प्रीती.. पर्व दुसरे! भाग -५२

कथा सोनियाची.. तिच्या प्रीतीची!
प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -बावन्न.

"प्रीती, मी खूप मोठा गुन्हेगार आहे गं. राधामावशीचा, सोनियाचा आणि तुझाही. मला सोनियाला भेटायचे आहे. तिची माफी मागायची आहे. तुला माझ्या मनाची तगमग कळतेय ना गं? लेक आहेस ना माझी? प्लीज घेऊन चल ना मला." तो तिच्यासमोर हात जोडून उभा होता.

"देन हू आय एम?" इतका वेळ बाहेर असलेली स्वीटी त्वेषाने आत आली. तिचा आवाज इतका मोठा होता की हॉलमध्ये असलेले समीर आणि कृष्णाही धावत आर्टरूमकडे गेले.

"डॅड, टेल मी, हू आय एम? ही प्रीती तुमची मुलगी आहे तर मग मी कोण आहे?" तिचे मन तुटले होते. सारा राग डोळ्यातून अश्रूद्वारे वाहत होता. अंगाची थरथर वाढली होती.

ती पहिल्यांदा त्याच्या या खोलीत आली होती. खोलीभर चितारलेली सोनियाची चित्रे, कॅनव्हासवर प्रीतीचे रेखाटन.. हे सगळं बघून तिच्या डोळ्यातील संततधार आणखी वाढली.

"डॅडऽऽ.." तिच्या डोळ्यात अगतिकता होती.

"स्वीटीऽऽ" काहीतरी बोलायला प्रीतीने तोंड उघडले.

"प्रीती, तू तर बोलूच नकोस. माझ्या डॅडला माझ्यापासून हिरावून घ्यायला तू आली आहेस ना?" प्रीतीला बघून तिला आणखी राग येत होता.

"स्वीटी, तू तर माझा बच्चा आहेस बेटा." तिचा हात हातात घेत मोहन म्हणाला.

"नाही. खोटं बोलतोहेस तू. तू प्रीतीला तुझी लेक म्हणालास ना? मी कोण आहे सांग ना मग?" त्याचा हात झिडकारून ती स्फून्दत होती.

"स्वीटी, अगं लेक तर तूच त्यांची आहेस. मी फक्त माझ्या माईची मुलगी आहे. माझी माई आता अशा टप्प्यावर आहे की आमच्यासाठी तिचा मोहन हीच एकमेव शेवटची आस उरलीय. तुझ्या डॅडला नव्हे तर इतके दिवस मी फक्त माईचा मोहन शोधतेय." प्रीती तिच्याजवळ येत म्हणाली.

"मला शब्दांच्या जाळ्यात गुंडाळू नकोस. हे असं नाही कळत मला. डॅड आणि मी इतकंच छोटुसं आमचं जग होतं ना? मग ही सोनियाआँटी, तू कुठून आलात? मी डॅडची मुलगी नाही तर कोण आहे मी?" स्वीटी काहीही ऐकायच्या स्थितीत नव्हती.

"मी सांगतो." समीरसह आत येत कृष्णा म्हणाला.

"कृष्णा? तू? तू इथे कसा?" त्याला बघून प्रीतीच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते.

"सॉरी प्रीती. तुला मी सांगितले होते की मी एका मिशनवर आलोय. खरं तर मी मिस्टर मोहनना भेटायला इथे आलो होतो." प्रीतीसमोर कान पकडून तो म्हणाला.

"सर, मी इन्स्पेक्टर कृष्णा, फ्रॉम कोल्हापूर.." त्याने मग थोडक्यात सोनियाचा ॲक्सिडेंट, प्रीतीचे कोल्हापूरला येणे, तिने मोहनचे बनवलेले स्केच, त्याचे ते सोशल मीडियावर टाकणे आणि एकदिवस त्या संदर्भात स्वीटीचा त्याला आलेला कॉल हे सर्व सांगितले.

"स्वीटी, तू बोललीस ना की तू कोण आहेस म्हणून? मिस्टर मोहन प्रीतीचे वडील आहेत हे सत्य आहे पण ते तिचे केवळ बॉयलॉजिकल फादर आहेत. मुलगी म्हणून तूच त्यांच्या हृदयात आहेत. ट्रेनखाली आलेली महिला सोनिया मॅडम असाव्यात अशी मिस्टर मोहन यांची धारणा झाली होती पण ती स्त्री सोनिया मॅम नसून दुसरीच कोणी होती, जी तुझी जन्मदात्री होती. जबरदस्तीने वेश्याव्यवसायात तिला ढकलण्यात आलेली एक अभागिनी होती ती. मोहन नावाच्या एका व्याकुळ पित्याचे प्रेम तुला लाभावे म्हणून देवानेच केलेली ही योजना असेल कदाचित." कृष्णा तिला समजावत होता.


