प्रीती.. पर्व दुसरे! भाग -७८

कथा सोनियाची.. तिच्या प्रीतीची!

प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -अठ्ठ्याहत्तर.



"श्श! शांत. मिहीर काही तुमच्या एवढा नाहीये, असा जल्लोष करायला. आधी मला आबांना रीतसर मागणी घालू देत. त्यांनी होकार दिला तर मग जंगी पार्टी करूया." माही त्यांना दमटावत म्हणाली.


इकडे एका सेपरेट टेबलवर बसलेल्या मोहन आणि सोनियाला काय चाललेय, याचा अंदाज येत नव्हता. शालिनी तर या सर्वापासून दूर आबा, देवकी आणि राधामावशी असलेल्या ठिकाणी गप्पा मारण्यात गुंग होती.

*********

"मोहन अंकल, सोनिया मॅम मला आता निघायला हवे. माझी फ्लाईट आहे. यू बोथ एंजॉय युअर न्यूली मॅरीड लाईफ." दोघांना नमस्कार करत कृष्णा म्हणाला.

"अरे, तू असा कसा अचानक निघालास?" प्रीतीला त्याचे लगेच जाणे अनपेक्षित होते.

"माझे ट्रेनिंग पिरेड सुरू आहे ना, त्यामुळे जास्त सुट्ट्या घेऊ शकत नाही. बट डोन्ट वरी, तुला भेटायला असे अधेमध्ये येत राहीन." तो तिला एक छोटी झप्पी देत म्हणाला. तिचे डोळे पाणावले होते.

प्रीती, चल आपण याला सोडून येऊया." समीरने तिच्याकडे सूचकतेने पाहिले.

सगळ्यांना टाटा बाय बाय करून कृष्णा निघाला. दोघांना प्रायव्हसी मिळावी म्हणून समीर कार ड्राइव्ह करत होता. दोघे मात्र गप्प बसले होते.

"ओये लव्हबर्डस, तुम्हाला एकत्र वेळ घालवता यावा म्हणून मी ड्राइव्ह करतो आहे, आणि तुम्ही का शांत झालात?" तो मागे वळून म्हणाला. "बिनधास्त बोला मी काहीही ऐकणार नाहीये." तो.

ते मात्र शांतच होते. दोघांनी एकमेकांचा हात तेवढा गच्च पकडला होता. विरहाच्या कल्पनेने तिच्या डोळ्यात आभाळ दाटले होते. कृष्णाचीही अवस्था काही वेगळी नव्हती. दोघे जणू मुकपणेच एकमेकांशी बोलत होते.

एअरपोर्टवर पोहचल्यावर समीरने कार पार्क केली. कारच्या काळ्या काचा वर चढवल्या आणि स्वतः बाहेर येऊन उभा राहिला.

"आय विल मिस यू." कृष्णाने तिच्या हातावर ओठ टेकवले आणि आवेगाने तिला मिठीत घेतले. दोन मिनिटे तशीच त्याच्या मिठीत राहून ती बाजूला झाली. स्वतःच्या भावानांना नियंत्रित करून दोघे बाहेर आले. आपल्या प्रिय व्यक्तीला असे सोडून जाणे किती क्लेशदायक असते याचा त्यांना प्रत्यय येत होता.

कृष्णा गेल्यानंतर समीर प्रीतीला परत हॉटेलवर घेऊन आला. रस्त्यात तिचा मूड खुलवण्यासाठी तो काही ना काही करामती करत होता.


"समीर, थँक यू." आत जाण्यापूर्वी तिने त्याला हग केले.
"यू आर माय ट्रू फ्रेंड. थँक यू फॉर अंडरस्टॅंडिंग मी. थँक यू फॉर सपोर्टींग मी. थँक यू फॉर एव्हरीथिंग." त्याने काही प्रश्न करण्यापूर्वी ती म्हणाली.

"सेम टू यू डिअर." तिला जवळ घेऊन त्याने गोंजारले आणि मग दोघे आत गेले.

********

रात्री सोनिया- मोहन आणि सोबत इतर लवजमा बंगल्यावर परतला. राधामावशीने भाकर तुकडा ओवाळून उभयंत्यांचे स्वागत केले.

सोनियाचा तो भव्यदिव्य बंगला बघून आबाचे डोळे दिपून गेले. आपली सून इतकी मोठी कर्तबगार स्त्री आहे याचा त्यांच्या डोळ्यात अभिमान दाटून आला.

