प्रीती.. पर्व दुसरे! भाग -५३

कथा सोनियाची.. तिच्या प्रीतीची!

प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -त्रेपन्न


"सर, इफ यू डोन्ट माईंड, तुम्ही मागे बसा ना. मी ड्राईव्ह करतो. तसेही तुम्हाला सोनिया मॅमचे घर माहित नसावे." कारचे दार उघडत कृष्णा म्हणाला.

मोहनला त्याचे म्हणणे पटले. तसेही सोनियाची बातमी ऐकून त्याचे मन जागेवर होतेच कुठे? कारची स्टीअरिंग त्याच्या हवाली करून तो मागे जाऊन बसला. कृष्णाने खुणेनेच प्रीतीलाही मागे बसायला सांगितले. ती अवघडून मोहनशेजारी जाऊन बसली. कृष्णा आरशातून बघत होता. बापलेकीने एकमेकांना समजून घ्यावे हेच तर त्याच्या मनात होते.

प्रीती मनात विचार करत होती, 'विरेन घरी आला तेव्हा आपण त्याला आपला मामा म्हणून किती सहज स्वीकारले? माईचा रक्ताचा भाऊ म्हणून मी ते नाते लगेच स्वीकारले असेल का? मग मिस्टर मोहनला स्वीकारणे का जमत नाहीये? माझे त्यांच्याशी असलेले नाते तर रक्ताचेच आहे ना. मग तरीही त्यांना वडील म्हणून का स्वीकारू शकत नाहीये?'

तिने मोहनकडे एक कटाक्ष टाकला त्याचीही नजर तिच्यावर स्थिरावली होती. बापलेकीच्या मनातील चलबिचल कृष्णा आरशातून टिपत होता.

दोघे काहीतरी बोलतील या हेतूने कृष्णाने त्यांना मागे बसायला भाग पाडले होते. पण घडत तसं काहीच नव्हतं. जिच्यासाठी सोनिया आणि त्याने मुंबई गाठली होती, ती प्रीती मोहनच्या बाजूला बसली होती. त्याला काय बोलावं कळत नव्हते. जीला काळजाचा तुकडा समजून वाढवले ती स्वीटी, जिच्यासाठी घर सोडले ती प्रीती.. कोण माझ्या अधिक जवळचे? त्याला फरक करता येत नव्हता. ज्या अधिकाराने स्वीटीला मिठी मारून तो घरातून निघाला होता, प्रीतीवर तोच अधिकार गाजवायला मन हिम्मत करत नव्हते.

"प्रीती.. आय एम सॉरी. माझ्यामुळे तुझ्यावर खूप अन्याय झाला ना." त्याने हिंमत करून तिच्या हातावर आपला हात ठेवला.

एक स्पर्श.. वडिलांच्या प्रेमाचा. हा स्पर्श तिला आजवर कधी झालाच नव्हता. कधी गरज पडलीच नाही असे कितीदा म्हणून झाले असले तरी आज त्या स्पर्शाने तिला उचंबळून येत होते.

"इट्स नॉट युअर फॉल्ट." ती हळव्या स्वरात म्हणाली. त्याचा प्रेमळ स्पर्श तिला हवा होता पण तिने मनावर आवर घालत आपला हात हलकेच सोडवून घेतला. तिच्या डोळ्यातील थेंब अलगद त्याच्या बोटावर निखळला. त्या अश्रूच्या स्पर्शाने त्याच्या काळजात चर्र झाले. सोनियाच्या डोळ्यातील अश्रू कधीकाळी तो बघू शकत नव्हता. आज त्याची लेक त्याच्यापासून अश्रू लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतेय हे बघवत नव्हते.

"तू अजूनही मला माफ केले नाहीस ना? मी फोर्स करणार नाही. यू कॅन टेक युअर ओन टाइम. एका मुलीला आपल्या बापासमोर आपले अश्रू लपवावे लागतील या पेक्षा त्या बापाचे दुर्दैव कुठले?" तो अलवारपणे बोलत होता. त्याचे एकेक शब्द तिच्या काळजात घर करत होते.

"मला फक्त माझी माई हवीय आणि त्यासाठी तिला तिचा मोहन, बस्स. द्याट्स ऑल." नजर बाजूला करत ती म्हणाली.
त्याच्याकडे बघताना तिचे बारीक निरीक्षण चालले होते. त्याच्या डोळ्याच्या लांबसर पापण्या, हाताची निमूळती बोटे.. शालिनीने म्हटल्यासारखे अगदी तिच्यासारखेच होते. की ती त्याच्यासारखी होती?

तिने डोके सीटला टेकवले आणि हलकेच डोळे मिटले. माईकडे केव्हा लवकर पोहचते असे तिला झाले होते.

