Feb 28, 2024
प्रेम

प्रीती.. पर्व दुसरे! भाग -५१

Read Later
प्रीती.. पर्व दुसरे! भाग -५१

प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -एकावन्न.

इतका वेळ रोखून धरलेले त्याचे अश्रू बघून प्रीतीचे डोळे डबडबले. एखाद्या पुरुषाला रडताना ती पहिल्यांदा बघत नव्हती. आपल्या माईसाठी डोळ्यात पाणी आणताना तिने मिहीरला पाहिले होते पण आज सोनियाने ज्याच्यावर जीव ओवाळून टाकला होता त्या मोहनच्या डोळ्यातील अश्रुंनी तीही हळवी होत होती.

"मिस्टर मोहन.." सांत्वनासाठी म्हणून तिला तिचा हात समोर करायचा होता, मात्र त्यानेच त्याचे डोळे पुसले.

बाहेर स्वीटीला तिच्या डॅडचे अश्रू तर दिसले नाहीत पण त्याच्या स्वराने तिच्याही डोळ्यातून पाणी वाहू लागले होते.


"मी खोलीचा दरवाजा वाजवला. सोनिया दार उघडेल म्हणून मी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होतो. ते दोन तीन क्षण सुद्धा मला युगाप्रमाणे भासत होते." त्याने डोळे पुसत पुन्हा पुढे बोलायला सुरुवात केली.

"दार तर उघडल्या गेले. दारात एक स्त्री उभी होती. 'सोनिया..' मी भावविभोर होऊन तिच्याकडे पाहिले, पण ती सोनिया होतीच कुठे? ती तर कोणीतरी वेगळीच स्त्री माझ्या पुढ्यात उभी होती." मोहन सांगत होता.


तेव्हाचा प्रसंग जशाच्या तसा त्याच्या डोळ्यापुढे उभा राहिला. फ्लॅशबॅकसारखे सगळे त्याला दिसत होते.

"कोण तुम्ही?" तो त्या स्त्रीला विचारत होता.

"अहो, तुम्ही कोण? मलाच तोंड उचकटून कोण म्हणून काय विचारताय?" ती स्त्री चिडून बोलली.

"मी मोहन. हे माझं घर आहे. माझी पत्नी सोनिया.. माझं बाळ.. कुठे आहेत ते?"

"आत्ता? मला काय माहित? दोन महिन्यापासून तर आम्हीच इथं राहतोय मग तुमचं कसलं घर हो?" ती बाई काही ऐकून घ्यायला तयार नव्हती आणि मोहनला आतही येऊ देत नव्हती.

"तुमच्या सारख्या माणसांना मी चांगलीच ओळखून आहे. घरात एकटी दुकटी बाई बघितली की घरात घुसता होय रे?" ती गलका करत होती. तिच्या आवाजाने चारपाच बायका गोळा झाल्या. मोहनचे काही ऐकून न घेता तिच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता.

"मोहनभाऊ तुम्ही?" गर्दीतील एकीने त्याला ओळखले आणि त्या बाईला गप्प बसायला लावले.

"खूप दिवसांनी दिसलात आणि इतके दिवस कुठे होता?" प्यायला पाणी देत तिने चौकशी केली. सोनियाच्या सातव्या महिन्याच्या कार्यक्रमाला बोलावलेल्या स्त्रियांपैकी ती एक होती.

"मी कामानिमित्त बाहेर गेलो होतो. सोनिया कुठे आहे तुम्हाला ठाऊक आहे का? आणि ती राधामावशी? ती कुठे आहे?" मोहनने अधीरतने विचारत होता.

"राधामावशी?" ती काहीशी कुत्सित हसली. तिच्याबरोबर असलेल्या बायकाही हसल्या.

"अहो, ती राधा कशी पांढऱ्या पायाची आहे हे ठाऊक नाही का तुम्हाला? सोनियाला बाळ झाल्यानंतर दोन महिन्यांनी त्यांना घेऊन पळाली की तुमची राधामावशी." दुसरी म्हणाली.

"म्हणजे? राधामावशी त्यांना घेऊन कुठे गेली?" त्याच्या डोळ्यात राग, भीती, काळजी सगळ्याच भावना एकवटून आल्या होत्या.

"तरुण आणि सुंदर स्त्रीला राधासारखी बाई कुठे घेऊन जाणार? गेली असेल एखाद्या कुंटणखाण्यात घेऊन."

"ताई, काय बोलताय तुम्ही?" तो रागाने गरजला.

"आता? आमच्यावर कशापायी डाफरताय? जे होऊ शकतं तेच सांगून राहिलोय की." ती फनकाऱ्याने तिच्या घरात गेली.

