प्रीती.. पर्व दुसरे! भाग -७४

कथा सोनियाची.. तिच्या प्रीतीची!


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -चौऱ्याहत्तर.

"प्रीती दी, रिंग इज सो ब्युटीफुल." निकी आत येत म्हणाली.

निकी आहेस छोटीशीच, पण डोकं फार चालतं हं." प्रीतीने तिचा कान हलकेच ओढला.

"हां, पण चांगल्या कामासाठीच चालतो बरं." तिने प्रीतीकडे बघून डोळा मारला आणि प्रीतीने डोक्यावर हात मारला.

*******

हो- नाही करता करता शेवटी पंधरा दिवसा नंतरच्या मुहूर्तावर सोनिया मोहनच्या लग्नासाठी शिक्का मोर्तब झाला. प्रीती आणि स्वीटी जरा जास्त उत्साहात होत्या. आणि का नाही असणार? शेवटी त्यांच्या माई -बाबा कम मॉम -डॅडचे लग्न होते ना.


"डॅड, तू ना लग्नासाठी किरमीजी रंगाचा कुर्ता घे. हळदीच्या फंक्शनला येलो कलर आणि नंतरच्या प्रोग्रामसाठी स्काय ब्लू कलर.." स्वीटी खूप जास्त एक्साईटेड होऊन बोलत होती.


"काय चाललंय स्वीटी तुझे? एवढे सारे कपडे कशाला गं?" मोहन डोक्यावर हात ठेऊन विचारत होता.

"डॅड, तुला ना काही कळतच नाही. अरे, तुझं लग्न आहे मग इतके कपडे तर लागतीलच ना? आणि तसेही तुझे चॉईस तेवढं काही चांगलं नाहीये त्यामुळे मलाच सगळे सिलेक्ट करावे लागेल." ती एकदम पोक्त स्त्री सारखी बोलत होती.

"काय?माझा चॉईस चांगला नाहीये?" तो तिच्याकडे डोळे मोठे करून म्हणाला.

"माझ्या मॉमला निवडलेस ही एक चॉईस चांगली आहे रे. कपड्यांचा चॉईस तेवढा चांगला नाही." ती खुदकन हसून म्हणाली.
"आणि तुझ्या लग्नाची पुर्ण शॉपिंग मीच करणार आहे की नाही, मग तू मध्ये मध्ये लुडबुड नाही करायची. फक्त डिझायनरला तुझे माप तेवढे दे. बाकीचे मी बघून घेईन." तिच्या बोलण्याने ती त्याला धमकावत आहे की काय असेच वाटले.


इकडे नवऱ्या मुलीकडे प्रीतीने नुसता धुमाकूळ घातला होता.

"माई, ही ना रेड बॉर्डर असलेली मोतिया कलरची साडी लग्नात कशी दिसेल? नाहीतर त्यापेक्षा आपण एक काम करूया, तुला आवडणाऱ्या गुलाबी रंगाचा लेहंगा डिझाईन करून घेऊया." ती जरा जास्तच उत्साहात होती.

"प्रीती काहीतरी गं तुझे. माझे काय वय राहिलेय का एवढी फॅशन करायची?" सोनिया हसून म्हणाली.

"माई एज इज जस्ट अ नंबर फॉर यू. तू अजूनही खूप सुंदर आणि तरुण दिसतेस बरं. तुझ्यासमोर तर मी सुद्धा अगदीच ही दिसते." प्रीती तिची स्तुती करत म्हणाली.

"तुला ते टिपिकल शालू वगैरे नेसायचे आहे का?"

"प्रीती, हे नटण्याची दिवस तर तुमचचे आहेत बाळा. का उगाच माझ्या मागे लागतेस? हो की नाही गं मावशी?" सोनिया राधामावशीकडे बघत म्हणाली.

"सोना, प्रीती म्हणते तेच योग्य आहे. अगं इतक्या वर्षांनी आपण हे मंगल कार्य पार पाडणार आहोत, मग तुझी हौस तर पूर्ण व्हायलाच हवी ना? प्रीती तू तिच्याकडे लक्ष नको देवू. तुला जे वाटते ना ते खरेदी कर." राधामावशी प्रीतीला दुजोरा देत म्हणाली.

