प्रीती.. पर्व दुसरे! भाग -३९

कथा सोनियाची.. तिच्या प्रीतीची!


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -एकोणचाळीस.

"मी घरूनच मुंबईला यायचे प्लॅनिंग केले होते. एकदा बोलता बोलता बाबाने सांगितले होते की माझे आजोळ महाराष्ट्रात आहे. नेमके कुठे ते मला माहित नाहीये. मुंबईत एक दोन दिवस फिरल्यानंतर मी पुण्याला निघाले. सामान असे फारसे नव्हतेच. दोन चार ड्रेसेस आणि कॅश तेवढी होती. पण इथे आल्यानंतर हॉटेल बुक करण्यापूर्वीच माझी बॅग चोरीला गेली. माझ्याकडे काहीच उरले नव्हते. मग पर्याय म्हणून मी एका गाडीखाली यायचे ठरवले कारण घरी कसे गेले असते ना? तेथून निघून तर केवळ चारच दिवस झाले होते. पण नेमके तू मला वाचवलेस."

ती जणू काही फारसे चिंताजनक घडलेच नाही अशी बोलत होती. प्रीतीने डोक्यावर हात मरून घेतला. ही अल्लड आणि निरागस तर आहेच त्यापेक्षा थोडी मूर्ख आणि बेफिकीर आहे हे तिला पटले. दुपारी समीरने तिच्याबद्दल केलेले वक्तव्य आठवले आणि तिलाच त्याचे हसू आले.

"दी, मी इतके सिरीयस सांगते आहे आणि तू हसतेस?" तिचे गोबरे गाल पुन्हा फुगले.

"नाही गं, तुला नव्हे. दुसऱ्याच गोष्टीचे मला हसू आले. बरं आता सांग तुझ्या अंडूबद्दल तुला काय वाटते?"

"काय वाटायचं? इतके दिवस दूर राहून हे पटले की त्याच्याशिवाय एकदाची मी जगू शकेन पण आईबाबांशिवाय नाही." निकी.

"द्याट्स लाईक अ गुड गर्ल!" तिच्या रेशमी केसातून हात फिरवत प्रीतीने स्मित केले. "निकी, एक सांगू? कोणताही निर्णय आपल्या पेरेंट्सला दुखवून घ्यायचा नसतो गं. पुढे त्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागते." बोलताना तिच्यासमोर सोनियाचा चेहरा आला.

"आणि तशीही तू लहान आहेस. छान अभ्यास करून आयुष्यात पूढे जा. विचारांची कक्षा वाढली की तुलाच तुझे योग्य निर्णय घेता येतील. आणि मग तो निर्णय तुझे आईबाबा देखील मान्यच करतील." प्रीती तिला समजावत होती.

"दी, तू ना आत्ता अगदी माझ्या बाबांसारखी बोललीस. ते मला असेच समजावत असतात पण मीच तिकडे लक्ष देत नाही. आज मात्र तू सांगितलंस ते पटलं मला. मी नक्कीच फॉलो करेन." प्रीतीकडे बघून ती म्हणाली.

"गुड गर्ल. चल मी नर्सला इथे पाठवते. तू तुझी मेडिसिन घे. आता मला माईकडे जायला हवं हं." तिच्या गालाला हात लाऊन प्रीती सोनियाच्या खोलीत गेली.

*******
रात्री बेडवर पडल्यापडल्या निकीशी झालेले बोलणे तिला आठवत होते. 'जराशी मंद आहे का ही?'
'नाही गं, उलट गोड आणि निरागस आहे.' तिने स्वतःला समजावले.
तिला एकेक करून दिवसभरातील सर्व घटना आठवत होत्या. समीरची तिची काळजी घेणे, कृष्णाबद्दल विचारलेले.. हे सारेच आठवत होते.

'कृष्णा आवडतो मला, हे जरी खरे असले तरी मी अजुनपर्यंत त्यालाच सांगितले नाहीये आणि तरी समीर तुला माझ्या मनातील कळावे? खरंच ग्रेट आहेस यार. माझा मित्र म्हणून सदैव माझ्या पाठीशी उभा राहतोस. अगदी बालपणापासून.. शाळेत असल्यापासून.'
तिच्या ओठावर मंद असे स्मित आले.

शाळा आठवली आणि मग अचानक तिला स्वीटी आठवली. ती गोबऱ्या गालाची गोड स्वीटी. नावासारखीच गोड होती, पण तिचे सदैव आपले बाबापुराण चालू असायचे. तिच्या तशा वागण्यामुळेच तर लहानग्या प्रीतीला आपलाही बाबा असावा ही भावना मनात येत होती. एकदा तिने त्याच्याबद्दल सोनियाला विचारले तेव्हा तिने मोहनचा जपून ठेवलेला एक फोटो तिला दाखवला आणि सांगितले की हाच तुझा बाबा. तो शरीराने कुठेही असला तरी मनाने मात्र कायम तुझ्यासोबत असेल.

'ही तीच स्वीटी, जिच्यामुळे माईचा मोहन मला पहिल्यांदा कळला, माझा बाबा म्हणून. मग मी तिला कशी विसरले? तिच्यामुळेच तर तो फोटो माझ्या हृदयात कायमचा वसला.'
तिच्या डोळ्यावरची झोप उडाली होती. ती हलकेच उठून तिच्या आर्टरूम मध्ये गेली. तिच्या वाढदिवशी माईला रिटर्न गिफ्ट म्हणून द्यायला काढलेले मोहनचे पोट्रेट ती कितीतरी वेळ न्याहाळत राहिली.

'कुठे आहात तुम्ही? माझ्यासाठी नाही किमान तुमच्या सोनियासाठी तरी परताल का? तुम्ही म्हणजे आमची शेवटची आशा आहात. तुमची तिला प्रेमाने घातलेली साद कदाचित तिला आपल्यात परत आणेल. माझ्या माईला, तुमच्या प्रेमाला जीवनदान द्यायला या ना.'
ती साश्रूभरल्या नयनांनी मनातल्या मनात त्याला साकडे घालत होती.
शालिनीला भेटल्यापासून त्याच्याबद्दल असलेला प्रीतीचा आकस नाही म्हटले तरी थोडा कमी झाला होता. तिचे तिला मात्र अजूनही ते कळले नव्हते.

'कृष्णाला फोन करावा का?'

'नको, आत्ता नको. खूप रात्र झालीये. पण त्याने सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोचे काय झाले हे मला जाणून घ्यायचे आहे. काय करू?'
पहिल्या मनाने तिच्या दुसऱ्या मनाला साथ दिली आणि तिने मोबाईल हातात घेतला.

'प्रीती?' मोबाईल स्क्रिनवर नाव झळकले तसे कृष्णाने पटकन कॉल उचलला. तो आज नाईट ड्युटीवर असल्यामुळे त्यावेळी मोबाईल त्याच्या टेबलवरच होता.

"हॅलो, प्रीती. इतक्या रात्री कॉल केलेला? तू ठीक आहेस ना?" त्याने काळजीने विचारले.

"कृष्णा, काहीच ठीक नाहीये अरे. आपली गाडी तिथेच अडकून पडली आहे. सांग ना मला तू टाकलेल्या फोटोचे काय झाले? काही रिप्लाय आलेत की नाही?" ती हळव्या स्वरात म्हणाली. तिच्या हृदयात होणारी कालवाकालव त्याला स्पष्टपणे जाणवत होती.

"अगं, अगं. शांत हो आधी एक लांब श्वास घे बघू." तिची अस्वस्थता त्याने ताडली. "आणि असं कोणी म्हटलंय की आपण तिथेच आहोत म्हणून. अगं आतापर्यंत चार रिप्लाय आले की." तो.

"काय? आणि तू मला आत्ता सांगतो आहेस?" ती.

"हम्म. म्हणजे रिप्लाय आले पण ते सगळे मिस्टर मोहनचे कॉलेज फ्रेंड्स आहेत. सध्या ते कुठे असतील याचा कुणालाच अंदाज नाहीये. म्हणून तुला काही सांगितले नाही. काही दिवसात एखादा रिप्लाय येऊच शकतो ना जो त्यांना आताच्या परिस्थितीत ओळखत असेल." कृष्णा.

"हम्म." तिने हुंकार भरला. "कृष्णा, तुला मी खूप त्रास देतेय ना रे?" ती.

"प्रीत, तुझा त्रास मी मला कधीच झाला नाही. पुढे जाऊन काही त्रास द्यायचा असेल तर मी आयुष्यभर सहन करायला तयार आहे पण तुझ्या डोळ्यातील पाणी मात्र नाही गं सहन होणार. प्लीज डोळे पूस ना." तो अलवारपणे तिच्याशी बोलत होता.

"कृष्णा, आपलं मन असं कसं असतं रे? इथे माझी काळजी घेणारे माझ्यावर प्रेम करणारे कितीतरी लोकं आहेत. राधाई, समीर, मिहीर अंकल आणि तू सुद्धा. तू माझी किती काळजी करतोस? तरीही माझं मन माईजवळच पिंगा घालत असतो. केव्हा बरी होईल रे ती? तिच्या प्रेमाच्या स्पर्शासाठी, तिच्या डोळ्यातील माझ्याविषयी दिसणाऱ्या काळजीसाठी खूप आसूसलेय रे मी." तिचा हुंदका बाहेर आला.

"हेय, प्रीत तू जास्त रडू नकोस ना. म्हणजे थोडेसे रडू शकतेस त्याने आपल्या भावना मोकळ्या होतात, पण जास्त रडू नकोस कारण मग मला इकडे कसेतरी होते. ऐक ना, मी उद्याच पुण्याला येतोय. तुला भेटायचं आहे मला."

"अरे, नको. खरंच नको. भावनेच्या भरात मी वाहवत गेले. सॉरी. आय विल मॅनेज मायसेल्फ." आपले अश्रू पुसत ती म्हणाली. "कृष्णा थँक यू."
'अँड आय मिस यू.' हे वाक्य तिने मनातच म्हटले.

"आय मिस यू टू. काळजी घे." कृष्णा म्हणाला तसे ती एकदम दचकली. 'याला माझ्या मनातले कसे ऐकू आले?' ती स्वतःला विचारत होती.

"तुझ्या मनातलं कळतं मला प्रीती. मनाचे मनाशी जुळलेले कनेक्शन आहे ते. चल बाय ठेवतोय. काही फाईल्स बघायच्या आहेत."
"हूं, बाय. गुडनाईट. " तिने कॉल कट केला. चेहऱ्यावर पुसटसे हसू आले होते.


ती तिथेच मोहनच्या चित्रापाशी उभी होती. 'प्रेमात पडल्याचं मला जाणवतंय. ही भावना खूप सुंदर असते म्हणतात. मलाही काहीसे तसेच वाटतेय तरी समोर पाऊल टाकायला का घाबरतेय मी? इतकी वर्ष माई आणि तुम्ही एकमेकांना भेटला नाहीत तरी तुमचे प्रेम तसुभरही कमी झाले नाही. तुम्हाला तर माझी माई या जगातच नाहीये असे वाटतेय ती मात्र त्याच विश्वासाने तुमची वाट बघतेय. प्रेमात एवढं बळ असतं का हो?'
चित्रातल्या मोहनशी ती पहिल्यांदा बोलत होती.

'तू एकदा खऱ्या प्रेमात पडशील तर तुलाही जाणवेल त्या प्रेमात किती ताकद असते ते.' शालिनीने तिला बोललेले आठवत होते.


"प्रीती, इथे काय करते आहेस बाळा? झोप येत नाहीये का?" तिच्या मागून खांद्यावर हात ठेवत राधामावशी विचारत होती.

"राधाई? तू?"

"हं. चल केसांना तेल लाऊन चांगली मालिश करून देते. तुला मस्त झोप येईल." राधामावशी तिला घेऊन गेली.

******

"प्रीती, सोनियाच्या आलमारीतील सोनप्रीतची एक इम्पॉर्टन्ट फाईल हवी आहे, तू ती काढून ठेव. मी असिस्टंटला पाठवतोय."

केबिनमध्ये असताना मिहीरचा फोन आला तशी प्रीतीने सोनियाची आलमारी उघडली. सोनियाच्या आलमारीला तिच्याशिवाय कोणीच हात लावत नसे, ती नसल्यामुळे ती जबाबदारी प्रीतीवर आली होती. फाईल बाहेर काढत असताना तिचे लक्ष लॉकरकडे गेले. अचानक मनात काहीतरी डोकावले आणि तिने चावी लॉकरला लावली. एक दोन महत्त्वाचे कागदपत्रे सोडली तर तिथे विशेष असे काहीच नव्हते. कागदपत्रे जागेवर ठेवताना तिच्या हातून एक लिफाफा खाली पडला. तो उचलताना त्यातून एक फोटो बाहेर डोकावला. तिने ते कुतूहलाने बाहेर काढून बघताच ती शॉक झाली. सोनियाचा तरुणपणातील आजवर कधीच न पाहिलेला तो फोटो होता आणि तिच्यासोबत तिचे भावंडदेखील त्या फोटोत दिसत होते.
फोटोतील ती निरागस, निर्मळ सोनिया बघून प्रीतीचे ओठ रुंदावले. मनात एक निश्चय करून तिने तो फोटो पर्समध्ये ठेवला.

:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all