Feb 25, 2024
प्रेम

प्रीती.. पर्व दुसरे! भाग -४२

Read Later
प्रीती.. पर्व दुसरे! भाग -४२

प्रीती..पर्व दुसरे!
भाग -बेचाळीस


"मग मीच त्याला प्रॉमिस केलं की मी कितीही रागावून घराबाहेर गेले तरी तुझ्याकडे नक्की परत येणार. त्यामुळे मी घरून अशी गेले तरी त्याचा मी येणार आहे हे त्याला ठाऊक असतं.
आत्तूवर त्याचा खूप जीव आहे गं दी. ती तेव्हा माझ्यासारखी घरी परत आली असती तर बरं झालं असतं ना?" प्रीतीकडे एक कटाक्ष टाकून निकी खिन्नपणे म्हणाली.

प्रीती काही न बोलता निकीच्या पायाशेजारी खाली बसली. डोळ्यातून अश्रू नाही म्हटले तरी गालावर आलेच.

"दी, अगं तू नको ना इतकी इमोशनल होऊ. तू अशी रडशील तर मलाही रडू येईल. आणि अशी खाली का बसलीस? तू आधी ऊठ बघू." निकीचा स्वर रडवेला झाला होता.


"निकी, तू मला विचारलेस ना, की हा फोटो माझ्याकडे कसा आला? ऐक, ही फोटोतील तुझी सोनाआत्तू आहे ना, ती जिच्याबद्दल बोलताना तू थकत नाहीयेस, तिचे ते कौतुक ऐकून मी नतमस्तक झालेय. आत्तापर्यंत तिच्या भावंडाबद्दल थोडे थोडे जाणून घेत होते त्यांच्याबरोबर तू लहानाची मोठी झालीयेस, मग मी का बसू नये तुझ्या पायाशी?" प्रीती भावनाविवश होऊन बोलत होती.

"दी, तू काय बोलतेस ना मला कळत नाहीये." निकी.

"निकी, हा जो फोटो आहे ना तो माझ्या माईचा आहे. अगं वेडे, तुझी सोनाआत्तू म्हणजेच माझी माई आहे. तुला कळतंय का?" प्रीती आवेगाने म्हणाली.

"काय? तुझी माई माझी सोनाआत्तू आहे? म्हणजे माझी सोनाआत्तू तुझी माई आहे? ओ माय गॉड! ओ माय गॉड." तिचा गोंधळ दूर झाला होता. तीने प्रीतीचे हात घट्ट पकडले.
"दी, म्हणजे आपण दोघी खरंच बहिणी आहोत?" ती प्रीतीकडे आनंदाने बघून विचारत होती.
"दी आय एम सो सो सोऽऽ हॅपी! तुला कळणार नाही मी किती खूष आहे ते. इतकी वर्ष बाबाकडून मी आत्तूबद्दल ऐकत आले, तिच्याच घरी गेल्या महिन्याभरापासून मी राहतेय, इट्स जस्ट अनबिलीव्हेबल. मला ना आनंदाने काय करू, काही सुचत नाहीये. उठून नाचावसं वाटतंय. उडया माराव्याशा वाटत आहेत. माझा पाय बरा असता तर मी नाचलेही असते, पण अफसोस! काय करू यार मी? आनंदाने ओरडू का? की बाबाला फोन करून सांगू?" तिच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.

"अगं, हो, हो. रिलॅक्स. तुझा पाय कसा आहे ते माहितीये न? आणि इतक्या रात्री फोनही करू नकोस. तुला काही बरेवाईट झाले असे समजून घाबरतील ते." प्रीती उठून तिला मिठी मारत म्हणाली.

"मग काय करू मी? इतकी आनंदाची बातमी आपल्या दोघीतच कशी ठेवायची ना? दी मला आत्तूला भेटायचे आहे, आत्ताच्या आता."

"सकाळी घाबरली होतीस, ते लगेच विसरलीस का?" प्रीती.

"निकी आता नाही घाबरणार गं. प्लीज चल ना." प्रीती तिच्या या मागणीला नकार देऊच शकली नाही.

सोनियाच्या खोलीत गेल्यावर तिला बघण्यासाठी अधीर झालेली निकी तिला बघतच राहिली.
गोरापान चेहरा, मिटलेले डोळे, नाकावर असलेला ऑक्सिजनचा मास्क. ते बघून निकीचा हुंदका बाहेर पडला.