"ठरलं तर मग. राधाई, ही पिवळी साडी हळदीच्या कार्यक्रमासाठी. लग्नासाठी मस्तपैकी पैठणी आणि नंतर पार्टीसाठी गुलाबी रंगाची डिझायनर साडी."

ती एक एक साड्या सिलेक्ट करत बोलत होती. तिच्या मदतीला मधुरा आणि निकीही आल्या.

वर वधूच्या कपड्यांचे सिलेक्शन झाल्यावर समस्त महिला वर्गाने त्यांची खरेदी केली. या खरेदीमध्ये संपूर्ण दिवस गेला.

दोन्ही घरी लग्नाची तयारी मोठ्या धूमधडाक्यात साजरी होत होती. मिहीर आणि समीरचे कुटुंब वराकडून होते. तर वधूकडे विरेन, मधुरा, निकी, प्रीती आणि राधामावशीने मिळून कसलीच कसर सोडली नव्हती.

प्रीतीचा आग्रह म्हणून मोहनने गावाला असलेल्या शालिनी आणि आबाला निमंत्रण धाडले पण तिकडून अजूनपर्यंत काहीच उत्तर मिळाले नव्हते. आबाला तर मोहनचे तोंड देखील बघायचे नव्हते तेव्हा ते येतील ही आशा दुरापस्त झाली होती.

संपूर्ण कार्यक्रमासाठी एक आलिशान हॉटेल बुक केले होते. सगळ्यांची स्पेशल सोय करण्यात आली होती. पाहुणे मंडळी अशी फारशी नव्हतीच कुणी. सोनप्रीतचा अख्खा स्टॉफ मात्र तीन दिवसापासून आवर्जून हजेरी लावणार होता. शेवटी सोनप्रीतच्या मालकीणीचे लग्न होते.

मेहंदीचा कार्यक्रमात सर्वांनी आपल्या हातावर मेहंदी काढून घेतली होती. स्वीटी या सगळ्या कार्यक्रमात खूप उत्साहाने वावरत होती. तिच्या आयुष्यातला हा पहिला फॅमिली प्रोग्राम होता. या आधी तिला असे अनुभवायला मिळाले नव्हते.

तिने मस्त दोन्ही हात भरून मेहंदी काढली. हातावरच्या सुंदर अशा अगदी बारीक बारीक डिझाईनमध्ये ती कितीतरी वेळ हरवून गेली होती. गालावर उडणाऱ्या केसामुळे तिला अडथळा येत होता आणि हे केस बाजूला कसे सारायचे हा प्रश्न तिला छळत होता. तेवढ्यात एक मऊ स्पर्श तिच्या गालाला झाला. इतका वेळ तिला न्याहाळत असलेला समीर तिच्या जवळ कधी आला तिला कळलेच नाही.

"लुकिंग ब्युटीफुल!" तिचे केस हलकेच कानामागे घेत तो हळूच तिच्या कानात म्हणाला. त्या गरम श्वासाने तिच्या शरीरातून एक गोड शिरशिरी उमटल्यासारखी तिला वाटले. जेवणाच्या टेबलवरही तो तिला भरवत होता आणि ती आनंदाने सगळे एंजॉय करत होती.

त्यांचा हा हलकाफुलका रोमान्स बघून प्रीतीला कृष्णाची प्रकर्षाने आठवण झाली. 'तो असता तर किती मजा आली असती.' उगाच हा विचार तिच्या डोक्यात चमकून गेला.

"कृष्णा नाहीतर काय झाले? तुझी काळजी घ्यायला मी आहे ना." तिच्यासमोर बाउलमधले सूप चमच्यात घेत मिहीर म्हणाला.

"मिहीर अंकल, अहो मी करेन ना मॅनेज." प्रीती बळेच हसून म्हणाली.

"तू करशीलच गं मॅनेज पण तुझ्याकडे नीट लक्ष दिले नाही म्हणून आयपीएस साहेब आम्हाला फाडून खातील त्याचे काय?" तिला मिहीर चिडवत होता.

"नाही हं, कृष्णा तसा बिलकुल नाहीये. खूप प्रेमळ आहे तो." ती चटकन बोलून गेली आणि आपण काय बोललोय हे कळून तिचा चेहरा लाल झाला.
तिची अवस्था बघून मिहीरला हसू आले.


पलीकडच्या टेबलवर मोहन सोनियाला भरवत होता. दोघांना भेटायला मनाई केली होती तरी सोनियाचे ओल्या मेहंदीने सजलेले हात बघून तो तिच्या मदतीला आलाच. त्याला बघून सोनियाने गोड स्मित केले.

