Feb 22, 2024
प्रेम

प्रीती.. पर्व दुसरे! भाग -६६

Read Later
प्रीती.. पर्व दुसरे! भाग -६६


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -सहासष्ट.

"हो गं वेडू, मी असं कुठे म्हणालो की स्वीटी माझी आणि शालिनीची मुलगी आहे? ती केवळ माझी लेक आहे." तो म्हणाला.

मुंबईत आल्यावर चाळीतील बायकांनी राधामावशीबद्दल त्याच्या मनात काय काय भरवले आणि त्याला पुढे अनाथाश्रमात स्वीटी कशी भेटली हे सगळे सविस्तर सांगितले.
"आता पटलंय ना की स्वीटी माझी मुलगी आहे म्हणून?" तो.

"हूं." ती रुध्द कंठाने म्हणाली.

"या सगळ्या भूतकाळाच्या जंजाळात अडकलेला मी. हे जाणून घेतल्यावरही तू मला होकार देशील?" सोनियाच्या गर्द निळ्या डोळ्यात त्याची नजर रोखून त्याने विचारले.


"नाही." ती शांतपणे म्हणाली.

"सोना?"
"सोनिया?"
"माई?"
विरेन, राधामावशी, प्रीती सर्वांनी एकाचवेळी तिच्याकडे पाहून म्हणाली.

"अरे, माझे म्हणणे पूर्णपणे ऐकून तर घ्या." ती.
"मोहन, मी नाही म्हणाले म्हणजे, तुला एकट्याला स्वीकारायला मी नकार दिला. मला फक्त तू नकोस तर तुझ्यासोबत तुझी लाडकी स्वीटीदेखील हवीय. स्वीटी, तुला आवडेल का हे?"
मोहन आणि स्वीटीकडे आळीपाळीने बघून सोनिया म्हणाली.

तिचे वक्तव्य ऐकून मोहनच्या आंनदाला पारावर उरला नाही, आणि स्वीटी? तिला तर आश्चर्याचा धक्काच बसला. कोणीही सहज प्रेमात पडेल असे सोनियाचे व्यक्तिमत्व आहे हे निकी तिला बोलली होती. ती या क्षणी हे सर्व प्रत्यक्षात अनुभवत होती. सोनियाच्या प्रश्नावर काय उत्तर द्यावे हे तिला कळत नव्हते. उत्तरादाखल तिने सोनियाला एक घट्ट मिठी मारली.

"डॅडच्या आयुष्यात तुम्ही परत आलात तेव्हा मी काहीशी जेलस झाले होते. बट नाऊ आय एम फिलिंग व्हेरी हॅपी टू एक्सेप्टिंग युअर प्रपोजल." डोळ्यातील पाणी पुसत ती म्हणाली.

सोनियाने एक स्मित केले. "मोहन स्वीटी तर तयार आहे पण तू तयार आहेस ना? " मंद हसत तिने मोहनकडे कटाक्ष टाकला.

"या क्षणापासूचा तुझा प्रत्येक निर्णय मला मान्य असेल." त्या दोघींना कवटाळून तो म्हणाला.

प्रीती त्या तिघांकडे बघत उभी होती.
'किती सहज माईने स्वीटीला स्वीकारले, आणि स्वीटी देखील माईच्या मिठीत विसावली मग मलाच मिस्टर मोहनला स्वीकारायला का कठीण जातेय?' तिच्या डोक्यात वारंवार वळवळणारा प्रश्न पुन्हा मनात डोकावला.

"प्रीती, तू पण ये ना, वी आर सिस्टर्स नाऊ." स्वीटी तिला त्यांच्यात बोलावत होती.

"नको." तिच्या तोंडून पटकन निघाले. म्हणजे जोपर्यंत माई आणि यांचे ऑफिशियल लग्न होत नाही, आपण फॅमिली मेम्बर्स होऊ शकत नाही ना?"
स्वतःला सावरत प्रीती उत्तरली." तुम्ही केक खा ना." मोहनकडे बघत ती.

"अरे हो, ते राहिलेच." म्हणून मोहननने सोनियच्या हातातील केकचा तुकडा खाल्ला.

"मग केव्हा बांधणार लग्नगाठ?" वीरेनने मोहनकडे पाहून विचारले.

"तुमची परवानगी असेल तर आत्ता या क्षणीच." मिश्किल हसून मोहन म्हणाला.

"नाही, नको." विरेन काही उत्तर देण्यापूर्वी प्रीती बोलली.
"म्हणजे, माई आत्ताच कुठे आजारपणातून उठतेय, तिला आणखी थोडे बरे होऊ देऊ आणि मग तुमच्या लग्नाचा ग्रँड सोहळा आयोजित करू. राधाई तुला काय वाटतं?"
आपले म्हणणे मांडल्यावर तिने राधामावशीला विचारले. कुणास ठाऊक का पण ती थोडेसे इनसेक्युअर फील करत होती.

