प्रीती.. पर्व दुसरे! भाग -४९

कथा सोनियाची.. तिच्या प्रीतीची!


प्रीती..पर्व दुसरे!
भाग -एकोणपन्नास.

"मिस्टर मोहन?" तिने त्याच्याकडे बघून विचारले. तो प्रश्न होता की तोच मोहन आहे ही ती स्वतःला पटवू पाहत होती तिलाही कळले नाही.

तो मात्र तसाच उभा होता, स्थितप्रज्ञ! 'ही म्हणजे नेमकी आहे तरी कोण? सकाळपासून डोळ्यसमोरून एक क्षणही हलली नाही आणि आता समोर उभी आहे. का असं वाटतंय की खूप जवळची आहे ही, माझ्या सोनियाची प्रतिकृती आहे ही.' त्याचे डोळे कठोकाठ भरले.

"मिस्टर मोहन, मे आय कम इन?"

तिच्या आवाजाने तो बाजूला सरला. आजवर त्याने त्याच्या लाडक्या लेकीला सुद्धा कधी आपल्या आर्टरूममध्ये प्रवेश दिला नव्हता. प्रीतीने म्हणताक्षणी त्याने आपसूकच तिला आत यायला वाट मोकळी करून दिली. तिने आत प्रवेशून संपूर्ण खोलीभर एक नजर फिरवली आणि भारावल्यागत ती पाहतच राहिली.


खोलीभर सगळीकडे सोनियाच्या चित्रांचे पोस्टर्स होते. पंचवीस वर्षापूर्वीची सोनिया चित्ररुपात तिच्या समोर होती. लांबसडक केसांची, कुठे गालावर अवखळ बट आलेली, कुठे ओठावर गोड हसू उमटलेली! त्या विविधांगी छटांनी ती खोली सजली होती. तिच्या माईला ती पहिल्यांदाच तारुण्यातील अशा अवखळ रूपात भेटत होती. प्रत्येक चित्रात एक जिवंतपणा होता. सोनिया नव्हतीच सोबत पण हृदयाच्या गाभाऱ्यात दडलेल्या तिच्या प्रत्येक छटा मोहनने अगदी जशाच्या तशा रंगवल्या होत्या.
हे सगळं बघताना तिचे डोळे आपसूकच भरून येत होते. सोनियाचा विश्वास होता की तिचा मोहन नक्की परतेल, तो तिच्याशी प्रतरणा करणार नाही. खरंच मोहनने कुठे केली होती प्रतारणा? शालिनीने म्हटल्याप्रमाणे त्याच्या हृदयात तर केवळ सोनियाच होती. ही खोली त्याचीच तर साक्ष देत होती.

'राधाई, मोहनचे माईवरील प्रेम फसवे नव्हते गं. नाहीतर त्यांनी रेखाटलेले हे सर्व चित्रे अशी जिवंत कशी भासली असती? मोहन त्याच्या सोनियाला कधीच विसरू शकला नाही, विसरणार नाही.' तिचे मन तिला ग्वाही देत होते.

आपले अश्रू लपवत तिने मोहनकडे एक दृष्टीक्षेप टाकला. माईने फोटोत दाखवलेल्या चेहऱ्यापेक्षा प्रत्यक्षातील मोहन जास्त देखणा होता. हं, आता पन्नाशीकडे झुकलेला तो, त्यामुळे कपाळावर एक दोन सुरकुत्या दिसू लागल्या होत्या. डोळ्यावर चष्म्याने ठाण मांडले होते. केसातील एक दोन टुकार पांढरे केस चिडवत होते. अंग जरासे स्थूल झाले होते. यशाच्या समृद्धीचे तेज चेहऱ्यावर झळकत होते आणि तरीही त्याच्यात कसलेतरी एक अधुरेपण तिला जाणवत होते.

'मला ही अधुरेपणाची किनार अगदी स्पष्ट जाणवतेय. शालिनीआंटीने म्हटल्याप्रमाणे प्रेमाच्या आगीच्या झळा माईच्या मोहननेही सोसल्याहेत. पण यांना माईबद्दल असलं अभद्र कोणी सांगितले असावे? आणि यांनीही त्यावर लगेच विश्वास ठेवला? माईला शोधण्याचे साधे कष्टही घेतले नाहीत.' तिला मोहनला जाब विचारायचा होता. ती त्याच्याकडे वळली. तो तिचे निरीक्षण करतोय हे तिला जाणवत होते. एक पिता आपल्या लेकीला ओळखू शकला नव्हता, केवढे ते दुर्दैव!

"ही सगळी पेंटिंग्स.." कुठून सुरुवात करावी म्हणून तिने त्याच्या चित्रांना मध्ये आणले.

