प्रीती.. पर्व दुसरे! भाग -६७.

वाचा प्रीती आणि मोहनचा खास भाग!


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -सदुसष्ट.

"डॅड, चल आपल्याला निघायला हवे. मला तुझ्या लग्नाचे भरपूर कामं आहेत." त्याच्याजवळ येत स्वीटी म्हणाली.

"स्वीटी, मला असं वाटतं की आपण पुन्हा काही दिवस इथेच थांबूयात." मोहन.

"डॅड, असं कुठे असतं? लग्न ठरल्यावर नवरा नवरी एका घरात राहत नाही. आता तुम्ही डायरेक्ट लग्नातच भेटायचं. हो ना गं प्रीती?" ती प्रीतीकडे बघून म्हणाली.

प्रीतीचे लक्ष तिच्या बोलण्याकडे होते कुठे? ती तर स्वीटी आणि मोहनकडेच पाहत होती. स्वीटीचे त्याच्याशी इतक्या हक्काने बोलताना बघून तिच्या काळजात काही तरी होत होते. स्वीटीसाठी जे प्रेम ती मोहनच्या डोळ्यात बघत होती, त्या प्रेमासाठी तर तीही आसूसली होती.

"प्रीती मी काय म्हणतेय?" स्वीटीने तिच्या समोर टिचकी वाजवली.

"हं? काय?" प्रीती.

"डॅडचे इथे थांबणे तुला पटते का?" स्वीटी.

"मला न पटण्यासारखे काय त्यात? तुला थांबायचे असेल तर तुसुद्धा थांब." तिच्याकडे हसरा कटाक्ष टाकून प्रीती तिच्या रूममध्ये गेली.

"डॅड, असा अचानक निर्णय का बदलवलास? आपण निघणार होतो ना आता?" स्वीटी.

"हो, पण वाटलं एखादंदिवस तरी आणखी थांबावे इथे. तुला काही प्रॉब्लेम नाहीये ना?" तो.

"छे रे. मला काय प्रॉब्लेम असणार? उलट मी तर इथे एन्जॉय करतेय. चल मग मी निकीला ही गुडन्यूज सांगून येते." ती पळतच निकीच्या खोलीत गेली.

******
प्रीती खिडकीतून बाहेर बघत होती. नभीचा चंद्र शांतपणे तिच्याचकडे बघतोय असे तिला वाटत होते. ही निरव शांतता तिला अस्वस्थ करत होती. मनात साचलेले वादळ पुन्हा पुन्हा तिला ओढून आपल्या गर्तेत सामावून घेत होते. ह्या समयी तिला कृष्णाची आठवण झाली पण तिला त्याच्याशी बोलून मोकळे व्हावे असेही वाटत नव्हते.

मनात नुसते माजलेले काहूर, अन शांत न होणाऱ्या वादळाची चाहूल! तिच्या डोळ्यातील ओल आपोआप गालावर आले.

तिची पावले आपोआप तिच्या आर्ट रूम कडे वळली हातात कुंचला घेऊन ती कॅनव्हासवर फिरवत होती. ती काय काढतेय तिचे तिलाही कळत नव्हते. थोड्यावेळाने चित्र पूर्ण झाले तेव्हा ती बघतच राहिली. तिच्या हातून मोहनचे पोट्रेट रेखाटले गेले होते, जे तिने तिच्या वाढदिवशी सोनियाला रिटर्न गिफ्ट म्हणून दिले होते.

ते चित्र बघून ती क्षणभर थांबली. डोळ्यांच्या कडा केव्हाच ओलावल्या होत्या. "का आलात तुम्ही परत? तुमच्या येण्याने मी आनंदी आहे की नाही? माझ्या मनात काय चाललंय हे मला का कळत नाहीये? मिस्टर मोहन काय हवेय मला? तुम्हीतरी सांगाल का?" चित्रातील मोहनकडे एकटक बघत ती बोलत होती.

"प्रीती, मला एकदा प्रत्यक्षात विचारून तर बघ. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन."
मोहनचचा दाटलेला आवाज तिच्या कानावर आला.

तिच्या आर्टरूममधून दिसणारा प्रकाश बघून मोहन तिथे आला होता. तिथे आल्यानंतर आतील दृश्य बघून तो एकदम स्तब्ध झाला. त्याच्या हातातील कला तिच्या बोटामध्ये उतरली आहे हे त्याला ठाऊक नव्हते.

