प्रीती..पर्व दुसरे! भाग -३४

कथा सोनियाची.. कथा तिच्या प्रीतीची.
प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -चौतीस.


"अरे, म्हणजे तू घरी गेलीच नाहीस का? किमान घरी तरी कळवलेस की नाही?" त्याचा दुसरा प्रश्न.

"नाही रे. मी त्या मुलीला पाहिले नी अगदी ब्लँक झाले. अचानक तिच्या ठिकाणी मला माई दिसू लागली आणि कसलाच विचार न करता मी मदतीला सरसावले. तुला सांगावे, मिहीर अंकलना कळवावे, किंवा राधाईला फोन करून मी पुण्यात पोहचलेय हा निरोप द्यावा याचे भानच उरले नाही बघ. सर्व लक्ष त्या मुलीतच गुंतले होते. आता कळवते मी." ती बोलत होती.

"हो लगेच कॉल कर आणि सांग त्यांना. काळजीत असतील गं. आणि काही मदत लागली तर मलाही फोन कर."

तिने 'ओके' म्हणून त्याचा कॉल कट केला आणि आधी राधाईचा नंबर डायल केला. तिला सर्व परिस्थिती सांगितल्यावर मिहीरशी बोलायचे ठरवले.

"प्रीती, तू इथे येऊनदेखील काही कळवले नाहीस?" फोनवर मिहीर विचारत होता.

"सॉरी अंकल, मला काही सुचलेच नाही हो." तिने त्याला अपघाताचा इतिवृत्तांत सांगितला.

"ओह गॉड! मला सांग, ती मुलगी आता कशी आहे?" मिहीर.

"डॉक्टरांनी अजून काही सांगितलेले नाहीये. तिच्यावर त्यांचे उपचार सुरू आहेत."

"ओके, यू डोन्ट वरी. मी थोडयावेळात पोहचतोय." कारची चावी घेत तो बाहेर आला.
समीरला सोबत घेऊन दोघेही हॉस्पिटलकडे निघाले.


म्हटल्याप्रमाणे अर्ध्या तासात ते दोघे तिथे पोहचले. तोवर पेशंटला आयसीयू मध्ये शिफ्ट केले गेले.
मिहीर डॉक्टरांना भेटायला त्यांच्या केबिनमध्ये गेला.

"प्रीती, काय हे? निदान कळवायचेस तरी?" तिथे आल्यावर समीर तिच्यावर जरा रागावलाच.

"सॉरी ना. मला सुचले नाही हे सांगितलेय तरी माझ्यावरच का ओरडताय सगळे?" तिच्या डोळ्यात अश्रू होते.

तिला तसे बघून समीरला वाईट वाटले. "सॉरी, डिअर. डोन्ट क्राय. तुला हर्ट करायचे नव्हते मला." तिला एक जादूची झप्पी देऊन तो म्हणाला.

"पुन्हा असा ओरडलास ना सम्या तर मार खाशील." ती त्याच्या मिठीत मुसमूसत होती.

"सॉरी बोललोय ना. परत एकदा सॉरी, ओके." तो.
"बस आणि थोडी रिलॅक्स हो. हे घे पाणी पी." तिला पाण्याची बाटली देत समीर.

"समीर, थँक्स यार. मी आल्यापासून साधे पाणी देखील प्यायले नव्हते." पाणी पीत ती.

तेवढ्यात डॉक्टरांच्या kebinmdhunनर्स बाहेर आली.
"मॅम, तुम्हाला सरांनी आत बोलावलेय." प्रीतीकडे बघून ती.
समीर आणि प्रीती दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि मग दोघेही केबिनमध्ये गेले.


"डॉक्टर, कशी आहे ती?" तिच्या चेहऱ्यावर काळजी पसरली होती.

"नाऊ शी इज आऊट ऑफ डेंजर. सध्या अनकॉन्शिअस आहे. पण काही वेळाने शुद्धीत येईल." डॉक्टर.

"थँक गॉड!" तिच्या चेहऱ्यावरचा ताण थोडा निवळला.

'थँक्स टू यू मिस प्रीती. तुम्ही माणुसकी दाखवून तिला हॉस्पिटला घेऊन आलात. तुमचे कौतुक करावे तितके थोडेच आहे." डॉक्टरांच्या डोळ्यात तिच्याबद्दल कौतुकाचे भाव होते.

"डॉक्टर,जो या परिस्थितीतून जातो, त्यालाच त्याचं गांभीर्य कळतं ना?" ती खिन्नपणे म्हणाली. सोनियाचा चेहरा पुन्हा एकदा तिच्या डोळ्यासमोर आला.

"या, आय अंडरस्टुड. बरं त्या पेशंटबद्दल मला आणखी एक सांगायचे आहे." डॉक्टर.

"काय?"

"तिच्या मांडीचे हाड फ्रॅक्चर झालेय, ते ऑपरेट करावे लागेल. ॲटलीस्ट उद्या सकाळी तरी."

"व्हॉट?" प्रीती.

"ती काही वेळाने शुद्धीवर येईल तेव्हा तिच्या घरच्यांबद्दल आपल्याला कळेलच. त्यांना सांगून हा निर्णय घ्यावा लागेल." डॉक्टर समजावत होते.

"पण मग आत्ता केले असते ना? जो खर्च लागेल तो करायला मी तयार आहे." प्रीती.

"इतके पॅनिक होऊ नका. तेवढी इमरजन्सी असती तर आजच केलं असतं. बट वी कॅन वेट टिल मॉर्निंग."

"ठीक आहे डॉक्टर. तुम्हाला जे योग्य वाटतेय तेच करूयात. अंकल तुम्ही निघा आता. मी इथेच थांबते." मिहीरकडे बघून ती.

"नो डिअर. तू प्रवासातून आलीहेस. तू जा घरी." मिहीर.

"खरं तर तुम्ही तिघेही गेलात तरी चालेल. तुमची पेशंट आमची स्पेशल जबाबदारी आहे. तुम्ही माणुसकीच्या नात्याने तिला इथे आणलंत. आता त्याच नात्याने इथला स्टॉफ तिची काळजी घेईल." डॉक्टर त्या तिघांना आश्वस्त करत म्हणाले.

"डॉक्टर, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. पण मला चैन नाही पडणार हो. अशा अवस्थेत ती इथे एकटी.." प्रीती पुढे बोलूच शकली नाही. तिचा हुंदका दाटून आला होता.

"डोन्ट वरी. तिला शुद्ध आली की आम्ही तुम्हाला कळवू. आता तुम्ही निशंक मनाने जाऊ शकता."

त्यांचे म्हणणे प्रॅक्टिकली तिला पटले होते. मन मात्र तिथून निघायला धजावत नव्हते. शेवटी मिहीरने समजाल्यावर तिघेही निघाले. त्याआधी एकदा तिला भेटायचा मोह प्रीती आवरू शकली नाही.

ती डोळे मिटून होती. अजूनही बेशुद्धावस्थेतच. नाजूक, गोरापान चेहरा. गालावर थोडेसे खरचटले होते. कदाचित अठरा- वीस वर्षांची असावी. चेहऱ्यावरून चांगल्या घरातील वाटत होती. तिच्याबद्दल मनात कणव येऊन प्रीतीने तिच्या केसातून हात फिरवला. शॉर्ट असे दाट रेशमी केस. त्यातून झळकणाऱ्या काही सोनेरी बटा. कुणास ठाऊक का पण ती तिला आपलीशी वाटत होती. कोणीतरी जवळची अशी. तिला असे एकटे सोडून जायला अगदी जीवावर येत होते. 

"प्रीती, जायचे ना?" मिहीरने तिच्या खांद्यावर हात ठेवला, तशी मान हलवून ती उठली.

"तुझ्या मनाची अवस्था मला कळतेय गं. पण डॉक्टर बोललेत ना की ती आऊट ऑफ डेंजर आहे म्हणून? आता घरी चल. सोनिया तुझी वाट बघत असेल. तुलाही तिला भेटायचे होते म्हणून ओढीने अशी रात्रीची आलीस की नाही? आता इथला विचार बाजूला ठेवून दे."

"अंकल, काही न सांगता तुम्हाला माझ्या मनातले कसे हो कळते?" तिने कातर स्वरात विचारले.

"एवढया वर्षांत इतकं तर कळायलाच हवं ना?" तिचे नाक खेचून तो म्हणाला. 
त्याच्या कृतीने तिघांच्याही चेहऱ्यावर स्फूट हसू आले.
******

मिहीर त्याच्या कारने तर समीर आणि प्रीती तिच्या कारने घरी परतले.

"राधाईऽऽ, आय मिस यू टू मच!" घरी पोहचताक्षणी तिने राधामावशीला घट्ट मिठी मारली.

"मीदेखील तुझ्या वाटेकडे डोळे लाऊन बसले होते." डोळ्यांच्या कडा पुसत राधामावशी.

"मला ना यार या लेडीज लोकांचे काही कळतच नाही. आनंद, दुःख प्रत्येकवेळी या कशा रडत असतात राव?" समीर दोघींकडे आळीपाळीने बघत होता.

"तुला नाहीच कळायचे ते." प्रीतीला मिठीतून सोडवत राधामावशी म्हणाली. "प्रीती, तू लगेच फ्रेश होऊन ये. त्यानंतरच सोनियाच्या रूममध्ये येशील." राधामावशी.

