प्रीती.. पर्व दुसरे! भाग -६४

कथा सोनियाची.. तिच्या प्रीतीची!


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग - चौसष्ट

"राधाई, मी काय म्हणतो? परवा आपण केक कापला पण त्याचा आनंद लुटता आला नाही. आज आपण परत एकदा सोनियाआँटीचा बी लेटेड हॅपी बड्डे साजरा करायचा का?"

समीरने प्रस्ताव मांडला अन लगेच राधामावशी तिच्या लाडक्या सोनाच्या आवडत्या फ्लेवरचा केक बनवायच्या कामाला लागली.

केकचा सुगंध संपूर्ण बंगल्यात दरवळत होता. काही वेळातच मिहीर त्याच्यासोबत तुषार आणि माहीला (वीरेनचे मॉम -डॅड) घेऊन आला. सगळीकडे आनंदीआनंद होता. आता वाट होती ती सोनियाच्या आगमनाची.

*******
"प्रीती मी खूप खुश आहे आज. फायनली आज आपण घरी परत जात आहोत." सोनियाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.

"येस माई, आय एम अल्सो हॅपी. राधाई ने तुझ्यासाठी साडी पाठवलीय. मी तुला नेसायला मदत करू का?" प्रीती.

"साडी?" सोनियाने जराशा आश्चर्याने पाहिले.

"हो. तू काय हॉस्पिटलच्या ड्रेसमध्ये घरी जाणार का?" प्रीती हसून.

सोनियाने तिच्या हातून ती साडी घेतली. आता ती हळुवारपणे कोणाच्या आधारविना चालू शकत होती. प्रीतीला बाहेर थांबायला लाऊन ती स्वतः चेंज करून बाहेर आली. तिची आवडती साडी खूप दिवसानंतर नेसल्यामुळे तिला खूप भारी वाटत होते.

बेसिनमध्ये चेहऱ्यावर पाणी मारताना ती स्वतःला निरखत होती. इतक्या दिवसात जराशी थकली होती ती. पण आत्मविश्वास परत आला होता, कदाचित तो हरवलाच नव्हता. तिने आरशातील स्वतःला बघून एक हलके स्मित केले. चेहऱ्यावर पावडर लावली आणि ओठावरून तिची आवडती गुलाबी रंगाची लिपस्टिक फिरवली. प्रीतीने मुद्दाम मेकउप किट मागवली होती, पण त्यातील लिपस्टिक आणि पावडर व्यतिरिक्त तिने काहीच वापरले नाही.

"रेडी?" ती बाहेर आली तशी प्रीतीने तिला विचारले. क्षणभर तर तिची नजर तिच्यावरून हटलीच नाही.

"माई, किती गं गोड दिसते आहेस. कुणाची नजर नको लागायला." तिने आपल्या डोळ्याचे काजळ तिला लावले.

"प्रीत, काहीही? मला कुणाची नजर लागणार?" ती हसून म्हणाली. तिच्या मोहक हास्याने चेहरा तजेलदार दिसत होता.

"कदाचित माझी?" इतकावेळ तिच्याकडे एकटक बघत असलेला मोहन म्हणाला.

"आपल्या माणसांची कधी नजर लागत नसते." सोनिया म्हणाली तसे त्याने मंद स्मित केले. तिच्या निळ्या डोळ्यात त्याला हरवायला होत होते.

"निघायचं?" त्या दोघांकडे बघून प्रीतीच्या प्रश्नाने दोघेही भानावर आले.

"प्रीती, मला घ्यायला विरेन दादा किंवा मिहीर कोणीच का नाही आले?" सोनियाने प्रश्न केला.

ती घरी येतेय हे कळल्यावर मिहीर आनंदाने हॉस्पिटलला येईल, विरेनदादा तिथे ठाण मांडून बसेल असे तिला वाटले होते. पण तसे काहीच घडले नव्हते इव्हन कोणी साधा फोनही केला नव्हता. याचे तिला आश्चर्य वाटत होते. रागही येत होता.

"माई, मी सोबत असल्यावर तुला आणखी कोणाची गरज आहे का? रिलॅक्स." कार ड्राइव्ह करताना ती म्हणाली.
तिने मुद्दाम स्टीअरिंग स्वतःच्या ताब्यात घेतली आणि सोनिया व मोहनला मागे बसायला लावले होते.

"हो, पण तरीही.." सोनिया विचार करत होती.

