प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -चव्वेचाळीस.
"मी इन्स्पेक्टर कृष्णा. आतातरी आत सोडाल का?"
"सर, मी मॅमना आधी विचारते आणि सांगते." ती फोनला हात लावणार तोच कृष्णाच्या मोबाईलची रिंग वाजली.
"सी, तुमच्याच मॅमचा फोन आलाय. तुम्ही आत सोडत नाही आहात हे त्यांना सांगू का?" तिला मोबाईलची स्क्रिन दाखवत तो म्हणाला.
"ओह, सॉरी सर. तुम्ही जाऊ शकता." त्याला प्रीतीच्या केबिनचा मार्ग दाखवत ती अदबीने म्हणाली.
ओठावर स्मित घेऊन कॉल कट करून तो केबिनकडे निघाला.
कॉल कट झाला म्हणून प्रीती जरा खट्टू झाली. थोडेसे वाईटही वाटले.
'इट्स ओके! तो कामात असेल म्हणून त्याने कॉल कट केला असावा आणि मी म्हणेन तेव्हा प्रत्येकवेळी माझ्यासाठी त्याने का अव्हेलेबल असावे?' ती तिच्याच विचारात होती.
"मे आय कम इन?" केबिनच्या दारावर झालेली टकटक आणि कानावर आलेला ओळखीचा स्वर. प्रीती उठून उभी झाली.
"कृष्णा? तू इथे? असा अचानक?" तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्याचे भाव एकाचवेळी अवतरले.
"तू माझी आठवण केलीस तसाच आलो की." तो हसून म्हणाला.
"काय गं? खूप टेन्स दिसतेस, ठीक आहे ना सगळं?" थोडे गंभीर होत तो.
तिने होकारार्थी मान हलवली. तिच्या डोळ्यातील पाणी आणि हृदयातील अस्वस्थता मात्र त्याच्यापासून लपली नाही.
"प्रीती? अगं काय हे?" त्याने विचारायचे अवकाश की तिने त्याला मिठी मारली. तिच्या अनपेक्षित अशा वागण्याने तो जरासा भांबावला.
"कृष्णा, आय रिअली मिस यू." तिचा एक हुंदका बाहेर पडला.
"वेडाबाई, मी तुझ्यासमोरच आहे की. शांत हो आणि काय झाले ते नीट सांग बघू." तिच्या डोक्यावर हात फिरवत त्याने विचारले.
त्याच्या हाताचा स्पर्श होताच ती मागे सरली.
"आय एम सॉरी! भावनेच्या भरात ते.."
"प्रीती, स्पष्टीकरण देणं खरंच इतकं महत्वाचे आहे का?" तिची उडालेली भंबेरी बघून तो म्हणाला. "आणि हे काय? तुमच्या ऑफिसमध्ये बाहेरचे कोणी आले की स्वतःबरोबर त्यांनाही उभे राहायची शिक्षा करतात का?" त्याने हसून विचारले.
"नाही रे. सॉरी, सॉरी! प्लीज बस ना." खुर्चीकडे इशारा करून ती म्हणाली. तो बसल्यावर ती बसली आणि रिसेप्शनवर फोन करून चहा पाठवायला सांगितले.
"इकडे कसे काय येणे झाले?" चहाचा घोट घेत ती.
"अगं सकाळी एका केसच्या संदर्भात आलो होतो, मग म्हटलं तुला भेटून जाऊया." तो.
"अरे, मग घरी का नाही आलास?"
"हो, यायचंय ना. सोनिया मॅमना भेटायचे आहे आणि तुझ्या निकीला सुद्धा भेटायचे आहे. कशी आहे आता ती?"
निकीचे नाव घेतले तसे प्रीती खुदकन हसली.
"कृष्णा, तुला सांगायचं राहूनच गेलं. निकी माझ्या मामाची मुलगी आहे, खऱ्याखुऱ्या मामाची."
तो तिच्याकडे काही न कळून नुसता बघत राहिला. त्याचा गोंधळ बघून मग तिने त्याला सारे काही कथन केले.
"अरे व्वा! हे तर भारीच झाले की. मग तर घरी यायलाच हवे."
