प्रीती.. पर्व दुसरे! भाग -६९

कथा सोनियाची.. तिच्या प्रीतीची!


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -एकोणसत्तर.


"एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर डिअर! आणि सोनिया नाही का माझ्यासारख्या कफल्लकाच्या प्रेमात पडली होती.

"डॅड, तुम्ही हिरा आहात हे मॉमला माहित असावं." स्वीटी.

"त्या इन्स्पेक्टरमध्ये एक स्पार्क आहे हे प्रीतीनेही ओळखले असावे. शेवटी सोनियाची लेक ती. तिचीही नजर एका व्यापारीची आहे हे विसरू नको बरं."

मोहन म्हणाला त्यावर स्वीटीने त्याला हसून टाळी दिली.
"यू आर ॲब्स्यूल्यूटली करेक्ट डॅड." तिने त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला.

********
"मिहीर अंकल, गुडमॉर्निंग!" मिहीरच्या केबिनमध्ये प्रवेश करत प्रीतीने त्याला ग्रीट केले.

"अरे प्रीती? गुडमॉर्निंग डिअर. आज चक्क माझ्या केबिनमध्ये? काय काम काढलेस?" खोडसाळ हसून त्याने विचारले.

"ॲक्च्युली अंकल काम आहेच. पण पहिले मला सांगा तुम्ही कसे आहात?" त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसत तिने विचारले.

"हम्म. बरा आहे मी. सोनिया रिकव्हर झालीय. सगळीकडे आनंदीआनंद आहे मी बराच असेल ना?" कोरडे हसून तो.

"अंकल, त्याच विषयावर मला बोलायचे होते. माई आणि बाबांच्या ऑफिशियल लग्नाचं ठरतेय. तुम्ही आनंदी तर आहात ना?" त्याच्या मनाचा ठाव घेत तिने विचारले.

"प्रीती, आय एम सो मच हॅपी! विचार का?" ओठावर स्मित लेवून तो.

तिने नजरेनेच कारण विचारले.

"प्रीती, सोनिया माझी नव्हतीच कधी. हे तुलाही माहिती आहे. इतक्या वर्षांच्या तपश्चर्येचे फळ तिला मिळत आहे. तिचे प्रेम तिला परत मिळते आहे. मग मी हॅपी असेनच ना? आणि त्यांचे नाते तूही एक्सेप्ट केलेसच की." त्याच्या ओठावरचे हसू तसेच कायम होते.

"म्हणजे?" ती.

"म्हणजे कालपर्यंत मिस्टर मोहन म्हणता म्हणता आज चक्क बाबा बोललीस. याचा अर्थ काय समजावा?" तो.

"खरंतर अंकल, मन खूप विचलित झाले होते हो पण जेव्हा त्यांना 'बाबा' म्हणून साद घातली तेव्हा सगळं शांत शांत वाटलं." एक दीर्घ श्वास घेऊन प्रीती बोलली. "अंकल, माझे काही चुकले तर नाही ना?" ती.

"ॲब्स्यूल्यूटली नॉट. तुमच्या फॅमिलीची फोटोफ्रेम कम्प्लिट होतेय, तेव्हा त्यात कुणाची चुकी कशी असू शकते. उलट हे खूप चांगले आहे की. आणि प्रीती तुझ्या लक्षात येतेय का? या नात्याने आपण सगळे खऱ्याखुऱ्या नात्यात बांधले जाणार आहोत."
त्याच्या बोलण्यावर तिने प्रश्नार्थक त्याच्याकडे पाहिले.

"सी, समीर आणि स्वीटीचे लग्न होईल तर आमची फॅमिली आणि तुमची फॅमिली एकत्र येईल की नाही? इट मिन्स आपणा सर्वांचे एका धाग्यात गुंफणे विधिलिखित होते. त्यामुळे कसले टेंशन घेऊ नकोस. गो अहेड. आय एम अल्वेज विथ यू." तिला अंगठा दाखवत तो म्हणाला.

"अंकल, यू आर रिअली ग्रेट. कॅन आय हग यू?" डोळ्यात पाणी घेऊन ती म्हणाली.

"कम ऑन डिअर. तुला कधीपासून परवानगी घ्यावी लागतेय?" आपले हात तिच्यासमोर पसरत तो म्हणाला तशी उठून ती धावत त्याच्या मिठीत शिरली.

