Mar 02, 2024
प्रेम

प्रीती.. पर्व दुसरे! भाग -४३

Read Later
प्रीती.. पर्व दुसरे! भाग -४३


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -त्रेचाळीस

"जेवण अगदी सुग्रास होते. मन तृप्त झाले. प्रीती बाळा, निकी कुठे आहे आणि सोना कुठे आहे हे आतातरी सांगशील का गं?"

जेवण आटोपल्यावर हात धुताना विरेनने विचारले. जेवण स्वादिष्टच होते, पण आल्यापासून दोघीही नजरेस पडल्या नव्हत्या त्यामुळे तो कासावीस झाला होता.

"प्रीती, निकी ठीक तर आहे ना गं? आणि मुळात तुम्ही दोघी कशा भेटल्यात?" मामीने म्हणजे मधुराने अधीरतेने विचारले.

"हो, निकी अगदी सुखरूप आहे. आम्ही कुठे भेटलो हे तुम्हाला सांगेनच. आधी तुम्ही तिला भेटून घ्या. तत्पूर्वी तुम्हाला एक सांगायचंय."

"काय?" मामा मामी एकत्रच म्हणाले.

"ते.. निकीचा छोटुसा ॲक्सीडेन्ट झालाय, त्यामुळे सध्या ती चालू शकत नाहीये."

"काय?" तिचं वाक्य पुरे होण्यापूर्वीच मधुराची घालमेल सुरू झाली. "निकी बरी तर आहे ना?" तिचा प्रश्न.

"हो, हो. ही एक गोष्ट सोडली तर ती एकदम ठणठणीत आहे. चला, तुम्हीच प्रतक्ष्यात भेटून बघा."


"निकी ऽऽ" अधीरतेने दोघेही तिच्या खोलीत गेले.

"आई, बाबा.. कसे आहात तुम्ही?" आपल्याला काही झालेच नाही या अविर्भावत निकी त्यांनाच विचारत होती.

"आम्हाला काय धाड भरलीय? तूच केवढा मोठा ॲक्सीडेन्ट करून घेतला आहेस, आणि काय गं? आम्हाला कळवावे असेही तुला वाटले नाही का?" विरेन तिला काळजीने बोलत होता. मधुरा तर काही न बोलता तिला मिठी मारून अश्रुंचा अभिषेक करत होती.

"बाबा, अरे रिलॅक्स! किती टेंशन घेतोस? तुमची निकी आता काय कुक्कुल बाळ आहे का? माझं मला व्यवस्थित मॅनेज करता येतं. आणि आई अशी सारखी रडत असते ना, म्हणून नाही सांगितले.
अगं माझी लाडकी आई, नको रडूस ना. नाहीतर मी माझ्या मॉमकडे दुबईला निघून जाईन." ती आपल्या आईचे गाल ओढत म्हणाली.

"बघितलंत? एक महिन्यापासून माझ्या दूर आहे तरी परत दुबईला जायची गोष्ट करते." मधुराने डोळ्याला पदर लावला.

"ए आई, चिल गं. आता तुला सोडून मी कुठ्ठे कुठ्ठेच जाणार नाही." निकी हसत म्हणाली. आतून तीही थोडी हळवी झाली होती.

"आणि बाबा हे काय? मी तुम्हाला इथे सोनाआत्तूला भेटायला बोलावले होते ना? तुम्ही दोघे तर मलाच गराडा घालून बसला आहात." लटक्या रागाने निकी.

"हो गं. पण तुझी ही प्रीती दी, एक नंबरची हट्टी आहे. तिने आधी आम्हाला जेवण करायला लावले आणि आत्ता कुठे तुझ्याकडे सोडले. आता मात्र तिला भेटल्याशिवाय चैन पडणार नाही." विरेन.

"हो पण त्या आहेत तरी कुठे? मलाही त्यांना भेटायची ओढ लागलीये."मधुरा उत्सुकतेने प्रीतीकडे बघून म्हणाली.

"चला, आपण माईला भेटायला तिच्या खोलीत जाऊ." त्यांच्याकडे बघून प्रीती.

"सोना घरात असूनही भेटायला बाहेर आली नाही. अजूनही ती तिच्या लाडक्या विरेनदादावर रागावली आहे का गं?" हळवे होत विरेन विचारत होता.

"तू ओळखतोस ना तुझ्या सोनाला? ती रागावली असेल असे खरंच तुला वाटते?" राधामावशी त्याच्याकडे पाहत म्हणाली. तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते.


