Mar 02, 2024
प्रेम

प्रीती.. पर्व दुसरे! भाग - २८

Read Later
प्रीती.. पर्व दुसरे! भाग - २८

प्रीती. पर्व दुसरे!

भाग -अठ्ठावीस.


"काकू, हातात जादू आहे हो तुमच्या. किती चवदार जेवण बनवलंत."


"हे काहीच नाही. माझी आई तर खूप चविष्ट जेवण बनवायची. आप्पासाहेबांच्या वाड्यावर जेवण बनवायला ती जायची. तिच्या हातच्या स्वयंपाकाशिवाय त्यांच्या बंगल्यात दुसऱ्या कुणालाच जेवण बनवण्याची मुभा नव्हती." सांगताना देवकी जुन्या आठवणीत रंगून गेली.


आप्पसाहेबांचे नाव ऐकून प्रीतीचे कान टवकारले.


"आप्पसाहेब?" तिच्या चेहऱ्यावर आश्चर्यसोबत एक प्रश्नचिन्ह होते.


"हो. म्हणजे तो भूतकाळ आहे. आप्पासाहेब नावाचे मोठे प्रस्थ होते आमच्या कोल्हापुरात. माणूस मोठा दिलदार पण नियतीपुढे कोणाचे चालले आहे?" एक सुस्कारा टाकत देवकी म्हणाली.


"म्हणजे?" प्रीती.


"बिझनेसमध्ये लॉस झाला नी त्यांनी हाय खाल्ली. त्यात ते गेले. त्यांची मुलगीदेखील घर सोडून गेली. काही वर्षांनी मुलांनीही घर सोडले. मालकीणबाई वारल्यावर धाकटा लेक त्यांचा बंगला विकून दुसऱ्या शहरात गेला. हळूहळू आप्पासाहेब म्हणून कुणी होते हेही लोक विसरले." देवकीने एक उसासा टाकला.


"तुम्ही जायचा त्या बंगल्यावर?" तिने उत्सुकतेने विचारले.


"फार नाही, एकदोनदा गेले असेल. मालकीणबाईंना असे बाहेरचे आलेले नाही खपायचे. पण माझ्या आईच्या हातचे जेवण मात्र सगळ्यांना आवडायचे हं. त्यांच्या स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तूवर तिचा हात फिरला होता." देवकी भरभरून बोलत होती.


"आई, पुरे अगं. तिला का त्यांच्याबद्दल एवढं सांगते आहेस? ती कुठे त्यांना ओळखते?" कृष्णाने मध्येच देवकीला थांबवले.


"तिला नाही, तुझ्याच आठवणीत रहावे म्हणून सांगतेय. आज आपण जे आहोत ते त्यांच्याचमुळे, हे तू कधी विसरू नकोस." देवकी.


"नाही गं आई. मी कसे विसरेन?"कृष्णा.


"त्यांच्यामुळे कसे काय?" प्रीती उत्सुकतेने म्हणाली.


"खूप मोठी गोष्ट आहे ती. माझे लग्न झाले आणि तीन वर्षातच माझे धनी मला सोडून गेले.पदरात दोन वर्षाचं लेकरू घेऊन मी आईकडे परत आले. त्याकाळात आप्पासाहेब नव्हते पण मालकीणबाईंनी आईला साथ दिली. आमच्या घरात खाणारी तोंडे वाढली म्हणून त्यांनी आईचा पगार देखील वाढवला. कृष्णा चांगला शिकावा म्हणून त्या मला नेहमी मार्गदर्शन करायच्या म्हणून हा एवढा मोठा ऑफिसर झाला. त्यांनी योग्य मार्ग दाखवला नसता तर मला कुठं काय कळलं असतं? वरून स्वभावाने फणसासारख्या काटेरी वाटत असल्या तरी मनाने खूप चांगल्या होत्या त्या. मुलगी त्यांना सोडून गेली तेव्हा पार खचल्या होत्या पण कोणाला आपले दुःख कधी बोलून दाखवले नाही."

बोलता बोलता देवकी क्षणभर थांबली. प्रीतीच्या डोळ्यातील थेंब तिच्या नजरेस पडला.

"अगं, तू का हळवी होतेस? माझेच चुकले. मी तरी काय जुन्या आठवणी उगाळत बसले. ते जाऊ दे, मला सांग कसे वाटले आमचे शहर? आवडले ना?" देवकीच्या प्रश्नावर प्रीतीने स्मित करून मान डोलावली.