लहानपणापासून तिच्या डोळ्यासमोर असलेला तो एकमेव पुरुष होता ज्याला तिच्या माईला प्रत्येकवेळी सपोर्ट करताना तिने पाहिले होते. तिच्या अडचणीत तिच्या पाठीशी खंबीर उभा राहिला होता. सोनिया त्याची नाहीये हे कळूनही तिचे भले चिंतीत होता.

काही नात्याला नावाचे लेबल लावायची गरज नसते. कदाचित तेच अनलेबल्ड नाते मिहीर आणि सोनियाचे होते. आणि म्हणूनच प्रीतीच्या मनात मिहीरबद्दल एक आदराचे स्थान होते. ते आज आणखी वाढले.

*****
"ए, हाय मामुजान. हॅलो प्रीती. बरं झालं तू इथेच भेटलीस." काही वेळाने समीर तिथे आला.

"काय मग छुपेरुस्तम? लग्नाचे कुठवर पोहचले?" त्याच्याकडे मिश्किल बघून हसत प्रीती.

"सर्वांची परवानगी असेल तर लगेच." त्यानेही तिच्या रीसोबत री ओढली.

"गुडघ्याला बाशिंग बांधून फिरतो आहेस की काय?" मिहीर देखील त्यांच्या मस्करीत सामिल झाला.

"मामाश्री, तसेच काही समजा. आपल्या गुरुजीकडून दोन चांगले मुहूर्त शोधायला सांगा." समीर.

"दोन?" मिहीर आणि प्रीती एकाचवेळी म्हणाले.

"हं, दोन. एक सोनिया आँटी आणि मोहन अंकलच्या लग्नाचा आणि दुसरा मुहूर्त स्वीटी मी आणि प्रीती कृष्णाच्या लग्नाचा. काय? बरोबर ना?" तिच्याकडे बघून त्याने भुवई उडवून विचारले.

"काहीही तुझे. तुमचे लग्न होऊ द्या. आम्हाला आणखी किमान सहा महिने वेळ आहे." ती बोलून गेली तसे दोघेही तिच्याकडे तोंडाचा मोठा आ करून बघत होते.

"ओह, असं आहे तर?" मिहीर आणि समीर दोघेही एकत्रच म्हणाले तशी ती काय बोलून गेली हे तिला कळले.

"तसं नाही रे गधड्या." समीरच्या पाठीत धपाटा घालत ती. चेहरा मात्र लाजेने लाल झाला होता.

"आऊच! मामाश्री, बघितलंत? समवन इज ब्लशिंग!" पाठ चोळत समीर.

"ए, जास्त छळू नकोस रे तिला." समीरकडे डोळे मोठे करून मिहीर म्हणाला. "उद्याच गुरुजींना घरी बोलावतो मग तुमच्या मुहर्ताबरोबर सहा महिन्यानंतरचा मुहूर्त असेल तर शोधायला सांगतो." मिश्किलपणे मिहीर.
"
अंकल तुम्हीसुद्धा? जा बाबा." तिला चेहरा कुठे लपवू असे झाले होते.

"ओए लाजाळूचे झाड. आँटीला संगितलेस का कृष्णाबद्दल?" समीर.

"ऊ हूं. मी अजूनतरी काहीच बोलले नाही." ती.

"कमाल आहे. अशा गोड गोष्टी लवकर सांगायच्या असतात. तुला हिंमत नसेल तर मी सांगू का?" समीर हसून.

"अंकल बघा ना, कसा छळतोय हा?" तिने लहानसा चेहरा केला. तसे मिहीरने तिला मिठीत घेतले.

"समीर पुरे आता. पण प्रीती त्याचे म्हणणे मला पटतेय बरं का. शुभस्य शीघ्रम म्हणतात ते काही उगाच नाही. सोनियाशी या विषयावर लवकर बोलून घे." तिच्या केसावरून हात फिरवत मिहीर म्हणाला तसा तिनेही मान हलवून होकार दिला.

*******

"प्रीत, हा कृष्णा कोण आहे?" रात्री जेवणानंतर प्रीती सोनियाच्या खोलीत आली तेव्हा सोनियाने तिला विचारले.

तिच्या अशा अचानक प्रश्नाने प्रीतीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. "माई?" ती कसे तरी अडखळत म्हणाली.

"अगं दुपारी तू गेल्यानंतर राधामावशीच्या मोबाईलवर त्याचा फोन आला होता. माझ्या तब्येतीची चौकशी करत होता. मावशीला विचारले तर ती म्हणाली की तुला विचार, म्हणून विचारतेय." सोनिया.