"आत्तू, ऊठ ना गं. आणखी किती दिवस अशी लोळत पडून राहशील? बघ तरी तुला भेटायला कोण आलंय?"
सोनियाच्या हातावर आपला हात हलकेच ठेवून निकी म्हणाली. तिच्या बोलण्याने सोनियावर कसला परिणाम झाला नाही पण त्या आवाजाने राधामावशीची झोप मात्र चाळवली.

"प्रीती, झाले का गं बाळा तुझे काम? लाईट का लावलास? तो बंद कर आणि झोपायला ये." राधामावशी झोपेतल्या जड आवाजात बोलत होती.

प्रत्युतरादाखल तिच्या कानावर हुंदक्याचा आवाज आला तसे पांघरून बाजूला सारून ती उठून बसली.
"प्रीती, काय झाले? आणि ही निकी इथे कशी?" दोघींकडे बघून राधामावशीने विचारले.

"राधाईऽऽ" प्रीतीने तिच्या गळ्यात आपले दोन्ही हात गुंफले. तिच्या डोळ्यातील अश्रूचा थेंब राधामावशीच्या खांद्यावर पडला.

"प्रीती, काय झाले, मला कळेल का?" राधामावशी चिंतीत झाली.

"राधाई, अगं ही निकी म्हणजे माईच्या विरेनदादाची मुलगी आहे?"

"काय?" तिच्या प्रतिक्रियेवर प्रीतीने आत्तापर्यंत घडलेला प्रसंग राधामावशीला कथन केली.

आता राधामावशीच्या डोळ्यात देखील अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते.
"प्रीती, देव आहे गं जगात. त्या देवामुळेच चांगलं घडत आहे. आपली सोनिया नक्की लवकर बरी होईल." राधामावशी दरवाज्याकडे जात म्हणाली.

"तू कुठे निघालीस?" प्रीती.
"एवढी आनंदाची बातमी दिलीस, मग देवाजवळ साखर ठेवायला नको का? आलेच मी." राधामावशी देवघराच्या दिशेने वळली.

प्रीतीचा देवावर फारसा विश्वास नव्हता, तरी नजरेसमोर कृष्णाने दिलेली ती चांदीची गणेशमूर्ती उभी राहिली आणि तीने मनातच दोन्ही हात जोडले.


"निकी चल, तू झोप बरं आता." तिला तिच्या खोलीत घेऊन जात प्रीती.

"दी, अत्यानंदाने झोप पार उडाली गं आता. बाबाला ही न्यूज केव्हा सांगतेय असं झालंय."

"वेडू, आता इतक्या रात्री नकोच. हवे तर सकाळी उठल्या उठल्या पहिले काम हेच करशील, ओके? आणि निकी, तू त्यांना सांगितलं तर ते लगेच इथे येतील तेव्हा तुला असं बघून किती वाईट वाटेल गं त्यांना? त्यापेक्षा काही दिवस थांबूयात ना."

"नाही दी, मी फार फार तर सकाळपर्यंत थांबू शकते त्याहून जास्त वेळ नाही. मला असे बघून त्यांना वाईट वाटेलही, पण त्यांची लाडकी सोना भेटल्यावरचा आनंद कैक पटींनी जास्त असेल ना? त्यांचा तो आनंद मला हिरवायचा नाही आहे. "

"निकी,आज एकदम मोठी झाल्यासारखी बोलत आहेस गं. कर सकाळी कॉल पण आता झोप. आणि हो माझा मोबाईल मी इथेच ठेवून जाते, ओके? गुडनाईट." तिच्या कपाळावर ओठ टेकवत प्रीती म्हणाली आणि मग निकी बेडवर लेटल्यावर ती सोनियाच्या खोलीत गेली.

"माई ऐकते आहेस ना गं? तुझा लाडका विरेनदादा कुठे आहे हे कळलंय बरं. आणि ती वेडूली निकी आपल्या घरात राहतेय ना, ती त्यांचीच लेक आहे. तुला भेटून ती किती आनंदलीय, बघितलंस ना? डोळे मिटले असले तरी तुझ्या मन:चक्षुने तू सगळं अनुभवू शकतेस ना गं? माई आता सारं काही चांगलंच होईल. मामा भेटलेत, लवकरच तुझा मोहनही भेटेल. तू लवकर बरी होशील. होशील ना गं? " प्रीती सोनियाचा हात हातात घेऊन तिच्याशी हळुवार आवाजात एकतर्फी संवाद साधत होती.
तिच्या चेहऱ्यावरची आशेची किरणं अधिकच प्रकाशमान दिसत होती.