"अंकल इट इज नॉट फेअर. तुम्ही रुल तोडलाय. आत्तूला तर बाबा पण भरवू शकत होता. तुम्ही का आलात?" विरेनच्या हातून सूप पीत निकी बोलत होती.

"तुझ्या बाबांचे हाल दिसत आहेत की. म्हणून मदतीला आलोय." विरेनकडे बघून मोहन निकीला म्हणाला. विरेन मध्ये बसला होता आणि त्याच्या दोन्ही बाजूला निकी आणि मधुरा मेहंदीचे हात घेऊन बसला होता.

"मदतच करतो आहेस तर माझीसुद्धा कर ना. माझे हातदेखील मेहंदीने माखले आहेत. राधामावशी मोहनच्या बाजूला येऊन बसली आणि सोनिया गालात खुदकन हसली.

मोहन डोळ्याच्या कोपऱ्यातून प्रीती आणि मिहीरला न्याहाळत होता. त्याच्या हातून ती हसून खात होती. हे बघून कोपऱ्यातले पाणी त्याने लगेच टिपले. 'तिच्यात नि माझ्यात एवढी बॉण्डिंग होईल ना?' सहजच त्याच्या मनात आले.

"ती तुझीच मुलगी आहे. लहानपणापासून मिहीरच्या सानिध्यात आली आहे म्हणून त्याच्याशी जास्त कंफर्टेबल असते. पण तुझ्याशीही लवकरच रुळेल. काळजी करू नकोस." सोनियाने त्याला नजरेनेच दिलासा दिला.

******

दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होता. पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये सोनिया कमालीची सुंदर दिसत होती. मोहनची उष्टी हळद घेऊन माही आली आणि मग इकडे हळदीच्या खेळाचा रंग चढला.

पहिल्यांदा मधुराने हळदीचे पान सोनियाच्या अंगाला हळद लावली. त्या उष्ट्या हळदीच्या स्पर्शाने तिला मनात गलबलून आले. आईसाहेबांनी तेव्हा तिला थोडे समजून घेतले असते तर ही हळद अडीज तपापूर्वीच तिच्या अंगाला लागली असती.

मधुरानंतर राधामावशी आणि तिच्यानंतर प्रीतीनेही तिला हळद लावली. नंतर एकमेकांना हळदीच्या रंगात रंगवणे सुरू झाले. समीर आणि स्वीटी सुद्धा हळदीची उधळण करत होते तर मिहीर आणि मोहनने एकमेकांच्या गालाला हळदीचे बोट लाऊन मिठी मारली.


हळद खेळणे रंगात आले होते. मस्ती, डान्स सर्व सुरू होते. तरुणाईसोबत सोनिया, मोहन, मिहीर, माही, तुषार सर्वच नाचत होते. सोनिया आनंदी होती मनात मात्र कुठेतरी आईसाहेब आणि आप्पांच्या आठवणीने खळबळ माजत होती. विरेन मधुरा तिला खुलवत होते.
तिच्या मनातील भाव न सांगताही त्यांना कळत होते.

अचानक लाईट्स ऑफ झाले आणि तिथे अंधार पसरला. त्यासरशी सर्वांचे थिरकणारे पाय थांबले.

"सरप्राईज!" अचानक डीजेचा आवाज बंद झाला आणि एक ओळखीचा आवाज सोनियाच्या कानावर आला. तेवढ्यात लाईटही ऑन झाले.

सोनियासह सर्वांनी वळून पाहिले. सुंदर साडया नेसलेल्या दोन अनोळखी स्त्रिया समोर उभ्या होत्या. सोनियासह इतर त्यांच्याकडे अनोळखी नजरेने बघत होते.

"मॉम, आँटी.." एकाएक निकीने दोघींना मिठी मारली. "वेलकम टू इंडिया." तिने हसून ग्रीट केले. सोनिया गोंधळून बघत होती. ओळखीचा स्वर कुठून आला त्याचा ती अंदाज लावत होती. तसा विरेन बाजूला झाला आणि तिच्यासमोर दोन हँडसम पुरुष आले.

"विश्वास दादा, रजत दादा?" ती शॉक होऊन दोघांकडे पाहत राहिली.

:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all