Feb 28, 2024
प्रेम

प्रीती.. पर्व दुसरे! भाग -४०

Read Later
प्रीती.. पर्व दुसरे! भाग -४०


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -चाळीस.

केबिनमध्ये असताना मिहीरचा फोन आला तशी प्रीतीने सोनियाची आलमारी उघडली. सोनियाच्या आलमारीला तिच्याशिवाय कोणीच हात लावत नसे, ती नसल्यामुळे ती जबाबदारी प्रीतीवर आली होती. फाईल बाहेर काढत असताना तिचे लक्ष लॉकरकडे गेले. अचानक मनात काहीतरी डोकावले आणि तिने चावी लॉकरला लावली. एक दोन महत्त्वाचे कागदपत्रे सोडली तर तिथे विशेष असे काहीच नव्हते. कागदपत्रे जागेवर ठेवताना तिच्या हातून एक लिफाफा खाली पडला. तो उचलताना त्यातून एक फोटो बाहेर डोकावला. तिने ते कुतूहलाने बाहेर काढून बघताच ती शॉक झाली. सोनियाचा तरुणपणातील आजवर कधीच न पाहिलेला तो फोटो होता आणि तिच्यासोबत तिचे भावंडदेखील त्या फोटोत दिसत होते.
फोटोतील ती निरागस, निर्मळ सोनिया बघून प्रीतीचे ओठ रुंदावले. मनात एक निश्चय करून तिने तो फोटो पर्समध्ये ठेवला.

******

".. अँड टुडेज मिटींग इज ओव्हर." कृष्णाचे शेवटचे वाक्य ऐकून त्याच्या स्टॉफने एक सुस्कारा सोडला. तब्बल दिड तासापासून त्याने सर्वांना एकत्र बोलावून त्यांच्या कामकाजाची माहिती घेत होता.

"स्वतः सडफटिंग आहेत म्हणून असे उठसूट केव्हाही मिटींग घेत असतात." एक सहकारी.

"नाहीतर काय? जेव्हा स्वतः लग्न करतील तेव्हाच त्यांना समजेल बायको आणि पोलीस स्टेशन एकाच वेळी सांभाळणे किती कठीण असते ते."
दुसऱ्या सहकाऱ्याने पहिल्याची री ओढली.

"हम्म!मी सगळं ऐकतोय बरं का? आणि विसरू नका आपण जनतेचे सेवक आहोत. दिवसातले चोवीस तास आपण ऑन ड्युटी असतो, गॉट इट?"
तिथे येत कृष्णा कडक शब्दात बोलला, तसे दोघांनीही 'येस सर' म्हणून त्याला सॅल्यूट ठोकला.


"सर तुमचा मोबाईल वाजतोय." जुन्या फाईल चेक करीत असताना कृष्णाचा मोबाईल बऱ्याच वेळापासून वायब्रेट होत होता.

"तीन मिस्डकॉल? एकदा कॉल उचलला नाही तर लोकांना कळत नाही का रे की माणूस कामात असेल म्हणून?" मोबाईल हातात घेत तो बोलतच होता की मोबाईल चे पुन्हा वायब्रेशन सुरू झाले.

"हॅलो, इन्स्पेक्टर कृष्णा हिअर." त्याने कानाला मोबाईल लावला.

"व्हॉट इज धिस इन्स्पेक्टर? एक कॉल रिसिव्ह करायला इतका वेळ?"

"अहो बाई, मी इथे रिकामा नाही बसलोय. सांगा काय काम होतं?" पलीकडून आलेल्या आवाजातील ॲटीट्युड बघून कृष्णाचा राग पार डोक्यात गेला.

"फर्स्ट अप ऑल, आय एम नॉट एनी बाई ओके? आय एम अ गर्ल! आणि मला सांगा कुणाच्या परवानगीने तुम्ही माझ्या डॅडचे स्केच सोशल मीडियावर टाकलेत?" ती अजूनही त्याच ॲटीट्युडमध्ये बोलत होता.

"तुम्ही मिस्टर मोहनबद्दल तर बोलत नाही आहात ना?" एक अंदाज घेत कृष्णाने तिला विचारले.

"येस, ऑफकोर्स." ती.

"ते तुमचे वडील आहेत का?" तो.

"एनी डाऊट?" तिचा प्रतिप्रश्न.

"मॅडम, तुम्ही कुठून बोलत आहात ते कळेल काय?" कृष्णाने तिला विचारले. मोहनचा शोध इतक्या लवकर लागेल हे त्याला वाटले नव्हते. चेहऱ्यावर एक आनंद पसरला होता.