"मला आई नाहीये याचं कधीच वाईट वाटलं नाही. डॅडने ती कमी मला कधी जाणवू दिलेच नाही. पण आज कळतंय की तोच माझा डॅड नाहीये." मोहन तिचा खरा डॅड नाही हे उमजून स्वीटी अधिकच रडत होती

"स्वीटी, तुला सांगू? तुला जशी आईची कमतरता भासली नाही ना, तशी मलाही कधी वडिलांची कमतरता जाणवली नाही. माईने प्रेमाची इतकी उधळण केलीय ना माझ्यावर की कधी कुणाची गरज पडली नाही. हं, लहानपणी शाळेत असताना तू जेव्हा तुझ्या डॅडबद्दल भरभरून बोलायचीस तेव्हा मला बाबा का नाही, तो कसा दिसतो हे प्रश्न पडले होते. माईला विचारल्यावर तिने यांचा एक फोटो मला दाखवला होता, पहिल्यांदा आणि शेवटचा. तो चेहरा माझ्या मनात घर करून आहे, तेव्हापासून तर आजतगायत. पण केवळ माईचा मोहन म्हणूनच. तुझ्यामुळे मला त्या चेहऱ्याची ओळख झाली. पण म्हणून मी तुझ्या डॅडला हिरावून नाही गं घेत आहे. फक्त एकदा त्यांना माईजवळ जाऊ दे ना. कदाचित त्यामुळे काही चमत्कार तरी होईल. जसा तुला तुझे डॅड हवेत तसे मलाही माझी माई हवीय. प्लीज."
प्रीती स्वीटीसमोर हात जोडून उभी होती.

स्वीटीने मोहनकडे पाहिले. त्याची मनस्थिती विचित्र झाली होती. एका बाजूला त्याच्यासमोर स्वीटी होती.. त्याची प्राणप्रिय लेक. तर दुसरीकडे प्रीती होती.. त्याची प्राणप्रिया सोनिया आणि त्याच्या प्रेमाची प्रतिकृती असलेली प्रीती! त्याने स्वीटीकडे पाहिले, त्याच्या डोळ्यात अर्जव होते.

"डॅड, जा तू." स्वीटी नम्रपणे म्हणाली. त्याच्या मनात काय चाललेय हे ती त्याच्या डोळ्यात बघून वाचू शकत होती.

"डॅड अल्वेज लव्ह यू बच्चा." त्याने तिला एक घट्ट मिठी मारली.
"चलायचं?" त्याने प्रीतीकडे पाहत विचारले.

स्वीटीला 'थँक यू' म्हणून प्रीती खोलीबाहेर गेली. तिच्या पाठोपाठ मोहन आणि कृष्णाही गेले.


आता खोलीत समीर आणि स्वीटी दोघेच उरले होते. खोलीभर असलेली सोनियाची पेंटिंग्स, तिथे असलेली प्रीती..इतका वेळ तिथे काय सुरू आहे हे सुरुवातीला त्याला कळले नाही आणि जेव्हा कळले तेव्हा काय करावे हे उमगत नव्हते. स्वीटी त्याची गर्लफ्रेंड होती आणि आत्ताच त्याने तिला आयुष्यभरासाठी कमिट केले होते. प्रीती त्याची बालपणाची बेस्टमबेस्ट फ्रेंड होती. कोणाची बाजू बरोबर, कोण योग्य याचा मेळ त्याला मांडता येत नव्हता.

स्वीटीच्या डोळ्यातील अश्रू त्याला बघवत नव्हते. त्याने
तिला मिठीत घेतले.

"सॅम, डॅड माझा डॅड नाही. मला कोणी आई नाही. मी अनाथ आहे रे." तिचे डोळे अजूनही झरत होते.

"अशी का म्हणतेस? तुझ्या डोळ्यात आणि तुझ्या डॅडच्या डोळ्यात एकमेकांबद्दलचे प्रेम, ती माया बघितलीय ना मी. प्रीती तर त्यांना फक्त सोनिया आँटी साठी घेऊन गेली ना? आणि तुलाही तुझे डॅड आनंदी हवे होते ना? स्वीटी आपण आत्ता काही वर्षांपूर्वी प्रेमात पडलोय तरी एकमेकांचा दुरावा सहन होत नाही. मग विचार कर सोनिया आँटी आणि तुझे डॅड तब्बल पंचवीस वर्ष एकमेकांशिवाय कसे राहिले असतील? त्यांचे प्रेम किती महान असेल. त्यांनी इतक्या वर्षात दुसऱ्या पार्टनरचा कधी विचारसुद्धा केला नाही. तू तुझ्या डॅडला ओळखतेस ना? परस्त्रीबद्दल त्यांच्या मनात कधी तशी फिलिंग जाणवली तुला?"
त्याच्या प्रश्नावर तिने मान हलवून नाही म्हणून उत्तर दिले.