********

"निक, तू खरं बोलत आहेस ना?" पलीकडून विरेनचा घोगरा आवाज येत होता. निकीने सकाळी उठल्याबरोबर त्याला सोनियाची खबर ऐकवली होती.

"येस बाबा, निकी कशाला खोटं बोलेल? तुम्ही दोघं या ना इथे. मला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे."

"हो आम्ही जी फ्लाईट मिळेल तिच्याने निघतोच. लव्ह यू निक. तू इतकी छान बातमी दिलीस ना, बेटू त्याबद्दल्यात तू मागशील ते तुला दिलं प्रॉमिस." त्याचा स्वर गहिवरला होता.

"पहिले तू इथे ये तर. मग काय मागायचे ते बघूयात." ती हसून म्हणाली.
नर्सच्या मदतीने तीने आपले सगळे आवरून घेतले, आणि ती सोनियाच्या खोलीत जाऊन बसली. इकडे विरेनदेखील बायकोला सर्व हकीकत सांगून पुण्याला यायच्या तयारीला लागला.

प्रीतीही खूप खूष होती. पहिल्यांदा कोणीतरी सोनियाला भेटायला इतक्या तातडीने येणार होते. निकीकडून विरेनच्या आवडीनिवडी जाणून घेऊन तिने मेडला स्वयंपाकात तेच पदार्थ बनवायला लावले. राधामावशीदेखील खूष होती. सोनियाचा लाडका दादा लवकरच तिला भेटणार होता.

सकाळी बरोबर अकराच्या ठोक्याला सोनप्रीत बंगल्यासमोर कॅब थांबली.

"सोनाऽऽ" त्यांनी घातलेल्या सादेने प्रीती आणि राधामावशी दारात आल्या.
जीन्स टॉप घातलेली निळ्याशार डोळ्यांची प्रीती समोर बघून विरेनला त्याची पंचवीस तीस वर्षांपूर्वीची सोना आठवली. तरुणपणी तीही अशीच तर दिसत होती.

"प्रीती.. राईट?" त्याने तिच्याकडे गोड स्मित करत विचारले.

"येस. वेलकम टू होम." तिनेही स्मित करत त्या दोघांना आत घेतले.

"प्रवासाने थकले असणार. तुम्ही फ्रेश व्हा, नंतर मी जेवण घेते." राधामावशी.

"थकवा कसला? आणि जिच्यासाठी आम्ही आलोय ती कुठाय? निकीही कुठे दिसत नाहीये ते?" मामीने विचारले.

"निकी इथेच आहे. तुम्ही फ्रेश व्हा. चला मी तुम्हाला तुमची रूम दाखवते. मामा मामी या इकडे."
ती गेस्टरूमकडे त्यांना घेऊन गेली.
"सॉरी, मी मामा मामी म्हटले तर तुम्हाला चालेल ना?" प्रीतीने एक कटाक्ष विरेनकडे टाकत प्रश्न केला.

"अगं आम्ही तुझे मामा मामीच आहोत, मग हा प्रश्न कशाला?" विरेन तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला. त्या स्पर्शात तिला नकळत सोनियाचा स्पर्श आठवला.
"या तुम्ही. मी निघते." ती खोलीतून बाहेर पडली.

"जेवण अगदी सुग्रास होते. मन तृप्त झाले. प्रीती बाळा, निकी कुठे आहे आणि सोना कुठे आहे हे आतातरी सांगशील का गं?"

जेवण आटोपल्यावर हात धुताना विरेनने विचारले. जेवण स्वादिष्टच होते, पण आल्यापासून दोघीही नजरेस पडल्या नव्हत्या त्यामुळे तो कासावीस झाला होता.

"प्रीती, निकी ठीक तर आहे ना गं? आणि मुळात तुम्ही दोघी कशा भेटल्यात?" मामीने अधीरतेने विचारले.

"हो, निकी अगदी सुखरूप आहे. आम्ही कुठे भेटलो हे तुम्हाला सांगेनच आधी तुम्ही तिला भेटून घ्या. तत्पूर्वी तुम्हाला एक सांगायचंय."

"काय?" मामा मामी एकत्रच म्हणाले.

:
क्रमश:
प्रीती काय सांगणार? वाचा पुढील भागात.

पुढील भाग लवकरच!
******
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//