Feb 23, 2024
प्रेम

प्रीती..पर्व दुसरे! भाग -३१

Read Later
प्रीती..पर्व दुसरे! भाग -३१


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -एकतीस.


"नाही गं. परत तेच नको बोलूस ना. मोहन असा नाहीये. सोनिया तुला घेऊन पुण्याला गेली त्यानंतर तो मुंबईला आला असेल नि मग हा घोळ झाला असावा, असेही होऊ शकते ना?"

"तुम्हाला खात्री आहे?"

"शंभर टक्के!"

"इतक्या खात्रीने कसे काय सांगू शकता?"

"त्याला जेवढी मी ओळखते, त्यावरून इतकं तर नक्कीच सांगू शकते."

"एवढं प्रेम होतं तुमचं त्यांच्यावर? म्हणून का पुढे तुम्ही दुसरं लग्न नाही केलंत?"

तिच्या प्रश्नावर शालिनी खिन्न हसली. "खरं प्रेम एकदाच होते. ते प्रेम वाळूसारखे माझ्या हातातून निसटले खरे, पण मनाच्या कप्प्यात तसेच जपून ठेवलेय."

"पण तुमच्या आबांनी तुम्हाला लग्नासाठी आग्रह केला नाही का?"

"हे आबा म्हणजे मोहनचे बाबा आहेत. तुझे आजोबा आहेत ते. मोहन मला सोडून गेला हे त्यांच्या मनाला फार लागलं. आमचं लग्न म्हणजे खरं लग्न नव्हतं हे समजावून सांगण्याचा मी खूप प्रयत्न केला. पण त्यांना ते पटत नव्हते. माझे बाबा आणि आबा मिळून दुसऱ्या लग्नासाठी खूप मागे लागले, मला मात्र ते नको होते. माझे कसे होईल ही दोघांनाही काळजी होती मग मी पुढे शिकायचे ठरवले. डी.एड. करून गावातील शाळेत शिक्षिका झाले तेव्हा कुठे दोघांनी तो नाद सोडला. मी माझ्या पायावर उभी झाले हे बघून एक दिवस माझ्या वडिलांनी समाधानाने सुटकेचा श्वास सोडला, तो शेवटचाच. तेव्हापासून आबा माझे बाबा झालेत तेच माझी आई झालेत. मोहनचे प्रेम माझ्या वाट्याला नव्हते. आईवडिलांचे प्रेम मात्र भरभरून मिळाले. आबा थकलेत आता. एखाद्या गोष्टीचा लवकर राग येतो. पण मनाने खूप प्रेमळ आहेत." शालिनी तिला सांगत होती.

प्रीतीने उठून तिला एक गच्च मिठी मारली. कदाचित प्रेमाला पारखे झालेल्या सोनियाचे प्रतिबिंब तिला शालिनीत जाणवले असावे.
"आय एम सॉरी! मी तुम्हाला खूप चुकीचे ठरवले." तिचे डोळे अश्रुंनी भिजले होते. आत्तापर्यंत तिथले पाणीही न पिणारी ती, शालिनीच्या मिठीत विसावली होती.

शालिनीचे डोळे आपसूकच भरून आले. इतक्या वर्षात तिला समजून घेऊन प्रेमाने अशी मिठी कुणी मारलीच नव्हती. प्रीतीने मारलेली मिठी तिला पंचवीस वर्ष मागे घेऊन गेली. त्यावेळी मोहनने देखील 'थँक यू' म्हणत आवेगाने अशीच तर मिठी मारली होती. तिच्या डोळ्यातील थेंब प्रीतीच्या केसात अलगद विसावला.

"तू का सॉरी बोलतेस? तुला तर यातलं काहीच ठाऊक नव्हतं."

"एका प्रेमाची केवढी मोठी सजा मिळालीय तुम्हाला? आणि तरीही तुमची काहीच तक्रार कशी नाहीये?" प्रीती.

"तक्रार कुणाला करायची? आणि कुणाविषयी? खरं तर चूक कोणाचीच नव्हती. प्रीती, मोहनदेखील चुकीचा नाहीये गं. कदाचित आम्हा तिघांच्या प्राक्तनात हेच असावं. प्रेम आणि विरहाच्या आगीत आम्ही तिघेही सारखेच पोळलोय. मग दोष कोणाला द्यायचा?"