त्या बायकांचे बोलणे ऐकून तो पूर्ण उध्वस्त झाला होता. जिच्यासाठी त्याने कायमचे घर सोडले, तिला राधामावशी तशा ठिकाणी घेऊन गेली असेल या कल्पनेनेच अंगावर काटा उभा राहिला. त्याला एक क्षण वाटले स्वतःचा कडेलोट करून घ्यावा. दुसऱ्याच क्षणी मात्र त्याला त्याच्या सोनियाचा निरागस चेहरा आठवला आणि डोळ्यात पुन्हा पाणी जमा झाले होते.

सोनियाच्या शोधात तो मुंबईत वेड्यासारखा फिरत होता. सगळ्या गल्ल्या पालथ्या घातल्या. कुंटणखाने धुंडाळले. कुठेच सोनिया सापडली नाही. कुठे असती तरी त्याला भेटण्याची शक्यता नव्हतीच.

एक महिना असाच निघून गेला. कोल्हापूरला जाऊन तिच्या घरच्यांची मदत घ्यावी असे त्याच्या मनात यायचे. आधीच तिच्या घर सोडण्यामुळे गेलेले आप्पासाहेब आणि आता हे ऐकून पुन्हा त्यांच्या घरात काही वाईट घटना घटू नये म्हणून त्याने तो मार्ग स्वीकारला नाही.

एके दिवशी असाच एका कुंटणखाण्यात जाऊन स्वतःचे हसे करून तो परत येत होता. डोळ्यात अश्रू होते. सकाळपासून काही खाल्ले नव्हते त्यामुळे गरगरल्यासारखे होत होते. म्हणून मग तो एका भिंतीचा आधार घेऊन तिथेच बसला. काही वेळात घाईघाईने एक मध्यमवयाची स्त्री रिक्षामधून उतरून हातात छोटं बाळ घेऊन आत जाताना त्याला दिसली. त्याने सहज त्या इमारतीकडे पुन्हा पाहिले, ती एक अनाथाश्रमाची इमारत होती आहे हे त्याच्या लक्षातआले.
त्या स्त्रीचे बोलण्याचा आवाज त्याच्या कानावर येत होता. ते ऐकून नकळत त्याचे पाय आत वळले.

"ट्रेनखाली आली बिचारी. पण लेकरू मात्र तिने मध्ये ठेवलं म्हणून त्याला काही झालं नाही. दोन तीन महिन्यापूर्वी तिला तिच्या एका नातेवाईकाने जबरदस्तीने कुंटणखाण्यात डांबलं होतं. तिला तिथे रहायचे नव्हते म्हणून चान्स मिळताच तिथून पळ काढला आणि ट्रेनखाली स्वतःला संपवून टाकलं. शरीराच्या पार चिंधड्या झाल्या होत्या. चेहराही शाबूत राहिला नव्हता."

ती स्त्री तेथील व्यवस्थापिकेला सांगत होती. इकडे मोहनच्या डोळ्यासमोर सोनियाचा चेहरा उभा राहिला आणि तो रडतच तिथे गेला.
चाळीतील बायकांनी राधामावशी आणि सोनियाबद्दल जे सांगितले होते त्यामुळे ट्रेनखली आलेली स्त्री म्हणजे सोनियाच असेल हे त्याच्या मनात पक्के झाले होते.

"माझे बाळ आहे ते. द्या मला." त्यांच्याकडे बघून तो गयावया करत होता. व्यवस्थापिका बाईंनी त्याला आधी फटकारले. चांगलेच धारेवर धरले.

मोहनने करूण स्वरात आपली आपबीती सांगितली तेव्हा कुठे त्यांचा थोडा विश्वास बसला. पण बाळाला त्याच्याकडे सोपवायला त्या तयार नव्हत्या. तो बाळाचे करू शकणार की नाही? नोकरी आहे का हे सर्व त्यांना बघावे लागणार होते. मोहन बी. कॉम. चांगल्या गुणांनी पास झाला होता. एक दोन ठिकाणी नोकरीसाठी त्याने अर्ज टाकले होते. कुठूनतरी नोकरीची ऑर्डर येईल हे ठाऊक होते. पण त्या जर तरच्या गोष्टी होत्या. अजूनतरी काहीच पक्के नव्हते.

"मॅडम, मी बाळाला घेऊ?" त्याच्या डोळ्यातील अर्जव बघून व्यवस्थापिका बाईंना नाही म्हणताच आले नाही. त्यांनी बाळाला त्याच्या हातात दिले. बाळ हातात घेताक्षणी त्याच्या डोळ्यातील थेंब बाळाच्या गालावर पडला आणि बाळाने डोळे उघडून त्याच्याकडे बघून गोड हास्य केले. जन्माजन्मीची त्यांची ओळख होती जणू.
हातातील बाळ म्हणजे चार पाच महिन्यांची एक छोटूशी गोडुली होती. गुलाबाच्या पाकळी सारखा गुलाबी गोरा चेहरा, गोबरे गाल, काळे डोळे.. तो टक लाऊन तिच्याकडे बघतच राहिला. तिच्या गालाचा मुका घेऊन त्याने तिला पुन्हा एकदा हृदयाशी कवटाळले आणि मग बाईंच्या हवाली केले.