बोलता बोलता ते सोनियाच्या खोलीजवळ आले. बाहेर येत असलेल्या नर्सने त्यांच्यासाठी दरवाजा उघडला.
समोरचे दृश्य पाहून विरेनसह मधुराच्या पायाखालची जमीन सरकली.

"सोनाऽऽ, सोनाऽऽ काय झाले तुला? बोल ना माझ्याशी. तू आमच्यावर रुसली आहेस का? हवं तर मी तुला सॉरी म्हणतो पण डोळे उघडून एकदा तुझ्या दादाकडे बघ तरी." विरेन एखाद्या लहान मुलासारखा रडत होता.

"मामा.." प्रीतीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. "आवरा स्वतःला. माई कुणालाही काहीच प्रतिक्रिया देऊ शकत नाही हो. तिचा खूप मोठा अपघात झाला आहे." प्रीती.

"कसं झालं हे सगळं? प्रीती, राधामावशी कोणीतरी सांगा ना?" तो अजूनही स्फून्दत होता. मग राधामावशीनेच त्याला शांत करत घडलेली सर्व हकीकत विस्ताराने सांगितली.

"पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदा तिने कोल्हापुरात पाऊल टाकलं आणि तिचे आयुष्यच खुंटले. तीन महिन्यापासून ती अशीच बेडवर पडून आहे. मनात रोज एक नवी आस असते की आजतरी ती डोळे उघडेल, पण अजुनपर्यंत तो दिवस उजाडला नाहीये." राधामावशी.

"उजाडेल, मावशी नक्कीच उजाडेल. तिच्यावर प्रेम करणारी इतकी माणसं तिच्याजवळ आहेत, त्याच प्रेमाखातर तो ईश्वरदेखील लवकरच त्यांना या सगळ्यातून बाहेर घेऊन येईल." मधुरा राधामावशीचे डोळे पुसत म्हणाली.

"हो, इतकी वर्ष मी देवावर विश्वास ठेवत नव्हतो, पण त्याचे लक्ष सर्वांकडे असते. उगाच त्याने निकी आणि प्रीतीची भेट घडवून नव्हती आणली. प्रीती बेटा, आता खचायचं नाही. आपली सोना लवकर बरी होईल."
वीरेनच्या बोलण्यावर आलेला उमाळा गिळून तिने होकाराने मान हलवली.

"माई मी, ऑफिससाठी निघते. उद्याच्या मिटिंगचे प्रिपरेशनदेखील करायचे आहे."

"हो, नीट जा गं बाळा."

"हम्म." म्हणून तिने सगळ्यांकडे बघून हात हलवला. निकीला स्पेशल बाय करून मग ती पुढे निघाली.

"एवढीशी पोर, पण सोनिया अशी पडल्याबरोबर ऑफिसची सगळी जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडतेय. प्रीतीकडे पाहिलं तर मला पंचवीस वर्षांपूर्वीची सोनियाच दिसते रे. याच वयात सोनियाने सोनप्रीतची वीट रचली होती आणि आता प्रीती तोच वारसा चालवत त्याचा डोलारा सांभाळत आहे."

राधामावशी वीरेन, मधुरा आणि निकीशी गप्पा मारत होती.

"बरोबर बोलतेस मावशी. तिच्या डोळ्यात तोच स्पार्क आहे गं, जो सोनियाच्या डोळ्यात मी पूर्वी बघायचो. आमच्या आप्पासाहेबांना तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या. ते तर तिला अस्सल सोनं म्हणायच्या." डोळ्यात पाणी आणून तो.

"हो, मला ठाऊक आहे सारं. मी कोणाला प्रत्यक्षात पाहिले नसले तरी सोनियानी तुम्हा सर्वांबद्दल सांगून सांगून मनात तुमची एक प्रतिमा तयार झाली आहे." राधामावशी.

"मावशी तू देखील किती ग्रेट आहेस गं. कदाचित आईसाहेबांना एखादी बहिण असती तर तिने सोनासोबत असे काही घडूच दिले नसते. सोनाला इतकी साथ दिल्याबद्दल थँक यू सो मच." त्याचे डोळे भरून आले तसे राधामावशीने त्याला मिठीत घेतले. आईसाहेब गेल्यानंतर अशी हक्काची प्रेमळ मिठी तो पहिल्यांदा अनुभवत होता.

