प्रीती.. पर्व दुसरे! भाग -५४

कथा सोनियाची.. तिच्या प्रीतीची!प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -चौपन.

मिहीरचा मोबाईल सोनियाच्या खोलीत होता. त्यामुळे रिंग वाजली पण मिहीरला आवाज आला नाही.

"काय झाले?"

"कॉल रिसिव्ह होत नाहीये. होप आपण सगळे तिथे गेल्यावर तो शॉक व्हायला नको." परत नंबर डायल करत तो म्हणाला.


"सर तुमचा मोबाईल." सोनियाच्या खोलीत आवरायला गेले असताना नर्सला आवाज आला आणि तिने मिहीरला आणून दिला.

"समीरचे पाच मिस्डकॉल? काय झाले असेल?" त्याला कॉल लावत असतानाच बाहेर कार थांबल्याचा आवाज आला.

राधामावशीच्या आधीच मिहीर दारात आला. कृष्णा, प्रीती आणि मोहन कारबाहेर येत होते. मिहीर बघतच राहिला. 'कृष्ण आणि प्रीती ठीक आहे. पण मिस्टर पाटील? ते कसे काय आलेत?' त्याला प्रश्न पडला.

"मिस्टर पाटील, तुम्ही इथे?" त्याच्या नजरेत आश्चर्यमिश्रित प्रश्न होता.

मिहीरला असे अचानक समोर बघून प्रीतीला काय बोलावे ते कळले नाही.

"मिहिर अंकल राधाई कुठे आहे?" तिच्या प्रश्नासरशी राधा मावशी समोर आली. मोहन आणि तिची नजरानजर झाली त्याला बघून ती जागीच थीजली.

"मोहनऽऽ?" तिच्या कापर्‍या शब्दात कित्येक भावनांचे कांगोरे होते. डोळ्यातून अश्रू वाहत होते.

"राधामावशीऽऽ." मोहनने कसलाही विचार न करता तिला पटकन मिठी मारली.
"राधामावशी, कुठे होतीस गं इतके दिवस? किती शोधले मी तुला?" तो लहान मुलासारखा स्फुंदत होता

"लेकरा, तू रे कुठे होतास इतकी वर्ष? किती वाट पाहिली आम्ही?" तिच्याही डोळ्यातील अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते.

"सगळं दारातच बोलणार का? आत बसूया ना." कृष्णाच्या बोलण्यावर दोघे भानावर आले.

"थांब एक मिनिट. मधुरा, आतून आरतीचे ताट घेऊन ये गं." दारातूनच राधामावशीने आवाज दिला.

मधुरा आरतीचे ताट घेऊन आली. डोळ्यात पाणी घेऊन राधामावशीने मोहनला ओवाळले.

"आता आला आहेस ना, यापुढे इथून कुठेच नाही जायचं. कळलं?" त्याला आत घेत ती म्हणाली.

मिहीरच्या डोळ्यात अजूनही आश्चर्य होते. "प्रीती व्हाट इज धिस? काय आहे हे सगळं?" त्याने गोंधळुन विचारले.

"मिहीर अंकल, मिस्टर पाटील हेच माईचे मोहन आहेत. त्यांना आम्ही इथे घेऊन आलोय."
ती त्याला सांगत तर होती पण त्याच्या नजरेला नजर देण्याचे धाडस तिला झाले नाही.
"चला आत बसून बोलूया." ती.

"हम्म. तुम्ही जा मी आलोच." मिहीर म्हणाला.

'माईचा मोहन म्हणजे? म्हणजे मिस्टर पाटील हे सोनियाचे हजबंड आहेत?' सुरवातीला क्षणभर त्याला काही कळले नाही आणि मग जेव्हा लक्षात आले तेव्हा गरगरल्यासारखे वाटायला लागले. त्याने दरवाज्याचा आसरा घेऊन स्वतःला सावरले.

प्रीती आत गेली आणि त्याच वेळी बाहेर समीरची कार येऊन थांबली. मिहीरला बाहेर बघून तिथे काय झाले असावे हे समीर समजून गेला.

"समीर.." मिहीरचे डोळे डबडबले होते.

"अरे, कुठे होतास इतका वेळ? तुला मी कितीदा कॉल केलेला? समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

मिहीरच्या डोळ्यातील पाणी त्याच्या नजरेतून सुटले नाही.
"हेय मामाश्री, कूल डाउन. तुझ्या डोळ्यात हे असे पाणी नाही रे सुट होत."

प्रीतीचे बोलणे ऐकून बसलेल्या धक्क्यातून मिहीरने स्वतःला सावरले. "आय एम फाईन. लेट्स गो इनसाईड." आत वळत तो म्हणाला.

काही न बोलता समीर देखील स्वीटीसोबत मिहीरच्या पाठोपाठ आत आला. आत सोफ्यावर मोहन बसला होता. राधामावशीने मोहन आणि विरेनची ओळख करून दिली.

