प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -बासष्ट.
"रिलॅक्स सोना." विरेनने पुन्हा तिच्या डोक्यावर हात ठेवला. "आम्ही भेटलोय एकमेकांना. मोहन खूप चांगले आहेत." तिच्या गालाला स्पर्श करून विरेन हलकेच हसला.
"म्हणजे तुला माझा राग नाही ना आला?" आश्चर्याने ती.
"आजपर्यंत तुझ्यावर मी कधी रागावलोय का?" त्याच्या डोळ्यात पाणी होते.
सोनियाने त्याच्या हाताची पकड घट्ट केली. तिच्याही डोळ्यातील दोन थेंब खाली सांडले. विरेनशी बोलल्यावर तिला खूप हलके वाटत होते. आपल्यामुळे आप्पा आणि आईसाहेब गेले या ठपक्यातून ती बाहेर आली होती.
विरेननंतर राधामवशी सोनियाला भेटली. सोनियासमोर आता रडायचे नाही असे तिने ठरवले होते, पण अश्रुंनी तिला दगा दिला. शेवटी मानलेली का असेना पण लेक होती ती तिची. हृदयातील प्रीती पाझरणार तर होतीच ना?
काही वेळानंतर डॉक्टर येऊन तिला चेक करून गेले.
त्यांनी तिला कसलाही ताण न घेता आराम करायला सांगितले होते. नर्सने सलाईन द्वारे तिला औषधं दिली आणि सोनिया निद्रादेवीच्या कुशीत शिरली.
******
प्रीतीने मिहीर आणि समीरला सोनियाबद्दल कळवले होते. दोघे आले तेव्हा सोनिया झोपली होती. सगळ्यांची एकाच वेळी गर्दी नको म्हणून थोडे उशीरा पोहचले.
"सोनिया.." ती उठली तेव्हा मिहीरने तिला हाक मारली. तिने त्याच्याकडे पाहिले नि मग पुढचे त्याला बोलवेना.
त्याच्या भावना सोनियाच्या मनाने हेरल्या. तिने त्याच्या हातावर हात ठेवला.
"मिहीर,आय एम ॲब्स्यूल्यूटली फाईन नाऊ. थोडा थकवा आहे. किती दिवसांपासून बेडवर पडलेय ते माहित नाही, तेवढे सोडलं तर मला सगळ्या गोष्टी आठवत आहेत. मेमरी लॉस झाला नाही हे माझे भाग्य." ती हलके हसून म्हणाली.
"सोनिया, किती दिवसांनी मी तुला हसताना पाहतोय. तुझी ही स्माईल खरंच मी मिस करत होतो." डोळ्यातील पाणी रोखून तो म्हणाला.
"अरे, मी आता बरी आहे. हे रडणं थांबव. सोनप्रीतचा स्टॉफ असा रडका असलेला मला चालणार नाही बरं." तिच्या ओठावर मघाचेच हसू होते.
"थॅंक यू!" आता मिहीरच्या ओठावर देखील स्मित फुलले. "तू तुझा स्पार्क, तुझी स्पिरिट तुझ्यातून हरवू दिले नाहीस या lबद्दल खूप मोठा थॅंक यू. सोनप्रीत त्यांच्या सीईओच्या याच ॲटीट्युडला मिस करतेय. तू लवकर बरी हो आणि आपली कंपनी जॉईन कर. मी एकटा कंटाळलोय गं." मीहीर तिच्याकडे बघून बोलत होता.
"अहो मामाश्री, प्रीतीला बरे विसरलात होय? इतके दिवस तिने सोनप्रीतला किती उंचीवर नेऊन ठेवले हे सांगा की तुमच्या सीईओला." तिथे बसलेल्या समीरने वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला.
"ते कसं विसरू? प्रीती इज व्हेरी स्मार्ट अँड ब्रिलिअन्ट गर्ल. सोनिया,तुझ्या तालमीत ती पूर्णपणे तयार झालीये." मिहीर प्रीतीची स्तुती करत होता.
"येस. ऑफ्टरऑल शी इज माय डॉटर." तिलाही प्रीतीचा अभिमान होताच ना.
"मिहीर, तू आणि मोहन भेटलात का?" पुढे सोनियाने त्याला प्रश्न केला.
"हो." त्याने निर्विकारपणे उत्तर दिले.
"कशी आहे माझी चॉईस?" तिने अनपेक्षितपणे विचारले.
"सोनिया, तू निवड केलीस म्हणजे भारीच असणार. यू नेव्हर मेड रॉंग डिसिजन." तो म्हणाला.
"सगळे मोहनला माझ्यापूर्वीच भेटलेत. मीच नाही." एखाद्या छोट्या मुलीसारखी ती खट्टू झाली.
"ओह! तुला त्यांच्याशी बोलायचंय? लगेच त्यांना पाठवतो."