"हो, रात्रीच्या जेवणालाच ये ना. म्हणजे मग तुला माझ्या राधाईच्या हातची चवदेखील चाखायला मिळेल." ती.
त्याने 'डन' म्हणून अंगठा दाखवला.
"बरं, आता मी निघू?" उठत तो.
"कृष्णा, मिस्टर मोहनबद्दल काही कळलेय का रे?" तिने त्याच्याकडे आशेने पाहत विचारले.
"प्रयत्न सुरू आहेत. आय प्रॉमिस यू, पुढील काही दिवसात तुला नक्की चांगली बातमी मिळेल." त्याने शिताफीने त्याच्या हाती लागलेली बातमी सांगायची टाळली.
"हम्म." तिचा चेहरा खिन्न झाला.
"प्रीती, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर?" तिला तसे खट्टू झालेले बघून तिच्या जवळ येत त्याने विचारले.
"हो, आहे ना." तिने मंद स्मित करून मान डोलावली.
"मग झालं तर. आता निघतो मी." तो.
तो गेल्यावर प्रीती काही क्षण डोळे मिटून बसली होती. त्याची आठवण काय केली नी तो अचानक हजर झाला याचे तिला आश्चर्य वाटत होते. तिचे अनपेक्षितपणे त्याला मिठी मारणे आणि त्याला 'आय मिस यू' म्हणणे तिला आठवले तसे तिने स्वतःच्या डोक्याला एक टपली दिली.
'असे कसे वागले मी? पण मुद्दामहून नाही केले. त्याला बघून अचानक झालेली ती क्रिया होती. त्यावेळी तो दिसला आणि स्वतःला मी आवरू शकले नाही. माझे हे वागणे बघून त्याला काय वाटले असेल? तो कसा अगदी प्रोफेशनली बोलत होता, मीच स्वतःला सावरायला हवे होते.'
मोबाईलची मेसेज ट्यून वाजली आणि तिने डोळे उघडले.
'जास्त विचार करू नकोस, तब्बेतीला हानिकारक असतं ते. तुझे डोळे बघितलेस? तो निळाशार समुद्र ओहोटी लागल्यासारखा भासत होता. असे आटलेले डोळे तुला सुट करत नाहीत गं. सो डोळ्यावर पाणी घे आणि तुझ्या मिटिंगच्या प्रेजेंटेशनची तयारी कर. ऑल दी बेस्ट!'
कृष्णाचा भलामोठा मेसेज होता.
'अरे, याला खरंच माझ्या मनातील कळतं का? मी विचार करतेय हे याला कसे समजले? आणि प्रेजेंटेंशनचे काय? मी तर काहीच बोलले नव्हते.'
ती बुचकाळ्यात पडली. त्याची निळाशार समुद्राला लागलेली ओहोटी आठवली आणि तिने आरशात चेहरा पाहिला.
'खरंच, माझे डोळे किती निस्तेज दिसत आहेत. पाच मिनिटाच्या भेटीत त्याला लगेच हे जाणवलेदेखील?'
तिने चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारला आणि परत आरशात पाहिले. तिचे तिलाच थोडे बरे वाटत होते. ती स्मित करून खुर्चीवर बसली.
'मिस एच आर, कामाला लागा. नाहीतर मनात काही विचार यायचा अवकाश की इन्स्पेक्टर साहेबांचा मेसेज आलाच म्हणून समजा.' तिने हसून स्वतःला बजावले.
*******
"अंकल, विरेन मामा म्हणजे माईचा अगदी जवळचा भाऊ, तरी त्याच्या हाकेला तिने प्रतिसाद नाही हो दिला." सायंकाळी मिहीरशी बोलताना ती सांगत होती.
"प्रीती माझे मन मला सांगतेय की सोनिया लवकरच बरी होईल. तू टेंशन घ्यायचे नाही बरं." त्याने तिला समजावले.
"आणि हो, कृष्णा काय म्हणाला? ते नाही सांगितलेस."
"तो आल्याचे मी तुम्हाला सांगायलाच विसरले, पण तुम्हाला कसे माहित? "तिने त्याच्याकडे गोंधळून पाहिले.