"मॅडम, माझ्या मुलीला मी चांगल्याप्रकारे सांभाळेन. आता किमान दोन तीन महिने तिला इथेच राहू द्या. मला नोकरी मिळाली की मी घेऊन जाईन. पण माझी एक विंनती आहे. तुम्ही कृपा करून कोणी दत्तक घ्यायला आलेल्या दाम्पत्याला माझी छकुली देऊ नका हो."

तो जायला निघाला तसे मॅडमनी त्याला आवाज दिला.."मोहनराव, तुमच्या या गोड मुलीचे नाव काय ठेवायचे?"

"ही परी खरंच खूप गोड आहे. मॅडम, तिचे नाव स्वीटी ठेवूया?" तो म्हणाला आणि त्या बाळाचे नामकरण 'स्वीटी' झाले.

*******
मोहन प्रीतीला त्याची गाथा ऐकवित होता. इकडे बाहेर स्वीटी ते सारे ऐकत होती. तिचे पाय लटपट कापत होते. आजवर तिच्या आयुष्याचा हा अध्याय कधी तिच्यासमोर आलाच नव्हता. मोहनने तिच्यावर प्रेमाची एवढी लयलूट केली होती की आयुष्यात आई नावाचे छत्र असावे असा विचारही तिला कधी शिवला नव्हता. तोही तिच्यापुढे कधी सोनियाचा विषय काढत नव्हता. पण आज तिच्या लाडक्या डॅडला सरप्राईज द्यायचे म्हणून ती आलेली, आणि ती स्वतःच सरप्राईज झाली होती.

"पुढे? पुढे काय झाले?" प्रीतीने हळवे होऊन मोहनला विचारले.

"त्याच महिन्यात मला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. दोन महिन्यांनी मी स्वीटीला घरी घेऊन आलो. गावाला जाण्याचा प्रश्नच नव्हता. फोन करून मी शालिनीला सारे काही सांगितले होते. आबांचा राग मावळणारा नाहीये हे मला कळले होते. मी सर्व विसरून पुढे जायचे ठरवले. माझे ऑफिस, माझी लेक आणि मी हेच माझे जग होते. आप्पासाहेबांची नात माझ्या पदरात आहे, तिला त्या सर्व सोईसुविधा मिळाल्या पाहिजेत, जे कधी सोनियाला तिच्या घरी मिळाल्या होत्या, या ध्यासाने मला पछाडले होते. खूप मेहनत करून खूप पैसा कमावला. स्वीटीला कशाचीही कमी पडू दिले नाही. मी तिच्यात इतका गुंतलो की सोनिया आणि माझी खरी लेक दुसरीकडे कुठेतरी आहेत, असे कधी मनातही आले नाही."
लांब श्वास घेऊन त्याने आपले डोळे टिपले.


"तुम्ही मुंबईला परतण्यापूर्वीच माईने राधाईसोबत पुणे गाठले होते. तुम्ही तिच्या आयुष्यातून का गेलात हे ठाऊक नव्हतं पण कसलीच बातमी न देता केवळ तुमचे पैसे पाठवणेही तिला रुचले नव्हते. ती स्वाभिमानी होती. पुण्यात येऊन हालअपेष्टा सोसून तिने काही दिवस काढले. नोकरी केली आणि मग सोनप्रीतची वीट रचली. ज्या राधाईबद्दल तुमच्या मनात राग आणि घृणा निर्माण झालीये ना, त्याच राधाईने माईला तेव्हा सोबत केली आणि आजही करतेय." प्रीतीचा स्वर कातर झाला होता.

"प्रीती, मी खूप मोठा गुन्हेगार आहे गं. राधामावशीचा, सोनियाचा आणि तुझाही. मला सोनियाला भेटायचे आहे. तिची माफी मागायची आहे. तुला माझ्या मनाची तगमग कळतेय ना गं? लेक आहेस ना माझी? प्लीज घेऊन चल ना मला." तो तिच्यासमोर हात जोडून उभा होता.

"देन हू आय एम?" इतका वेळ बाहेर असलेली स्वीटी त्वेषाने आत आली. तिचा आवाज इतका मोठा होता की हॉलमध्ये असलेले समीर आणि कृष्णाही धावत आर्टरूमकडे गेले.

"डॅड, टेल मी, हू आय एम? ही प्रीती तुमची मुलगी आहे तर मग मी कोण आहे?" तिचे मन तुटले होते. सारा राग डोळ्यातून अश्रूद्वारे वाहत होता. अंगाची थरथर वाढली होती..


:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//