Feb 29, 2024
प्रेम

प्रीती.. पर्व दुसरे! भाग -३०

Read Later
प्रीती.. पर्व दुसरे! भाग -३०

प्रीती.. पर्व दुसरे!

भाग -तीस.


"बहुधा ते झोपलेत आणि तसेही त्यांचे वय झालेय, त्यांचे बोलणे कशाला मनाला लाऊन घ्यायचे? मी तुमच्यापेक्षा वयाने मोठी आहे. त्या अधिकाराने तुम्हाला आत बोलावतेय आणि अतिथी देवो भव ही संस्कृती आहेच की आपली."

शालिनी प्रेमाने बोलत होती. तिची अधिकारवाणी प्रीतीला आवडली नाही पण मोहनला भेटायचे म्हणून ती आत येऊन बसली.

शालिनी तिच्यासाठी पाणी घेऊन आली.

"माझ्याकडे माझी पाण्याची बाटली आहे." बॅगेतून बाटली काढून तोंडाला लावत प्रीती म्हणाली. तिला त्या घरातील पाणीही नको होते.

तिचे वागणे बघून शालिनीच्या ओठावर मंद स्मित आले.

"हं, तर मोहनबद्दल काय बोलत होतात? आणि तुम्ही आहात तरी कोण? मोहनला कसे ओळखता?" तिच्यासमोर खुर्ची घेऊन बसत शालिनीने प्रश्न केला.


"मी प्रीती." ती क्षणभर थांबली. "सोनियाची मुलगी." आपले वाक्य पूर्ण करत ती.


"काय तू सोनियाची मुलगी आहेस? म्हणजे मोहनची मुलगी ना? किती सुंदर आहेस तू! तूच इतकी सुंदर तर सोनिया किती सुंदर असेल?" शालिनीच्या डोळ्यातील थेंब गालावर उतरले. बोलण्यातील औपचारिकता केव्हाच गळून पडली. ती मोहनची लेक म्हणून आपलेपणाने तिचे बोलणे आपसूकच एकेरीवर आले.


"मी केवळ माझ्या माईची म्हणजे सोनियाची मुलगी आहे. त्यांच्याशी माझा काहीएक संबंध नाहीये. माझ्या माईशी प्रतारणा करणाऱ्या माणसाला मला एकदा भेटायचे आहे, म्हणून मी इथे आलेय." प्रीती तिरस्काराने म्हणाली.


"प्रतारणा केली असे का तू बोलतेस? आणि भेटायचे आहे म्हणजे? तू त्याच्यासोबतच राहतेस ना? मग?" न कळून शालिनी तिलाच विचारत होती.


"मी का सोबत राहू? माझ्या माईला वाऱ्यावर सोडून त्यांनी तुमच्याशी लग्न केले ना? मग आमचा सोबत राहण्याचा प्रश्न येतोच कुठे?" ती कुत्सित हसली.


"आमच्या लग्नाबद्दल त्याने तुला सांगितले का?" शालिनीने हळवे होत विचारले.


"आयुष्यात मी कधी त्यांना भेटलेच नाहीये मग ते कसे सांगणार? मला तुमच्याकडून ऐकायचे आहे, का केलात माझ्या माईशी विश्वासघात? का केले तुम्ही लग्न?" ती जाब विचारत होती.


"विश्वासघात.. प्रतारणा..! किती मोठमोठे शब्द वापरतेस गं? असं कोण का करेल?" विषण्णपणे शालिनी म्हणाली. "तू असे का बोलते आहेस, तेच मला कळत नाहीये." तिच्या डोळ्यात पाणी होते.


"मला तुमच्या लग्नाबद्दल ऐकायचं आहे. प्लीज सांगाल?" तिच्या डोळ्यात बघत प्रीती म्हणाली. जणू काही ती निर्वाणीचेच बोलत होती.


"लग्न!" शालिनी खिन्न हसली. "आमचं लग्न, लग्न होतेच कुठे? पंचवीस वर्षांपूर्वी केलेली ती तर फक्त एक तडजोड होती. सोनियासारखी सुंदर, सोज्वळ, स्वाभिमानी मुलगी आयुष्यात असताना तो का माझ्याशी लग्न करेल?" तिच्याकडे पाहत शालिनी.


"तरीही मग का केले तुम्ही लग्न?" प्रीतीचा स्वर रुद्ध झाला होता.


"आत्यासाठी. म्हणजे मोहनच्या आईसाठी." निर्विकारपणे शालिनी उत्तरली.

प्रीतीच्या चेहऱ्यावरचा प्रश्नार्थक भाव शालिनीने हेरला. आणि मग तिने मोहनच्या आईचे आजारपण, मुंबईहून मोहनचे इथे येणे, आत्याने घातलेला लग्नाचा घाट हे सर्व कथन केले.

