प्रीती.. पर्व दुसरे! भाग -७७

कथा सोनियाची.. तिच्या प्रीतीची!


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -सत्याहत्तर.


"अरे हो,माई मी तर तुला भेटवूनच दिले नाही. या देवकी आई म्हणजे कृष्णाच्या आई." प्रीती देवकी आणि सोनियाची भेट करून देत म्हणाली. मोहनही तिला भेटला.


विश्वास, रजत, विरेन सोबतच मिहीर, समीर, तुषार, माही सगळे तिथे आले. सर्वांनी सर्वांचा परिचय करून घेतला. आज खऱ्या अर्थाने सोनियाच्या कुटुंबाची फॅमिली फ्रेम पूर्ण झाली होती.

********

लग्नाच्या सर्व विधी पार पडल्या होत्या. सगळी मंडळी जेवायला बसली होती. तरुण मंडळींनी आपला एक ग्रुप केला होता. प्रीती- कृष्णा, स्वीटी -समीर यांची जोडी सोबत निकी आणि रॉकी ही भावंड एका ग्रुपमध्ये होते. विश्वास, रजत, विरेन आणि तिघांच्या बायका यांचा एक ग्रुप तर सोनिया - मोहन या नवदाम्पत्यांच्या जोडीला तुषार, माही, मिहीर, शालिनी, आबा, देवकी आणि राधामावशी हे सगळे होते.


सर्वांचे मजामस्ती करत जेवण चालले होते. माही शालिनीच्या अगदी समोर बसली होती आणि योगायोगाने शालिनीच्या बाजूला मिहीर होता. जेवता जेवता माहीचे बारीक निरीक्षण चालले होते. तिच्या मनात अचानक काही तरी आले आणि तिने बाजूला बसलेल्या तुषारला हळूच धक्का मारला. त्याने तिला नजरेनेच 'काय?' म्हणून विचारले.

"समोर बघतो आहेस?" त्याच्या कानाजवळ ती हळूच कुजबुजली.

"वॉव! फँटॅस्टिक. समोरचे डेकोरेशन खूप सुंदर आहे गं. माझे लक्षच नव्हते." एक मोठी स्माईल देत तुषार म्हणाला.

तसे तिने त्याच्या पायावर जोरात पाय दिला.

"आँऽऽ" तो कळवळला. "काय झालं? डेकोरेशन छान नाही आहे का?" तिच्याकडे प्रश्नार्थक बघत तो.

"डेकोरेशन काय बघतोस रे? तुझ्या अगदी समोर बघ." काहीशा रागात ती म्हणाली. कोणाला कळू नये म्हणून ओठावर मात्र छोटेसे स्मित होते.

"काय?" तो बिच्चारा चेहरा करून म्हणाला.

"अरे वेड्या, राजयोग." गालात हसून माही म्हणाली.

"राजयोग?"तुषार डोके खाजवायला लागला.

"असा रे कसा बुद्धू आहेस? आपल्या गुरुजींनी नाही का सांगितलं की त्याच्या आयुष्यात राजयोग येणार आहे म्हणून?" त्याचा हाताचा चिमटा काढून ती हळूच बरळली

आता तुषारच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्याने समोर बसलेल्या मिहीर आणि शालिनीकडे पाहिले आणि माहीचे म्हणने त्याला पटले.

"हो, तू म्हणतेस ते खरं आहे गं. पण आपल्या राजाला पण कळायला पाहिजे ना की त्याचा योग त्याच्या बाजूलाच आहे." तो तिच्या कानाजवळ बारीक आवाजात म्हणाला.

"त्याला नाही कळले तर मग आपण कशाला आहोत? आपण कळवून देऊ की. सोनियाच्या वेळी तूच तर त्याला प्रेमाची जाणीव करून दिली होतीस, आता मी करून देईन." ती खुसपुसली.


"माही, तुषारराव मघापासून काय सुरू आहे तुमचे? नवीन जोडपे गुमान जेवत आहेत आणि तुम्ही काय एकमेकांच्या कानाला चिकटलात?" इतका वेळ शांत बसलेली राधामावशी त्या दोघांना म्हणाली, तसे दोघे हसून बाजूला झाले.

*******

"शालिनी राईट?" जेवणानंतर थोडा वेळ आराम केल्यावर सायंकाळी पुन्हा सगळी मंडळी जमली होती. माही मुद्दाम शालिनीशी बोलायला गेली. तिला ती चांगलीच भावली होती.

शालिनीने माहीकडे बघून स्मित केले.