"तुझा मुद्दा मला पटतोय. काही दिवस सोनियाला आराम करू देत. मग हा सोहळा करूया." राधामावशी.

सगळीकडे आनंदीआनंद होता. सर्वांनी केक खाल्यानंतर एक छोटेखानी पार्टी आयोजित करण्यात आली.

"वॉव! खूप दिवसानंतर आज अशी मजा आली. अशा पार्ट्या पुन्हा व्हायला हव्यात." निकी आनंदाने बोलत होती.

"हो, आता रोजच पार्टी करूयात पण आता सोनिया थकली असेल. तिला आराम करू द्या." राधामावशी म्हणाली.

"होय, राधामावशी तू योग्य तेच बोलते आहेस. आम्हीही आता निघतो. सोनिया तू आराम कर." मिहीर म्हणाला.

काहीवेळाने मिहीरचे कुटुंब त्यांच्या घरी परतले.

*******
"सोनिया, मला वाटतं की आम्ही देखील आता निघावे." सोनिया तिच्या खोलीत आराम करत असताना मोहन तिच्याजवळ येत म्हणाला.

"मोहन तू मला परत सोडून जाणार आहेस?" ती त्याच्यावर नजर रोखून म्हणाली.

"नाही गं. असं पुन्हा बोलू नकोस. तुझ्यापासून दूर राहिल्यावर मी काय काय भोगले माझे मलाच माहित. आता पुन्हा ती ताकद माझ्यात नाहीये." त्याच्या डोळ्यात ओल होता.


"अरे, मी जस्ट गंमत केलीय. असा सिरीयस नको होऊ." सोनिया.

"हम्म, माहितीये मला. पण आता अशी गंमत देखील नको वाटते. अनपेक्षितपणे तू मला परत मिळालीस सोनिया. आता शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यापासून वेगळं व्हायचा विचार मनाला शिवणारही नाही." तिचा हात हातात घेऊन तो बोलत होता.
सोनियानेही त्याच्या हातावर तिचा हात ठेवला.

"तुला सांगू मोहन, तू अजूनही तसाच आहेस, रडका. किती रे हळवा आहेस? प्रत्येकवेळी इतके हळवेपण बरे नव्हे."

"खूप प्रयत्न केला पण तुझ्यासारखा कणखरपणा अंगी नाही गं बांधता आला." डोळे पुसत तो म्हणाला. "आणि तसेही दोघांनी सारखं राहून कसं चालेल? दोघे विरुद्ध स्वभावाचे आहोत म्हणून आपलं प्रेमात तसुभरही अंतर आले नाही ना?" तो हलके हसून म्हणाला.

"खरं आहे. म्हणून मी आणि मिहीर माझ्याबाजूने केवळ मित्रच राहिलो. तुझ्याबाजूने तू आणि शालिनीसुद्धा त्याच वर्तुळात राहिलात." ती.

"हम्म.सोनिया एक विचारू? तू स्वीटीला अशी कशी लगेच स्वीकारू शकलीस? म्हणजे तुला माझा राग आला नाही का?" मघापासून त्याच्या मनात असलेला प्रश्न त्याने विचारला.

"मोहन तू माझ्याशी प्रामाणिक आहेस हे मला नव्याने सांगायला हवे का? तू मला भेटायला आलास तेव्हा तुझ्या स्पर्शाने मी शुद्धावस्थेत यायला प्रवृत्त झाले. माझ्याशेजारी बसून तू आपला भूतकाळ सांगत होतास तेव्हा तुझा आवाज माझ्या हृदयापर्यंत पोहचत होता.
तू किती प्युअर सोल आहेस ते कळत होतं रे मला." ती भावनिक झाली होती.

"आणि तरीही शुद्धीत यायला तू इतका वेळ घेतलास. मी किती घाबरलो होतो गं. पण तुझ्या पापण्यांची थरथर मला जाणवली होती. मी प्रीतीला बोललो तर तिचा विश्वास बसेना पण जेव्हा आम्ही दोघं सोबत असताना तू प्रतिसाद दिलास, तेव्हाचा आनंद मी शब्दात सांगू शकत नाही." त्याचा स्वर परत कातर झाला.

"मोहन, तुला कळतंय का? मला आत्ता तू एकटा नको आहेस. प्रीती आणि तू दोघेही माझ्या आयुष्याचा भाग आहात. कदाचित तुम्ही दोघांनी एकमेकांना स्वीकारावे हेच त्यावेळी माझ्या मनात असेल आणि म्हणून तुम्ही दोघं एकत्र आलात तेव्हाच माझी बॉडी रिस्पॉन्स होत असावी." ती.

"होय. तुझे म्हणणे मला पटतेय गं. पण प्रीतीने अजूनही मला माफ केले नाहीये. तिच्या मनात माझ्याबद्दल दुरावा आहे, तो कसा कमी होईल तेच कळत नाहीये." तो.