"मोहन इथे आला तेव्हा आत्या इतकी सिरीयस असेल हे त्याला ठाऊक नव्हते. इथे आल्यावर तिच्या गंभीरतेची त्याला प्रचिती आली. आत्याला कोणताही मानसिक धक्का सहन होणार नाही हे डॉक्टरांनी सांगितले होते तरी तिने आमच्या लग्नाचा विषय काढला तेव्हा अप्रत्यक्षपणे त्याने नकारच दिला. पण तिची प्रकृती बघता सोनियाबद्दल तो तिला सांगू शकला नाही."

"तुम्हाला तर सांगितले असेल ना?"

"हम्म. त्याने मला सांगितले तेव्हा आमचे लग्न जुळल्याच्या बातमीने सर्व आनंदात होते. आईशिवाय वाढलेल्या पोरीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आत्याला मला दुखवायचे नव्हते गं. ज्याच्यावर मी प्रेम केले त्या मोहनलाही दुखवायचे नव्हते. मला वाटलं, लग्नानंतर आत्या बरी होईल. त्यानंतर तिला सोनियाबद्दल सांगता येईल. मी मोहनला काडीमोड देईन आणि सोनिया या घरात सून म्हणून येईल. पण आपण विचार केला नी घडेल एवढं सोप्प आयुष्य नसतं ना गं."


"म्हणजे?" आवंढा गिळून प्रीतीने प्रश्न केला.


"लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आत्या आम्हाला सोडून देवाघरी गेली. तिच्या जाण्याचे दुःख, आबा आणि माझ्या बाबांची बिकट अवस्था.. तेव्हा आम्ही सोनियाबद्दल घरी कसे सांगणार होतो?" शालिनी.


"माझी माई तेव्हा गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात होती. किमान तो तरी विचार तुम्ही करायला हवा होता ना? तेव्हा नाही पण त्यानंतरही कधीच तुमचा नवरा तिच्याकडे फिरकला नाही. तुमचं प्रेम होतं ना त्यांच्यावर? मग माझ्या माईचे प्रेम तुम्ही का समजून घेतले नाही? तिला तेव्हा तिच्या मोहनची गरज होती." प्रीती चिडली होती.


"माझे मोहनवर प्रेम होते, पण म्हणून मी स्वार्थी नव्हते गं. आत्याच्या पिंडाला कावळा शिवत नव्हता तेव्हा मी वचन दिले, की मोहनच्या प्रत्येक निर्णयात मी त्याच्या सोबत असेन. त्याला त्रास होईल असे मी कधीच वागणार नाही आणि हे बोलल्यावर क्षणार्धात कावळा शिवला. वीर जोत्याजी केसरकरांच्या गावाची लेक आहे मी. दिलेला शब्द पाळतो आम्ही. म्हटल्याप्रमाणे सहा महिन्यांनी आम्ही रीतसर घटस्फोट घेतला. लग्नानंतर सुरुवातीचे तीन चार महिने मोहन मुंबईला येऊ शकला नाही पण तो सोनियाला पैसे पाठवत होता. तिच्या मनावर काही परिणाम होऊ नये म्हणून त्याने इथले तिला काहीच कळू दिले नाही. प्रत्यक्ष भेटल्यावर तो तिला सारं सांगणार होताच पण तो मुंबईला पोहचेपर्यंत होत्याचे नव्हते झाले." बोलता बोलता तिने पदराने आपले डोळे पुसले.

"काय झाले?" आता प्रीतीचा उमाळा दाटून आला होता.


"तो मुंबईला गेला, तेव्हा सोनियाने हे जग सोडले होते. तू तिथल्या जवळच्या अनाथाश्रमात त्याला भेटलीस. त्याने मला फोनवर हे कळवले होते. आमचे नवराबायकोचे नाते तुटले असले तरी माणुसकीचे नाते होतेच की. मी त्याला तुला इथे घेऊन यायला सांगितले, पण तोही स्वाभिमानी होता. दुसऱ्या कोणत्यातरी मुलीसाठी आमचे नाते तुटले म्हणून आबांनी त्याच्याशी बोलणे टाकले होते. आता इथे कधीच परतणार नाही म्हणून तो मुंबईला गेला तर तिकडे सर्व संपलं होतं. काही दिवस तुला अनाथाश्रमात ठेवून त्याने चांगली नोकरी मिळाल्यावर तुला सोबत घेऊन राहू लागला. पुढे तो परदेशातही गेला. आता बहुतेक इथे भारतातच आहे पण नक्की कुठे ते मला ठाऊक नाही. मला कळत नाहीये, तुम्ही दोघं सोबत असताना तू असं का म्हणतेस की तू त्याला कधीच भेटली नाहीस?"


