प्रीती.. पर्व दुसरे! भाग -३३

प्रीतीसमोर येतेय एक अनपेक्षित वळण!
प्रीती.. पर्व दुसरे!
भाग - तेहत्तीस.

"मे आय?" तिच्याजवळ सरकत त्याने परवानगी मागितली. रंग पुसताना तिच्या गालाला झालेल्या त्याच्या बोटांच्या स्पर्शाने ती शहारली. कृष्णा तिच्या खूप जवळ उभा होता. त्या स्पर्शाने ती जणू काही गोठली होती. रंग पुसताना तिच्या डोळ्यात त्याचे डोळे भिडले आणि त्या निळ्याशार सागरात तोही हरवला.

"कृष्णाऽ.." क्षणभरात भानावर येऊन ती मागे सरकली.

"हं? होईल ना." तिच्या आवाजाने तोही वास्तवात परतला.

"काय होईल?" गोंधळून ती. तिच्या हृदयाची वाढलेली स्पंदने अजूनही तिला ऐकू येत होती.

"हेच, की तू काढलेल्या स्केचचा उपयोग होईल, हे म्हणतोय मी. आपण हे स्केच सोशल मीडियावर टाकून बघूया." कृष्णा.

"आणि ते सोशल मीडिया वापरत नसतील तर?"

"प्रयत्न करायला काय हरकत आहे? सोबत पुन्हा काही करता येईल का ते मी बघतो ना. तू टेंशन घेऊ नकोस. लवकरच सापडतील ते." तिच्याकडे बघत तो म्हणाला.

"सापडायलाच हवेत रे. माईला अशी या अवस्थेत फार काळ नाही बघू शकत मी. ते म्हणजे माझी शेवटची आशा आहेत. किमान त्यांना बघितल्यावर माई काही रिस्पॉन्स द्यायला सुरवात तरी करेल." तिचा स्वर भिजला होता.

"एक विचारू? तू अजूनही मिस्टर मोहनना तुझे बाबा म्हणून स्वीकारले नाहीस का? म्हणजे बोलण्यात कायम 'ते', 'त्यांना' हेच शब्द वापरतेस म्हणून विचारतोय. प्लीज, डोन्ट टेक इट अदरवाईज." तो तिला विचारत होता.

"एखाद्याला लगेच स्वीकारणे एवढे सोप्पे नसते ना कृष्णा. माईने कितीही नाकारले तरी माझ्या नजरेत तिचा मोहन मला आरोपीच्या पिंजऱ्यात दिसतो, त्याला मी काय करू? जोपर्यंत प्रत्यक्ष भेटून त्यांची बाजू ऐकणार नाही, तोपर्यंत तरी मी त्यांना माझे समजू शकत नाही." 

"तुझ्या मनासारखं नक्की होईल." तो म्हणाला.

"होप सो." ती.

"अरे, तुमचं बोलणं आटोपलंच नाही का?" चहाचे कप घेऊन येत देवकी म्हणाली.

"काकू? तुम्ही केव्हा आलात?" प्रीती.

"पंधरा मिनिटं झालीत. कृष्णाने चहासाठी मेसेज केला म्हणून चहा घेऊन आले." देवकी हसून म्हणाली.

"काकू आल्याचं तुला माहिती होतं?"

"हो, तेवढं कनेक्शन आहे आमचं." तिला चहाचे कप देत तो.

"काकू तुम्हीही इथेच चहा घ्या ना." प्रीतीच्या आग्रहावर देवकीने कृष्णाकडे पाहिले.

"हो आई बस इथेच. तुला एक सांगायचे आहे. ही प्रीती म्हणजे आपल्या मालकीणबाईंची नात आहे बरं."

"काय?" तिला आश्चर्याचा धक्काच बसला.
"तू सोनियाताईंची मुलगी आहेस?" प्रीतीकडे बघून तिने विचारले.

 प्रीतीने होकारात्मक मान हलवली. "तुम्ही कधी भेटलात का माझ्या माईला?" प्रीती.

"नाही. तसा कधी योगच आला नाही पण आईकडून खूप ऐकलंय. खूप चांगल्या आहेत त्या."
देवकीचे बोलणे ऐकून प्रीतीच्या ओठावर हलके स्मित आले.

"काल आलीस तेव्हा का नाही सांगितलेस हे? ज्यांच्या जोरावर आज आम्हाला हे दिवस दिसत आहेत, त्या मालकीणबाईंच्या घराण्यातील तू आहेस हे ऐकून किती आनंद झालाय मला, तुला कसं सांगू?" देवकीच्या चेहऱ्यावर खरंच आनंद होता.