दुसऱ्या दिवशी पूजा आयोजित केली होती घरातील मंडळी आणि मिहीरचे कुटुंबीय तेवढे पूजेला होते. पूजा आटोपली, जेवणे झाली. विश्वासने मोहनच्या हातात एक पाकीट ठेवले. त्यात स्वित्झरलँडसाठी दोन तिकिटं होती.


"आमच्या कडून हे छोटेसे गिफ्ट. सात दिवस जरा बाहेर फिरून या." विश्वास हसून म्हणाला.


"दादा, याची खरंच गरज होती का? उलटपक्षी मला हा वेळ तुम्हा सर्वांसोबत घालवायचा आहे." सोनिया त्याच्याकडे बघत म्हणाली.

"याह, ऑफकॉर्स! आम्हालाही तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. त्यामुळे तुम्ही परत येईपर्यंत आम्ही इथे थांबतोय की. तेवढा वेळ आम्ही आमच्या भाच्यांसोबत घालवू." विश्वास म्हणाला.

"हो, म्हणूनच तर केवळ सात दिवसांसाठी बाहेर पाठवत आहोत. नाहीतर दादाने तर पूर्ण एक महिन्याचा प्लॅन केला होता." रजत हलके हसून म्हणाला.

"खरंय. तुम्हाला तेवढा वेळ एकत्र स्पेंड करायला हवाच. इतक्या वर्षांचा दुरावा मिटवायला इतका वेळ हवाच ना?" विरेनने देखील त्यांच्या सुरात सूर मिसळला.

तिघा भावंडांपुढे तिला शेवटी होकार द्यावा लागला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.


"पण ही तिकिटं तर उद्याच्याच फ्लाईटची आहेत. उद्या तर आबांना कोल्हापूरला सोडून द्यावे लागेल. तेव्हा आम्ही कसे जाऊ शकतो?"  मोहन एकदा आबाकडे आणि मग विश्वासकडे पाहून विचारत होता.

"बाबा, यू डोन्ट वरी. जस्ट फोकस ऑन युअर ट्रिप. इथे आम्ही आहोत ना? आम्ही आबांना सोडून देऊ, काय मिहीर अंकल?" तिने एक कटाक्ष मिहीर कडे टाकला.

"अं? हो, हो. नो प्रॉब्लेम. मी आहे ना इथे. यू डोन्ट वरी. दोघं मस्त एंजॉय करा." मिहीरने एक मोठी स्माईल करून त्यांना आश्वस्त केले.

********

"शालिनी, मग तू काय विचार केलाहेस?" स्वयंपाकघरात मुद्दाम पाणी घ्यायला आलेली माही शालिनीला विचारत होती.

"तुम्ही नेमके कशाबद्दल बोलत आहात, मला खरेच कळले नाही." शालिनी म्हणाली.

"हम्म, लग्नाबद्दल. तू कधी लग्नाचा विचार का केला नाहीस?" माहीने तिला आता जरा स्पष्टच प्रश्न केला.

"एकदा केलेय मी लग्न. बालपणापासून ज्याची स्वप्न पाहिली होती त्याच्याशीच केले होते. त्यानंतर परत विषाची परीक्षा द्यायची हिंमत झाली नाही. आणि आता आहे ते आयुष्य मी स्वीकारलेय." ती नम्रपणे म्हणाली.

"पण ह्या वेळी ते विष नसून अमृत असेल तर?" माहीच्या स्वरात एक निर्मळ शांतता होती.

"म्हणजे? मी समजले नाही." शालिनी माहीकडे बघत होती.

"शालिनी, मला चुकीचे समजू नकोस." तिचे हात हातात घेऊन माही म्हणाली. मी तुला पाहिल्यांदा पाहिले तेव्हाच तू मला आवडलीस. तू माझी वहिनी व्हावीस, ही माझी इच्छा आहे" माही मोठ्या आशेने तिच्याकडे पाहून म्हणाली.

"म्हणजे? मला कशाचाच संदर्भ लागत नाही आहे." शालिनीच्या चेहऱ्यावरचा गोंधळ स्पष्ट दिसत होता.

"मिहीर, माझा भाऊ. तू त्याला बघितलेसच. त्याच्याशी लग्न करशील?" माहीच्या डोळ्यात एक अर्जव होते.

शालिनी तिच्याकडे चेहऱ्यावर मोठे प्रश्नचिन्ह घेऊन बघत होती.