******

"हेय प्रीती, एव्हरीथिंग इज फाईन ना?" ती केबिनमध्ये शिरली तसे तिच्या मागोमाग येत समीरने विचारले. "ती डोक्यावर पडलेली मुलगी बरी आहे ना?" तिचा पडलेला चेहरा बघून त्याने मस्करीत पुढचा प्रश्न विचारला.

"समीर, तिला काही बोलायचे नाही हं. निकी माझी खरीखुरी बहिण आहे." प्रीती.

"ओह रिअली?" तो.

"येस." तिने मग काल घडलेली घटना आणि विरेन व मधुराचे झालेल्या आगमनबद्दल त्याला सांगितले.

"अच्छा, म्हणून तू सकाळची आत्ता उगवलीस होय? ते जाऊ दे, पण मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे." त्याने तिला एक प्रेमळ मिठी मारली.

"तुला माहित आहे, मामा नावाचं एक तरी रसायन आपल्या आयुष्यात असायलाच पाहिजे. माझे माझ्या मामाशी कसे रिलेशन आहेत ते माहितेय ना? तुमचीही गट्टी लवकरच जुळेल." तिच्या डोक्यावर टपली मारत तो.
तिच्या ओठावर एक हलके हसू उमटले. तो पुढे आणखी काही बोलणार तेवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली.


दोन मिनिटे बोलून त्याने मोबाईल ठेवला. बोलताना त्याच्या चेहऱ्यावर चमक जाणवत होती." बाय प्रीती, मी येतोच." तो.

"अरे पण इतक्या घाईने कुठे निघालास? आणि चेहरा बघितला का? किती तो ब्लश करतोय?" आता तिला त्याची मस्करी करण्याची लहर आली.

"काहीतरीच तुझं." तो.

"ओहो, सम्या तू चक्क लाजतो आहेस? नक्कीच स्वीटीचा कॉल होता ना? तिच्या प्रेमात वगैरे पडलास की काय? तशी चांगली आहे हं ती." प्रीती त्याला चिडवत होती.

"नंतर बोललेले चालणार नाही का? आता उशीर होतोय." चिडक्या स्वरात तो.

"हो, जा बाबा. आता काय दोस्त दोस्त ना रहा.." ती हसू दाबत म्हणाली.

"प्रीतीऽऽ.."

"असा चिडू नकोस, लवकर जा. जी ले अपनी जिंदगी."
तिच्या बोलण्यावर न चिडता तो तिथून हसून निघून गेला.

तो गेल्याच्या दिशेने प्रीती एकटक पाहत होती.
'दिवस कसे भरभर सरत आहेत? आयुष्य वळणावर नवे वळण घेतेय.'
तिला अचानक कृष्णाची खूप आठवण येऊ लागली.

'कृष्णा, तू इथे असतास तर किती बरे झाले असते? समीरशी बोलून बरेच हलके झाल्यासारखे वाटतेय पण तरीही तूही सोबत हवास रे.' तिने मनात त्याची आळवणी केली. 'त्याला एक कॉल करावा का?' स्वतःलाच तिने प्रश्न केला.

******

"एक्सक्युज मी, मला मिस प्रीतीला भेटायचे आहे, त्यांची केबिन कुठे आहे कळेल का?" एक सुंदर रुबाबदार तरुण रिसेप्शनवर विचारत होता.

"सॉरी, सर. तुमची अपॉइंटमेंट नसेल तर तुम्हाला त्यांना भेटता येणार नाही." दिलगिरी व्यक्त करत रिसेप्शनीस्ट म्हणाली.

"त्यांना भेटायला मला अपॉइंटमेंटची गरज नाहीये. केबिन कुठे आहे तेवढे सांगा."

"आपण कोण?"

"मी इन्स्पेक्टर कृष्णा. आतातरी आत सोडाल का?"

"सर, मी मॅमना आधी विचारते आणि सांगते." ती फोनला हात लावणार तोच कृष्णाच्या मोबाईलची रिंग वाजली.

"सी, तुमच्याच मॅमचा फोन आलाय. तुम्ही आत सोडत नाही आहात हे त्यांना सांगू का?" तिला मोबाईलची स्क्रिन दाखवत तो म्हणाला.

"ओह, सॉरी सर. तुम्ही जाऊ शकता." त्याला प्रीतीच्या केबिनचा मार्ग दाखवत ती अदबीने म्हणाली.

ओठावर स्मित घेऊन कॉल कट करून तो केबिनकडे निघाला.

:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//