"काल सांगितले असते तर मला तुमच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहायला मिळाला नसता ना. आजही त्या कुटुंबाबद्दल तुम्हाला इतकी आपुलकी आहे ते बघून मला खूप समाधानी वाटतेय." प्रीती म्हणाली.

"बरं, कृष्णा, काकू येते मी आता. मला निघायला हवे." थोडयावेळाने तिने आपली बॅग उचलली.

"अगं आता कुठे निघालीस? या वेळेला मी नाही जाऊ द्यायची." देवकी कळवळून म्हणाली.

"हो प्रीती, आता पाच वाजत आलेत. आता कुठे जातेस? आज थांबून हवे तर उद्या सकाळीच निघ ना."

"नको रे. खरं तर आत्तापर्यंत मला पोहचायला हवे होते, ते शक्य झाले नाही. इतके दिवस मी माईपासून दूर आहे, आता नाही राहू शकत. कधी एकदा घरी जाते आणि तिला भेटते असे झाले आहे रे." ती हळवी झाली होती.

"मी समजू शकतो गं. पण आता रात्र होत येईल. रात्रीचा प्रवास टाळावेस असे मला वाटत आहे. हवे तर घरी एक व्हिडीओ कॉल कर ना." तिला समजावत कृष्णा म्हणाला.

"ते तर रोज करतेच .आता मात्र माईला प्रत्यक्षात बघायची आस लागलीय." डोळ्यात पाणी आणून ती म्हणाली.

"एवढेच असेल तर मग मी तुझ्यासोबत येतो." त्याच्या बोलण्यावर तिने प्रश्नार्थक पाहिले.
"म्हणजे, तू इथे आहेस तर माझी जबाबदारी आहे ना ती? तू सुखरूप घरी पोहचावीस, इतकंच. बाकी काही नाही." तो.

"तुला काय म्हणायचे ते कळतंय मला. बट डोन्ट वरी. मी नीट जाईन. आणि गरज भासली तर तू आहेसच की. आत्ता जशी हक्काने मदत मागितली तशी तेव्हाही मागेन." प्रीती तिच्या बोलण्यावर ठाम होती. मग तिला कोण अडवेल? पुढल्या पाच मिनिटात ती परतीच्या प्रवासाला निघाली.

"घरी पोहचलीस की कळवशील गं." ती दिसेनाशी होईपर्यंत तो भरल्या नजरेने तिच्या दिशेने बघत होता.

"कृष्णा." देवकीच्या हाकेने तो भानावर आला.

"हं? काय?" तो.

"कुणाशी नातं जोडण्याचे स्वप्न बघतोहेस तू? प्रीती खूप मोठया घराण्यातील आहे रे. आपली त्यांच्याशी कशी बरोबरी होऊ शकेल?" देवकी.

"आई काय बोलतेस तू? परवाच तर तिला प्रत्यक्षात न भेटताच पसंत केले होतेस ना? आणि आता अचानक?"

"हो, कारण तेव्हा मला ती आप्पासाहेबांची नात आहे हे कुठे ठाऊक होतं? त्यांच्याकडे माझी आई स्वयंपाक करायची, त्याच घरातील मुलीवर तुझा जीव जडलाय, ते योग्य वाटत नाहीये बघ." देवकी.

"आई, तू उगाच विषय कुठल्याकुठे नेऊ नकोस ना. ती माझ्या हृदयात ठाण मांडून बसलीय. आता तिच्याशिवाय तिथे कोणालाच स्थान नाहीये. चल, डोक्यात भलते विचार आणू नकोस. मला कामं आहेत. मी चौकीवर जाऊन येतो." असे म्हणून तो घराबाहेर पडला. 


पोलीस स्टेशनमध्ये पोहचल्यावरही आईचे बोलणे त्याचा पिच्छा सोडत नव्हते. त्याने एक कडक चहा मागवला. चहा पीत असताना देवकी आणि प्रीती दोघींचेही चेहरे डोळ्यांभोवती पिंगा घालत होते.

'काय तर आई म्हणते, आपण त्यांच्या बरोबरीचे नाही आहोत. असे कुठे असते? आता तो जमाना नाही राहिलाय आणि प्रीती तू मान्य करत नसलीस तरीदेखील तुझ्या नजरेत मला माझ्याबद्दल काहीतरी जाणवतेच की.' विचारानेच त्याच्या चेहऱ्यावर एक मंदशी हास्यछटा उमटली. मनात हसून त्याने चहाचा पुढचा घोट घेतला.

त्याने फाईल मधून प्रीतीने रेखाटलेले मोहनचे चित्र टेबलवर ठेवले आणि मोबाईलमध्ये त्याचा फोटो घेऊन आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अपलोड केला. सोबतच आपल्या सहकाऱ्यांनाही त्याने टॅग केले. कोणीतरी हा फोटो बघून त्याला संपर्क करेल हा त्याला विश्वास होता.

*******
रात्रीचे नऊ वाजत आले होते. प्रीतीची कार पुण्याच्या हद्दीत पोहचली. इथवर सुरक्षित झालेल्या प्रवासाने तिने सुटकेचा निःश्वास टाकला. थकली होतीच पण आता लवकरच माईला भेटता येईन या आनंदाने तिचे ओठ रुंदावले. ती थोडया अंतरावर गेली असेल आणि पुढच्याच क्षणाला तिने ब्रेक लावला. समोर गर्दी दिसत होती. कुणाचातरी अपघात झाला होता. कार बाजूला लाऊन ती धावतच घटनास्थळी गेली. जमलेल्या गर्दीतून वाट काढून समोर बघितले तर एक मुलगी खाली पडली होती. तिला धडक देणारे वाहन केव्हाच पोबारा झाले होते. गर्दीतील सर्वांची बघ्याची भूमिका पाहून प्रीतीला भयंकर राग आला. त्या मुलीच्या जागी तिला सोनिया दिसू लागली. वेळेवर मदत मिळाली नाही तर काय होऊ शकते याची जाणीव तिला होती. 

तेथील एक दोघांना मदतीची याचना करून तिने तिला कारमध्ये ठेवले आणि मग एका मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वेगाने तिने आपली कार पळवली. तिथे पोहचल्यावर लगेच उपचार करणे आवश्यक होते. अपघाताची केस म्हणून पोलिसांना पाचारण करणेही गरजेचे होते. त्या मुलीचे नाव गाव पत्ता कशाची काहीच खबरबात नव्हती. प्रीतीने पुढाकार घेतला. तिचे काही झाले तर स्वतःवर जबाबदारी घेत केसपेपरवर बहीण या नात्याने सही केली आणि पुढच्या उपचाराला सुरुवात झाली.

तिच्या मोबाईलची रिंग सारखी वाजत होती. तिने मोबाईल बघितला. कृष्णाचा फोन होता. दहा वाजले तरी तिचा कॉल आला नाही म्हणून काळजीने तो तिला फोन करत होता.

'गॉड!' तिने अपराधीपणाने कपाळावर हात ठेवला.

"हॅलो, प्रीती तू अजून पोहचली नाहीयेस का? कुठे आहेस तू? तुला केव्हाचा कॉल करतोय." रिसिव्हची बटण दाबल्याबरोबर तिने हॅलो म्हणण्यापूर्वीच कृष्णाची सरबत्ती सुरू झाली.

"आय एम सॉरी कृष्णा, एक्सट्रीमली सॉरी. काम डाउन. मी ठीक आहे आणि पुण्यात व्यवस्थित पोहचले सुद्धा." ती त्याला शांत करत म्हणाली.

"अगं, मग तसे कळवायचेस ना. कॉल नाही तर निदान एक मेसेज तरी करायचा. काळजीने इकडे माझे कुठे लक्ष लागत नाहीये." तो.

"सॉरी रे. खरंतर माझ्या डोक्यातून ते निघूनच गेलं. मी इकडे थोडी अडकले होते." ती.

"का? काय झाले?" त्याच्या प्रश्नावर तिने मग अपघाताचा इतिवृत्तांत सांगितला.

"अरे, म्हणजे तू घरी गेलीच नाहीस का? किमान घरी तरी कळवलेस की नाही?" त्याचा दुसरा प्रश्न.

"नाही रे. मी त्या मुलीला पाहिले नी अगदी ब्लँक झाले. अचानक तिच्या ठिकाणी मला माई दिसू लागली आणि कसलाच विचार न करता मी मदतीला सरसावले. तुला सांगावे, मिहीर अंकलना कळवावे, किंवा राधाईला फोन करून मी पुण्यात पोहचलेय हा निरोप द्यावा याचे भानच उरले नाही बघ. सर्व लक्ष त्या मुलीतच गुंतले होते. आता कळवते मी." ती बोलत होती.

"हो लगेच कॉल कर आणि सांग त्यांना. काळजीत असतील गं. आणि काही मदत लागली तर मलाही फोन कर."
तिने ओके म्हणून त्याचा कॉल कट केला आणि आधी राधाईचा नंबर डायल केला.
:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.
__________________


🎭 Series Post

View all