प्रीती.. पर्व दुसरे! भाग -७६

कथा सोनियाची.. तिच्या प्रीतीची!


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -शहात्तर.

"म्हणजे?" तिने नजरेने विचारलेल्या प्रश्नाला त्याने नजरेनेच उत्तर दिले आणि समोरच्या रांगेत बसलेल्या देवकीकडे बोट दाखवले. आत्तापर्यंत समोरच्या रांगेतील या खुर्च्या रिकाम्या होत्या. त्या आता भरल्या होत्या. एका खुर्चीवर देवकी आणि बाजूला तिचे आबा बसले होते. ते बघून ती भारावली.

"कृष्णा तू आबांना घेऊन आलास? तुझे त्यांनी कसे ऐकले?" डोळ्यात पाणी घेऊन तिने विचारले.

"कृष्णा है तो सब मुमकिन है." कुर्त्याची कॉलर टाईट करत तो म्हणाला.


"तुझ्या याच अदेमुळे तर पुन्हा पुन्हा प्रेमात पडते मी." प्रीती गोड हसून म्हणाली. तिच्या डोळ्यात त्याच्याबद्दल प्रेमासोबतच एक अभिमानही दाटला होता.


"थँक यू." तो तिच्या आणखी जवळ येऊन म्हणाला.


"आणि शालिनी आँटी? त्या कुठे आहेत?" किंचित मागे सरकत तिने विचारले.


"तूच शोध ना." तिच्या गळ्यात त्याने दोन्ही हात गुंफले. त्या निळ्या डोळ्यात त्याला हरवायला होत होते.


"काय करतो आहेस? सगळे आहेत इथे." शहारून तिने आपले अंग चोरून घेतले.

"डोन्ट टेक इट अदरवाईज. एक सिक्रेट सांगायचे होते म्हणून जवळ आलोय." तिच्या डोळ्यांवरची नजर न हटवता तो म्हणाला.

"काय?" कसाबसा तिचा आवाज बाहेर पडला. त्याच्या अशा जवळ येण्याने हृदयाची धडधड कित्येक पटीने वाढली होती.


"यू आर लूकिंग सो ब्युटीफुल."तिच्या चेहऱ्यावर हळूच फुंकर मारून तो म्हणाला.


"सेम टू यू." त्याला दूर ढकलून ती म्हणाली.

"अरे व्वा! मी ब्युटीफुल आहे हे आजच मला कळलंय." तो हसून म्हणाला.

"ब्युटीफुल नाही रे, मला हँडसम म्हणायचे होते." तिच्या हृदयाची कंपने अजूनही जोरात सुरू होती.

तिच्या अशा बावरण्याने त्याला आणखी हसायला येत होते. तो आता तिच्या बाजूला झाला. तिच्या हृदयाची स्पंदने त्यालाही जाणवत होती. ती रिलॅक्स व्हावी म्हणून तो दोन मिनिटे गप्प राहिला.


"प्रीत, लुक ऍट द्याट." ती अजूनही त्याच्याच विचारात खाली मान घालून होती. त्याने किंचित हसून तिचा हात हळूच आपल्या हातात घेतला आणि दुसऱ्या हाताने तिचा चेहरा स्टेजकडे वळवला.


मोहनने सोनियाच्या गळ्यात मंगळसूत्र घातले होते. ते तेच मंगळसूत्र होते जे त्याने पंचवीस वर्षांपूर्वी तिच्यासाठी तयार करून घेतले होते. अगदी साधेसे असे होते ते. त्या काळात त्याने कसेबसे पैसे साठवून घेतले होते. आज सोनिया दागिन्यांनी मढलेली होती आणि तरीही सर्व दागिन्यात ते छोटूसं गळ्यातील उठून दिसत होते. त्यांच्या प्रेमाची झळाळी त्याला आली होती.


सोनिया आनंदी होतीच आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून प्रीतीच्या डोळ्याच्या कडा आनंदाने पाणावल्या होत्या. रुंदावल्या ओठांनी ती समाधानाने तिच्या माई -बाबाकडे पाहत होती.