तो ज्याप्रकारे बेभान होऊन चित्र रेखाटायचा, अगदी तशाच प्रकारे तिचीही बोटी कॅनव्हासवर फिरत होती. तो अगदी विस्मयाने तिच्या बोटांकडेच बघत होता. चित्र पूर्ण झाले आणि त्याच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. तिच्या हातून नकळत त्याचे रेखाटन झाले होते आणि तो स्तब्धपणे फक्त बघत उभा राहिला होता.

जेव्हा ती चित्रातील मोहनशी बोलायला लागली तेव्हा आत येऊन त्याने तिला प्रत्युत्तर दिले.

"मिस्टर मोहन?" ती प्रश्नार्थकपणे त्याच्याकडे वळली.

"हो,मीच. तुझ्या चित्रातील मिस्टर मोहन प्रत्यक्षात तुझ्यासमोर उभा आहे. प्रीती माझ्याशी प्रत्यक्षात बोलायला का घाबरतेस तू? तुला माझी भीती वाटते का? तुला माहिती आहे, तू जितके सुंदर चित्र काढलेस ना कदाचित मीही काढू शकलो नसतो. कुठे शिकलीस तू हे? आर्टचे क्लासेस केले आहेस का?" तिच्याकडे प्रेमळ नजरेने बघत त्याने विचारले.

"नाही." ती खाली नजर करून म्हणाली.

"तुला माहित आहे? माझ्यातील कलेचे जीन्स तुझ्यात पुरेपूर उतरले आहे." तिच्याशी बोलताना त्याच्याही डोळ्यात पाणी आले होते.

ती काही न बोलता त्याच्याकडे पाहत होती.
त्याचे लक्ष अजूनही तिच्या बोटावर खिळले होते. त्याने आपले हात समोर केले.

"प्रीती,बघ. तुझी आणि माझ्या हातांची बोटे एकदम सारखी आहेत. अगदी सेम टू सेम! आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचे साधनदेखील एकच आहे हे कळते तुला? बाळा तू सोनियाची प्रतिकृती असली तरी माझीही लेक आहेस हे नको ना गं विसरु."

तिचे हात घट्ट पकडत तो म्हणाला. तो तिच्या डोळ्यात आरपार बघत बोलत होता त्याच्या नजरेतील कळकळ, त्याच्या हृदयातील प्रेम, मनातील अगतिकता थेट तिच्या हृदयाला जाऊन भिडत होती.

"तुला जर मी नको असेल तर तसे स्पष्ट सांग ना. इतकी वर्ष सोनिया आणि मी सेपरेट होतोच की. आता तुला दुखावून आम्ही एकत्र येणं माझ्यासाठी तरी शक्य नाही. प्रीती बाळा, मला सोनिया हवी आहे पण मला तू ही हवी आहेस. जेव्हा तू मला अगदी मनापासून स्वीकारशील तेव्हाच मी सोनिया सोबतच्या नात्याला पुढे घेऊन जाईल."

त्याने हातात घेतलेल्या तिच्या हातावर त्याच्या अश्रूंचे थेंब पडले आणि तिचे थेंब त्यात मिसळले अन अचानक तिच्या हृदयात काहीतरी टोचल्यासारखे तिला वाटले.

तिने पटकन मोहनला मिठी मारली. "बाबा, आय एम सॉरी!" तिच्या नकळत तिच्या तोंडून निघून गेले.

"प्रीती, तू बाबा म्हणालीस मला?" तिच्या डोक्यावर हात फिरवत मोहन विचारत होता. "हे बघ बाळा, तुझ्यावर कसली जबरदस्ती नाही आहे तुला जेव्हा वाटेल तेव्हाच तू मला स्वीकार." त्याला तिचे मन जाणून घ्यायचे होते.


"तुम्हाला वाटतं की मी तुम्हाला जबरदस्तीने बाबा म्हणतेय?" ती मुसमुसत होती. "माझ्या डोळ्यात एकदा डोकावून बघा तरी. तिथले भाव तुम्हाला खोटे वाटत आहेत का?" एखाद्या लहान लेकराप्रमाणे ती बोलत होती.

"नाही ग बेटू, तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दलच्या भावना मला पहिल्याच भेटीत दिसल्या. इतके दिवस तूच त्यापासून अनभिज्ञ होतीस." तिच्या केसातून प्रेमाने हात फिरवत मोहन म्हणाला.