"अगं, तो ना.. तो कोल्हापूरला इन्स्पेक्टर आहे म्हणजे होता. तुझ्याबद्दल चौकशी करायला कॉल केला असेल."
डोक्यावर हात मारत ती म्हणाली.

"तसा बोलायला बरा वाटला. पाच एक मिनिटं बोललो आम्ही. मला वाटलं तुझा कोणी फ्रेंड असेल म्हणून मी फारसं काही त्याला त्याच्याबद्दल विचारलं नाही." सोनिया.

"तू बोललीस त्याच्याशी?"

"हो, म्हणजे माझ्याच तब्बेतीबद्दल तो विचारत होता तर मीच बोलले. का गं नको होते का बोलायला?"

"अं? ना. मी असं कुठे काही बोलले." प्रीती चेहऱ्यावरचे भाव लपवत हसली. "पुन्हा काही बोलला का तो?" सोनियाकडे बघून तिने विचारले.

"नाही गं. बरं चल गुडनाईट. मी झोपते. तू सुद्धा झोप."

"ओके. गुडनाईट." म्हणून प्रीती जायला निघाली.

"तससे त्याला कॉल केलास तर चालेल असं म्हणाला बहुतेक." जात असणाऱ्या तिला सोनिया हसून म्हणाली.

मिनिटभर तर सोनिया काय बोलली ते तिच्या डोक्यावरून गेले. आणितिच्या खोलीत परतल्यावर अर्थ कळून प्रीती स्वतःला दोष द्यायला लागली.

'गॉड, किती मूर्ख आहे मी? या दोन दिवसात त्याला साधा कॉल करून सांगितले सुद्धा नाही. माझा तरी काय दोष? मला वाटलं तो त्याच्या ट्रेनिंगला जायच्या तयारीत बिझी असेल. आठवण तर प्रत्येक क्षणी येत होतीच की. काय करू आता? कॉल करू का?' हातात मोबाईल घेत ती स्वतःशी बोलत होती.

'पण त्याला वाटेल की माईने सांगितले म्हणून मी कॉल केलाय. नकोच. तोही मला कॉल करू शकला असता ना?' मोबाईल बेडवर ठेवून ती परत येरझारा घालू लागली.

'पण प्रत्येक वेळी त्यानेच का कॉल करायचा? माझीही काही रिस्पॉन्सबिलीटी आहे की नाही?' स्वतःला समजावत ती.

तिने हातात मोबाईल घेतला. 'खरंच करू का?' तिच्या मनात चलबिचल सुरू होती. शेवटी एकदाचा नंबर डायल केलाच. हृदय उगाच धडधडत होते.

"हां, बोला प्रीती मॅडम, आज बरी आठवण झाली." पलीकडून त्याचा आवाज आला.

"कृष्णा अरे, सॉरी. मी तुला माईबद्दल कळवलेच नाही. ॲक्च्युली मला वाटलं तू बिझी असशील. सो.. " ती काहीसं अडखळत बोलत होती.

"एवढं एक्सप्लानेशन द्यायची गरज नाहीये. माझे खबरी सगळीकडे पसरले आहेत त्यामुळे बातम्या कळतात मला." तो.

"तू रागावलाहेस?" ती जरा हळुवारपणे विचारत होती

"ना. मी का रागावू?" तो.

"मग असा का बोलतोहेस? आणि मला कॉल न करता माईशी बोललास. आपल्याबद्दल काही सांगितलेस का तिला?" ती.

"अच्छा! हे विचारायला फोन केलास तर आणि खरंच आपल्यात काही आहे का?" तो.

"कृष्णा?" त्याच्या तशा बोलण्याने तिला धक्का बसला.

"बरं ठेऊ आता? झोपायचेय मला. उद्या निघतोय मी. बाय." तो.

"एक मिनिट. तू खरंच रागावला आहेस होय ना? कृष्णा आय एम सॉरी. तुला कॉल करावा असं कित्येकदा वाटलं पण नाही केला."

"का?"

"कारण माझ्या डोक्यात तुझा विचार आला की नेहमी तूच मला कॉल करतोस. मग या दोन दिवसात का नाही केलास?" तीच त्याला जाब विचारत होती.

कारण प्रीती, यावेळी मी तू कॉल करशील या अपेक्षेत मी होतो. एनिवेज झोपूया आता. गुडनाईट." त्याने फोन ठेवलादेखील.

ती हाताशपणे मोबाईलकडे पाहत राहिली. नंतर डोळे बंद करून स्वतःला बेडवर झोकून दिले.
:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all