लग्न पार पडल्याचे भटजीने जाहीर केले आणि त्याच वेळी, "काँग्रॅच्यूलेशन्स!" असा एक गोड ओळखीचा आवाज मोहनच्या कानावर आला. त्याने आश्चर्याने त्याच्या बाजूला पाहिले आणि पाहतच राहिला.


त्याच्यासमोर एक सौंदर्यवती उभी होती. गोऱ्या अंगावर गर्द जांभळ्या रंगाची पैठणी, चेहऱ्यावर हलकासा मेकअप, कपाळावर उमटलेली चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात दागिने, केसावर माळलेला गजरा. अस्सल मराठमोळ्या अंदाजात नटलेले तिचे सौंदर्य उठून दिसत होते. मोहनसोबत सोनियाही काही क्षण ते सौंदर्य न्याहाळत राहिली.

"शालिनी?" तिला अनपेक्षितपणे समोर बघून मोहन भावविभोर झाला. "तू इथे आलीहेस हे बघून किती आनंद झालाय गं मला." त्याने तिला मिठी मारली. शालिनीसोबतच त्याच्याही नयनात अश्रू उभे राहिले.

"सेम हिअर." त्याच्या मिठीतून बाहेर येत शालिनी म्हणाली.

"सोनिया, ही शालिनी आणि शालिनी ही सोनिया." त्याने दोघींची ओळख करून दिली.

"सोनिया, किती सुंदर आहेस तू. मोहनने तुझे वर्णन केले होते त्यापेक्षाही खूप खूप जास्त सुंदर आहेस." शालिनी तिची तारीफ करत होती ते ऐकून सोनिया तिच्याकडे पाहून गोड हसली.

"थँक यू. शालिनी तू सुद्धा फार सुंदर आहेस हं." सोनिया.

"तुझ्यापेक्षा जरा कमीच." शालिनीचेही ओठ रुंदावले.

"सोनिया मला माफ कर. मोहन नाही म्हणत असतानादेखील आत्यासाठी मी त्याला माझ्याशी लग्न करायला भाग पाडले होते. माझे तेव्हा जरासे चुकलेच." हळवी होत ती म्हणाली.

"नाही गं. तुझ्या ठिकाणी तू योग्यच होतीस. कदाचित आपल्या दैवात हेच लिहिले असावे. आता मात्र सगळं ठीक होताना भूतकाळ का उगाळून काढायचा?" शालिनीला प्रेमाने आलिंगन देत सोनिया म्हणाली.


"शालिनी, तू एकटीच? आबा नाही का आलेत?" रुद्ध स्वरात मोहन विचारत होता.

"आबा? आबा ते काय तिथे बसलेत." तिने खुर्चीवर बसलेल्या आबाकडे बोट दाखवले.


"आबाऽऽ" मोहन सोनियाला आबाजवळ घेऊन गेला. इतक्या वर्षांनी एकमेकांना बघून दोघेही गहिवरले होते.


"आबा, आम्हाला आशीर्वाद द्या." सोनियाने मोहनकडे सूचकतेने बघितले आणि दोघे आशीर्वादासाठी खाली वाकले.


"सौभाग्यवती भव!" त्यांनी आपला थरथरणारा हात तिच्या पाठीवर ठेवला आणि दोघांनाही त्यांनी कवेत घेतले.
"इतकी वर्ष नियतीने हिरावलेले सगळे सुख तुमच्या ओंजळीत पडू दे." दोघांना दोन्ही हातांनी गोंजारत आबा बोलत होते.


"आबा मला माफ करा. तुम्हाला गरज असताना मी तुमच्या सोबतीला राहू शकलो नाही." मोहन डोळे पुसत म्हणाला.


"तू कसली माफी मागतोय लेका? मीच तुला समजून घ्यायला कमी पडलो. सूनबाई तुम्हीही मला माफ करा. अशी जीव ओवाळून टाकणाऱ्या तुमच्या सच्च्या प्रेमाला कळायला मला लई वेळ लागला. आमच्या मोहन्यामुळे खूप काही सहन करावं लागलं तुम्हाला." आबांनी हात जोडले.


"आबा, काय बोलताय तुम्ही. मी तुमच्या लेकीसारखी आहे ना? लेकीपुढं कोणी हात जोडतो का?" तिच्या बोलण्यावर आबा गहिवरले.