"माझ्या पत्नीची आहेत." तिचे वाक्य पुरे व्हायच्या आधीच तो उत्तरला.

"ओह, ब्युटीफुल!" तिने प्रशंसा केली. आता परत तिची नजर कॅनव्हास वरच्या ओल्या चित्रावर वळली आणि तिने प्रश्नार्थक त्याच्याकडे पाहिले.

"सॉरी, हे चित्र तुमचे आहे. खरं तर मी सोनियाचे चित्र रेखाटत होतो, पण माहित नाही का तुम्ही नजरेसमोरून हटत नव्हतात आणि कॅनव्हासवर मग तेच चित्र उमटले. प्लीज डोन्ट टेक इट अदरवाईज!" तिला वाईट वाटू नये म्हणून त्याने लगेच स्पष्टीकरण दिले.

"मला का वाईट वाटेल? उलट तुमच्या हातून स्वतःला असे रेखाटलेले बघून आनंदच झाला." ती स्फूट हसून म्हणाली.

"बाय द वे, तुमच्या मिसेस चित्रात खूप तरुण दिसतात. आता आहेत तरी कुठे त्या?" तिने उत्तरासाठी खडा टाकला.

"हे सर्व रेखाटन पंचवीस तीस वर्षांपूर्वीच्या सोनियाचे म्हणजे माझ्या पत्नीचे आहेत." तो.

"म्हणजे? आता त्या?"

"ती नाहीये या जगात." तो खिन्नपणे म्हणाला. डोळ्यात आसवांची गर्दी झाली होती.

"कधी शोधायचा प्रयत्न केलात?" तिचा प्रश्न.

"कुठे शोधू? ती राहिलीच नाही तर कुठे शोधायचं? तिला इथेच भेटतो मी. ह्या कॅनव्हास वर कुंचल्याने रंगवत राहतो." तो उत्तरला.

"सोनप्रीतच्या मीटिंगला यापूर्वी कधी पाहिले नाही मी." तिने विषय बदलवला.

"हं, आमची मेन ब्रँच बंगलोरला आहे. यापूर्वी दोन वर्ष मी तिथेच होतो. यावेळी आमच्या सीईओने मला पुण्यात पाठवले. एसएम ग्रुपची न्यू ब्रँच इथे ओपन केलीय आणि त्याची जबाबदारी माझ्यावर टाकली." तो तिला सांगत होता.

"सोनप्रीतच्या सीईओ कोण आहेत हे ठाऊक आहे तुम्हाला?" त्याच्या डोळ्यात नजर रोखून तिने विचारले.

"मिस सोनिया इनामदार. कोल्हापूरचे प्रसिद्ध व्यावसायिक आप्पासाहेब इनामदारांची मुलगी." ती त्याच्याचकडे बघत होती.

"सोनिया? आप्पासाहेबांची मुलगी? धिज इज इम्पॉसिबल!" त्याचा घसा कोरडा पडला होता.

"का शक्य नाहीये? एकट्या स्त्रीने हे साम्राज्य उभारले हे अशक्यप्राय वाटतेय का तुम्हाला?"

"नाही, तसे नाही. पण तुम्ही जे नाव घेतलेत, ज्या सोनियाबद्दल बोलता आहात ती बायको आहे माझी. "

"ठाऊक आहे मला. कारण मी तिचीच मुलगी आहे, प्रीती सोनिया इनामदार." तिचे ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते.

"काय बोलतेस तू? सोनिया, माझी सोनिया खरंच आहे? ती मला सोडून नाही गेलीये ना? आणि तुम्ही.. म्हणजे तू, तू आमची लेक आहेस? त्याचा श्वास फुलला होता. "इतकी वर्ष मी कुठल्या गैरसमजात वावरत होतो?"


"मी केवळ माझ्या माईची मुलगी आहे आणि माझी माई तुम्हाला सोडून नव्हे तर तुम्ही तिला सोडून गेलात. का वागलात तुम्ही तिच्याशी असं? तिला तिच्या गरोदरपणात सर्वात जास्त तुमची गरज होती, तेव्हा कुठे होता तुम्ही? का तिला आणि तिच्या बाळाला वाऱ्यावर सोडले?" ती त्याला जाब विचारत होती.

"मला सोनियाला भेटायचे आहे. आत्ता. प्लीज मला तिच्याकडे घेऊन चला ना."

"नाही मला आधी तुमचे उत्तर हवे आहे. का माझ्या माईला असे जिवंतपणी तिला देवाघरी पाठवून दिलेत?"

"असे नका ना बोलू." त्याने तिच्या ओठावर हात ठेवला.

