Login

प्रीती.. पर्व दुसरे! भाग -३७.

कथा सोनियाची... तिच्या प्रीतीची!


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -सदतीस.

तो गंभीर चेहरा करून म्हणाला तसे तिने बॅगेतून आरसा काढून चेहरा बघितला.

"सम्या, कुठे आहेत रे काळी वर्तुळं?" एकवार आरशात आणि मग त्याच्याकडे नजर टाकत तिने विचारले.

"तुझ्या चेहऱ्यावरच्या मेकअपखाली लपलेली आहेत." त्याचा चेहरा अजूनही गंभीर होता.

"समीर तू माझी खेचतो आहेस ना? मी कुठे मेकअप करते?"त्याच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकून ती म्हणाली तसा तो मोठ्याने हसायला लागला.

"काय रे घाबरवलंस ना मला?" तिने त्याच्या पाठीत एक धपाटा घातला. आता तीही त्याच्या हसण्यात सामिल झाली होती.

"बघ, हसलीस की किती गोड दिसतेस. नेहमी हसत रहा डफर. तुझ्या गालावरच्या खळीला असं हिरमुसवून ठेवू नकोस."
"भारीच निरीक्षण करतोस रे माझं."

"काय करणार? बालपणीची एकमेव आवडती मैत्रीण आहेस मग लक्ष ठेवायला हवेच ना."

"पण खरंच थँक्स समीर. आज खूप दिवसानंतर अशी हसले. छान वाटतंय."

"माझ्यासोबत राहिलीस की छानच वाटेल. आणखी मस्त वाटून घ्यायचे असेल तर चल माझ्याबरोबर."

"कुठे?"

"हॉटेलिंग."

"काहीही सुचतं तुला. या वेळेला कुठे जाणार? कामं पडलीत ना."

"मॅडम, काही वेळापुरते काम बाजूला ठेवा आणि चला."

"अरे.."

"मी मामाशी बोललोय यार. चल ना अशी काय भाव खातेस? तुलाही बरं वाटेल की."तिचे बोलणे मध्ये तोडत तो म्हणाला.

"नको रे. वर्किंग अवर्स मध्ये असं हुंदडायला मला नाही आवडणार, सॉरी."

"अगदी सोनिया आँटीसारखीच बोलतेस. पण विचार केला आहेस का की त्या बऱ्या झाल्यावर माझं काय होणार आहे ते?"
ती आश्चर्याने पाहत होती.

"अशी बघू नकोस. त्या माझ्यावरच ओरडतील. म्हणतील, काय रे समीर, थोडे दिवस मी झोपून काय राहिले तर माझ्या मुलीची नीट काळजी घेऊ शकला नाहीस? बघ तिच्या चेहऱ्यावरचा ग्लो कसा कमी झालाय. आता माझ्या मुलीशी कोण लग्न करेल?"

"काही काय बोलतोस रे? चल जाऊया आपण. माईचे नाव मध्ये आणलेस म्हणून तयार झाले हं. नाहीतर अजिबात आले नसते." ती खुर्चीवरून उठत म्हणाली.
त्याला तर तेच हवे होते. तो हसून तिच्या मागे निघाला.
*****

शहराच्या जरा बाहेर, कमी वर्दळ असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये ते बसले होते.


"समीर, तुला खरंच असं वाटतं की माई लवकर बरी होईल?" कॉफीचा घोट घेत प्रीतीने त्याला विचारले.

"प्रश्नच नाही. आता इतके दिवस कामात झोकून दिले म्हणून त्यांना आराम करायला सक्तीची रजा मिळालीय. पण फार काळ त्या अशा बेडवर नाही राहू शकणार. त्यांचा पिंडच नाहीये तो." तो उत्तरला.

"हम्म. किती छान बोलतोस रे. समीर आपली अशी काळजी घेणारी, आपल्याला समजून घेणारी माणसं आसपास असली की किती मस्त वाटतं ना. लकी असल्याचा फील येतो. थँक्स यार."

"इतकी फॉर्मल कधीपासून झालीयेस गं आणि आभारप्रदर्शनाचा कर्यक्रम इथून गेल्यावर असेल ना?आत्ताच का जाहीर करते आहेस?" त्याच्या बोलण्याने तिला हसू आले. तोही मिश्किल हसला.

"आता सांग, कशी आहे तुझ्या घरची ती छोकरी? तिच्या फॅमिलीबद्दल काही सांगितले की नाही?" तो.

"निकी? ती ओके आहे. घरच्यांविषयी काही सांगितले तर नाही पण ती पळून आल्याचं मात्र कळलंय."