"आणि प्रीतीला पण." तिचे ऐकून मिहीर मान डोलावून उठला.
******
"मोहन तू सकाळपासून मला भेटायला का नाही आलास?" सोनिया त्याला विचारत होती.
तिच्या त्या प्रश्नाने त्याला ती तीच सोनिया वाटली, कॉलेजमध्ये असणारी. भेटायला उशीर झाला तर लगेच खट्टू होणारी.
सोनियाला शुद्ध आली तेव्हा पहाटे मोहन तिला भेटला होता आणि त्यानंतर तिची तब्येत पुन्हा बिघडली होती. त्या गोष्टीला तो स्वतःला जबाबदार धरत होता आणि त्यामुळे परत काही असं घडू नये म्हणून सकाळपासून तिकडे फिरकला नाही. बाहेर सोफ्यावर बसून मात्र तो तिच्यावर लक्ष ठेऊन होता.
"का नाही आला? सांग ना रे."
सोनियाने परत विचारल्यावर तो हसला आणि तिच्या जवळ जाऊन बसला.
"अगं मी इथेच होतो आणि तुला भेटायला कोणी ना कोणी येतच आहेत ना? म्हणून मग डिस्टर्ब नको म्हणून बाहेरच बसलो."
त्याने तिला हे स्पष्टीकरण दिले. पण डोळ्यातील भाव वेगळेच भासत होते.
"मोहन तुझ्या मनात कसला गिल्ट आहे का? असेल तर तो काढून टाक. तुझ्यामुळे खरंच मला काही झालेले नाहीये." त्याच्या डोळ्यात बघत सोनिया.
"माई, तू आराम कर ना. जास्त बोलशील तर तुला पुन्हा त्रास होईल." प्रीती म्हणाली.
"प्रीत, ठीक आहे गं मी आता. थोडं बसावे म्हणते. झोपून झोपून खूप कंटाळा आलाय."
"सोनिया द ग्रेट, यांना फक्त एकाच गोष्टीचा कंटाळा येतो आणि तो म्हणजे झोपणे. इतक्या दिवसात मात्र त्यांना तेच काम करावे लागले." प्रीती हसून म्हणाली.
"हो ना. तुम्ही दोघं मला जरा बसायला मदत करता का?" आशेने त्यांच्याकडे पाहत सोनिया.
"अगं, पण डॉक्टरांना विचारल्याशिवाय कसं करायचं?" प्रीती बोलत होती तेव्हाच डॉक्टरांनी आत प्रवेश केला.
"हाऊ आर यू मॅडम?" डॉक्टर राउंड घ्यायला आले.
"मी अगदी बरी आहे डॉक्टर. आता झोपून राहणे पुरे झाले. बसायचे आहे." सोनिया लहान मुलीसारखी म्हणाली .
"सिस्टर, मॅम ना बसायला हेल्प करा." डॉक्टर म्हणाले तसे दोन नर्सनी मिळून तिला बसवायचा प्रयत्न केला.
खूप दिवसांनी बसत असल्यामुळे तिला गरगरायला होत होते. ती भिंतीला डोके टेकवून बसली.
"ओके नाऊ?" डॉक्टर.
"हम्म. डॉक्टर, मी घरी केव्हा जाणार आहे? इथे असं किती दिवस राहायचेय?" तिचा प्रश्न.
"सोनिया मॅम, अहो इतके दिवस घरीच होतात की. आत्ता काल कुठे इथे आलात आणि लगेच जायची भाषा देखील बोलत आहात?" डॉक्टर मिश्किल हसले.
"मी इतके दिवस घरीच होते? डोक्याला ताण देत सोनिया विचारकरत म्हणाली. "असेल तरीही मला घरी जायचे आहे." ती.
"हो. नक्कीच. आज बसून बघताय ना? उद्या तुम्हाला थोडं चालून बघायचे आहे. चालताना काही त्रास झाला नाही तर पुढल्या दोन दिवसात तुम्ही घरी असाल." डॉक्टरांनी एक स्माईल दिली.
"ग्रेट, मला तर वाटत आहे की आत्ताच चालून बघावं म्हणजे उद्याच घरी जाऊ शकेन."
"माई?" प्रीतीने डोक्यावर हात मारला. ही सारखी लहान लेकरासारखी का वागतेय हेच तिला कळत नव्हते.
"नो, नो. घाई करून चालणार नाही. आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचे आहे, लक्षात ठेवा." डॉक्टर बोलून निघून गेले.
डॉक्टर गेले आणि प्रीती हसायला लागली.
"तू का हसते आहेस?" सोनिया.
"माई, कशी बोलत आहेस तू? एखाद्या छोट्या मुलीसारखं. सोनप्रीतच्या सीईओला असं मी आजवर कधीच नाही पाहिलं." तिला पुन्हा हसू आले.
