प्रीती.. पर्व दुसरे! भाग -३२

प्रीती आणि कृष्णा मिळून काढतील का काही मार्ग?
प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -बत्तीस.

तहान लागली म्हणून कार बाजूला घेऊन तिने पर्समधून पाण्याची बॉटल घेतली. तिथे ठेवलेल्या गणेशमूर्तीकडे लक्ष गेले तसे ती मूर्ती हातात घेऊन ती शांतपणे बसून राहिली. मनात नुसता भावनांचा कल्लोळ माजला होता. त्या विघ्नहर्त्याकडे पाहून तिला काय वाटले कोणास ठाऊक, तिने तिची कार कोल्हापूरच्या दिशेने वळवली. तो चिमुकला गणराया तिच्या बॅगेत न जाता कारच्या मध्यभागी आनंदाने विसावला होता. जणूकाही तोच तिला आता योग्य दिशा दाखवणार होता.

******
"प्रीती, तू इथे?" त्याच्यासमोर उभ्या असलेल्या प्रीतीला बघून कृष्णाने आश्चर्याने विचारले. "तू तर सकाळीच हॉटेल सोडले होते ना? मग परत कोल्हापुरात कशी?"

"मी बसू?" त्याच्या प्रश्नाला उत्तर न देता तिनेच त्याला उलट सवाल केला.

"हो अगं. बस ना. खरं तर तुला असे अनपेक्षितपणे समोर बघून मला काही सुचलंच नाही. प्लीज बस." तो.

"कृष्णा, मला बोलायचंय तुझ्याशी. रॅदर मला तुझी मदत हवीय." प्रीती बसत म्हणाली.

"हो बोल ना. आय एम अल्वेज देअर फॉर यू. काय सांगायचे आहे ते बिनधास्त बोल." तिच्या चेहऱ्यावर नजर खिळवून तो म्हणाला.

"ऐक. मी.."

"एक मिनिट.." ती काही सांगणार त्यापूर्वी तोच बोलायला लागला. " तू कोल्हापूर सोडले होतेस ना? मग इतका वेळ कुठे होतीस? आणि चेहरा असा ओढल्यासारखा का दिसतोय? सकाळपासून काही खाल्लं वगैरे नाहीस का?"

"तो मुद्दाच नाहीये.." ती आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करत होती.

"असा कसा मुद्दा नाहीये? तू काही खाल्लं नाहीस हे तुझा चेहराच सांगतो आहे. ऊठ आणि माझ्यासोबत आधी चल बघू." खुर्चीवरून उठत तो.

"कृष्णा, मला काही महत्त्वाचे बोलायचेय."

"मी सुद्धा महत्त्वाचेच बोलतोय. आणि तसेही हे माझे वर्किंग प्लेस आहे तेव्हा इथे माझी ऑर्डर चालते. चला मॅडम, उठा." तो चालायला लागल्यावर त्याच्या मागे जाण्याशिवाय तिला पर्याय उरला नाही.

"तुझ्या कारची चावी देतेस?" त्याच्या प्रश्नावर तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक पाहिले.

"अगं बाई, मी ड्राइव्ह करणार म्हणून विचारतोय." तिच्या नजरेतील प्रश्न समजून तो उत्तरला.

स्टीअरिंगचा ताबा घेतल्यावर त्याची नजर समोर विसावलेल्या गणरायावर पडली आणि तो मंद हसला.

"आपण कुठे चाललोय?" इतकावेळ बंद असलेल्या तिच्या तोंडाचे कुलूप उघडले.

"घरी." तो.

"का?"

"का काय? आईच म्हणाली होती ना की परत कोल्हापूरला आलीस की घरी ये म्हणून? म्हणून घरी घेऊन जातोय." मिश्किल हसत तो.

"मला जे सांगायचेय त्यासाठी ती योग्य जागा नाहीये."

"प्रीती, अजूनही तू तिथेच अडकली आहेस का? घरी आपण जेवायला जातोय. त्यानंतर तू म्हणशील तिथे जाऊन बोलूया. ठीक आहे?"

त्याच्या बोलण्यावर केवळ मान हलवून ती गप्प बसली.