"माई जास्त विचार करू नकोस. डॉक्टरांनी त्यासाठी मनाई केली आहे. मिहीर अंकल कामात असतील म्हणून आले नाहीत आणि विरेन मामाचे पण काही काम असेल. सोड ना. जस्ट चिल. जे इथे नाहीत त्यांचा विचार करण्यापेक्षा जे तुझ्या जवळ आहेत त्यांचा विचार कर ना." प्रीतीने मुद्दाम मोहनला उद्देशून म्हटले. तसे सोनियाने मोहनकडे पाहिले. मोहनची नजर शांत होती. कसल्याशा विचारात तो गढलाय हे तिला जाणवत होते.

ती त्याच्याचाकडे बघत आहे हे त्याला जाणवत होते. तिच्याकडे बघून तो हसला. त्यावर तिनेही हसून प्रतिक्रिया दिली. "काय झालं? कुठे हरवला आहेस?" तिने नजरेनेचा त्याला विचारले.

"इथेच तर आहे, तुझ्याजवळ."तो बोलून गेला. खरंतर तो तिच्याजवळच तर होता. पण त्याचा भूतकाळ कळाल्यावर ती माफ करेल का? हा प्रश्न अजूनही छळतच होता. प्रीतीने त्यावर सुचवलेला उपाय अमलात आणता येईल का? आणि तिला केव्हा आणि कसे विचारायचे या विवंचनेत तो होता. त्यामुळेच ती शेजारी बसूनही तिला थोडासा टाळण्याचा प्रयत्न करत होता.

'हे भगवान, मिस्टर मोहन असेच बसून राहिले तर कसे होईल? त्यांनी काही बोलावे म्हणून मी ड्राइव्ह करतेय तर ते अगदी शांत आहेत. कसं होईल यांचं?' आरशातून मागे मोहनकडे बघून प्रीती मनात बोलत होती.

'गणेशा, आता तुच मार्ग दाखव रे बाबा.' समोर असलेल्या गणेशमूर्तीकडे बघून तिने मनोमन हात जोडले.

"प्रीत, ही गणेशमूर्ती यापूर्वी तुझ्या कारमध्ये नव्हती, कधी घेतली?" सोनियाचे लक्ष त्याचवेळी त्या छोट्या गणूकडे गेले.

"हं? माई, ते ना मी तुला आरामात सांगेन." प्रीती गोंधळून म्हणाली, त्यावर सोनियाने आपले खांदे हलवले.

'केव्हा येणार घर? प्रीती जरा स्पीड वाढव ना.'  मोहन प्रीतीला मनातून साकडे घालत होता. एकतर त्या बंगल्यावर स्वीटी होती आणि तिला बघून सोनिया कशी रिॲक्ट होईल याची सुद्धा त्याला भीती वाटत होती.


इकडे बंगल्यावर सर्वजण डोळ्यात प्राण आणून सोनियाची वाट बघत होते. हॉस्पिटलमधून निघताना प्रीतीने मिहीरला कळवले होते.

प्रीतीने ब्रेक दाबून कार थांबवली.
"उतरा." मागे वळून तिने सोनिया मोहन कडे पाहिले.

"इथे? कार आत घे ना." सोनिया.

"माई, मेन गेट बंद दिसतोय. बहुतेक घरी कोणी नसावेत." प्रीती खाली उतरून तिच्या बाजूचा दरवाजा उघडत म्हणाली.

तिचे म्हणणे मोहनला पटले नाही कारण सोनिया येणार असताना बाकीचे बाहेर कसे जाऊ शकतील हा प्रश्न त्याला पडला होता. त्याने त्याच नजरेने प्रीतीकडे पाहिले. पण आपल्याला काहीच ठाऊक नाही असे भासवून तिने खांदे उडवले.

"माई आपल्याच घरी जायला आणखी कोणी सोबत हवेत का? तू इथे कोणाला एक्स्पेक्ट करत होतीस का?" प्रीती तिच्या जवळ येत म्हणाली.

सोनियाने मानेनेच नकार दिला. खरे तर राधामावशी, मिहीर हे तरी स्वागतासाठी उभे असतील अशी अपेक्षा तिने केली होती. पण तिथे कोणालाच न बघून काहीशी खट्टू होत तिने प्रीतीकडे पाहिले.

"मग चल तर. जाऊया आपण. तसेही तुला आता थोडया विश्रांतीची गरज आहे." तिचा हात पकडून ती गेटजवळ आली.

एका बाजूला प्रीती आणि दुसरीकडे मोहन, तर मध्ये सोनिया असे ते चालत होते. गेटजवळ पोहचल्याबरोबर प्रीती हात लावणार तोच गेट आपोआप उघडले. आणि समोरचा नजारा बघून सोनिया दंग झाली.