"खरं तर तुम्ही काय बोलताय त्याचा मला अंदाज लागत नाहीये. मी माझ्या माईसोबत पुण्यात राहते. \"सोनप्रीत\" नावाच्या मोठया कंपनीची मालकीण आहे ती." सोनियाचा फोटो शालिनीला दाखवून प्रीती म्हणाली. "ही माझी माई. सध्याच्या घडीला जीवन आणि मृत्यूच्या पुसटशा रेषेत ती उभी आहे. आणि त्याही स्थितीत ती तिच्या मोहनच्या वाटेकडे आस लाऊन बसली आहे."


"हे कसे शक्य आहे? आणि मग गेले पंचवीस वर्ष मोहन त्याची मुलगी म्हणून जिच्यासोबत राहतो ती कोण आहे?" आता शालिनीच्या चेहऱ्यावर प्रश्न होते.


"मला काय माहीत? जसे माझ्या माईशी ते खोटं बोलले तसे तुमच्याशीही बोलले असतील." तुसडेपणाने प्रीती म्हणाली. 


"नाही गं बाळा, मोहन खोटे बोलणाऱ्यातील नाहीये. या मातीतला माणूस खोटे बोलूच शकत नाही. आत्याला तो सत्य सांगणारच होता पण तिच्या नाजूक प्रकृतीमुळे मी त्याला ते सांगण्यापासून रोखले. याचा अर्थ तो खोटारडा आहे असे होत नाही ना?" शालिनीच्या डोळ्यात पाणी होते.


"तुम्ही एवढया विश्वासाने कसे सांगू शकता?"


"कारण मुंबईला जाऊन वर्ष उलटल्यावर त्याने त्याच्या मुलीबरोबरचा एक फोटो पाठवला होता. नोकरी लागली म्हणून तो तिला आपल्यासोबत घेऊन गेला होता. त्यानंतरही कधी पत्र पाठवायचा. आबांना ते आवडायचे नाही त्यामुळे नंतर त्याने ते बंद केले."

"तो फोटो मी बघू शकते?" प्रीती.


"हो. का नाही?" म्हणत तिने आत जाऊन एक अलबम आणला. त्यात तिचे, मोहनचे, त्याच्या आईचे काही जुने फोटो होते. ब्लॅक अँड व्हाईट. त्यानंतर त्यांच्या लग्नाचा एक फोटो होता. दोघांच्याही चेहऱ्यावर जबरदस्तीने आणलेले हसू स्पष्ट दिसत होते. तो फोटो पलटल्यावर मोहनचा फोटो होता आणि त्याच्या कडेवर एक चिमूरडी बसली होती.


"ही मी नाही आहे." फोटो बघून प्रीतीने शालिनीकडे नजर टाकली. "मुळात मी त्यांना कधी भेटले नाहीये आणि मी माईसोबत राहते."


"मग हा घोळ कसा झाला? सोनियाच्या प्रेमात गाढ बुडालेला तो, त्याच्या हातून असे कसे घडू शकते?" शालिनी.


"कदाचित त्यांनी माईसोबत तुम्हालाही फसवले असेल?" प्रीती तिला म्हणाली.


"नाही गं. परत तेच नको बोलूस ना. मोहन असा नाहीये. सोनिया तुला घेऊन पुण्याला गेली त्यानंतर तो मुंबईला आला असेल नि मग हा घोळ झाला असावा, असेही होऊ शकते ना?" तिने तर्क लावला.


"तुम्हाला खात्री आहे?"


"शंभर टक्के!"


"इतक्या खात्रीने कसे काय सांगू शकता?"


"त्याला जेवढी मी ओळखते, त्यावरून इतकं तर नक्कीच सांगू शकते." प्रीतीच्या डोळ्यात बघत शालिनी.


"एवढं प्रेम होतं तुमचं त्यांच्यावर? म्हणून का पुढे तुम्ही दुसरं लग्न नाही केलंत?"

प्रीतीच्या प्रश्नावर शालिनी खिन्न हसली."खरं प्रेम एकदाच होते. ते प्रेम वाळूसारखे माझ्या हातातून निसटले खरे, पण मनाच्या कप्प्यात तसेच जपून ठेवलेय."


"पण तुमच्या आबांनी तुम्हाला लग्नासाठी आग्रह केला नाही का?" प्रीतीचा पुढचा प्रश्न तयार होता.

:

क्रमशः

पुढील भाग लवकरच!

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.

********

फोटो गुगल साभार.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//