तिला कृष्णाचे बोलणे आठवत होते. त्याने तिला म्हटले होते उघड्या डोळ्यांनी एकदा मोहनच्या डोळ्यात बघ तुला केवळ त्यांच्या डोळ्यात तुझ्या प्रतीचे वडिलांचे प्रेम ओतप्रोत भरलेले दिसेल. आज तिने तेच केले होते आणि तिला तिचे बाबा भेटले होते.
मनातील सारी किल्मिष दूर झाली होती. पित्याच्या प्रेमळ मिठीत त्याची लेक विसावली होती.

"बाबा, आय रिअली मिस यू. माईला वाटते तेवढी स्ट्रॉंग नाहीये हो मी. इतरांचे बाबा पाहिले की मलाही वाटायचे मला माझे वडील असावेत. पण ते कधी भेटतील असे वाटत नव्हते." ती अजूनही मुसमूसत होती.

"मला माफ कर प्रीती. माझ्या एका चुकीमुळे तुला माझ्यापासून इतकी वर्ष दूर राहावी लागली." तो हळव्या स्वरात म्हणाला.

"तुम्ही सॉरी नका ना म्हणू. मला माहितीये तुमची काहीच चूक नव्हती. कदाचित आपल्या सर्वांच्या प्राक्तनात हेच असावे." ती डोळे पुसून म्हणाली.

दोघांना असे मिठीत बघून दारात उभे असलेल्या सोनियाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. झोपेतून अचानक जाग आल्यावर ती सहज बाहेर आली होती आणि प्रीतीच्या आर्टरूममधील प्रकाश बघून तिची पावले तिकडे वळली होती. मोहन आणि प्रीतीचा संवाद तिने ऐकला होता. बापलेकींच्या त्या भावनिक भेटीची ती मूक साक्षीदार होती. त्यांच्या नात्याची ती पहिली मिठी होती, त्या सुवर्णक्षणाला भंग न करता सोनिया अलगद तिथून निघून गेली.

"बाबा, खूप हलकं वाटत आहे हो. तुमच्या या मिठीसाठी मी किती आसूसले होते." त्याच्यापासून वेगळे होत प्रीती म्हणाली.

"एखादं नातं स्वीकारणे तेवढे कठीण नसते, फक्त तो योग्य क्षणाला आपल्याला पकडता यायला हवं." तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवत तो म्हणाला.
"प्रीती, आतातरी तुझ्या मनातील माझा राग गेला ना?"
तो विचारत होता.

"खरं तर राग असा नव्हताच मुळी. फक्त माझे बाबा माझ्या सोबत का नाहीत हा प्रश्न लहानपणी छळायचा. मोठे झाल्यावर वाटलं की कदाचित तुम्ही माईशी प्रतारणा तर केली नसेल ना? मन ते मानायला तयार नव्हते. गावाला शालिनीऑंटीशी भेटल्यावर ती शक्यता तर पूर्णपणे नाहीशी झाली पण एक अढी निर्माण झाली होती ती या क्षणाला संपूर्ण नाहीशी झाली.

मी तुमच्यासासारखी आहे, हे पहिल्यांदा त्यांच्याकडूनच मला कळले. आपल्या दोघांची बोटे सारखी आहेत, तुमच्या मानेवर असलेला तीळ माझ्याही मानेवर आहे हे त्यांनी मला सांगितले. तुम्ही म्हणालात तसे मी माईची प्रतिकृती आहे पण तुमचीही लेक आहे हे तेव्हाच मला कळले होते." ती मंद हसून म्हणाली.

बाप लेक मग बराच वेळ बोलत बसले. तिने त्याला आपल्या पेंटिंग्स दाखवल्या. त्यातील बारकावे बघताना तो हरखून जात होता. स्वीटीला आर्ट आवडावे म्हणून त्याने कितीदा खटाटोप केला होता पण तिला कधीच त्याच्यात रुची नव्हती. आणि त्याची प्रीती त्याचे कलागूण घेऊन जन्माला आली, हे त्याला ठाऊकही नव्हते.

त्याला असे अचानक गप्प झालेले बघून प्रीतीने खुणेनेच काय झाले म्हणून विचारले. काही नाही म्हणून त्याने मान हलवली. भूतकाळ विसरून आता केवळ वर्तमानावर फोकस करायचा असा त्याने मनात निश्चय केला आणि मग आपसूकच त्याचे ओठ रुंदावले.

:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.

वाचकहो, आजचा भाग फक्त प्रीती आणि मोहनसाठी लिहिलेला खास भाग होता. बापलेकीच्या मनातील द्वंद्व एकदाचे मिटले बाबा. तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कळवा.
धन्यवाद!

🎭 Series Post

View all