तिच्यासाठी मखमली पायघड्या अंथरल्या होत्या. मुख्य गेटपासून आतल्या प्रवेशद्वारापर्यंत हातात गुलाबफुलांच्या पाकळ्यांचे ताट पकडून दोन्ही बाजूने सजलेल्या बायका उभ्या होत्या. त्या तिघांनी जसे गेटच्या आत पाऊल टाकले त्यांच्यावर पाकळ्यांचा वर्षाव होऊ लागला.

सोनियाच्या चेहऱ्यावर एखाद्या लहान मुलीसारखा
आनंद होता. आत्तापर्यंत नाराज असलेले मन अचानक प्रफुल्लित झाले होते. दारात आरतीचे ताट धरून वाट बघणारी राधामावशी डोळ्यांच्या कडा पुसत होती. आज पहिल्यांदा सोनिया, मोहन अन प्रीती ही कंम्प्लिट फॅमिली एकत्र आली होती. तिच्या डोळ्यातून आनंदसरी बरसत होत्या.

दारात पोहचल्यावर राधामावशीने सोनियाचे औक्षण केले आणि तिची नजर काढत तिला आत घेतले.

"वेलकम टू होम!" दारातून आत पाय टाकताच समीरने स्पार्कल बार उडवून तिच्यावर चमकीचा वर्षाव केला.

अंगावर पडलेल्या चमकीने सोनियाचे डोळेही चमकले.
आत्तापर्यंत ती ज्यांना शोधत होती ती सगळी तिची माणसं आत होती. मिहीर, समीर, विरेन दादा, मधुरा.. सगळ्यांना बघून ती हरखून गेली.
तिला हे सुंदर सरप्राईज द्यायचे होते म्हणून हॉस्पिटलमध्ये कोणी आले नव्हते हे कळून सगळ्यांकडे बघून ती गोड हसली.

"कशी आहेस आता?" माहीने तिला आलिंगन देत विचारले.

"मी बरीये. तुम्हा सर्वांना इथे बघून खूप मस्त वाटतेय. थँक यू ऑल!" ती म्हणाली.

"सोना आत्तू!" इतका वेळ स्वतःला आवरून ठेवलेल्या निकीने सोनियाला मिठी मारली.

"आत्तू?" सोनियाने आश्चर्याने विचारले.

"येस. मी तुझी भाची आहे. माझ्या बाबाची मुलगी. विरेन आणि मधुराकडे बघून ती म्हणाली.

"व्हॉट अ प्लिजन्ट सरप्राईज! किती गोड आहेस तू." निकीची पापी घेत सोनिया उद्गारली.

"निकी? तू बरी आहेस ना?" तिला असं स्वतःच्या पायावर उभे बघून प्रीती स्तिमित झाली होती.

"येस दी. बघ मी तर आता चालू शकते. उड्या मारू शकते. अरे मी विसरलेच, मला तर डान्स करायचा होता. स्वीटी दी ये ना." स्वीटीचा हात खेचून निकीने तिला ओढले.

"स्वीटी? आता ही कोण?" सोनियाने स्वीटीकडे बघून प्रश्नार्थक नजर टाकली.

तिच्या प्रश्नाने स्वीटी गडबडली. उत्तरासाठी तिची नजर मोहनला शोधत होती. तो काही बोलणार तोच माही समोर आली.

"स्वीटी आमची होणारी सून आहे." स्वीटीच्या खांद्यावर हात ठेवत तिने सांगितले.


"व्हॉट? काही दिवस मी बेशुद्ध होते तर किती शॉक मिळणार आहेत मला? समीर तू लग्न करतोहेस? द्याट्स ग्रेट! स्वीटी यू आर सो ब्युटीफुल." तिने स्वीटीला प्रेमाने मिठी मारली.

स्वीटी आजवर अनेकदा मोहनच्या मिठीत शिरली होती. पण एखाद्या स्त्रीने मायेने मारलेली मिठी ही स्वीटीची पहिली मिठी होती. आजवर अशा मिठीची ऊब तिने कधी अनुभवली नव्हती. सोनियाच्या मिठीत स्वीटीला केवळ प्रेम जाणवत होते, आईचे प्रेम!

आणि इकडे मोहन शॉक होऊन माहीकडे तर कधी स्वीटीकडे बघत होता. माही जे बोलली त्याचा त्याला धक्का बसला होता.

:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all