पोलीस स्टेशनमधून निघताना त्याने देवकीला कॉल करून कळवले होते. दोघे घरी पोहचून फ्रेश होईपर्यंत तिने मस्तपैकी गरमागरम पिठलं आणि भाकरी तयार करून ठेवली. फ्रेश झाल्यावर त्यांना पोटभर जेवू घातले. नाही म्हटले तरी प्रीतीला थोडे अवघडल्यासारखे वाटत होते पण पोटात दोन घास गेल्यामुळे चेहऱ्यावर जरा तरतरी आली होती. तिच्या अशा अचानक येण्याबद्दल देवकीने अवाक्षरही काढले नाही. तिचे अवघडलेपण मात्र तिच्या नजरेतून सुटले नाही.

"कृष्णा, मी देवळात जाऊन येते रे. बरेच दिवस झालेत गेले नाहीये ना. आणि येताना तिकडल्या मार्केटमधून भाजी घेऊन येईल. तुम्ही निवांत बोलत बसा." देवकी म्हणाली.
कृष्णाला तिचा इशारा कळला. त्याने ड्राईव्हरला बोलावून आईला त्याच्यासोबत पाठवले.
******

"हं, तर आता सांग की काय झालेय? परवापासून का इतकी अस्वस्थ आहेस?" त्याच्या स्टडीरूम मध्ये बसून दोघे बोलत होते.

"मी अस्वस्थ आहे हे तुला कसे कळले?" ती.

"परवा तुला रिक्षामध्ये पाहिले तेव्हाच तुझ्या चेहऱ्यावरचे भाव मी टिपले होते. आपण भेटल्यावर तू काहीतरी बोलशील असे वाटले पण तुला ते शेअर करायचे नव्हते म्हणून मी काही बोललो नाही. आता तू स्वतःहून सांगायला आलीस म्हणजे प्रकरण जास्तच गंभीर आहे याची जाणीव झाली म्हणून तर तुला घरी घेऊन आलो. घरापेक्षा दुसरी सेफ जागा कुठे असू शकते का?" त्याने स्पष्टीकरण दिले.

"किती दूरदृष्टीचा आहेस रे तू." ती किंचितशी हसली.

"थँक यू." तो.

"का?" तिच्या नजरेत आश्चर्य.

"आल्यापासून तुझ्या ओठावरचं हसू गायब झाले होते ना, त्याचे आत्ता कुठे दर्शन झाले. त्यासाठी."

त्यावर तिचे ओठ पुन्हा रुंदावले. "कृष्णा, तुला माहितीये मी कोण आहे?" क्षणभर थांबून तिने विचारले.

"हो, माहितीय की. पुण्यातील आणि आता महाराष्ट्रातील टॉपमोस्ट कंपनी सोनप्रीतची तू एचआर मॅनेजर आहेस." तो.

"ती माझी प्रोफेशनल ओळख झाली. खरी ओळख तुला माहितीये का? तू ज्यांना देवस्थानी मानतोस त्या आईसाहेबांची नात आहे मी." त्याच्या डोळ्यात बघत ती म्हणाली.

"काय सांगतेस? मालकीणबाईंची तू नात आहेस? कसं शक्य आहे हे?"

"का शक्य नाही? माझी माई म्हणजे सोनिया ही या शहरातील एकेकाळी नामांकित बिझनेसमन असलेल्या आप्पासाहेबांची मुलगी आहे." प्रीती.

तो काही न कळून तिच्याकडे पाहत होता. मग तिने सोनियाची कथा थोडक्यात त्याच्यासामोर मांडली. तिचे इथे येण्यामागचे प्रयोजन त्याला कळले होते.

"हे सगळं माझ्या आकलनापलीकडले आहे गं प्रीती." डोक्याला हात लाऊन तो म्हणाला. म्हणजे इतकी वर्ष ज्यांना मी माझा देव समजत होतो, त्यांच्या मुलीचे आयुष्य इतके संघर्षग्रस्त असेल ही कल्पनाही मला करवत नाही. रिअली हॅट्स ऑफ टू सोनिया मॅडम. त्यांनी स्वतःला प्रूव्ह करून दाखवले." तो भारावून म्हणाला.

"कृष्णा या काही दिवसात माझ्या लाईफमध्ये फार उलथापालथ झाली रे. माईचा ॲक्सीडेन्ट होतो काय आणि मग मला तिच्या आयुष्याचे हे पान वाचायला मिळते काय. मी तर पार भांबवूनच गेलेय." ती खिन्नपणे म्हणाली.