"सोनियासाठी तर मी माझे घर सोडले होते. पण काही दिवसात माझ्या आईची तब्येत बिघडली म्हणून मला गावी परत जावे लागले होते. आईला अटॅक आला होता. तिला कसलेही टेंशन द्यायचे नाही हे डॉक्टरांनी आम्हाला बजावून सांगितले होते. कदाचित तिला तिच्या मृत्यूची चाहूल लागली होती, म्हणून तिने माझ्या लग्नाचा हट्ट धरला. तिच्या अवस्थेपुढे मी सोनिया आणि माझ्याबद्दल सांगूच शकलो नाही."


"आणि मग तुम्ही शालिनीशी लग्न केले." ती पुढे बोलली.

"आईच्या मनात ते होते, वेळेवर नकार द्यायला मला नाही जमले कारण मला सोनियासोबत माझी आईदेखील हवी होती." डोळ्यातील पाणी गालावर येऊ लागले होते.
"शालिनीशी केलेला विवाह म्हणजे केवळ एक करार होता. तिला मी सर्व सांगितले होते. आई थोडी बरी झाली की आम्ही ते नातं तोडणार होतो. आई मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आम्हाला सोडून गेली."
"हे माहितीये मला. पुढे काय घडले ते मला ऐकायचे आहे." ती.

"तुला कसं माहित? तू ओळखतेस शालिनीला?" तो.

"मी मागच्या महिन्यातत्यांना भेटून आले आहे. त्यांच्याकडून इथवर सगळं मला ठाऊक आहे. पुढे काय झाले ते सांगा." ती निर्विकारपणे बोलत होती.


******

"काय, आतातरी तुमचे साहेब आहेत ना घरी?" बाहेर कृष्णा गार्डला जरबेने विचारत होता.

"हो,आहेत की. तुम्हाला भेटायचे आहे ना? मग जा की आत." त्याने नरमाईने कृष्णाला आत जाऊ दिले. सकाळी त्याने दिलेली धमकी आठवून तो तसा कृष्णाला भिऊन होता.

"साहेब कुणीतरी मोठया मॅडमशी आत बोलत आहेत. तुम्ही इथं बसून वाट बघता का?" तिथल्या काकूंनी त्याला पाणी देत विचारले. तसेही त्याला आता दुसरे काम नव्हतेच. त्यामुळे तो तिथेच सोफ्यावर पाय लांब करून बसला.

कामवाल्या काकू जरा बुचकाळ्यात पडल्या होत्या. इथे कामाला लागून दोन महिने झाले होते, आजवर फारसे कोणी भेटायला येत नव्हते. ऑफिसचे काम साहेबांनी कधी घरी आणले नव्हते. मोकळा वेळ असला की त्यांची मुलगी अन ते दोघेच गप्पा मारत बसत. आज मात्र एक मोठया मॅडम त्यांना भेटायला आल्या होत्या आणि आता पुन्हा एक नवे साहेब देखील आले होते.
घरात काय घडत आहे तिला अंदाज लागत नव्हता.

'आपल्याला काय करायचंय? आपलं काम बरं नि आपण बरं.' ती स्वतःशी पुटपुटली.


बाहेर कारच्या हॉर्नचा आवाज आला.
"छोट्या मॅडम आल्यात." तिने कृष्णाकडे नजर टाकली आणि दरवाजा उघडायला गेली.

"ये ना सॅम आत. आपलेच घर आहे नि डॅड देखील घरीच आहेत." दारात स्विटी उभी होती. तिच्या हातात समिरचा हात होता.

डॅऽड, व्हेअर आर यू?" तिने दारातूनच साद घातली.

"साहेब त्यांच्या आर्टरूममध्ये आहेत. कोणीतरी मॅडम आल्या आहेत, त्यांच्याशी बोलत आहेत. छोट्या मॅडम, तुम्ही सांगितले तसे मी गुलाबजाम करून ठेवले आहेत. आता मी निघते. मला उशीर होतोय." काकू निघून गेल्या.

"एक्सक्युज मी? आपण कोण? आणि इथे काय करताय?" इतकावेळ सोफ्यावर शांतपणे बसून असलेल्या कृष्णाकडे बघत ती म्हणाली.

तो काही बोलणार तोच समीरची नजर त्याच्याकडे गेली.

"कृष्णा? व्हॉट अ प्लिजन्ट सरप्राईज. तू इथे काय करतो आहेस?" त्याच्याशी हस्तांदोलन करत समीर विचारत होता.

"सॅम, तुम्ही ओळखता एकमेकांना?"

"येस! हा माझा मित्र, एक डॅशिंग असा इन्स्पेक्टर कृष्णा फ्रॉम कोल्हापूर आणि कृष्णा ही स्वीटी." त्याने दोघांची ओळख करून दिली.

:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all