असे एकेरी कसं बोलणार?" आता शालिनी जराशी निवडली होती.

"मग तू सुद्धा शिक्षिका आहेस. शाळेतील इतकी सारी मुलं सांभाळतेस. मलाही तुला रिस्पेक्ट द्यावा लागेल." तो हसून म्हणाला. त्याच्या बोलण्यावर तीही खळाळून हसली.


आबा आत आराम करायला गेले होते. बाहेर हे दोघेच बोलत बसले होते.
"शालिनी, खूप गोड आहेस तू." तिला हसताना बघून तो परत म्हणाला. "असं वाटतेय की यापूर्वी इतकी वर्ष मला का भेटली नाहीस?" त्याच्या तशा बोलण्याने तिने चमकून त्याच्याकडे पाहिले.

"म्हणजे?" तिच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव होता.

"म्हणजे इतकी वर्ष मी शैलीच्या आठवणीमध्ये दिवस कुंठत होतो. सोनिया मध्ये मी तिला शोधण्याचा प्रयत्न केला. पण आता असं वाटतं की आता मला शैली नको. शालिनीच्या रूपात शालिनीच भेटली तरी मला पूरे आहे." तिच्या हातावर अलगद हात ठेवून तो म्हणाला.

तिने शहरून आपला हात काढून घ्यायचा प्रयत्न केला तर त्याने तो हात अधिकच घट्ट पकडला.

"हा हात असाच आयुष्यभर सोबत पकडून ठेवायला आवडेल मला. शालिनी तुलाही ते आवडेल का? मी तुझ्या उत्तराची वाट बघेल. येतो मी."

तिच्या गालाला हलकेच स्पर्श करून तो बाहेर निघून गेला. ती मात्र स्तब्धपणे बसली होती. या काही क्षणात काय घडले हेच तिला कळत नव्हते. इतक्या वर्षानंतर कोणीतरी स्वतःहून प्रेमाने बोलणारी व्यक्ती भेटली ह्या जाणीवेने तिचे मन मोहरून आले होते.

********

"माई, धिज इज फॉर यू. तुला माझ्याकडून गिफ्ट." आदल्या दिवशीच सोनिया आणि मोहन त्यांच्या विदेशभ्रमंतीवरून परतले होते आणि प्रीती आज तिला एक खास गिफ्ट देत होती.

"अरे, आता हे काय नवीन? तू का मला गिफ्ट देणार?" सोनिया तिला म्हणाली.

"अगं, तुझ्या लग्नाचे स्पेशल गिफ्ट आहे हे. तू बघशील ना, तर तुला खूप आनंद होईल."

"प्रीत, माझे सगळ्यात स्पेशल गिफ्ट तर तू आहेस. आता आणखी काही नको." सोनिया.

"माई हे बघशील तर तू बघतच राहशील." प्रीतीने गिफ्ट बॉक्स तिच्यासमोर धरला.
किंचित हसून सोनियाने तो गिफ्ट बॉक्स उघडला. तर त्यात एक फाईल होती.

"हे काय आता?" तिने विचारले.

"बघ तरी." प्रीती.

सोनियाने फाईल उघडली आणि त्यातील पेपर्स बघून तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले.

"प्रीती.." दाटलेल्या कंठाने ती बोलली.

"माई, आवडलं ना?" तिच्या गळ्यात हात गुंफुन तिने विचारले.

"हो, खूप. थँक यू सो मच डिअर." तिने प्रीतीला घट्ट मिठी मारली.

सोनिया इतकी खूष आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी खास गिफ्ट असेल हे सर्वांच्या लक्षात आले होते.

"दादा, हे पेपर्स, कोल्हापूरच्या आपल्या बंगल्याचे आहेत." बोलतानाच सोनियाचा स्वर रुद्ध झाला होता.

"सोनिया व्हिला? पण तो आपण विकला होता ना?" रजत विरेनकडे बघून म्हणाला.

"हो, त्या वेळची परिस्थिती तशी होती की तो बंगला तुम्हाला विकावा लागला. पण अंकल, तो बंगला म्हणजे आप्पसाहेबांचे काळीज होते. तिथली प्रत्येक आठवण माईच्या हृदयात अजूनही ताजी आहे. ते केवळ एक घर नव्हते तर आप्पसाहेबांचे सर्वस्व होते. तेच आज मी माईला परत करत आहे. कारण त्या बंगल्यावर तिचा किती जीव आहे हे मला माहितीये." डोळे पुसत प्रीती म्हणाली.


"मला कोल्हापूरला जायचे आहे. आत्ता, या क्षणी त्या वास्तूला माझ्या डोळ्यांनी बघायचे आहे, मला तिला स्पर्शायचे आहे." सोनिया भावविभोर होऊन बोलत होती.

"हो माई, रिलॅक्स. उद्या आपण सर्वच कोल्हापूरला जात आहोत. आजचा दिवस तेवढी वाट बघ."

"तुला माहित नाही प्रीत, मला कोल्हापूरला जायची किती ओढ लागलीये. यू आर द बेस्ट. बेस्ट डॉटर फॉरेव्हर!" तिच्या कपाळाचे एक चुंबन घेऊन सोनिया म्हणाली.

"येस आय नो द्याट. आफ्टरऑल मी मुलगी तर तुझीच आहे ना?" तिच्या मिठीत विसावत ती म्हणाली.
:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.

प्रिय वाचकहो, आज दीपावली! दिव्यांच्या रोषणाईचा सण. या प्रकाशासारखे आपणा सर्वांचे आयुष्य उजळून निघावे हिच सदिच्छा!!

दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

वाचत रहा, स्वस्थ रहा.

🎭 Series Post

View all