"मिस्टर, धिस इज नॉट द आन्सर ऑफ माय क्वश्चन. डॅडचे हे स्केच तुम्हाला कुठून मिळाले आणि तुम्ही ते मीडियावर का टाकले?" ती.

"तुम्ही कुठून बोलताय, तुमचे नाव काय ते सांगा की. मग मीही तुम्हाला सविस्तर बातमी सांगतो." तो.

"माय फूट! स्वतःला पोलीस म्हणताय ना? मग तुम्हीच त्याचा शोध घ्या. अँड लिसन, जर का ते स्केच हटवले नाही तर मी पोलिसांत जाईन, ते पण खऱ्याखुऱ्या. गॉट इट?" तिने कॉल कट केला.

'मी तर शोध घेईनच, यू डोन्ट वरी.' तिचा नंबर सर्चलिस्ट मध्ये टाकत तो मनात म्हणाला.

थोड्यावेळाने तिची माहिती हाताला लागली आणि मग त्याने फेसबुकवरही तिला शोधून काढले.

'पोरगी तशी दिसायला बरी आहे पण जरा आगाऊ आहे. प्रीतीला लगेच कळवू का?' त्याने मोबाईलमधली डायल लिस्ट उघडली.

'नको, त्यापेक्षा तिला सरळ सरप्राईजच देऊ की. ती तर पार खूष होऊन जाईल.' तिच्या आनंदाची कल्पना करताना त्याचाच चेहरा फुलला होता.

******

"ही तुझी व्हीलचेअर. डॉक्टरांनी सांगितल्याप्रकारे तू आता हिच्यावरून घरात, बाहेर लॉनमध्ये फिरू शकतेस."
नुकतेच डिलिव्हरी बॉयने व्हीलचेअर आणून दिली होती आणि प्रीती तिच्यावर निकीला प्रात्यक्षिक करून दाखवत होती.

"दी, तू माझ्यासाठी किती करतेस गं? कधी कधी वाटतं की मागच्या जन्मात तू माझी खरीखुरी बहीण असावीस." निकी स्मित करत म्हणाली.

"इथे याच जन्माचा गुंता उलगडलेला नाहीये नि तू मागच्या जन्मात जाऊन पोहचलीस." प्रीतीने तिला टपली दिली.

नर्सच्या मदतीने निकीने तिथेच दोन राऊंड मरून पाहिले, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून प्रीतीची कळी खुलली.


रात्री प्रेसचे कपडे नीट ठेवत असताना तिला तिच्या कपाटात सोनियाच्या आलमारीत सापडलेला तो फोटो दिसला.

'माई, किती सुरेख होतीस गं तू. तुझ्या डोळ्यातील हा निरागस भाव केव्हा मला बघायला मिळेल?' ती खिन्नपणे स्वतःशी बोलत होती.

तिने फोटोतील तो चेहरा डोळ्यात साठवून ठेवला आणि मग कपाटात व्यवस्थित ठेवून ती सोनियाच्या खोलीत आली.


"प्रीती, पुढच्या आठवड्यात सोनाचा वाढदिवस येतोय. तू काही ठरवले आहेस का?"
झोपताना राधामावशी प्रीतीला विचारत होती.

"मला तर काहीच सुचेना झालंय. तसे आपल्या संपूर्ण स्टॉफला या महिन्याचा बोनस द्यायचा विचार केलाय.
मिहीर अंकल काय म्हणतात ते बघूया." प्रीती.

"चांगलाच निर्णय आहे की हा. जितक्या लोकांचे आशीर्वाद माझ्या सोनाला मिळतील तितक्या लवकर ती बरी होईल." राधामावशी तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली.

"राधाई, तुला आठवते? मी माईला म्हणाले होते की तिच्या वाढदिवसाला तिचा मोहन तिच्यासमोर उभा करेन. राधाई मी हरले गं. इतका प्रयत्न करूनही माझ्या हाती काहीच लागले नाही." प्रीतीने एक हुंदका दिला.

"प्रीती, अशी हरण्याची भाषा तू नाही गं करायचीस. सोनासारख्या लढवय्यीची तू मुलगी आहेस. तुला नक्की यश येईल बाळा. असा धीर सोडून कसा चालेल ना?" राधामावशी तिला समजावत होती.

"राधाई, मला ऑफिसच्या केबिनमध्ये माईचा एक फोटो सापडलाय. ते स्केच करून तिला गिफ्ट करेन. ती जेव्हा बघेल तेव्हा तिला आवडेल ना गं?"

"प्रीती,तू लहानपणी कागदावर ओढलेल्या रेघोट्यासुद्धा तिला आवडायच्या, मग तू काढलेले चित्र का आवडणार नाही?" राधामावशी.