"पळून आलीये? म्हणजे नक्कीच लव्ह मॅटर दिसतोय." तो.

"नाही रे, खूप लहान आहे ती."

"लहान कसली? एटीन प्लस आहे ती. सगळं कळतं तिला. वेंधळी असल्याचे फक्त नाटक करतेय."

"ए, लहान बहीण आहे ती माझी. ओके? तिच्याबद्दल असं काही ऐकून घेणार नाही मी."

"लहान बहीण का? लवकरात लवकर त्या लहान बहिणीला तिच्या घरी पाठव नाहीतर तिच्या सोबत राहून तू देखील वेडी होशील."

"तू असशील रे वेडा, तिला काही बोलायचं नाही आणि काय रे, आज काय माझी खेचायची लहर आलीय का तुला?"

"नाही. माझी हरवलेली मैत्रीण परत आणण्याचे प्रयत्न चाललेत.अशी भांडलीस की किती बरं वाटतं. माझी प्रीती आहेस असं वाटतं. नाहीतर 'मिस प्रीती, एच आर. ऑफ सोनप्रीत.'  यांच्यासोबत आहे असे वाटते." तो हसला. त्याचसोबत तिचेही ओठ उमलले.

"आता सांग, कोल्हापूरला का गेली होतीस?"

"माईचा भूतकाळ शोधायला. ती मूळची कोल्हापूरची हे अंकलकडून मला कळलं होतं. वाटलं तिथे गेल्यावर काहीतरी हाती लागेल." ती गंभीर होत म्हणाली.

"मग? काही कळलंय का?" तो.

"तशी बरीच माहिती कळली. आनंददायक असं मात्र काहीच हाती लागलं नाही. खरं तर मिहीर अंकल आणि तुला एकत्रित हे सांगणार होते पण निकी मध्ये आली आणि मग तिच्या मागे असताना सांगायचे राहूनच गेले."

कोल्हापुरात काय घडले हे तिने मग थोडक्यात त्याला सांगितले. कृष्णाच्या मदतीने माईचा मोहन शोधतेय हेही त्याच्या कानावर घातले.

"ओके! तसा बरा आहे." समीर म्हणाला.

"कोण?"

"तो ऑफिसर.. कृष्णा."

"हम्म." ती.

"ती गणेशाची मूर्ती त्यानेच गिफ्ट केली ना?" तो अंदाज घेत म्हणाला.

"हो, तुला कसं कळलं?"

"देवावर विश्वास न ठेवणारी तू आणि चक्क तुझ्या कारमध्ये गणराया अवतरलेला दिसला तेव्हाच समजले." तो हसून.

"हुशार आहेस रे." ती मंद हसली.

"हम्म. तो तर मी आधीपासूनच आहे गं." त्याने हसून पॉज घेतला. "प्रीती, तू प्रेमात पडली आहेस ना?"

"व्हॉट?" त्याच्या अनपेक्षित प्रश्नाने ती गोंधळली.

"कृष्णा आवडतो ना तुला? तुझ्यात झालेले चेंजेस कळतात मला स्टुपिड. ऑफ्टरऑल तुझा बेस्टफ्रेंड आहे मी." तो थेट तिच्या डोळ्यात पाहत बोलत होता.

"समीर, तुझ्याशी काय खोटं बोलायचं? पण माईचा अनुभव बघितल्यावर मला प्रेमात पडायची भीती वाटते रे." ती.

"एकाला तसा अनुभव आला म्हणून तुलाही येईल असे नाही ना?"

"मिहीर अंकल? त्यांचं काय? त्यांना तरी कुठे त्यांचे प्रेम मिळाले?"

"प्रीत, मी तेच तर म्हणतोय.आपल्या आजूबाजूच्या लोकांना वाईट अनुभव आलेत म्हणून आपल्यालाही येतील हे कुठे आवश्यक आहे? तू एक पाऊल पुढे टाकून तर बघ. तसेही तुझे मुळ कोल्हापूरचे आहे ना? आणि कोल्हापुरी जगात भारी असतात म्हणे. मग तू का घाबरतेस?" तिच्या हातावर हात ठेवत तो म्हणाला.

"समीर, आज मी तुझे वेगळेच रूप बघतेय. तू नेमका आहेस तरी कोण?" कोड्यात पडल्यासारखे तिने प्रश्न केला.

"मी तुझा मित्र, तुझा सखा आहे. तुझा वाटाड्या आहे मी. तुला आठवते, स्कूलमध्ये असताना कोणी तुझी खोडी काढली तर मी कायम तुझ्यासोबत असायचो. आताही मी तसाच तुझ्यासोबत आहे." तो.