"तुमच्या त्या प्रेमाला. माझी राधाई म्हणते, प्रेम फसवे असते. अगदी खरं आहे ते. त्या प्रेमानेच तर तुम्हा तिघांचीही फसवणूक केली."

"नाही गं राणी. उलट त्या प्रेमानेच तर परिस्थितीशी लढण्याची ताकद आम्हाला दिली. तू कधी खऱ्या प्रेमात पडशील ना तेव्हा तुलाही हे पटेल. आणि मग प्रेम फसवे नसते याची प्रचिती येईल." तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत शालिनी म्हणाली.

शालिनीचे बोलणे ऐकून तिच्या डोळ्यासमोर कृष्णाचा चेहरा आला. तिने अलगद त्याला बाजूला केले आणि ओठावर स्मित आणून ती शालिनीशी बोलू लागली. "मी निघू आता?" ती परवानगी मागत होती.

"अगं, अशी कशी जाशील? जेवणाची वेळ झालीये, मी वाढायला घेते."

"नको." तिच्या तोंडून पटकन निघून गेले.

"का? पाण्यासारखं जेवणही सोबत घेऊन आली आहेस काय?" शालिनी मस्करीत म्हणाली. त्यावर तीही हसली.

"ही अजून इथेच? शालू, तू हिला जायला सांगणार होतीस ना?" आबा बाहेरच्या खोलीत येत म्हणाले. त्यांची झोप चाळवली होती.

"आबा, झोप झाली ना? बसा इथे." खुर्चीवरून उठून शालिनीने त्यांना जागा दिली. ते बसले खरे, पण प्रीती नजरेस पडणार नाही असे तिरके बसले.

"आबा, हिच्याकडे बघितलं का? ही कोण असेल ते ओळखून दाखवा बघू." त्यांचा चेहरा प्रीतीकडे वळवत ती म्हणाली.

"मला नाही तिला बघायचे. तिला आधी इथून जा म्हण बघू." त्यांनी हट्टच धरला.

"आबा, असे लहान मुलासारखं काय करता? एकदा बघा तर. तुम्हाला माहितीये आपल्या मोहनची लेक आहे ही."

"मोहनची लेक?" त्यांनी किलकीले डोळे करून प्रीतीकडे कटाक्ष टाकला.

"हो, बघा तरी. डोळ्यांचा रंग मोहनचा नाहीये पण डोळ्यांच्या पापण्या बघा. अगदी तशाच लांबसर आहेत की नाही? हा मानेवरचा तीळ देखील मोहनच्या तिळासारखाच आहे आणि ही हातांची बोटे बघितलीत? बघा कशी निमुळती आणि लांब आहेत." प्रीतीचे हात त्यांच्यासमोर धरत शालिनी बोलत होती.

त्यांनी तिचे हात हातात घेऊन त्यावरून प्रेमाने आपला हात फिरवला. त्या स्पर्शातील थरथर प्रीतीला जाणवत होती.
"या अशा लांब बोटामध्येच कुंचला घेऊन मोहन चित्र काढत बसायचा. तू ही काढतेस का गं तशीच चित्रं?" तिच्या चेहऱ्यावर नजर गाढून आबांनी विचारले.

"हं?" त्यांच्या प्रश्नाने ती चक्रावलीच. आत्ताच तर तिच्या वाढदिवसाला तिने स्वतःच्या हाताने रेखाटलेले मोहनचे पोट्रेट सोनियाला गिफ्ट केले होते. 'म्हणजे माझ्यातील ही उपजत कला माझी नाहीच तर माईच्या मोहनकडून मला लाभलीय. हा मानेवरचा तीळ अन ही बोटेही त्यांचीच देणगी. आजवर मला कसे समजले नाही?' तिचे डोळे भरून आले.

"आबाऽ.." आबाकडे बघून तिने साद घातली.

तिच्या आवाजातील गोडवा त्यांना मोहवून गेला. त्यांचा थरथरणारा हात तिच्या चेहऱ्यावरून फिरू लागला. त्या स्पर्शाने प्रीतीच्या डोळ्यातील पाणी त्यांच्या हातावर पडले आणि त्यांनी तिच्या डोळ्यात पाहिले. तो निळा सागर बघून त्यांचा हात झरर्कन मागे आला.