"मावशी, मला सोनियाला भेटायचे आहे. मोहन अधीर होत म्हणाला.

"हो, तुला तर तिला भेटावेस लागेल मोहन. कारण तुच आता आमची शेवटची आशा आहेस. पण मला सांग, इतके दिवस तू कुठे होतास?" राधामावशी.

"मावशी, आता हे बोलणे एवढे महत्त्वाचे नाहीये. मला माझ्या सोनियाला भेटू दे ना, प्लीज." मोहन काकूळतीला आला होता.

"हम्म, तुम्ही माझ्यासोबत आत चला."
प्रीती त्याच्याकडे पाहून म्हणाली तसा तो पटकन उठला आणि तिच्या मागे निघाला.

सोनियाला बघायची अधीरता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. प्रीती त्याला सोनियाच्या खोलीत घेऊन गेली. पडदा बाजूला सारला आणि त्याला तिचे दर्शन झाले.

बेडवर निपचित पडलेली ती, नाकावर ऑक्सिजनचा मास्क, हाता पायाला लावलेल्या नळ्या बीप- बीप करणारे मॉनिटर.. हे सर्व बघून त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले.

"सोनियाऽऽ, सोनिया.."
काय अवस्था झाली आहे तुझी?" तिच्याकडे तो झेपावला. त्याचे सोनियावरचे प्रेम प्रीतीला उमगले होते. ती दारातूनच माघारी वळली.

आता खोलीत फक्त सोनिया आणि मोहन दोघेच होते. तिला पाहिल्याबरोबर आधी तो ढसाढसा रडायला लागला. दहा मिनिटांनी कसेबसे त्याने स्वत:वर आवर घातला. जी सोनिया या जगात नाही अशी त्याची समजूत झाली होती तीच सोनिया त्याच्या पुढ्यात मरणासन्न अवस्थेत होती. त्याने अलवारपणे तिचा हात हातात घेतला. तिच्या हातावर त्याच्या अश्रूंचा अविरत अभिषेक होत होता आणि सोबत सुरू होता त्याच्या ओठांच्या स्पर्शाचा वर्षाव.

"सोनिया, मी आलोय आता. झालं गेलं सगळं विसरून मला माफ करशील का? जमेल ना तुला? प्लीज ऊठ ना गं. तुझा मोहन तुझ्यासमोर आहे, तुझा गुन्हेगार आहे तो. त्याला माफ करायचं की नाही ते तू ठरव. काय सजा द्यायची तेही ठरव, पण प्लीज डोळे उघड ना."

त्याच्या डोळ्यातून वाहणारे पाणी थांबायचे नाव घेत नव्हते. इतका वेळ तो एकटाच रडत रडत बोलत होता. सोनियाची मात्र तीळभरही हालचाल होत नव्हती.
त्याने आपले अश्रू पुसले. तो आता खाली बसला होता. त्याच्या हातात असलेल्या तिच्या हाताचे त्याने परत चुंबन घेतले.

"सोनिया, आज तुझा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या तुला खूप,खूप, खूप शुभेच्छा! तुझ्या आयुष्यातला हा आनंदाचा दिवस. तुझ्याच नाही गं, आपल्या आयुष्यातील हा आनंदाचा दिवस आहे. हा अविस्मरणीय दिवस तू कसं विसरु शकतेस? हा दिवस विसरण्यासारखा तरी आहे का? सांग ना.
तुला आठवते ना सोनिया, सव्वीस वर्षांपूर्वीचा तुझा हा वाढदिवस आपल्यासाठी किती खास होता?"


तिचा हात त्याच्या हातात होता. तो तसाच ठेऊन त्याने डोळे मिटले. डोळ्यापुढे उभा होता त्याचा भूतकाळ सव्वीस वर्षापूर्वीचा.

तो रंकाळा तलाव.. पायाला स्पर्शणारे त्याचे पाणी. भर दुपारी रखरखत्या उन्हात सोनियाची वाट बघत उभा असलेला तो.

"मोहनऽऽ." सोनियाचा मधाळ आवाज त्याच्या कानावर आला. ती आल्याचा आनंद तर होता पण मुद्दाम तसे न दाखवता तो तसाच पाठमोरा उभा राहिला.

"मोहन, सॉरी ना. मी आले ना आता. असा रे कसा चिडका बिब्बा आहेस तू? आता काय माझे कान पकडू का?"
सोनिया बोलत होती. बोलताना ती धापा टाकते आहे हे त्याला कळून चुकले तसा तो झटकन मागे वळला.

"काय हे? किती उशीर?" त्याच्या ओठावर आलेला प्रश्न तिला समोर बघून मावळून गेला.