"मी निघू आता? कृष्णा, मला हॉटेलला सोडतोस का?" प्रीतीने कृष्णाकडे पाहिले.


"हो, चल. आई येतोच मी." कृष्णा कारची चावी घेत उत्तरला.


"काकू, येते मी." प्रीती देवकीला नमस्कार करत उठली.


"पुन्हा इथे आलीस की घरीच ये. असे हॉटेलवर किती दिवस रहायचे? हे घर आपलेच समजून इकडेच रहायला येऊ शकतेस." तिच्या डोक्यावर हात ठेवून देवकी भोळेपणाने म्हणाली.

तिच्या बोलण्यावर प्रीतीने स्मित करून मान डोलावली.

******


"थँक यू कृष्णा." हॉटेल सयाजीला पोचल्यावर प्रीतीने त्याचे आभार मानले.


"इट्स माय प्लेजर." तिच्याकडे बघत तो.

ती उतरायला गेली तसे त्याने तिला थांबवले, "प्रीती, हे तुझ्यासाठी." हातातील एक छोटा गिफ्टबॉक्स तिला देत तो.


"सॉरी, पण हे कशाला?" ती.


"आधी उघडून तर बघ मग घ्यायचे की नाही ते ठरव." तो.


ती नाही म्हणत असतानाही त्याने जबरदस्तीने तिच्याकडून बॉक्स उघडून घेतला. त्यात एक छोटीशी चांदीची गणरायाची मूर्ती होती. तिने एकवार कृष्णाकडे आणि मग त्या पिटुकल्या गणेशाकडे नजर टाकली.


"मुर्ती खूप सुंदर आहे,पण मी नाही घेऊ शकत." त्याच्यापूढे तो बॉक्स ठेवत ती म्हणाली.


"देवाला नाही म्हणू नये गं. खरे तर देवावर माझा विश्वास नाही. मी आजवर केवळ एकाच व्यक्तीला देव मानले, त्या म्हणजे आई मघाशी बोलली त्या मालकीणबाईंना. आई आप्पासाहेबांना देवमाणूस म्हणते. त्यांना मी नाही बघितले, पण मालकीणबाईंना एकदोनदा भेटण्याचा योग आला. दिसायला कठोर दिसत असल्या तरी डोळ्यात काहीतरी हरवल्याची सल मला कायम दिसायची. मी लहान होतो, फारसं काही कळायचं नाही मला पण त्यांच्या डोळ्यातील रितेपण मात्र जाणवायचा. मोठे झाल्यानंतर कळले की त्यांची मुलगी घर सोडून गेली तेव्हा ती प्रेग्नन्ट होती. माझी आजी त्यांच्याकडे कामाला होती म्हणून तिला हे माहिती होते. तिच्याकडून आईला कळले, नंतर मात्र कुठे वाच्यता झाली नाही. मला कळले तेव्हा का कोणास ठाऊक पण वाटायचे की मालकीणबाई माझ्यात त्यांच्या मुलीचे बाळ शोधत असतील का? कदाचित म्हणून त्या मला शिकायला नेहमी प्रोत्साहित करत असाव्यात. त्यांच्यामुळे मी शिकलो. आज माझी आई आलिशान घरात राहते ते त्यांच्यामुळेच असं मला वाटतं. मग त्याच माझ्यासाठी देव नाही का?"


त्याचे बोलणे ऐकून ती भारावल्यागत तिथेच बसून होती. 'माणसं ओळखण्यात आपण कित्येकदा चुकत असतो नाही का? आजवर वाटायचं, आईसाहेबांनी माईला समजून घेतले असते तर माईने जे सहन केले ते तिला करावे लागले नसते. चुकीची होते का मी? आईसाहेब खरंच एवढया थोर मनाच्या होत्या का?' तिच्या मनात विचार डोकावत होते.


"तुला सांगू? त्या दिवशी सोनिया मॅडम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना तुम्ही सर्वांनी तिथल्या गणपतीपुढे हात जोडलेत आणि ते बघून नकळत माझेही हात आपोआप जोडले गेले. कदाचित पहिल्यांदा मी देवापुढे हात जोडले असावेत. तो क्षण मनात कोरल्या गेला, म्हणून मी तुझ्यासाठी ही गणेशाची मूर्ती भेट म्हणून आणली. आतातरी स्वीकार करशील ना?"


