प्रीती.. पर्व दुसरे! भाग - ५०.

कथा सोनियाची.. तिच्या प्रीतीची!


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -पन्नास.


तो काही बोलणार तोच समीरची नजर त्याच्याकडे गेली.
"कृष्णा? व्हॉट अ प्लिजन्ट सरप्राईज. तू इथे काय करतो आहेस?" त्याच्याशी हस्तांदोलन करत समीर विचारत होता.

"सॅम, तुम्ही ओळखता एकमेकांना?"
"येस! हा माझा मित्र, एक डॅशिंग असा इन्स्पेक्टर कृष्णा फ्रॉम कोल्हापूर आणि कृष्णा ही स्वीटी." त्याने दोघांची ओळख करून दिली.


कृष्णाने तिच्याकडे बघून स्मित केले.

"एक मिनिट. इन्स्पेक्टर कृष्णा? म्हणजे माझ्या डॅडचे जुने फोटो सोशल मीडियावर टाकणारे ते तुम्हीच का?" स्वीटी त्याच्याकडे रोखून बघत विचारत होती.

"राईट. तुम्हीच बोलला होतात ना, की हिम्मत असेल तर पत्ता शोधून घरी या. मग मी शोधला पत्ता आणि पोहचलो की तुमच्या बंगल्यावर!" त्याच्या चेहऱ्यावर अजूनही स्मित होते.

"तुम्ही दोघं नेमकं कशाबद्दल बोलत आहात?" स्विटी आणि कृष्णाचे बोलणे न कळल्यामुळे समीर गोंधळला होता.

"ते एक वेगळे मॅटर आहे. आपण बोलू त्यावर. तू बस ना. मी आधी डॅडना भेटून येते. त्यांच्या आर्टरूममध्ये कोण असेल? काही आयडिया नाहीये.
सॅम तुला माहिती आहे ना, मी तुला आजच्या दिवसाबद्दल सांगितलेय ना. तो कोणालाच त्याच्या आर्टरूममध्ये येऊ देत नाही, इव्हन मलाही नाही. मग आत्ता त्याच्यासोबत कोण असेल?" ती आर्टरूमकडे जायला वळली.

"मिस स्वीटी, ते बाहेर आले की कळेलच ना की त्यांच्यासोबत कोण होतं ते? एवढी काय घाई आहे?"
कृष्णा शांतपणे म्हणाला.

"मिस्टर कृष्णा, प्लीज डोन्ट इंटरफिअर इन माय पर्सनल लाईफ."
त्याच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकून ती तणतणत गेली.


"मित्रा अवघड आहे बाबा तुझं. कसली रागीट आहे तुझी चॉईस!" कृष्णा समीरकडे बघून हसला.

"नाही रे, उलट फार प्रेमळ आहे ती. पण अजूनपर्यंत तू इथे कसा? ते नाही सांगितलंस. आणि स्वीटी कसल्या फोटोबद्दल बोलत होती?" त्याच्याशेजारी बसून समीरने विचारले.

"मी प्रीतीच्या संदर्भात इथे आलोय." कृष्णा.

"प्रीतीच्या संदर्भात..? इथे?" समीर परत बुचकाळ्यात पडला.

"रिलॅक्स ब्रो! मिस्टर मोहनला भेटल्यावर कळेलच. त्यांच्याशी भेट तर होऊ दे. मग सगळं काही क्लिअर होईल." कृष्णा.

"होप सो. मला तर काय चाललंय काहीच कळत नाहीये. फक्त स्वीटी कशाने दुखावू नये असं वाटतं." समीर.

"फारसं काही होणार नाही. सुखासोबत दुःखाचे काटे सोबतीला असले तरच ते सुख चाखण्यातच तर गंमत आहे ना. हं, थोडा त्रास होईल तिला पण तुझ्यासारखा हळवा पार्टनर सांभाळून घ्यायला असेल तर काळजी कशाची?" त्याच्या खांद्यावर हात ठेवत कृष्णा म्हणाला.

"कसल्या दुःखाबद्दल बोलतो आहेस कृष्णा? आणि आत तिच्या डॅडसोबत कोण आहे?" समीर जरासा पॅनिक झाला.