सुंदर असा आकाशी रंगाचा अनारकली ड्रेस घातलेला ती, गोर्‍यापान चेहऱ्यावरचा तो निळाशार समुद्र. तिचे घनदाट मोकळे केस, गालावरची खळी आणि घाईत आल्याने छातीची वाढलेली धडधड!
तो तिच्याकडे बघतच राहिला.

"रागावलास का?" तिच्या डोळ्यातील ते निष्पाप भाव.

"रागावला होतो खरा, पण तुझ्या इतके गोड दिसण्यापुढे माझा राग कुठे टिकतो होय?" तिच्या जवळ येत तो म्हणाला.

त्याच्या अशा जवळ येण्याने ती शहारली. "कशाला रे एवढ्या घाईत बोलावलंस? आजच्या दिवशी घरून निघणे किती कठीण असते, ठाऊक आहे ना तुला?
बाजूला सरत ती लटक्या रागाने म्हणाली.

तो मात्र काही न बोलता तसाच उभा होता. त्याची नजर अजुनही तिच्यावरच खिळली होती.

"बोल ना आता. काहीच बोलणार नाहीस का? सांग ना लवकर. नाहीतर मी घरी निघून जाईन."

ती वळली तसा त्याने तिचा हात पकडला. "सोनिया, हॅपी बर्थडे!" तिच्यासमोर लाल गुलाब पकडत तो.

"थँक यू व्हेरी मच!" त्या गुलाब पाकळीवर आपले ओठ टेकवत ती म्हणाली.
"मिस्टर मोहन,मला फक्त एवढयासाठीच इथे बोलावलं होतं का?" तिच्या ओठावर मिश्कील हसू होते. "तुझे बोलून झाले असेल तर मग मी आता जाऊ?"

"सोनिया, थांब ना." तिला अडवत तो म्हणाला.

"मोहन, मग आता तरी तू बोल ना." डोळ्यातील निळा समुद्र त्याच्यावर रोखत ती म्हणाली.

"सोनिया, लग्न करशील माझ्याशी? खूप दिवसांपासून मी तुला हे विचारणार होतो, पण हिंमत होत नव्हती."
तो तिला विचारात होता. त्याचे पाय मात्र लटपटायला लागले होते.

तू हे हिम्मत करून विचारत आहेस ना, तर मग माझे उत्तर ऐकताना सुद्धा तुला हिम्मत ठेवावी लागेल."
ती गालातल्या गालात हसून म्हणाली.

"सांग ना सोनिया, काय आहे तुझे उत्तर?" तो ऐकण्यास अधीर झाला होता.

"मोहन, मला असं वाटते की आता आपण असे एकत्र नको राहायला." ती गंभीर चेहरा करुन म्हणाली
सोनियाला तसे गंभीर बघून त्याचा चेहरा उतरला.

"अरे, म्हणजे असे न राहता आपण लवकरच लग्न करूया. कॉलेजच्या पहिल्या वर्षापासूनच माझं तुझ्यावरती प्रेम जडलं होतं. तुलाही मी आवडते. आपण आपल्या प्रेमाची एकमेकांना कबुली दिली आहे ना? मग लग्न कुठे अडलंय? आपण करूया की लग्न."
ती हसून म्हणाली.

तिचे खळखळणारे हास्य त्या शांत रंकाळा तलावातील पाण्यात तरंग निर्माण करत होते.
"सोनिया,प्रेमाचे ठीक आहे गं. पण लग्न? तुला माझ्या घरातील परिस्थिती माहितीये ना. तरीही आपल्या लग्नाला तुझ्या घरचे तयार होतील असे तुला वाटते?"

"मोहन, तुला माहित आहे ना, मी सगळ्यांची लाडकी आहे. त्यामुळे नकाराचा प्रश्नच उद्भवत नाही आणि तू आमच्या आप्पासाहेबांना भेटलासच कुठे? ते तर तुला बघताक्षणीच पसंत करतील." मघाशी त्याने पकडलेल्या हाताची पकड घट्ट करत ती म्हणाली.

"सोनिया, तू माझ्या मनावरचे किती मोठे दडपण दूर केलेस. थँक यू सो मच! आय लव्ह यू." तो.

"माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे रे आणि नेहमीच राहील. मोहन,मला प्रॉमिस कर काही झाले तरी आपण कधीच एकमेकांपासून दूर होणार नाही."

"प्रॉमिस!" त्याने तिला घट्ट मिठी मारली.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
साहित्यचोरी गुन्हा आहे.
*******
डिअर फ्रेंड्स, तुम्ही बोनस भागाच्या प्रतीक्षेत आहात ना? मग आज ती प्रतीक्षा संपतेय. आज या भागासोबत खास तुमच्यासाठी एक बोनस भाग घेऊन आलेय.

वाचून कसा झालाय ते नक्की कळवा.

🎭 Series Post

View all