"या निळ्या डोळ्यांनी हिरावलेय ना माझ्या मोहनला? कुठे आहे तो? सांग मला?" त्यांचा आवाज रागाने कापत होता.

"आबा काय करताय हे?" शालिनी त्यांना शांत करत म्हणाली.

"ही, ही.. हिच्यामुळेच सगळं घडलंय. तुझ्या आयुष्याचं वाळवंट करायला हीच कारणीभूत आहे." ते प्रीतीकडे बघून बोलत होते.त्यांच्या अशा बोलण्याने प्रीती घाबरून मागे सरली.

"आबा, माझ्या आयुष्याच्या वाळवंटास मी जबाबदार आहे. सारे काही ठाऊक असतानाही मी तो मार्ग निवडला होता हो. या लेकराचा काय दोष?" शालिनीच्या डोळ्यातील पाणी बघून ते लहान बाळासारखे रडायला लागले. ती त्यांना शांत करत आतल्या खोलीत घेऊन गेली.

"आय एम सॉरी प्रीती. आबांची अवस्था एखाद्या छोट्या मुलासारखी झालीये गं. ते कोणत्या गोष्टीवर कसे रिऍक्ट होतील सांगता येत नाही. तू प्लीज वाईट वाटून घेऊ नको ना." प्रीतीचे हात हातात घेत शालिनी म्हणाली. प्रीतीची अवस्था भेदरलेल्या कोकरासारखी झाली होती. आलेला हुंदका दाबून तिने मान डोलावून हुंकार भरला.

"मी निघू?" तिच्या डोळ्यात बघत प्रीती.

"निघू नाही येऊ का म्हणून विचार ना." शालिनी.

"परत इथे येणं होईल की नाही कुणास ठाऊक. तुम्हाला
भेटून मात्र फार बरं वाटलं. मनात असलेले गैरसमज तरी मिटले." प्रीती.

"मलाही तुला भेटून खूप छान वाटले." शालिनीच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या.

"एक विचारू? मोहन कुठे भेटतील याची तुम्हाला खरंच कल्पना नाहीये का?"

"नाही गं. तो भारतात आहे हे नक्की. पण कुठे आहे ते मला नाही माहीत."

"हम्म." तिचा हात सोडवून ती जायला वळली.

"प्रीती.." शालिनीच्या हाकेने तिने वळून पाहिले. "प्रीती, तुझ्या मनाची अवस्था मला कळतेय. पृथ्वी गोल आहे. मोहन तुला नक्की भेटेल. तुझी माईदेखील लवकर बरी होईल. मोहनला शोधण्यास मी तुला काही मदत केली असती पण आबांच्या वचनात मी बांधले आहे. तरी इतर कुठली मदत लागली तर नक्की कळव. हा माझा नंबर तुझ्याकडे सेव्ह करून ठेव. मी तुला सहकार्य करायला तयार असेन."
शालिनीच्या बोलण्यातील आपलेपणाचा ओल प्रीतीला जाणवत होता. तिने आवेगाने शालिनीला मिठी मारली.

"तुझ्या प्रयत्नांना लवकर यश मिळू दे." तिच्या केसावरून शालिनी हात फिरवत होती.
शेवटी तिचा निरोप घेऊन प्रीती पुढच्या प्रवासाला निघाली.

*******
तहान लागली म्हणून कार बाजूला घेऊन तिने बॅगेमधून पाण्याची बॉटल घेतली. तिथे ठेवलेल्या गणेशमूर्तीकडे लक्ष गेले तसे ती मूर्ती हातात घेऊन ती शांतपणे बसून राहिली. मनात नुसता भावनांचा कल्लोळ माजला होता. त्या विघ्नहर्त्याकडे पाहून तिला काय वाटले कोणास ठाऊक, तिने तिची कार कोल्हापूरच्या दिशेने वळवली. तो चिमुकला गणराया तिच्या बॅगेत न जाता कारच्या मध्यभागी आनंदाने विसावला होता. जणूकाही तोच तिला आता योग्य दिशा दाखवणार होता.
:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//