"हो राधाई, मी पाच मिनिटात आलेच." सोनियाच्या ओढीने प्रीती धावतच फ्रेश व्हायला पळाली.

"तुम्ही या ना आत. कशी आहे आता ती मुलगी?" राधामावशी मिहीरला म्हणाली.

"तिला अजून शुद्ध यायची आहे पण धोक्याच्या बाहेर आहे." मिहीर उत्तरला.
"राधामावशी, सोनिया अजून जागी आहे का गं? "त्याला मघापासून जाणून घ्यायचे होते. शेवटी त्याने विचारलेच.

"नाही. झोपलीये रे ती. भेटायचंय तुला?"

"आत्ता नको, सकाळी येईनच. तेव्हा भेटतो. नाहीतर चांगली झाल्यावर एवढ्या रात्री इथे कसा म्हणून ती कानउघडणी करेल माझी." त्याने वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला. 

ऑन्टीच्या या अवस्थेतही त्या झोपल्या की जाग्या आहेत ते तुला कसं कळतं गं?" समीर.

"सारे मनाचे अंदाज रे. तिच्या मिटल्या डोळ्याआड काय दडलंय हे फक्त मनाने जाणून घ्यायचं आणि स्वतःची समजूत घालायची." राधामावशी शांतपणे म्हणाली.

"मिहीर, आता या तुम्ही. खूप रात्र झालीय ना? सकाळी पुन्हा कंपनीत जायचे आहेच की." तिच्या बोलण्यावर दोघेही निरोप घेऊन निघाले.
******

प्रीतीने सोनियाच्या खोलीत प्रवेश केला तेव्हा ती झोपली होती. खरंच का ती झोपली होती? इतक्या दिवसांपासून ती एकाच तर अवस्थेत होती. केव्हा तरी डोळे उघडेल, कधी तरी हालचाल करेल, 'प्रीत' म्हणून साद घालेल ही एकच भाबडी आशा प्रीतीच्या मनात होती. 

"माई, मी आलेय गं. तुझी प्रीत आली आहे. बघ ना माझ्याकडे." सोनियाच्या हातावर हात ठेवून भरल्या कंठाने ती एकटीच बोलत होती.

"प्रीती, या खोलीत सोनियापुढे रडायचे नाही असे आपले ठरले होते ना बाळा?" राधामावशी तिचे डोळे पुसत म्हणाली.

"ये, माझ्या मांडीवर डोके ठेवून झोप बघू. मी तुला थोपटते." तिच्या केसातून हात फिरवत राधामावशी.

"राधाई, तू किती गं प्रेमळ आहेस. माझी किती काळजी घेतेस. आपली प्रेमाची माणसं जवळ नसली तर किती यातना होत असतील ना?" तिच्या गळ्यात प्रीतीने हात गुंफले.

"हम्म." राधामावशी.

"ती मुलगी हॉस्पिटलमध्ये एकटी आहे. तिची प्रेमाची माणसं तिच्याजवळ नाहीत तर ती किती दुःखात असेल ना?" ती. 

"हो गं बाळा. तू जास्त विचार न करता झोप बघू. ती मुलगी शुद्धीत आल्याचा फोन येऊन गेलाय ना. सकाळपर्यंत सगळं कळेल आपल्याला. तू नको ना त्रास करून घेऊस." राधामावशी.

प्रीतीने राधामावशीच्या मांडीवर डोके ठेवून डोळे मिटले तोच तिचा मोबाईल व्हायब्रेट झाला.

मोबाईल स्क्रिनवर कृष्णाचे नाव वाचून ती उठून बसली. थोड्यावेळापूर्वीच तिने ती घरी आल्याचे त्याला मेसेज करून कळवले होते.

"हॅलो कृष्णा, बोल ना." मोबाईल घेऊन ती हॉलमध्ये आली.
"काही नाही गं. गुडनाईट." तो.

"हे म्हणायला मला कॉल केलाय?" तिने काहीशा आश्चर्याने विचारले.

"अहं. खरं तर तुझा आवाज ऐकायचा होता. तुझ्या आवाजावरून तुझ्या मनस्थितीचा अंदाज येतो ना, म्हणून." तो.

"कृष्णा.." तिचा आवाज थिजला होता.

"गुडनाईट, आता आराम कर. मीदेखील निश्चिन्तपणे झोपतो. सकाळी बोलूया, बाय." त्याने कॉल कट केला.

'कृष्णा किती गुंतलाय माझ्यात. हे त्याचे गुंतणे योग्य नाहीये, असं वाटतं. मग त्याने माझी काळजी करणं मला का सुखावतेय?' ती स्वतःलाच विचारत होती. बेडवर तिने आपले शरीर झोकून दिले. बऱ्याच वेळाने तीचा डोळा लागला.

:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all