Feb 26, 2024
प्रेम

प्रीती.. पर्व दुसरे! भाग -६५

Read Later
प्रीती.. पर्व दुसरे! भाग -६५
प्रीती.. पर्व दुसरे!
भाग. पासष्ट

"स्वीटी आमची होणारी सून आहे." स्वीटीच्या खांद्यावर हात ठेवत तिने सांगितले.


"व्हॉट? काही दिवस मी बेशुद्ध होते तर किती शॉक मिळणार आहेत मला? समीर तू लग्न करतोहेस? द्याट्स ग्रेट! स्वीटी यू आर सो ब्युटीफुल." तिने स्वीटीला प्रेमाने मिठी मारली.

स्वीटी आजवर अनेकदा मोहनच्या मिठीत शिरली होती. पण एखाद्या स्त्रीने मायेने मारलेली मिठी ही स्वीटीची पहिली मिठी होती. आजवर अशा मिठीची ऊब तिने कधी अनुभवली नव्हती. सोनियाच्या मिठीत स्वीटीला केवळ प्रेम जाणवत होते, आईचे प्रेम!

आणि इकडे मोहन शॉक होऊन माहीकडे तर कधी स्वीटीकडे बघत होता. माही जे बोलली त्याचा त्याला धक्का बसला होता.

'स्वीटी समीरशी लग्न करतेय आणि मला काहीच ठाऊक नसावे?'

त्याने स्वीटीकडे पाहिले तसे तिने नजरेनेच त्याला सॉरी म्हटले. शेवटी बापच तो, त्याने ओठ रुंदावून तिला माफ केल्याची कबुली दिली. बापलेकींचा डोळ्यांनी चालणारा हा मूक संवाद प्रीती बघत होती. क्षणभर तिला स्वीटीचा हेवा वाटला.

"मिहीर, ही सर्व तुझी आयडिया ना?" मिहीरला हग करत सोनियाने विचारले.

"नाही मी फक्त ऑर्गनाईज केलेय. आयडिया तर स्वीटीची होती." स्वीटीकडे बघून तो म्हणाला. तशी स्वीटी गोड हसली. मोहनला आपल्या लेकीचा पुन्हा अभिमान वाटत होता.

"वंडरफुल स्वीटी. आय एम इम्प्रेस्ड. स्वीटीकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकून सोनिया म्हणाली. "समीर, तुझी चॉईस आवडली मला. स्वीटी, तुझी फॅमिली कुठे असते?" तिच्या या प्रश्नाने मात्र सर्वच गडबडले.

"सोनिया आँटी या विषयावर नंतर बोलूया ना. आत्ताचे हे क्षण तुमचे आहेत, त्यावर फोकस करूया. राधाईने तुमच्या आवडीचा केक बनवलाय, त्याचा किती सुगंध दरवळतोय. तुमचे तर तिकडे लक्षच नाहीय."
समीर सोनियाला हॉल मध्ये मध्यभागी सुशोभीत केलेल्या खुर्चीवर बसवत म्हणाला.

"केक? हां, केकचा सुगंध येतोय खरा. राधामावशी आज माझा वाढदिवस आहे का? खरं तर आज कोणता दिवस आहे हेच मला आठवत नाहीये." ती थोडीशी उत्साहित तर काहीशी खट्टू होत विचारत होती.

"तुझा वाढदिवस तर दोन दिवसांपूर्वी झालाय. पण आज तू हॉस्पिटलमधून बरी होऊन स्वतःच्या पायावर चालत घरी परतलीस. मग आजचा दिवस खास नाही का? आज आपण परत तुझा वाढदिवस साजरा करू. मधुरा केक घेऊन ये गं बाई."
राधामावशी हसून म्हणाली.

सोनिया भारावून खुर्चीवर बसली होती. समोर तिचा आवडता केक, तोही राधामावशीने बनवलेला.. तिच्या डोळ्यात पाणी आले पण शिताफीने तिने ते बाहेर येण्यापासून रोखले. या आनंदाच्या प्रसंगात तिला रडायचे नव्हतेच मुळी!

राधामावशीने परत एकदा तिचे औक्षण केले. मेणबत्ती विझवून तिने केक कापला तसा 'हॅपी बर्थडे टू यू!' चा सगळ्यांनी गजर केला.

प्रीती, राधामावशी, मिहीर, विरेन आणि इतर सगळ्यांना केक चारल्यानंतर ती मोहनजवळ आली. ती त्याला केक चारणार त्याचवेळी त्याने तिच्या हातातील तोच केक घेऊन तिला भरवला.

"अरे, तू पण खा ना." ती त्याला म्हणाली.