"आत कोण आहे हे तर मलाही ठाऊक नाही. कोणीतरी मोठया कंपनीच्या मॅडम आहेत असं त्या काकू सांगत होत्या. त्यांच्याबद्दल मी काही म्हणत नाहीये. मिस्टर मोहनशी मी जे बोलेल, कदाचित त्यामुळे स्वीटी दुःखी होऊ शकते असं सांगत होतो मी."
कृष्णाचे बोलणे ऐकून समीर डोक्याला हात लाऊन बसला.
*******

स्वीटी आश्चर्य आणि उत्सुकतेने मोहनच्या आर्टरूमजवळ येऊन ठेपली. या रूममध्ये येणारी व्यक्ती नेमकी आहे तरी कोण हे तिला जाणून घ्यायचे होते. आत पाऊल टाकावे की नाही या विचारात असतानाच तिचे लक्ष कॅनव्हासवरच्या रेखाटनाकडे गेले.

"प्रीती?" तिच्या तोंडून शब्द बाहेर पडणार तोच तिच्या कानावर मोहनचे शब्द ऐकू आले..


"कुठून सुरुवात करू?" हुंदका दाबत तो प्रीतीशी बोलत होता.

"आईचा तो तिसरा हृदयविकाराचा झटका होता. मला आई हवी होती. पण सोनियावर अन्याय करायचा नव्हता. त्याच वेळी आईने शालिनीसोबत मांडलेला लग्नाचा प्रस्ताव. ती परिस्थिती अशी होती की मी काहीच करू शकलो नाही. सोनियाच्या विरहामुळे आप्पासाहेबांचा झालेला मृत्यू मला माहित होता. माझ्यामुळे आईला काही झाले असते तर मी कसे सहन केले असते?" मोहनने एक लांब श्वास घेतला.

"पण शेवटी व्हायचे तेच झाले. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आई गेली. त्यानंतर तीन महिने मला घराबाहेर पडताच आले नाही. सोनियाच्या पोटात असणारे बाळ, घरच्यांशी नाते तोडल्याचे दुःख, मला तिला आणखी दुःखी बघायचे नव्हते म्हणून पत्रातून फारसा काही मजकूर न लिहित मी दरमहिन्याला तिला कोल्हापूरहून मनीऑर्डर करत राहिलो पण इथले सत्य सांगू शकलो नाही. काही महिन्यानंतर दोनदा मी पाठवलेले पैसे परत आले तसे माझ्या मनात चिंतेचे काहूर माजले. मी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. आबा आणि मामाने विरोध केला तेव्हा शालिनीने त्यांना सोनियाबद्दल सांगितले आणि मला मुंबईला जाऊ देण्याची विनंती केली.

आजवर मी आणि शालिनी नवराबायकोचे केवळ नाटक करत होतो हे ऐकून आबांचे डोके सनकले. मी जर मुंबईला जाण्यासाठी घरातून पाय बाहेर काढला तर त्या घरात पुन्हा पाय ठेवायचा नाही अशी आबांनी धमकी दिली. आईवर माझे जीवापाड प्रेम होते. तिच्या प्रेमापोटी मी शालिनीशी लग्न केले होते, तरी ती मला सोडून गेली. मला आता पुन्हा सोनिया आणि माझ्या बाळापासून दूर रहायचे नव्हते. मला मुलगा झालाय की मुलगी हेही मला ठाऊक नव्हते. दोन महिन्यापासून मनीऑर्डर परत येत होती त्यामुळे सोनिया मुंबईला आहे की नाही हेही माहित नव्हते. शेवटी मनात आबांची माफी मागून मी गाव सोडले, ते कायमचेच." आबांच्या आठवणीत तो व्याकुळ झाला होता.

प्रीतीलाही आबांच्या डोळ्यांची आठवण झाली. त्या डोळ्यात तिने मोहनबद्दलचा रागच तर तेवढा अनुभवला होता. तिच्याबद्दल थोडा ओल जाणवला होता त्यांच्या मनात, पण डोळ्यातील अंगारात तो ओलही जळून गेला होता.