"थँक्स डिअर, फॉर अल्वेज बिईंग विथ मी!" तिनेही त्याच्या हातावर आपला हात ठेवला. " तिच्या ओठावर हसू आणि डोळ्यात आसू होते.

"ए, हाय सॅम! व्हॉट अ प्लिजन्ट सरप्राईज डिअर!" काही क्षणातच एक गोड आवाज आणि तितकीच गोड मिठी समीरच्या गळ्यात पडली.

"हेय! स्वीट स्विटी. हाऊ आर यू आणि इथे कशी?" त्यानेही तितक्याच एक्साइटमेंटने विचारले.

"अरे, आठ दिवसांपूर्वीच पुण्यात आलेय. डॅडाचे भारतभ्रमण सध्या पुण्यात येऊन थांबलंय." ती हसत म्हणाली.
"जीएफ हं?" त्याला कोपऱ्याने मारत ती.

एव्हाना प्रीती आळीपाळीने दोघांकडे पाहत होती. समीरशी एवढया जवळीकतेने कोण बोलतंय हे तिला कळत नव्हते. तिच्या जीएफ च्या प्रश्नावर डोळे मोठे करून तिने समीरकडे कटाक्ष टाकला.

"डोन्ट टेल मी की तुम्ही दोघींनी एकमेकींना ओळखलं नाही?" समीर त्यांच्याकडे बघून म्हणाला.

दोघींनी पुन्हा एकमेकींकडे पाहिले आणि नाही म्हणून मान हलवली.

"गॉड!" त्याने डोक्याला हात लावला. "प्रीती ही स्वीटी अँड स्वीटी मीट माय क्लोज अँड बेस्टेस्ट फ्रेंड प्रीती, सिन्स चाईल्डहूड. अँड इफ आय एम नॉट रॉंग, आय थिंक यू बोथ वेअर क्लासमेट्स इन स्टॅन्डर्ड थर्ड."

त्याने ओळख करून दिली तशा दोघीही एकमेकींकडे आश्चर्याने पाहिले आणि मग दोघींनी गच्च मिठी मारली.

"ओ माय माय! प्रीती? यू चेंज्ड टू मच. इतक्या वर्षात किती बदललीस यार. तुझे डोळे मात्र तसेच आहेत निळेशार, ओशनच्या वॉटरसारखे. आय लव्ह इट." स्विटी तिला पुन्हा मिठी मारत म्हणाली.

"तू देखील फार चेंज झालीयेस म्हणून मी ओळखू शकले नाही." तिचा शॉर्ट ड्रेस आणि आधुनिकिकरण बघून प्रीती हसून म्हणाली.
"बाय द वे इतके दिवस कुठे होतीस?"

"अगं काय सांगू? डॅडाचा फिरतीचा जॉब. मग मीही त्याच्यासोबत फिरत राहिले. मुंबई, पुणे, दिल्ली, हैद्राबाद..सगळीकडे. आता पाच वर्ष अमेरिकेत होते. सॅम मला तिथे भेटलेला, सो आम्ही एकमेकांना ओळखतो." ती भरभरून बोलत होती.

"वॉव! भारीच. बस ना." प्रीती.

"नको. मी जरा घाईत आहे. सध्या इथेच आहे सो एकमेकांना भेटत जाऊ. बाय, बाय सॅम." ती आली तशी वाऱ्याच्या वेगाने निघूनही गेली.

"बघ जरा, तिच्याकडून शिक काहीतरी. ती कसं मला सॅम म्हणते. नाहीतर तू?"

"ओह! कुणाचंतरी सॅम म्हणणं कुणालातरी आवडतं वाटतं." प्रीती त्याला चिडवत म्हणाली.

"तिला म्हणू दे. तशीही ती इंग्रजळेली दिसतेय. मी काय अस्सल महाराष्ट्रीयन त्यात पुण्याची बिच्चारी बापुडी. त्यामुळे मी तुला सम्याच म्हणणार." ती हसून त्याची मजा घेत होती.

"पुरे, पुणेकर पुरे! चल निघूया." बील देऊन तो जराशा घुश्यात उठला. प्रीती मात्र हसत त्याच्या मागे निघाली.
:

क्रमश:

या भागात परत एका नव्या पात्राची एंट्री झालीये. होप तुम्हाला आवडेल. नवीन पात्र आणून गोंधळ घालायचा नाहीय,गरज म्हणूनच ती आलीय. काही भागानंतर उलगडा होईलच. तोपर्यंत वाचत रहा आणि आनंदी रहा.
*******

पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all