मनातच रंगवलेल्या सोनियाच्या चित्राने प्रीतीच्या मुखावर प्रसन्नता पसरली. तिने डोळे मिटले आणि झोपदेखील अगदी अलवारपणे तिच्या डोळ्यावर येऊन विसावली.

******

"गुडमॉर्निंग लिटल सिस, जमतंय का?" ऑफिसला निघताना प्रीतीने निकीच्या खोलीत डोकावून पाहिले. ती व्हीलचेअरवर बसून मागेपुढे ओढून बघत होती.

"येस दी. निकीच्या डिक्शनरीमध्ये इम्पॉसिबल हा वर्ड नाहीच आहे." चेअरची आटोमॅटिक बटण दाबून प्रीतीजवळ येत निकी हसून म्हणाली.

"गूड! द्याट्स द स्पिरिट. कीप इट अप डिअर. मी ऑफिसला जाऊन येते. बाय."

"बाय." निकीने हात हलवला. ती आज जाम खूष होती. व्हीलचेअरमुळे आता तिला एकाच ठिकाणी बसून रहावे लागत नव्हते.

फिरत फिरत निकी तिच्या खोलीबाहेर आली. संपूर्ण हॉलभर तिने दोन चकरा मारल्या. आज तिला कसे एकदम मोकळे वाटत होते. इथे आल्यापासून ती पहिल्यांदा अशी हॉलमध्ये ती आली होती. तो प्रशस्त हॉल, तेथील फर्निचर, भिंतीवरच्या पेंटिंग्स हे सर्व बघून तिच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेची एक लकेर उमटली. आज कसे सगळे कसे तिला हॅपी हॅपी वाटत होते.

फिरताना तिची व्हीलचेअर सोनियाच्या खोलीशेजारी जाऊन थांबली. खोलीचे दार उघडे होते. पडदा तेवढा ओढला होता. प्रीती जिची तारीफ करताना थकत नाही त्या तिच्या माईला एक नजर बघावे म्हणून तिने हळूच पडदा बाजूला केला. नर्स सोनियाचे कपडे व्यवस्थित करत होती. ती बाजूला झाली आणि सोनिया निकीच्या नजरेला पडली.

चेहऱ्यावर लावलेला ऑक्सिजन मास्क, तिच्या शरीराला जोडलेल्या सगळ्या मशीनरीज, सतत बीप बीप करणारे मॉनिटर.. हे सगळे बघून तिच्या तोंडून एक अस्फुट किंकाळी बाहेर पडली.

"निकी मॅडम, काय झाले?" नर्स धावत बाहेर आली. राधामावशीच्या कानावर देखील निकीची किंकाळी पोहचली होती. ती सुद्धा तातडीने बाहेर आली.

"निकी, काय झाले?" राधामावशीने काळजीने विचारले.

निकीचा श्वास फुलला होता. हृदय जोराने धडधडत होते.
नर्स तिला तिच्या खोलीत घेऊन गेली. बीपी मोजून पाहिले ते नार्मल होते.

"काय झालंय गं हिला? प्रीतीला कॉल करू का?" राधामावशी तिला विचारत होती.

"काही नाही हो आजी. त्या थोड्या पॅनिक झाल्यात बाकी काही नाही. ही गोळी खाल्ली की बरं वाटेल." निकीला गोळी चारून देत नर्स म्हणाली. गोळी घेतल्यानंतर थोडया वेळाने ती शांत झोपी गेली.

********

"अंकल, तुम्हाला ही कल्पना आवडली ना?" सोनियाच्या वाढदिवशी ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची कल्पना प्रीती मोहनला बोलून दाखवत होती.

"येस, आय एम विथ यू. भारीच आयडिया आहे ही." मिहीरने हिरवी झेंडी दाखवली तसा तिचा चेहरा खुलला.

"प्रीती आणखी एक सांगायचे होते, दोन दिवसांनी एक मिटिंग आहे, ती तुला अटेंड करायची आहे."

"मी? पण का अंकल? तुम्हीही करू शकता ना."

"नाही, जोपर्यंत सोनिया बरी होऊन इथे येत नाही, तोपर्यंत इथले महत्त्वाचे कामकाज तुलाच हाताळावे लागतील."

"पण अंकल.."

"आता पण नाही नि बिन नाही. बी प्रिपेअर आणि सोनियाची मुलगी आहेस हे सिद्ध करून दाखव." तो.

"येस अंकल, आय विल डू इट." ती म्हणाली.

मिहीरने स्मित करून तिच्या हातावर विश्वासाने आपला हात ठेवला.

:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//