"तुला भेटायला येण्यापूर्वी त्याने मला कॉल केला होता आणि जाताना सुद्धा भेटून गेला. बाय द वे, ही इज नाईस गाय!" हसून तो.
"ओह! म्हणजे उद्याच्या आपल्या मिटींगचे तुमच्याकडून त्याला कळले तर?" तिने डोक्याला हात मारला.
"हो, मी त्याला बोललो होतो. बरं, तुझी तयारी झालीये ना? मी आपले नेहमीचे हॉटेल बुक केलेय. तू कसली काळजी न करता फक्त मिटिंग हॅन्डल कर." मिहीर.
"येस अंकल, आय विल डू इट." तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता.
"द्याट लाईक माय प्रेट्टी प्रीती. मला तुझा हाच कॉन्फिडन्स फार आवडतो. जराशी अवखळ आहेस पण सोनियाचा हा गुण परफेक्टली तुझ्यात आलाय. उद्याची मिटींग नक्कीच सक्सेस होईल." तिच्या डोक्यावर हात ठेवत तो म्हणाला.
तिचे ओठ रुंदावले. 'कृष्णाला भेटले नी अचानक माझा आत्मविश्वास वाढला. त्याच्या व्यक्तिमत्वात खरंच एक जादू आहे.' मनात आलेल्या विचाराक्षणी परत एकदा मेसेज ट्यून वाजली. स्क्रिनवर कृष्णाचे नाव दिसत होते.
'अरेच्चा! याला परत मनातले कळले की काय?' विचार करत तिने मेसेज वाचला. रात्री साडेसातला तिच्याकडे तो येतोय हे त्याने कळवले होते.
अंकल, मला निघायला हवे. घरी गेस्ट आहेत आणि रात्री कृष्णादेखील येतोय.
"ओके डिअर, सी यू टुमारो! आणि उद्याची मिटिंग आटोपल्यानंतर मी घरी येईनच. सोनियाचा वाढदिवस आहे ना?" मिहीरने तिचा निरोप घेतला आणि ती निघाली.
*******
"सॅम, उद्याचा एक दिवस मला देशील?" तिच्या आवडत्या आईसक्रिमचा आस्वाद घेत स्वीटी समीरला विचारत होती.
"बेबी, आजचा अख्खा दिवस आपण सोबतच तर होतो. मुव्ही, शॉपिंग आणि आता हॉटेलिंग. तरी परत उद्या भेटायचे म्हणतेस." समीर.
"हम्म. यू आर अ स्पेशल पर्सन इन माय लाईफ. म्हणून उद्याचे स्पेशल इन्व्हिटेशन तुला देतेय."
"ॲक्च्युअली स्वीटी, उद्या सोनप्रीतची मिटींग आहे, प्रीती पहिल्यांदा ती ही मिटिंग अटेंड करतेय, तेव्हा तिच्यासोबत मला राहायला लागेल. सॉरी यार!" तो दिलगिरीने म्हणाला.
"इट्स ओके! तुला प्रीतीसोबत राहायचेय की माझ्यासोबत यायचेय ते तू ठरव. मी तुला फोर्स करणार नाही. चॉईस इज टोटली युअर्स. पण एक सांगू सॅम? जेव्हा मी तुझ्यासोबत असते ना तेव्हा खूप भारी वाटतं. तुझी कंपनी खरंच मी मनापासून एन्जॉय करते. "
त्याच्या डोळ्यात डोळे घालून ती बोलत होती. तिचे भाव त्याला काहीतरी वेगळेच भासत होते. तिच्या डोळ्यातील थेंब गालावर ओघळला आणि त्याचे मन सैरभैर झाले.
"हेय स्वीटी, अशी डोळ्यात पाणी नको ना आणू. मी तुझ्यासोबत येण्याचा नक्की प्रयत्न करेन." तिच्या हातावर हात ठेवून तो म्हणाला तशी स्वीटीची कळी खुलली.
"सॅम, आजचा दिवस मस्त गेला. होप उद्याचा सुद्धा छान जाईल. आता निघूया?" तिच्या प्रश्नावर स्मित करून तो उठला. तिची सोबत त्यालाही हवीशी वाटत होती. उद्याची त्यांची डेट निश्चित झाली होती.
:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा