प्रीती.. पर्व दुसरे! भाग -३८

कथा सोनियाची.. तिच्या प्रीतीची!


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -अडतीस.

बघ जरा, तिच्याकडून शिक काहीतरी. ती कसं मला सॅम म्हणते. नाहीतर तू?"

"ओह! कुणाचंतरी सॅम म्हणणं कुणालातरी आवडतं वाटतं." प्रीती त्याला चिडवत म्हणाली.

"तिला म्हणू दे. तशीही ती इंग्रजळेली दिसतेय. मी काय अस्सल महाराष्ट्रीयन त्यात पुण्याची बिच्चारी बापुडी. त्यामुळे मी तुला सम्याच म्हणणार." ती हसून त्याची मजा घेत होती.

"पुरे, पुणेकर पुरे! चल निघूया." बील देऊन तो जराशा घुश्यात उठला. प्रीती मात्र हसत त्याच्या मागे निघाली.

*****
"हाय निकी."

"हाय दी."

"हाऊ वाज द डे?" प्रीती तिच्याजवळ बसत म्हणाली.

"ॲज युज्युअल बोरिंग. तू नव्हतीस ना? मग कसा जाईल?" गाल फुगवून निकी.

"ओह, अगं मी जस्ट आलेय. माईला भेटले नी चहा घेऊन तुझ्याचकडे आले." प्रीती.

"त्यांच्यावर तुझा खूप जीव आहे ना?" निकीच्या प्रश्नावर
चहा पीतपीतच प्रीतीने मान डोलावली.

"आय एम सॉरी दी, मला तुझ्या माईबद्दल काहीच कल्पना नव्हती म्हणून काल मी तशी बोलले. मला रात्रीच नर्सकडून कळलंय सारं."

"सॉरी काय? अगं खरंच ती खूप बिझी असते. आता बेडवर आहे म्हणून, बरी झाली ना की बघ तिला. तिच्या इवलाशा डोक्यातून कशा वेगवेगळ्या आयडियाज बाहेर पडत असतात ते." ती हसून म्हणाली.
"बरं, तू आराम कर. मी जेवण तयार झाले असेल तर मेडला पाठवते. राधाई माईजवळ बसलीये ना म्हणून." ती जायला उठली.

"दीऽऽ" निकीने तिचा हात पकडला.

"काय गं? काही हवेय का?"

"दी, आय वॉन्ट टू गो बॅक माय होम. मला घरी जायचेय." आपले काळेभोर डोळे प्रीतीवर रोखून ती म्हणाली. चेहऱ्यावर तोच निरागसपणा.

"इतक्यात इथे कंटाळीस का?" प्रीती हसून.

"नो. पण तुमचे एकमेकींवरचे प्रेम बघून मला माझ्या आईबाबांची खूप आठवण येतेय."

"ओके, मग बोल ना त्यांच्याशी."

"कशी बोलू? मी त्यांच्यावर रागावलेय ना." ओठांचा चंबू करून ती.

"मग मी तुला तुझ्या घरी सोडून देऊ का?" प्रीती.

"नाही." तिने मान हलवली. "माझा ॲक्सिडेंट झालाय हे बघून किती हर्ट होतील ते? शिवाय जर मॉम आणि डॅडना कळलं तर ते बाबांनाच रागावतील ना." ती काहीशी खट्टू होत म्हणाली.

"मॉम-डॅड, आईबाबा हे काय समीकरण आहे? निकी माझ्या डोक्यात सगळ्या गोष्टींचा इतका गोंधळ माजलाय ना त्यात तू आणखी गोंधळ नको घालूस. तुला काय सांगायचे ते प्लीज क्लीअरली सांग ना." प्रीती खरंच गोंधळली होती.

ती बोलली तशी निकी रडायला लागली. "दी, तू माझ्यावर ओरडलीस ना. तू मला तुझी लिटल सिस्टर म्हणतेस मग असं कोण आपल्या छोटूशा बहिणीवर ओरडतं?"

"अगं, माझे राणी. ओरडत नाहीये आणि तूच म्हणतेस ना की निकी कधी रडत नसते म्हणून? मग रडायला काय झाले?" प्रीतीच्या ओठावर हसू होते.

"नाहीच रडत मी मुळी. पण आत्ता मला त्यांची आठवण येतेय ना आणि तू अशी बोलते आहेस मग रडणारच ना मी?" ती अजून मुसमूसत होती.

"प्रीतीताई, जेवण तयार आहे. यांच्यासाठी घेऊन आलेय." दारात मेड उभी होती.

"हो, द्या ते ताट इकडे आणि तुमची कामं झाली असतील तर तुम्ही निघू शकता." हातात ताट घेऊन प्रीतीने तिला जायला सांगितले.

"माझी पिटुकली बहीण रडली ना आता, मग मी तिला माझ्या हाताने जेवू घालते." तिला घास भरवत प्रीती.

"माझा बाबा माझे असेच लाड करतो. डॅडाला मात्र कधी वेळच नसायचा." निकी डोळे पुसून म्हणाली.
"हं. तुझ्या डॅड आणि बाबाचे काय प्रकरण आहे ते मला नीट सांगशील का?" प्रीती थोडी वैतागली होती पण तसे न भासवता तिने निकीला विचारले.

"माझे डॅडमॉम दुबईला असतात आणि आईबाबा दिल्लीला." ती सांगू लागली तसे प्रीतीने डोळे मोठे करून तिच्याकडे पाहिले.

"अगं, माझा बाबा म्हणजे माझ्या डॅडाचा भाऊ आहे, यू नो सिब्लिंग." प्रीतीच्या डोळ्यातील वैताग तिने ओळखला होता.

"अच्छा, पुढे?" तिला घास भरवत प्रीती.

"मी आठ वर्षांची होते, तेव्हा मॉम डॅड सोबत इंडियात आले. मला इथले वातावरण मला फार आवडले आणि मग मी इथेच राहण्याचा हट्ट केला. माझ्या काका काकूंना तसेही मूल नव्हतेच त्यामुळे मॉम डॅडनी माझे म्हणणे मान्य केले. काही दिवसात मी त्यांच्याकडे शिफ्ट झाले. तेव्हापासून काकू माझी आई झाली नी काका माझा बाबा."

"ओह, असं आहे तर. पण तू इतकं चांगलं मराठी कशी बोलू शकतेस? म्हणजे तू मराठी फॅमिलीला बिलॉंग करतेस का? आणि तुझे आईबाबा? ते कुठे राहतात?" प्रीतीने प्रश्न केला.

"ते दिल्लीला असतात. माझे शिक्षण तिथेच सुरू आहे. तू म्हणालीस त्याप्रमाणे माझी फॅमिली महाराष्ट्रीयन असल्यामुळे आम्ही घरी मराठीच बोलतो, अगदी दुबईत असल्यापासून." ती उत्तरली.

"एवढे सांगते आहेस तर मग हेही सांग ना, अशी घरून पळून का आलीस?" प्रीतीने हळूच विचारले.
"त्या अंडूमुळे." तिनेही लगेच उत्तर दिले.

"अंडू? आता हा किंवा ही कोण?" प्रीतीच्या कपाळावर आठया होत्या.

"अंडू म्हणजे आनंद. माझा बॉयफ्रेंड गं. नुसताच बॉयफ्रेंड नाहीये तर आम्हाला पुढे जाऊन लग्न करायचे होते. पण आई नाही म्हणाली कारण काय?तर तो नॉनमहाराष्ट्रियन आहे. आता सांग हे काय कारण आहे का?"

"पण म्हणून घरून निघून यायचे हे देखील काही कारण नाही आहे ना? निकी.."

"दी प्लीज." सोनियाचे वाक्य मध्येच तोडत निकी बोलायला लागली. "तूही आईसारखी बोलायला लागलीस तर मग मी काहीच सांगणार नाही." तिने आपल्या ओठांचा पुन्हा चंबू केला.

"सॉरी. बोल तू." प्रीतीने आपले कान पकडले.
दी अंडू खूप चांगला आहे. तो समजून घेतो मला. तो म्हटला की आई नाही म्हणतेय तर आपण लग्न नको करूया. बट हाऊ धिस पॉसिबल? मी त्याच्याशिवाय कशी जगू? पण मला आईबाबासुद्धा हवेत. आता सांग काय करू?"

"मला सांग इथे आल्यापासून तू सर्वात जास्त कोणाला मिस केलेस? तुझ्या अंडूला की आईबाबांना?" प्रीतीने आपली निळी नजर तिच्यावर रोखली.

"ऑफकोर्स आईबाबांना." तिच्या डोळ्यात पाणी होते. "दी, मी घरी एक कॉल करू?" अर्जवपूर्ण नजरेने तिने प्रितीकडे पाहिले.

तिच्या खांद्यावर हात ठेवून प्रीतीने तिच्या हातात मोबाईल ठेवला आणि इशाऱ्यानेच 'कॉल कर' म्हणून सांगितले.

"हॅलो, बाबा.." तिने फोन स्पीकरवर टाकला.

"निक, अगं कुठे आहेस तू? पुरे ना बाळा आता. आठ दिवस होऊन गेलेत. परत ये बघू." पलीकडून एक संयमीत स्वर कानावर पडला.

"बाबा, अरे मी आणखी महिनाभर तरी येणार नाही. मी इथे मस्त आहे, काळजी करू नकोस हे सांगायला कॉल केलाय." आपल्या आवाजावर नियंत्रण ठेवत ती म्हणाली.
"बाबा आई कशी आहे रे?" तिने अंदाज घेत विचारले.

"कशी असणार? तू घरातून गेलीस की अस्वस्थ असते ती खूप."

"मला बोलायचंय आईशी."

"निक, मी ऐकतेय गं. अजून आईवरचा राग गेला नाही का रे राजा? ये ना लवकर. आय मिस यू अ लॉट!" एक हुंदका कानावर ऐकू आला.

"आई,आय एम मिस यू टू अँड आय एम रिअली सॉरी! काळजी करू नकोस मी मस्त आहे. मी पुढच्या महिन्यात येतेय. तुझ्या मांडीवर डोके ठेवून निजायचे आहे ना." निकीचाही हुंदका अनावर झाला.

"ए बाळा, तू रडतेहेस? त्रासात आहेस का गं तू? आणि नेमकी कुठे आहेस ते सांग बरं." तिच्या आईचे प्रश्नावर प्रश्न सुरू.

"अगं, खूप दिवसांनी तुझा आवाज ऐकला ना म्हणून रडू आले नाहीतर तुला माहितीच आहे ना तुझी निक कधी रडते का? ती तर दुसऱ्यांना रडवते. मी खूप चांगल्या ठिकाणी आहे अगं, त्यामुळे काळजी करू नकोस. ठेवते मी फोन. बाय." मोबाईल बंद करत निकीने अश्रू पुसले.
"थँक्स दी." प्रीतीकडे मोबाईल देत ती.

"वेडी आहेस का गं? थँक्स कसले बोलतेस. बरं मला एक सांग, तू दिल्लीची मग इथे पुण्यात कशी आलीस? म्हणजे का आलीस? आणि तुझं सामान?" प्रीती.

"मी घरूनच मुंबईला यायचे प्लॅनिंग केले होते. एकदा बोलता बोलता बाबाने सांगितले होते की माझे आजोळ महाराष्ट्रात आहे. नेमके कुठे ते मला माहित नाहीये. मुंबईत एक दोन दिवस फिरल्यानंतर मी पुण्याला निघाले. सामान असे फारसे नव्हतेच. दोन चार ड्रेसेस आणि कॅश तेवढी होती. पण इथे आल्यानंतर हॉटेल बुक करण्यापूर्वीच माझी बॅग चोरीला गेली. माझ्याकडे काहीच उरले नव्हते. मग पर्याय म्हणून मी एका गाडीखाली यायचे ठरवले कारण घरी कसे गेले असते ना? तेथून निघून तर केवळ चारच दिवस झाले होते. पण नेमके तू मला वाचवलेस."

ती जणू काही फारसे चिंताजनक घडलेच नाही अशी बोलत होती. प्रीतीने डोक्यावर हात मरून घेतला. ही अल्लड आणि निरागस तर आहेच त्यापेक्षा थोडी मूर्ख आणि बेफिकीर आहे हे तिला पटले. दुपारी समीरने तिच्याबद्दल केलेले वक्तव्य आठवले आणि तिलाच त्याचे हसू आले.

:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all