"मीही सोनियाआँटीला लहानपणापासून पाहतोय की. त्या कशा आहेत, मला चांगलेच ठाऊक आहे. त्या दोघांना गरज आहे गं त्यांच्या प्रेमाची. इतक्या वर्षांचा हा दुरावा आता मिटायला हवा. तुझ्या डॅडच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तूही हॅपी होशील की." तिच्या खांद्यावर हलकेच थोपटत तो म्हणाला.

"येस सॅम. मला डॅडचा आनंद हवाय. थोडी सेल्फिश झाले होते मी, पण मला तो आनंदीच हवाय ना." ती डोळे पुसत म्हणाली.

"द्याट्स लाईक अ गुड गर्ल." त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

"सॅम, आपण प्रीतीकडे जाऊया?" तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक पाहिले."आज तिच्या माईचा म्हणजे पर्यायाने माझ्या मनात असलेल्या माझ्या मॉमचाही बर्थडे आहे ना. सोनियाआँटीला भेटून डॅडच्या चेहऱ्यावर जो आनंद असेल तो मला बघायचाय."

त्याने तिच्या बोलण्याला दुजोरा दिला.

*******
प्रीती, मोहन आणि कृष्णा गेटबाहेर आले. प्रीतीची कार नव्हतीच. कृष्णा येताना रिक्षाने तिथे आला होता.

"आपण माझ्या कारने जाऊया." मोहन त्याची कार काढायला गेला.

प्रीतीने कृष्णाकडे एक कटाक्ष टाकला आणि मग तिने नजर फेरली. त्याने तिला मोहनबद्दल सांगितले नाही याचा राग आला होता.

"प्रीती सॉरी ना. मी तुला हे सांगण्यासाठीच इथे आलो होतो." कान पकडून तो तिच्यासमोर उभा होता.

"कृष्णा, किमान एक कॉल तरी करायचास ना? तुला माहितीये ना माईचा मोहन भेटणे मला किती आवश्यक होते ते." तिचा स्वर रडवेला झाला होता.

"प्रीती, मी तुला स्वतः इथे घेऊन येणार होतो. तुला सांगायचे म्हणून तर मी तुझ्या ऑफिसला आलो होतो. पण तेव्हा कळलं की नेमकी आज तुझी कॉन्फरन्स आहे. तुझी इतकी इम्पॉर्टन्ट कॉन्फरन्स, म्हणून मी सांगायचे टाळले. पण बघ ना देवाच्या मनात कदाचित तुम्हा बापलेकींना प्रत्यक्षात समोरासमोर भेटवायचे होते. कसला दुवा नको होता, म्हणून तर कधी नव्हे ते यावेळी मिस्टर मोहन या कॉन्फरन्स आलेत. देवाचा कौल कळतोय ना तुला?" तिचा हात हातात घेऊन तो हळुवारपणे बोलत होता.

तिने समजल्यासारखी मान डोलावली.

मोहन कार घेऊन आला. हॉर्न वाजवून त्याने दोघांना आत बसायला सांगितले.

"सर, इफ यू डोन्ट माईंड, तुम्ही मागे बसा ना. मी ड्राईव्ह करतो. तसेही तुम्हाला सोनिया मॅमचे घर माहित नसावे." कारचे दार उघडत कृष्णा म्हणाला.

मोहनला त्याचे म्हणणे पटले. तसेही सोनियाची बातमी ऐकून त्याचे मन जागेवर होतेच कुठे? कारची स्टीअरिंग त्याच्या हवाली करून तो मागे जाऊन बसला. कृष्णाने खुणेनेच प्रीतीलाही मागे बसायला सांगितले. ती अवघडून मोहनशेजारी जाऊन बसली. कृष्णा आरशातून बघत होता. बापलेकीने एकमेकांना समजून घ्यावे हेच तर त्याच्या मनात होते.

प्रीती मनात विचार करत होती, 'विरेन घरी आला तेव्हा आपण त्याला आपला मामा म्हणून किती सहज स्वीकारले? माईचा रक्ताचा भाऊ म्हणून मी ते नाते लगेच स्वीकारले असेल का? मग मिस्टर मोहनला स्वीकारणे का जमत नाहीये? माझे त्यांच्याशी असलेले नाते तर रक्ताचेच आहे ना. मग तरीही त्यांना वडील म्हणून का स्वीकारू शकत नाहीये?'

तिने मोहनकडे एक कटाक्ष टाकला त्याचीही नजर तिच्यावर स्थिरावली होती. बापलेकीच्या मनातील चलबिचल कृष्णा आरशातून टिपत होता.

:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all