"मी खाईनच पण त्यापूर्वी तुला काही विचारायचे आहे." तो धीर एकवटून म्हणाला. हृदयाची स्पंदने जरा जास्तच वाढलीत असे त्याला भासत होते. प्रीतीने त्याला दिलेली आयडिया तो अमलात आणणार होता.

"काय?" तिच्या डोळ्यात प्रश्न. इतर सर्वांचे डोळे त्याच्यावरच खिळलेले.

"सोनिया, लग्न करशील माझ्याशी?" त्याने धडधडत्या अंतःकरणाने विचारले.

तिच्यासमोर तो उजवा हात मूठ बांधून उभा होता. सव्वीस वर्षांपूर्वी रंकाळा तलावाच्या परिसरात त्याने तिला प्रपोज केले होते, क्षणभर तीच आठवण पुन्हा जागृत झाली. तेव्हाही तो असाच लटपटत होता आणि आताही त्याची तीच गत होती.

ती काय म्हणते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. प्रीती आणि स्वीटीची नजरानजर झाली. दोघींच्या मनात काय चाललंय याचा दोघींनाही अंदाज येत नव्हता.

"मोहन, तुझ्या या बंद हातामध्ये काय आहे?" त्याच्या प्रश्नाला उत्तर न देता हातावर लक्ष केंद्रीत करत तिने विचारले.

त्याने अलगदपणे मूठ उघडली. त्याच्या हातात एक छोटूसे मंगळसूत्र होते. साधेच पण अस्सल सोन्याच्या दोन छोट्या वाट्या आणि काळ्या मण्यांचे ते मंगळसूत्र बघून सोनियाचे डोळे पाणावले. मुंबईवरून पुण्याला येण्यापूर्वी तिने मोहनने तिच्या गळ्यात घातलेले मंगळसूत्र तोडून टाकले होते, तो प्रसंग तिला आठवला.

"मोहन, हे मंगळसूत्र?" तिने हळव्या स्वरात विचारले.

"मी तुला बोललो होतो ना की लवकरच तुझ्यासाठी खरेखुरे मंगळसूत्र घेईन म्हणून? गावावरून मुंबईला आलो तेव्हा गाठीशी थोडा पैसा होता. मग आपल्या खोलीवर येण्यापूर्वी मी हे मंगळसूत्र घेतले होते." बोलताना तो सुद्धा हळवा झाला होता.

"मोहन, तू मुंबईला परत आला होतास?" डोळ्यातील हेलकावणाऱ्या निळया समुद्राला आवरत तिने त्याच्याकडे पाहून विचारले.

"हम्म, आलो होतो खरा, पण खूप उशीर झाला होता." आवंढा गिळून तो उत्तरला.

"तू मला लग्नासाठी विचारलेस ना? तू मला पहिल्यांदा विचारलेस तेव्हाही मी तयार होते आणि आजही आहे. मोहन, हृदयाच्या त्या कप्प्यात केवळ तूच होतास आणि आहेस रे. मी कधीही तिथे दुसऱ्या पुरुषाला प्रवेश करू दिला नाही." त्याच्या हातातील मंगळसूत्र घ्यायला तिची बोटे सरसावली तसे त्याने त्याचा हात मागे घेतला.

"मोहन..?" त्याच्या कृतीने तिच्या नजरेत परत प्रश्न उभा ठाकला.

"मला माहितीये सोनिया, तू माझी जागा कोणालाच दिली नाहीस. मी सुद्धा कायम तुझ्यावरच प्रेम केले पण मला तुला एक सत्य सांगायचे आहे." तो हिंमत करून बोलत होता. आता त्याला त्याच्या आणि तिच्यामध्ये कोणताही आडपडदा नको होता.

सोनिया त्याच्याकडे केवळ प्रश्नार्थक पाहत होती. तो काय बोलतोय हे तिला कळत नव्हते.

"सोनिया, माझ्या आयुष्यात आणखी एक स्त्री आली होती, जिच्याशी मी लग्न केले होते." तो सांगत होता.

"मोहन.." तिच्या तोंडून अस्पष्ट बाहेर पडले.

त्याच्या आयुष्याची ही बाजू प्रीती आणि राधामावशीशिवाय तिथे उपस्थित असलेल्या कोणालाच माहिती नव्हते. स्वीटी तर तिचा डॅड काय बोलतोय याचाच विचार करत होती.

"मोहन, आता हे सांगणे आवश्यक आहे का?" सोनियाची अवस्था बघून राधामावशी कापऱ्या आवाजात म्हणाली.

"हो मावशी, सोनियाला हे माहित असणे आवश्यक आहे. रादर हे सर्व जाणून घेण्याचा तिचा हक्क आहे." तो.