"मला वाटलं आबा राग राग करतील, पण जेव्हा ते त्यांच्या हातात आमच्या बाळाला घेतील तेव्हा त्या बाळाच्या निरागस स्पर्शाने त्यांचा राग कुठल्या कुठे पळून जाईल. सोनिया आणि बाळासकट ते आमचा स्वीकार करतील. लग्नाच्या बंधनातून मोकळे झाल्यावर शालिनीही तिचे आयुष्य जगू शकेल. एखाद्या चांगल्या मुलाशी तिचे लग्न होऊन तीही सुखी होईल.

आपण जसा विचार करतो तसे का घडत नसावे गं?"

त्याने तिच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला. त्या अश्रूनी काठोकाठ भरलेल्या डोहातील थेंब गालावर निखळतोय असे प्रीतीला वाटून गेले. मनात भावनांचे काहूर माजले तर होते पण स्वतःवर संयम राखत तिने केवळ श्रोत्याच्या भूमिकेचा आव आणला होता.

दाराआडून स्वीटी हे सर्व ऐकत होती. आपला डॅड कोणाशी हे बोलतोय हे अजूनपर्यंत तिला कळले नव्हते. कॅनव्हासवरचे प्रीतीचे चित्र आणि मोहन सांगत असलेला त्याचा भूतकाळ यांची सांगड घालणे तिला जमत नव्हते. तिच्या लाडक्या डॅडच्या आयुष्याचे आजवर न उलटलेले पान तीही बाहेरूनच वाचू पाहत होती.

"आबांचा रोष पत्करून मी मुंबईत पुन्हा एकदा परत आलो. दुःखाची पुरचुंडी होतीच सोबतीला, आता ते सर्व विसरून सुखाच्या नव्या धाग्याला पकडायचे होते. माझ्या बाळाचा मुका घ्यायचा होता, राधामावशीचे आभार मानायचे होते आणि माझ्या सोनियाला मिठीत घेऊन तिची माफी मागायची होती. तिला माझ्याबद्दल राग निर्माण झाला असेल, तो घालवायचा होता. तिचा रुसवा दूर करायचा होता.
माझ्या गाठीला काही पैसा जमा झाला होता. मुंबईत आल्याबरोबर सर्वातआधी मी सोनाराच्या दुकानात गेलो. दोन सोन्याचे मणी आणि एक छोटीसी डोरल्याची वाटी असलेले एक मंगळसूत्र घेतले. पहिल्यांदा मुंबईला आलो, तेव्हा तिला नकली मंगळसूत्र दिले होते, आता मला तसे करायचे नव्हते. माझ्या संसाराची नवी सुरुवात खरेपणाने करायची होती. गावाला गेल्यावर काय घडले हे तिला मी सांगणार होतो. आबांनी स्वीकार केला तर ठीक, नाहीतर आपला छोटासा संसार आपणच फुलवायचा हा विश्वास देणार होतो. चाळीतील त्या दहा बाय दहाच्या छोटयाशा घराची खूप ओढ लागली होती. कधी माझे बाळ आणि सोनिया नजरेला दिसणार असे झाले होते. त्या ओढीने डोळ्यात पाणी कसे आले, मलाच कळले नाही. डोळ्यातील पाणी घेऊन मी खोलीचा दरवाजा वाजवला. आणि.."

त्याच्या नजरेसमोर तो प्रसंग जशाच्या तसा उभा होता. त्या दिवसासारखेच आत्ताही त्याच्या डोळ्यातून आसवं वाहायला लागली.

इतका वेळ रोखून धरलेले त्याचे अश्रू बघून प्रीतीचे डोळे डबडबले. एखाद्या पुरुषाला रडताना ती पहिल्यांदा बघत नव्हती. आपल्या माईसाठी डोळ्यात पाणी आणताना तिने मिहीरला पाहिले होते पण आज सोनियाने ज्याच्यावर जीव ओवाळून टाकला होता त्या मोहनच्या डोळ्यातील अश्रुंनी तीही हळवी होत होती.

"मिस्टर मोहन.." सांत्वनासाठी म्हणून तिला तिचा हात समोर करायचा होता, मात्र त्यानेच त्याचे डोळे पुसले.

बाहेर स्वीटीला तिच्या डॅडचे अश्रू तर दिसले नाहीत पण त्याच्या स्वराने तिच्याही डोळ्यातून वाहू लागले होते.

:
क्रमश :
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all