******

तब्बल दोन आठवड्यानंतर मिहीर सोनियाच्या घरी जाणार होता. सोनियाचा वाढदिवस म्हणजे त्याच्या आनंदाला उधाण! त्यात प्रीतीने संपूर्ण स्टॉफला पूर्ण शंभर टक्क्यांचा दिलेला बोनस आठवून त्याला तर तिचे कौतुक वाटत होते. एवढा मोठा निर्णय घ्यायला खरंच धाडस लागतो. प्रीतीत निर्णयक्षमता आहे आणि ती आपल्या निर्णयामवर ठाम असते हे त्याला रुचले होते. मनात एक निश्चय करून त्याने कार काढली आणि तो सोनियाच्या बंगल्यावर निघाला.

"मिहीर?" त्याला दारात बघून राधामावशीला आढचार्य वाटले. "तू एकटाच? प्रीती कुठे आहे?" तिने प्रश्न केला. राधामावशीच्या प्रश्नाने मिटिंगच्या वेळी हॉटेलमध्ये
घडलेला प्रकार त्याला आठवला.

"काही कामानिमित्त ती बाहेर गेलीय." तो काहीसा अडखळत बोलला." का? मी एकटा येऊ शकत नाही का?" राधामावशीला टेंशन येऊ नये म्हणून तो मस्करीत बोलला.

"तसे नाही रे. ये आत." राधामावशीने त्याला आत घेतले. निकीला तर तो ओळखत होताच. तिने विरेन आणि त्याच्या बायकोची त्याच्याशी ओळख करून दिली.

थोड्या गप्पा मारून तो सोनियाला भेटायला गेला. ती नेहमीप्रमाणे तशीच झोपली होती… शांत, निश्चल!

"ओए बड्डे गर्ल, इतका वेळ असं कोण झोपतं गं? किमान आजच्या दिवशी तरी ऊठ ना." तिच्याजवळ बसत तो कातर स्वरात म्हणाला. सोनिया, यापूर्वी तू कधी स्वार्थी नव्हतीस ना, मग आता गं कशी झालीस? प्रीतीला तुझी गरज आहे हे लगेच कसे गं विसरलीस? प्रीतीसाठी तरी ऊठ ना गं." तिला रागावता रागावता त्याचा स्वर ओला झाला.

"मिहीर काय हे? तुझ्या डोळ्यात पाणी होते हे तिला कळले तर तिला वाईट वाटेल ना?" मागून आलेल्या रसधामावशीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

"नाही गं, पाणी कुठेय? बहुतेक काहीतरी डोळ्यात गेलंय." तो चेहऱ्यावर बळेच स्मित आणून बोलला. मावशी आपल्याला अख्खी रूम, हॉल बलून्सनी सजवायचे आहेत. खूप धमाल करायची आहे. आफ्टरऑल सोनप्रीतच्या सीईओचा आज बर्थडे आहे." विषय बदलवत तो म्हणाला आणि बाहेर गेला.

"सोना, ये ना गं बाई लवकर आमच्यात परत. तुझा आवाज ऐकायला, तुझ्या डोळ्यातील निळा समुद्र बघायला सर्व आतूर आहेत गं." मिहीर बाहेर गेल्यावर राधामावशी तिच्याजवळ काही वेळ थांबली.

"दादा, चला आज आपण मस्तपैकी एंजॉय करूयात. तुम्ही लहानपणी तुमच्या लाडक्या बहिणीचा चा जसा बड्डे सेलिब्रेट करायचात तसेच काहीतरी आज करू." मिहीर विरेनला म्हणत होता.
"अरे, सोना या अवस्थेत आहे, आणि आपण एन्जॉय करायचं?" विरेन.

"तिच्यासाठीच तर करायचा. आपला एन्जॉयमेंट बघून कदाचित उठेल तरी ती." मिहीर.

"इतक्या वर्षांनी मी भेटलो, तरी माझा आवाज तिच्या कानापर्यंत पोहचू शकला नाही. आजच्या सेलेब्रेशनचा आवाज खरंच पोहचेल?" कातर स्वरात विरेन विचारत होता.


"थोडे पॉझिटिव्ह रहायला काय हरकत आहे ना? कदाचित सर्वांनी मनापासून दिलेल्या शुभेच्छा तिला यातून बाहेर काढायला मदत करेल." तो स्मित करून म्हणाला.

"येस, मिहीर अंकल आय एम विथ यू. मला सांगा मी काय मदत करू? सध्या पायावर उभी तर राहू शकत नाही पण माझी ही व्हिलचेअर नक्कीच धावून येईल."

"ए हुई ना बात!" तिला टाळी देत मिहीर बोलला. "तू हे बलून्स फुगव. मी आणि दादा कसं डेकोरेट करायचे ते बघतो." तो उत्साहाने म्हणाला.

मिहीर, विरेन, निकी आणि मधुरा मिळून सजावट करत होते. फुलांच्या माळांनी घर सजले होते. हॉल पासून ते सोनियाच्या रूमपर्यंत फुगेच फुगे होते.