"सूनबाई तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही सोन्यासारख्या आहात बरं का. अस्सल बावनकशी सोनं. मोहन सांगत होता पण मी त्याचे काय एक ऐकले नाही." तिला प्रेमाने जवळ घेत ते म्हणाले.

आबांची ती ऊबदार मिठी सोनियाला आप्पासाहेबांची आठवण करून गेली. तेही हेच तर म्हणायचे, 'आमची सोना म्हणजे अस्सल बावणकशी सोनं आहे.' त्यांच्या आठवणीचे अश्रू अलगद तिच्या डोळ्यात येऊन विसावले.


"लेकीवरून आठवलं, सूनबाई आमची नात कुठं आहे? मोहनसारखी आहे असे शालिनी सांगत होती, पण मी तिला डोळे भरून पाहू शकलो नाही. आता मला तिला भेटायचे आहे."

आबांनी नातीचे नाव काढताच मोहनने स्वीटीकडे आणि सोनियाने प्रीतीकडे पाहिले. दोघीही धावतच आबाकडे आल्या. डॅडचे फॅमिली मेंबर्स आले म्हणून स्वीटी खूप आनंदली होती. प्रीतीची अवस्था देखील तशीच होती.

"मोहन्या, लेका तुला दोन दोन पोरी आहेत होय? जुळ्या आहेत का?" दोघींकडे आलटून पालटून बघत आबा मोहनला विचारत होते.

"हो आबा, जुळ्याच म्हणायच्या. एक हरवलेली अन दुसरी सापडलेली." मोहन डोळे पुसून म्हणाला.

"प्रीती, स्वीटी आबांना नमस्कार करा." त्याने म्हटले तसे दोघीही खाली वाकल्या.

"नाही पोरींनो, तुम्ही वाकू नका तुमची जागा तर या म्हाताऱ्याच्या हृदयात आहे." दोघींनाही त्यांनी छातीशी कवटाळले.

आता मोहनचे कुटुंब देखील पूर्ण झाले होते.


******

"शालिनी हे सगळं स्वप्नवत वाटत आहे गं. आबा इकडे यायला कसे तयार झाले? हा चमत्कार झाला तरी कसा?" मोहन आश्चर्याने विचारत होता.


"ही सगळी किमया त्या कोल्हापूरच्या हिऱ्याची आहे." कृष्णाकडे बोट दाखवून शालिनी म्हणाली.


"मी विशेष असे काही नाही केले. फक्त सोनिया मॅमची ऑर्डर फॉलो केली." तो सोनियाकडे पाहून म्हणाला.


"सोनिया? तुझ्यामुळे आबा इथे आले? आमच्यातील दुरावा मिटवून आज खूप मोठं गिफ्ट दिलेस तू मला." मोहन तिच्याकडे अभिमानाने पाहत म्हणाला.


"ओह, माई यू आर सिम्पली ग्रेट." तिच्या गळ्यात विळखा घालत प्रीती म्हणाली.

"आबा येणार नाहीत हे कळल्यावर मॅमनी मला फोन केला. त्यांची आज्ञा सर आखों पर मानून मी काल कोल्हापूरला परतलो. आबांना प्रत्यक्ष भेटून त्यांना कन्वीन्स केले. तुमची अख्खी स्टोरी त्यांच्यासमोर मांडली. ते सर्व ऐकल्यानंतर कोणता बाप आपल्या मुलाला अन सुनेला भेटायला येणार नाही? आणि यात माझ्या आईचीही मदत झाली बरं का. ती सुद्धा माझ्यासोबत गावाला आली होती." कृष्णा सांगत होता.


"अरे हो, माई मी तर तुला भेटवूनच दिले नाही. या देवकी आई म्हणजे कृष्णाच्या आई." प्रीती देवकी आणि सोनियाची भेट करून देत म्हणाली. मोहनही तिला भेटला.


विश्वास, रजत, विरेन सोबतच मिहीर, समीर, तुषार, माही सगळे तिथे आले. सर्वांनी सर्वांचा परिचय करून घेतला. आज खऱ्या अर्थाने सोनियाच्या कुटुंबाची फॅमिली फ्रेम पूर्ण झाली होती.

:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all