"मी माही, मिहीरची बहीण." ती काही बोलली नाही म्हणून माहीनेच पुढे विषय वाढवला.

"हो, ओळखते ना. जेवताना समोरच बसला होतात की." शालिनी.

"हो, आणि तुझ्या बाजूला बसला होता तो मिहीर. बाय द वे तुला असं एकेरी बोलले तर चालेल ना?"

माहीच्या बोलण्यावर शालिनीने मान डोलावली.

'ही फक्त हसते किंवा मान डोलावते. जास्त बोलता येत नाही का?' मनात माही म्हणत होती.

"मग, कसा वाटला आमचा मिहीर?" अचानक माही बोलली तसे गोंधळून शालिनीने माही कडे पाहिले.
"कसे वाटले पुणे? आवडले की नाही?" तिचा गोंधळलेला चेहरा बघून माहीने लगेच विषय बदलला.

"छानच आहे की." शालिनी उत्तरली.

"तूही खूप छान आहेस. आवडलीस मला." माही गोड हसली.

"थँक यू." शालिनीच्या चेहऱ्यावर स्मित होते.

"त्याला बघितलेस? माझा मुलगा आहे, समीर. त्याचे आणि स्वीटीचे दोन महिन्यांनी लग्न ठरलेय." माही सांगत होती.

"अरे व्वा!अभिनंदन."

"धन्यवाद आणि तुलाही अभिनंदन. त्याचे काय आहे ना या लग्नामुळे आपल्यात पुन्हा नाते निर्माण होईल." माहीने एक पॉज घेतला. "हे नाते आणखी वाढवायला तुला आवडेल?" तिच्याकडे आशेने पाहत माहीने विचारले.

"सॉरी, मला कळले नाही."शालिनीचा परत गोंधळ उडाला.

"ठीक आहे. कॉफी घेऊया नंतर बोलू, चालेल?" माहीच्या बोलण्यावर परत तिने मान डोलावली.

"हेय, तुषार, मिहीर. जॉईन विथ अस फॉर कॉफी." समोरून येत असलेल्या तुषार आणि मिहीरला तिने त्यांच्याकडे बोलावले.

"सॉरी, मला जायला हवं. आबांच्या गोळ्या खायची वेळ झालीये." कॉफी झाल्यानंतर शालिनी उठली.

"मिहीर, शालिनी कशी वाटते." ती जात असलेल्या दिशेने बघत माहीने मिहीरला विचारले.

"छानच आहे." त्याच्या कॉफीचा मग ओठांना लावत तो म्हणाला.

"डोळे बघितलेस तिचे? किती सुंदर काळेभोर आहेत नाही? अगदी शैलीसारखे."
तिच्या बोलण्यावर मिहीरने चमकून तिच्याकडे पाहिले.


"मिहीर, तू शैलीचे प्रेम सोनियात शोधायचे प्रयत्न केलेस. एकदा शालिनीच्या डोळ्यात शैलीला बघ ना." ती शांतपणे म्हणाली.


"काय बोलते आहेस तू?" तिच्याकडे मिहीर आश्चर्याने बघत होता.


"स्पष्टच बोलते, गुरुजींनी सांगितले होते, शालिनी तशीच आहे. प्रेमात जो अनुभव तुला आला तिनेही ते सोसलेय. मला वाटते, तिच्याबद्दल तू विचार करावा. छान आहे ती. आम्हाला आवडलीय. आणि तसेही तू काय आयुष्यभर एकटा राहणार आहेस का?" माही त्याला डायरेक्ट विचारत होती.


"प्लीज. आपले या वरून आधीच बोलणे झालेय." तो उठत म्हणाला.

"मिहीर." माहीने त्याचा हात पकडून खाली बसवले. "माझा एकुलता एक भाऊ आहेस तू. तू आयुष्यभर असाच राहशील तर मेल्यावर माझ्या आत्म्याला शांती तरी लाभेल का? जरा तरी विचार कर ना. लव्ह मॅरेज नाहीये तुझ्या आयुष्यात. पण अरेंज मॅरेज तर आहे ना. आणि शालिनी इज स्वीट गर्ल. प्लीज, थिंक अबाऊट हर."
यावेळी माही तिथून उठून गेली.


"ही काय बोलली आता? आत्म्याला शांती बिन्ती म्हणजे काय होतं हे?" तुषारकडे बघून मिहीर.


"साले साहब, सध्या माही सिरीयस मोड मध्ये आहे. तेव्हा ती म्हणते त्याचा तूही सिरीयसली विचार करावेस असे मला वाटते." त्याच्या पाठीवर थाप देत तुषार देखील तिथून दुसरीकडे गेला.