"रागावली नसली तरी रुसलीय ती तुझ्यावर. आयुष्याची पंचवीस वर्ष ती वडिलांच्या प्रेमाला मुकलीय. दाखवत नसली तरी तिच्या मनात तो एक सल आहेच ना? आपल्या प्रीतीने आपल्याला परत एकत्र आणलं. आता तुझी टर्न आहे मोहन. तुला तिचा रुसवा घालवावा लागेल. तो तू कसा घालवशील तुझे तू बघ. विसरू नकोस तुझी मुलगी असली तरी माझ्या कुशीत वाढलीय ती. तुझ्यासारखी हळवी आहेच पण माझ्यासारखी कणखर देखील आहे. मी तुम्हा दोघांच्या मध्ये येणार नाही. आता तुला एकट्याला तिला मनवायचे आहे. हवे तर चॅलेंज समज." सोनिया त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली.

"येस, मी घेतो हे चॅलेंज. प्रीती माझीही मुलगी आहे ना मग माझ्याशी जुळणारे काही तर गुण तिच्यात असतील. ती नक्की मला स्वीकारेल. आणि जोपर्यंत ती मला बाबा म्हणणार नाही तोपर्यंत मी तुझ्या गळ्यात लग्नाची माळ घालणार नाही. हे प्रॉमिस आहे माझं तुला." सोनियाचा हात दाबत तो म्हणाला.

"अरे, तुम्हा दोघांच्या मध्ये आपल्या लग्नाला का आणतोस?" ती मिश्किल हसून.

"सोनिया, हसू नकोस. आधी लगीन आमच्या नात्याचे मग तुझे नि माझे." तो उठत म्हणाला.

"ऑल द बेस्ट!" त्याला अंगठा दाखवत ती.

"आता जोपर्यंत प्रीती मला स्वीकारत नाही तोपर्यंत मी या घरातून बाहेर जाणार नाही." दरवाजातून सोनियाकडे पाहून तो म्हणाला.
*****

"प्रीती, आय एम सॉरी! मी तुला चुकीचे समजले होते. मला वाटलं की तू माझ्या डॅडना माझ्यापासून दूर नेते आहेस. पण तू तर मला डॅड सोबत एक मॉम सुद्धा दिलीस. थँक यू."
स्वीटी प्रीतीशी बोलत होती.

"मी तुला बोलले होते ना की तुझे डॅड केवळ तुझेच असणार. आणि मॉम काय म्हणतेस गं? माई म्हण ना. माई म्हटलेलं आवडेल माईला." प्रीती हसून.

"आणि तुला? तुला चालेल का मी माई म्हटलेलं?" स्वीटी.

"हो. माईने तुला स्विकारल्यावर मला कशाला काही प्रॉब्लेम असेल?" प्रीती.

"प्रीती, मे आय हग यू?" स्वीटी ओल्या डोळ्यांनी प्रीतीला विचारले.
प्रीतीने स्मित करून आपले दोन्ही हात तिच्यापुढे पसरले. तिच्या मिठीत स्वीटी धावत शिरली.

"यार, आपण जेव्हा शाळेत एकत्र होतो तेव्हाच आपल्याला हे का कळले नाही? आपण तेव्हापासून घट्ट बहिणी झाल्या असतो." स्वीटी अश्रू पुसत म्हणाली.

"मग तेव्हा तर तू मला समीरजवळ भटकूही दिले नसते." प्रीती हसून म्हणाली तशी स्वीटीही हसली.

"प्रीती, आता आपल्याला कामाला लागले पाहिजे. मी डॅडसाठी शॉपिंग करते तू माई साठी कर. दोघे लग्नात एकदम बेस्ट कपल दिसले पाहिजेत."

स्वीटीच्या बोलण्याला प्रीतीने हसून दुजोरा दिला.
तेवढ्यात मोहन सोनियाच्या खोलीतून बाहेर येताना त्यांना दिसला.

"डॅड, चल आपल्याला निघायला हवे. मला तुझ्या लग्नाचे भरपूर कामं आहेत." त्याच्याजवळ येत स्वीटी म्हणाली.

"स्वीटी, मला असं वाटतं की आपण पुन्हा काही दिवस इथेच थांबूयात." मोहन.

"डॅड, असं कुठे असतं? लग्न ठरल्यावर नवरा नवरी एका घरात राहत नाही. आता तुम्ही डायरेक्ट लग्नातच भेटायचं. हो ना गं प्रीती?" ती प्रीतीकडे बघून म्हणाली.

प्रीतीचे लक्ष तिच्या बोलण्याकडे होते कुठे? ती तर स्वीटी आणि मोहनकडेच पाहत होती. स्वीटीचे त्याच्याशी इतक्या हक्काने बोलताना बघून तिच्या काळजात काही तरी होत होते. स्वीटीसाठी जे प्रेम ती मोहनच्या डोळ्यात बघत होती, त्या प्रेमासाठी तर तीही आसूसली होती.
:

क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//