"तू ज्या आगीत इतकी वर्ष पोळत आहेस, त्याच अग्नीच्या दाहात तोही जळतो आहे. खरे प्रेम त्याच्या वाटेला कधी आलेच नाही. एकमेकांच्या दाहकतेवर फुंकर घालून त्याची सहचारिणी होशील का?" इतका वेळ आडून आडून विचारलेले आता ती स्पष्टच विचारत होती.

"मी असा कधी विचारही केला नाहीये." शालिनी नम्रपणे म्हणाली.

"मग एकदा विचार करून बघ ना." माही.

"मी या वयात आबांना सोडून नाही राहू शकत." शालिनी.

"त्यांना सोडायला कोण सांगतय? तू फक्त लग्नाचा विचार करावेस असं मी म्हणतेय. कसली घाई नाहीये आणि जबरदस्ती तर नाहीच नाही. पण मिहीर खूप चांगला व्यक्ती आहे. तू एकदा स्वतःला आणि त्याला चान्स देऊन बघ." तिच्या डोळ्यात बघून माही बोलत होती. उत्तराची बाजू तिच्यावर सोपवून ती स्वयंपाकघरातून बाहेर निघून गेली.


इकडे काय करावे ते शालिनीला सुचत नव्हते. घशाला जणू कोरड पडली होती. तांब्याभर पाणी घेऊन ती घटाघाट प्यायली.

मोहनशी घटस्फोट घेतल्यानंतर आबा आणि तिच्या वडिलांनी तिला दुसऱ्या लग्नासाठी कित्येकदा विचारले होते. तिने मात्र प्रत्येकवेळी ठामपणे नकार दिला होता.
'आज मी असा कसा ठाम नकार देऊ शकले नाही?' ती स्वतःला विचारत होती. बेसिनमधला नळ चालू करून तिने चेहऱ्यावर पाण्याचा शिपकरा मारला आणि मग ती बाहेर आली.


बाहेर आल्या आल्या हॉलमध्ये तिच्या दृष्टीस मिहीर पडला. तो प्रीतीसोबत काहीतरी बोलत होता. प्रीतीला ती पहिल्यांदा भेटली तेव्हाच तिला ती आवडली होती. 'ही गोड मुलगी मिहीरशी इतके हितगुज करतेय म्हणजे तो नक्कीच चांगला असावा.'  सहजच तिच्या मनात आले आणि त्या विचाराने ती स्वतःच चमकली. मिहीरकडे बघत असताना त्याचीही नजर अचानकपणे तिच्यावर गेली आणि बावरुन मग शालिनीने दुसरीकडे लक्ष केंद्रीत केले.


*******
"मोहन -सोनिया फॉरेनला गेलेत. आता आम्हीही कोल्हापूरला निघतो." दुसऱ्या दिवशी आबा राधामावशीला म्हणत होते.

"आबा, मला तुमच्याशी थोडे महत्त्वाचे बोलायचे आहे, म्हणजे काही विचारायचे आहे." माही शब्दांची जुळवाजुळव करत त्यांना म्हणाली. सोनिया आणि मोहनला सी ऑफ करायला गेल्यावर परस्पर ती इकडेच आली होती.

"हं, बोल ना." ते म्हणाले.

"तुमच्या शालिनीचा हात आमच्या मिहीरसाठी द्याल का?" मनात थोडे घाबरत तिने विचारले. "तुमची शालिनी आम्हाला पसंद आहे." ती.

"अरे, व्वा. ही तर आनंदाचीच बातमी म्हणायची. शालू तू काय म्हणतेस?" तिचे मत जाणून घेणे त्यांच्यासाठी आवश्यक वाटले.

"आबा, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही." ती उत्तरली.

"अगं वेडे, मला सोडायची गोष्ट कुठून आली? आणि मोहन गावलाय ना आता आपल्याला? त्याच्यावरचा रागही मावळलाय. तो आहे की आता माझी काळजी घ्यायला." आबा हसून म्हणाले.

"म्हणजे आबा, मोहन परत आला म्हणून मी तुम्हाला नकोशी झाले होय?" शालिनी स्फून्दू लागली.

"ओ वेडाबाई, रडू नकोस. मोहन माझा मुलगा असला तरी तू माझ्या लेकीपेक्षा कमी नाहीस. उलटपक्षी मोहनपेक्षा तुझ्यावर जीव जास्त आहे माझा." तिला जवळ घेत ते म्हणाले.

:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.

आबा लग्नाला देतील का होकार? वाचा पुढील भागात.

🎭 Series Post

View all