"प्रीत, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे एक प्रयोजन असते. सोनिया मॅडमचा ॲक्सीडेन्ट झाला नसता तर कदाचित हे तुला कधी कळलेही नसते. मिस्टर मोहनला शोधून त्यांना सोनिया मॅडम पुढे घेऊन जाणे ही आता तुझी जबाबदारी आहे." तिचा हात हातात घेत तो हळुवारपणे म्हणाला.

"पण कसे?" ती त्याच्याकडे बघून म्हणाली. "मला काही समजेना झालेय, म्हणून तर तुझ्याकडे आलेय ना मी. कृष्णा, मी पार गोंधळून गेलेय रे. हे इतकं सगळं मला एकटीला सहनच होत नाहीये."

"मग नको ना सहन करू. मी आहे की तुझ्यासोबत. एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघ ना." तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला.

"विश्वास आहे म्हणून तर या क्षणी मी तुझ्यासमोर आहे." बोलता बोलता तिच्या लक्षात आले की तिचा हात अजूनही त्याच्या हातात आहे. तिने हलकेच तो सोडवून घेतला. त्याच्या ध्यानात आले तसे त्यानेही पटकन आपला हात मागे खेचला.

"सॉरी. मला कळलेच नाही." तो.

"इट्स ओके. पण आता काय करायचं ते सांग ना." ती.
तुझ्याकडे त्यांचा एखादा फोटो असेल तर मला देऊ शकतेस?"

"फोटो आहे पण तो माझ्या हृदयात कोरला आहे."

"म्हणजे?"

"म्हणजे लहान असताना माईने मला एकदा त्यांचा फोटो दाखवला होता, त्यानंतर मग कधीच मी तो पाहिला नाही."

"ओह! मग आता काय करायचं?"

"मी त्यांचे स्केच काढू शकते. चालेल का?"

"अरे व्वा! तू आर्टिस्ट सुद्धा आहेस तर. का नाही चालणार? उलट धावेल." तिच्या हातात तिला लागणारे साहित्य देत तो म्हणाला.

उत्तरादाखल तिने केवळ स्मित केले.
तिची बोटे त्या पांढऱ्या कागदावर भरभर फिरत होती. पंधरा मिनिटात स्केच पूर्ण झाले.

"फँटॅस्टिक!" तो म्हणाला. "बोटात जादू आहे तुझ्या. तू आर्ट शिकली आहेस का?"

"नाही रे. येतं मला." ती हसून म्हणाली आणि लगेच शालिनीचे शब्द तिला आठवले. तिच्या म्हणण्यानुसार तिची बोटे मोहनच्या बोटासारखी लांब होती आणि आबांनी म्हटल्याप्रमाणे तो देखील आर्टिस्ट होता. तिने खिन्नपणे एक सुस्कारा सोडला.

"हे स्केच खूप जुन्या फोटोचे आहे. आता याचा उपयोग होईल का? म्हणजे आपल्याजवळ त्यांच्या नावाव्यतिरिक्त आणखी दुसरी कोणतीच माहिती नाहीये." त्याच्याकडे वळून ती म्हणाली. वळताना अनावधानाने हातातील ब्रशचा रंग तिच्या गालाला लागला. पुसायच्या प्रयत्नात तो आणखी पसरला.

"मे आय?" तिच्याजवळ सरकत त्याने परवानगी मागितली. रंग पुसताना तिच्या गालाला झालेल्या त्याच्या बोटांच्या स्पर्शाने ती शहारली. कृष्णा तिच्या खूप जवळ उभा होता. त्या स्पर्शाने जणू काही ती गोठली होती. रंग पुसताना तिच्या नजरेला त्याची नजर भिडली आणि त्या निळ्याशार सागरात तोही हरवला.

"कृष्णाऽ.." क्षणभरात भानावर येऊन ती मागे सरकली.

"हं? होईल ना." तिच्या आवाजाने तोही वास्तवात परतला.

"काय होईल?" गोंधळून ती. तिच्या हृदयाची वाढलेली स्पंदने तिला अजूनही ऐकू येत होती.
:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all