"प्रीती, प्रत्येकात एक लहान मुलं दडलं असतं. ते कधीतरी बाहेर येतं. तिच्यातील छोट्या सोनियाला येऊ दे बाहेर. तिलाही मग थोडं रिलॅक्स वाटेल." मोहन प्रीतीकडे बघून हळू आवाजात म्हणाला.
"हम्म, यू आर राईट." तिने स्मित करून त्याला अंगठा दाखवला.
सोनिया दोघांना न्याहाळत होती. 'यांचं गुळपीठ लगेच जमलं. शेवटी रक्ताने रक्त ओळखलं.' असे तिला वाटून गेले.
*******
दुसऱ्या दिवशी नर्सच्या मदतीने सोनियाने बेडच्या खाली पाय ठेवले. एका बाजूने प्रीतीने तिला सपोर्ट केला होता. दोन तीन पावलं चालल्यावर तिला आपण पडतो की काय असे वाटायला लागले तशी ती बेडचा आधार घेऊन बसली.
"माई, तुला त्रास होतोय का?" प्रीतीने घाबरून विचारले.
"नाही." सोनियाने मान हलवून नकार दिला. "आता त्रास होऊन कसे चालेल? मला पटापट चालायला शिकले पाहिजे. आता आराम बास झाला. गर्ल्स, चला पुन्हा प्रयत्न करूया." एकवार प्रीतीकडे आणि मग नर्सकडे पाहून ती म्हणाली.
पुन्हा पायावर उभे राहणे, तीन चार पाऊल चालणे असे पाचेक वेळा करून झाल्यावर प्रीतीने तिला थांबवले.
"माई पुरे आता. एकावेळी सर्व करायला जाऊ तर आपणच गोत्यात येऊ. सो जरा रेस्ट कर."
"कंटाळलेय गं मी हा शब्द ऐकून ऐकून. कित्येक कामं पेंडिंग पडली आहेत. आता आरामाला सुट्टी." ती पुन्हा उठायचा प्रयत्न करत म्हणाली.
"मॅम, खरंच थोडावेळ थांबा आता. पंधरा मिनिटांनी परत चालून बघू." नर्सने समजावले, मग तीही बसून राहिली.
पंधरा मिनिटे झाल्या झाल्या तिने दोघींकडे नजर टाकली. तसे दोघींना हसू फुटले.
"हसू नका, आता मी एकट्याने ट्राय करणार, तुम्ही केवळ बघत रहा." ती आत्मविश्वास लेवून म्हणाली.
"माई सांभाळून." ती उठण्यापूर्वी प्रीती उभी झाली.
"हो बेटू, आणि काही झालं तर तू आहेस ना? मग काळजी कसली? " सोनिया बेडच्या आधाराने उभे राहत म्हणाली.
पुढचे दोन पाऊल चालल्यावर तिचा पुन्हा विश्वास वाढला. आनंदाने ती पाच मिनिटं चालतच राहिली.
"येस आय डिड इट!" ती आनंदाने म्हणाली तशी प्रीतीने तिला मिठी मारली.
"माझी माई आहेस तू. तू सोनिया आहेस माई. सोनप्रीतची सर्वेसर्वा! तू कधी हरूच शकत नाहीस." प्रीतीच्या डोळ्यातील थेंब सोनियाच्या खांद्यावर पडले.
"हेय प्रीत, प्लीज डोन्ट क्राय बेटू. मी बरी आहे आता." सोनिया तिच्या पाठीवर हलके थोपटून म्हणाली.
"माई तुझा आवाज ऐकायला कान किती आतूर झाले होते म्हणून सांगू? रोज देवाला एकच मागणे मागत होते, माझ्या माईला लवकर बरी होऊ दे. आणखी मग मला काही नको. माई तू माझं पहिलं दैवत आहेस पण तुझ्यासाठी मी देवळातल्या देवांना साकडं घातलं होतं गं." प्रीतीने हुंदका दिला.
"प्रीत, तू देवाला मानायला लागलीस? कधीपासून?" सोनियाचा प्रश्न.
"ती एक वेगळीच स्टोरी आहे. सांगेन तुला." डोळे पुसत प्रीती म्हणाली. "आता रेस्ट घे. गुड गर्ल आहेस ना तू? कधी थोडं आपल्या लेकीचेदेखील ऐकत जा."तिला खाली बसवत प्रीती म्हणाली.
सोनिया त्यावर काही न बोलता गुमान ती म्हणेल तसे ऐकत होती. थोड्यावेळात तिने डोळे मिटले. प्रीतीने तिचा हात हातात घेऊन त्यावर आपले ओठ टेकवले. किती दिवसानंतर तिला तिची माई परत मिळाल्यासारखी वाटत होते.
:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.