"लहानपणी सोनियाला फुगे खूप आवडायचे. तिच्या वाढदिवसाला तर फुग्यांनी घर भरलेले असायचे." विरेनने मिहीरला सांगितले आणि त्याने इथे फुग्यांचा पसारा मांडला.

"काय रे मिहीर, आता सोनिया का लहान आहे का? केवढे हे फुगे?" राधामावशीने डोक्याला हात लावला.
"असू दे गं राधामावशी. तिच्यामुळे आपणही सगळे एक दिवस लहान मुल होऊन खेळू या. त्यात काय? काय गं?" निकीकडे फुगा फेकत तो म्हणाला.

"येस अंकल, आय एम आल्वेज रेडी टू प्ले." कॅच पकडत ती.

निकी आणि मिहीरच्या मस्त्यांनी तेथील वातावरण हलकेफुलके झाले होते. राधामावशीने केक बनवायला घेतला होता नि त्याचा सुगंध घरभर दरवळत होता. घराला खूप दिवसांनी आज घरपण आले होते.

*******
"स्वीटी, तू ठीक आहेस ना?" कार ड्राईव्ह करताना समीर तिला विचारत होता. त्याच्या कारने ते दोघे मोहनच्या कार पाठोपाठ निघाले होते.
"हम्म." ती एवढंच उत्तरली.

"प्रीतीबद्दल राग नको ठेऊस ना मनात." तिच्या हातावर हात ठेवून तो म्हणाला.

"तिच्याबद्दल राग नाहीच आहे रे. तुला सांगू सॅम, आय एम फीलिंग जेलस अबाऊट हर. एका दिवसात तिला तिचे दोन्ही पेरेंट्स मिळाले आणि मी मात्र माझ्या एकुलत्या एक डॅडला गमावले."

"डोन्ट से लाईक द्याट. एक सांगू? तुझ्या डॅडला तू किंवा प्रीती अशी कुण्या एकाची निवड करायला भाग पाडू नकोस. त्यांना निर्णय घेणे खूप कठीण जाईल. त्यांचे तुझ्यावर खूप प्रेम आहे. ते प्रेम हरवायचा प्रयत्न करू नकोस." तिच्याकडे एक प्रेमळ नजर टाकत तो म्हणाला.

"सॅम तू माझ्यासोबत आहेस ना रे?" तिचा हळवा प्रश्न.

"पुढच्या जन्माचे तर माहित नाही पण हा जन्म मात्र आता कायम तुझ्यासोबत असेन." तिच्या गालावर हलकेच ओठ टेकवत तो म्हणाला.
त्याच्या बोलण्यावर ती खुदकन हसली.

"यू डिझर्व्ह ओन्ली धिस स्माईल डिअर, नॉट टिअर्स. तुझ्या मनाची अवस्था मी कितपत समजू शकतो माहित नाही, पण एवढं नक्की सांगतो की ठीक होईल यार सगळं. डोन्ट वरी."

"होप सो." ती.


"बरं, मी मिहीर अंकलना कॉल करून सांगतो आपण सर्व तिकडे येत आहोत म्हणून. तो तिथेच असावा." त्याचा नंबर डायल करत तो म्हणाला.

मिहीरचा मोबाईल सोनियाच्या खोलीत होता. त्यामुळे रिंग वाजली पण मिहीरला आवाज आला नाही.


"काय झाले?"

"कॉल रिसिव्ह होत नाहीये. होप आपण सगळे तिथे गेल्यावर तो शॉक व्हायला नको." परत नंबर डायल करत तो म्हणाला.


"सर तुमचा मोबाईल." सोनियाच्या खोलीत आवरायला गेले असताना नर्सला आवाज आला आणि तिने मिहीरला आणून दिला.

"समीरचे पाच मिस्डकॉल? काय झाले असेल?" त्याला कॉल लावत असतानाच बाहेर कार थांबल्याचा आवाज आला.
:
क्रमश :
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.
__________________


प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो, प्रीती तुम्हाला आवडतेय त्या बद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तुम्ही सर्व आतुरतेने वाट बघत असता हे बघून मी सुखावलेय. मलाही लगेच पार्ट पोस्ट करण्याची घाई असते. पण या आठवड्यात बिझी शेड्युल असल्यामुळे लिखाण थोडे मागे पडत आहे. त्यामुळे रोज रेग्युलर पार्ट्स कदाचित येऊ शकणार नाही याबद्दल सॉरी. पण दोन तीन दिवसातून पोस्ट करेन.

वेळेअभावी मी तुमच्या छान छान कमेंट्सना रिप्लाय देऊ शकत नाहीये. बोनस पार्ट जमेल तर नक्कीच पुढच्या आठवड्यात टाकायचा प्रयत्न करेन.
तोपर्यंत असेच वाचत रहा, आनंदी रहा!
धन्यवाद!

🎭 Series Post

View all