त्याच्या प्रश्नाने तिने त्या मूर्तीवरून प्रेमाने हात फिरवला आणि तो बॉक्स आपल्या पर्समध्ये अलगद ठेवला.

"तुला माहितीये, मीदेखील देवाला फारसे मानत नाही रे. माझा देव म्हणजे माझी माई आणि तुझ्यामुळे तिचे प्राण वाचले म्हणून त्या देवाच्या पंक्तीत तुझेही स्थान आहे. मग तू दिलेली ही भेट स्वीकारावीच लागेल ना?" डोळ्यातील हेलकावणारे पाणी बाहेर पडू न देता ती म्हणाली.

"थँक यू आणि बाय! परत कधी जमलं तर तुला भेटायला आवडेल मला." ती कारच्या खाली उतरत म्हणाली.


"देवाच्या पंक्तीत न बसवता एक मनुष्य म्हणून नातं जोडशील माझ्याशी?" तोही खाली उतरत म्हणाला. "फ्रेंड्स?" हात समोर करत तो.


"नातं?" तिचा स्वर कापरा झाला. "रक्ताचं नातं माईशी आणि हक्काचं नातं माझ्या राधाईशी आहे. मिहीर अंकल आणि समीर हेही तेवढ्याच हक्काचे आहेत खरे, त्यापलीकडे मात्र आणखी कोणाशी नाते जोडलेच नाहीत रे मी. नाते जोडणे सोप्पे पण निभावून नेणे कठीण असते रे कृष्णा, नवीन नात्यात पडायची भीती वाटते मला."


"मैत्री करायला कसली भीती? समीर तुझा मित्रच आहे ना, त्यासारखे आपणही फ्रेंड होऊ शकतो की आणि विश्वास ठेव, कोल्हापूरकर नाते निभावण्यात कसलीही कसर सोडत नाही बरं." एक पाऊल पुढे टाकत तो म्हणाला.


"त्याचा प्रत्यय येतोय मला. समीर माझा बालपणापासूनचा मित्र आहे, त्यानंतर मी फारशी कुणाशी मैत्री केली नाही. तुझ्यासोबत एका दिवसात एवढं फिरले, मनसोक्त गप्पा मारल्या. खूप सहजतेने वावरले. असे वाटलेच नाही की आपण अनोळखी आहोत. आजवर असं मोकळेपणाने कोणाशी बोलले नसेल तेवढे तुझ्याशी बोलले. आता वाटतं इथेच थांबूया. आणखी पुढे नको जायला."


"का पण? कसली भीती वाटतेय तुला? माझ्यावर विश्वास नाहीये का?" त्याच्या नकळत डोळ्यातून थेंब खाली ओघळला.

ती काही न बोलता गप्प होती.


"प्रीती यार, मला ना गोष्टी गोल गोल फिरवून नाही बोलता येत. जे मनात आहे, तेच ओठात आहे. तुला पहिल्यांदा भेटलो नि तेव्हाच हृदयात काहीतरी झाले गं. आवडायला लागलीस तू. कदाचित मी तुझ्या प्रेमात पडलोय. तू कसल्यातरी त्रासात आहेस हे मला कळतंय. ते मला सहन होत नाहीये. तुझ्याही मनात माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय हे सुद्धा कळतंय मला. मग एक पाऊल पुढे टाकून बघायला काय हरकत आहे?" तिच्या डोळ्यात बघत तो स्पष्टपणे बोलत होता.


"कृष्णा, ट्राय टू अंडरस्टॅंड, मला कुठल्याच नात्यात अडकायचे नाहीये. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला खूप सुंदर दिवस होता. तो कायम माझ्या मनात राहील. इतक्या सुंदर दिवसासाठी थँक यू सो मच. पण इथेच थांबूया आपण. बाय." त्याच्या उत्तराची वाटही न बघता ती हॉटेलमध्ये निघून गेली.


तिच्या मनात खूप मोठे असे काहीतरी दडलेय हे त्याला कळत होते. 'बोलायला आपण घाई करायला नको होती. उगीच दुखावली ती.' तो स्वतःला दोष देत कारमध्ये बसला. त्याच्या घराच्या दिशेने तो निघाला होता.

:

क्रमश :

पुढील भाग लवकरच!

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )


*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.

********

फोटो गुगल साभार.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//