"तू काय बोलतोहेस ते मला कळेल का? कोणाशी लग्न केलेस तू?" स्वतःला सावरत सोनिया.

"शालिनी." तो शांतपणे म्हणाला. "आईला बरं नव्हतं म्हणून मी तुला राधामावशीकडे सोपवून मुंबईहून गावाला गेलो आणि तिथे मला शालिनीशी लग्न करावे लागले."

गावाला गेल्यावर काय काय घडले हे सगळे त्याने सर्वांसमोर सोनियाला सांगितले. त्याच्या आईला आलेला हृदयविकाराचा झटका, शालिनीशी इच्छा नसतानासुद्धा आईसाठी केलेले लग्न, आणि पूजेच्या दिवशी तिचा झालेला मृत्यू.. सारेकाही त्याने तिच्यासमोर मांडले.

"तुझ्या प्रेग्नन्सीत हे सगळे तुला मी कसे सांगणार होतो? तुझ्यावर त्याचा वाईट परिणाम होईल म्हणून मी काही न सांगता केवळ मनीऑर्डर करत होतो. लग्नानंतर आईची तब्येतीची सुधारेल आणि मग ती थोडी बरी झाली की तिला सत्य सांगून शालिनी आणि मी घटस्फोट घेणार होतो. पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आई गेली आणि मामा, आबासाठी काही दिवस मला तिथे राहणे भाग पडले. तीन महिन्यानंतर मी आबांना सत्य सांगून घराबाहेर पडलो आणि थेट मुंबई गाठली पण तोवर तू पुण्यात आली होतीस. खूप शोधलं गं मी तुला."
सांगताना तो अश्रू लपवू शकला नाही. आधीच हळवा, आता तो हमसून हमसून रडत होता.

"मोहन, हे सगळे तू एकट्याने सहन केलेस. माझ्यासाठी. आणि मी तुझी वाट न पाहता मुंबई सोडली. आय एम सॉरी मोहन." आवेगाने मोहनला मिठी मारून सोनिया म्हणाली.

"वेडू, तू का सॉरी म्हणतेस? उलट माफी तर मला मागायला हवी. माझ्यामुळे तुला खूप सफर करावे लागले." तिचे डोळे पुसत तो म्हणाला. "बट ट्रस्ट मी. शालिनीशी लग्न केले असले तरी ते लग्न केवळ नावापुरते होते. नवरबायकोच्या नात्यात आम्ही कधी अडकलो नाही." त्याला सर्व बाजू स्पष्ट करून सांगायच्या होत्या.

शालिनीकडून प्रीतीला हे कळले होते. आता मोहन सांगत असताना तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले.

"तू माझी परीक्षा घेतोहेस का? मला माहितीये, तुझ्या हृदयात केवळ मीच आहे." मिठी घट्ट करत ती म्हणाली.

"सोनिया, मला पुन्हा तुला एक सांगायचे आहे." एक लांब श्वास घेत मोहन म्हणाला.


"आता आणखी काय?" या नजरेने तिने त्याच्याकडे पाहिले.

"स्वीटी." स्वीटीचे नाव घेतल्याबरोबर स्वीटी दचकली.

'नो डॅड, तुम्ही आत्ताच काही सांगू नका. कदाचित त्यांना धक्का बसेल.' ती डोळ्यांनी खूणवत त्याच्याशी मूक संवाद साधत होती.

"सोनिया, स्वीटी माझी मुलगी आहे." तो तितक्याच शांततेने म्हणाला.

"काय? हे कसे शक्य आहे? तू तर आत्ताच कबूल केले होतेस ना की शालिनी आणि तुझ्यात तसले काहीच नाते नव्हते?" सोनिया शॉक लागल्यासारखे त्याच्याकडे पाहून म्हणाली.

"हो गं वेडू, मी असं कुठे म्हणालो की स्वीटी माझी आणि शालिनीची मुलगी आहे? ती केवळ माझी लेक आहे." तो म्हणाला.

मुंबईत आल्यावर चाळीतील बायकांनी राधामावशीबद्दल त्याच्या मनात काय काय भरवले आणि त्याला पुढे अनाथाश्रमात स्वीटी कशी भेटली हे सगळे सविस्तर सांगितले.
"आता पटलंय ना की स्वीटी माझी मुलगी आहे म्हणून?" तो.

" हूं." ती रुध्द कंठाने म्हणाली.

"या सगळ्या भूतकाळाच्या जंजाळात अडकलेला मी. हे जाणून घेतल्यावरही तू मला होकार देशील?" सोनियाच्या गर्द निळ्या डोळ्यात त्याची नजर रोखून त्याने विचारले.

काय असेल सोनियाचे उत्तर? वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//