******

आता तिथे मिहीर एकटाच उरला होता. पलीकडच्या टेबलवर देवकी, राधामावशी, आबा बसले होते. शालिनी तिथे जाऊन आबाची काळजी घेत होती, त्यांना हवे नको ते बघत होती. तिच्या एकेक कृतीला तो नकळत न्याहाळत होता. तिचे चालणे, बोलणे, वागणे एखाद्या घरंदाज स्त्रीसारखे होते. काहीतरी विनोद झाला असावा तिथे, ती अगदी खळखळून हसली आणि हसली तेव्हा ओठाआडील एका पंक्तीत असलेले शुभ्र मोती उधळल्यासारखे त्याला वाटले. शालिनी सुंदर तर होतीच, हसू ओठावर आले आणि तिचे सौंदर्य आणखीनच बहरले. तिला तसे बघून कुणास ठाऊक का पण मिहीरचे ओठ देखील अलगद उमलले.

'मी तिचा विचार का करतोय पण?' लगेच त्याच्या मनात विचार डोकावला.

"सुंदर आहे ना शालिनी आँटी?" त्याच्याजवळ येत हळुवारपणे कोणीतरी विचारत होते.


"हम्म. शी इज ब्युटीफुल." तो चटकन बोलून गेला.


"तसेही मी तिला आँटी म्हणतेच, तुमची इच्छा असेल तर ऑफिशियली आँटी म्हणायला आवडेल मला."

त्याने चमकून आवाजाच्या दिशेने बाजूला बघितले तर प्रीती त्याच्याकडे खट्याळपणे बघून हसत होती.

"प्रीती? तू केव्हा इथे आलीस?" त्याने बावरून विचारले.


"जेव्हा तुम्ही शालिनी आँटीकडे टक लाऊन बघत होतात तेव्हा." ती हसून उत्तरली.

"काहीही तुझे." नजर टाळत तो म्हणाला.


"खरंच अंकल, तुम्ही ज्या फेजमध्ये अडकला होतात तिथून बाहेर पडले आहात तर पुढे विचार करायला काय हरकत आहे? आणि शालिनी आँटी हा तर बेस्ट ऑप्शन आहे. स्वभावाने खूप गोड आहे ती." त्याच्या नजरेला नजर भिडवत ती म्हणाली.


"तुला खरंच असं वाटतं?" त्याने तिची नजर न टाळता विचारले.


"येस अंकल. असे झाले तर तो तुमचा राईट डिसिजन असेल."

"हम्म. तू म्हणतेस तर पुढे विचार करायला हरकत नाही.तशीही तुझी नजर पारखी आहे. आणि ताई- जिजुंना हेच वाटते आहे. म्हणून मी विचारात पडलो होतो. तसेही तुम्हा सगळ्यांचे लग्न झाल्यानंतर मी एकटाच पडेन की. मग मलाही आपला पार्टनर शोधायला हवा. काय म्हणतेस?" तो म्हणाला.

"ग्रेटच." तिने अंगठा दाखवला तसे त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

"व्वा रे, मी म्हणाले तेव्हा मला गप्प केलेस आणि प्रीती म्हणाली तर लगेच ऐकलंस." माहीने त्याचे कान पकडले. खरे तर तिनेच प्रीतीला त्याच्याकडे पाठवले होते.

"हम्म, आफ्टरऑल शी इज माय प्रिन्सेस. तिचे मला ऐकावेच लागेल ना." माहीकडे बघून मिहीर म्हणाला.

"हुर्रे!" आतापर्यंत त्याच्याजवळ सर्व तरुणमंडळी गोळा झाली होती. त्याचा होकार ऐकून सगळ्यांच्या अंगात आनंदाचे वारे शिरले होते.


"श्श! शांत. मिहीर काही तुमच्या एवढा नाहीये, असा जल्लोष करायला. आधी मला आबांना रीतसर मागणी घालू देत. त्यांनी होकार दिला तर मग जंगी पार्टी करूया." माही त्यांना दमटावत म्हणाली.


इकडे एका सेपरेट टेबलवर बसलेल्या मोहन आणि सोनियाला काय चाललेय, याचा अंदाज येत नव्हता. शालिनी तर या सर्वापासून दूर आबा, देवकी आणि राधामावशी असलेल्या ठिकाणी गप्पा मारण्यात गुंग होती.

:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.

आबा होकार देतील का? वाचा पुढील भागात.

🎭 Series Post

View all