प्रीती.. पर्व दुसरे! भाग -२६

प्रीतीला कळेल का मोहनचे सत्य?
प्रीती.. पर्व दुसरे!
 भाग -सव्वीस.


"नाही गं. मन जरा थाऱ्यावर नव्हतं मग म्हटलं, आजच्या दिवस अभ्यासाला गोळी मारूया." दुधाचा ग्लास घेत तो.

"कृष्णा,कोण आहे रे ती?"

"कोण?"

"तुझी चित्तचोर!"

"आई, अजून कशात काही नाही नि तू काही काय बोलतेस?"

"तुझ्या मनात तर ती आहे ना?"

तू पण ना गं! तुझ्याशी खोटं बोलताच
येत नाही बघ. हा बघ तिचा फोटो. मागे नाही का एका ॲक्सिडेंटबद्दल सांगितले होते, त्या मॅडमची ही मुलगी."

"अगदी नक्षत्रसारखीच आहे रे. खूप छान जोडा शोभेल बघ तुमचा." त्याच्या कपाळावर ओठ टेकवत देवकी म्हणाली.

"आई!" म्हणून तो तिच्या कुशीत विसावला.

"एवढा पोलिसातला माणूस तू नी मुलीसारखा काय लाजतोस रे?" आई हसत म्हणाली.

******

सकाळी प्रीती लवकर तयार झाली. तिला सोनिया व्हिला बघायला जायचे होते ना? गायत्रीला फोन करून तिच्याकडून पत्ता घेऊन ती परस्परच तिकडे गेली. महादूचा नातू तिथे होताच.

"या मॅडम! हा बघा तुमच्या आजोबांचा पूर्वीचा बंगला. आता इथे नवीन मालक राहतात." तो सांगत होता.

'त्या वास्तुला बघून प्रीतीच्या डोळ्यात पाणी आले. त्या काळात इतक्या मोठ्या बंगल्यात राहणारी माझी माई आणि तिची किती परवड झाली. मिस्टर मोहन मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही.'
डोळ्यातील एक उष्म थेंब तिच्या गालावर ओघळला.

"दादा, मी आत जाऊ शकते का?" तिने त्याच्याकडे पाहून विचारले.

"अहो मॅडम, इथले मालक इथे नाही आहेत. ते सध्या बाहेर गेलेत. मग तुम्ही कसे आत जाणार?" त्याच्या भोळ्या चेहऱ्यावर मोठा प्रश्न होता.

"हम्म, ते आहेच. बरं मला सांगा, छत्रपती राजाराम कॉलेज कुठे आहे?" ती.

"आजच अख्खे कोल्हापूर फिरणार आहात होय?" तिला पत्ता सांगत तो हसून म्हणाला.

"इथंच थांबा. मी तुमच्यासाठी रिक्षा घेऊन येतो." तिला तिथेच थांबवून थोड्यावेळात तो एक रिक्षा घेऊन आला. या परक्या असणाऱ्या लोकात असलेला स्नेहभाव बघून ती भारावून गेली. अनोळखी भागात तिच्यासाठी असलेला हा आपलेपणा ती पहिल्यांदाच अनुभवत होती.

******
'छत्रपती राजाराम कॉलेज!' कोल्हापूरातील एक नामांकित कॉलेज. त्या कॉलेजच्या आवारात प्रीती उभी होती.

"एक्सक्युज मी, मला प्रिन्सिपल सरांची केबिन कुठे आहे ते सांगू शकाल काय?"  
वाटेत भेटलेल्या शिपायाला तिने थांबवले.

"हे काय, इथून सरळ जावा नी डावीकडे वळा. तुम्हाला तिथे त्यांच्या नावाची पाटी दिसेल बघा."

"मे आय कम इन सर?" तिच्या आवाजाने सरांनी मान वर केली आणि ईशाऱ्यानेच तिला आत बोलावले.

"बोला." ते.

"सर, मला इथल्या एका एक्स स्टुडन्टबद्दल माहिती हवी आहे." ती.

"त्यासाठी तुम्हाला रीतसर अप्लिकेशन द्यावी लागेल. कोणत्या बॅचच्या विद्यार्थ्याविषयी बोलताय?" सर.

"एक्झ्याक्टली कुठली बॅच ते तर माहिती नाही. पण बावीस पंचेवीस वर्षांपूर्वीचा विद्यार्थी. कॉमर्स ब्रँचचा."

"तेव्हाचे रेकॉर्ड्स शोधायला तर खूप वेळ लागेल." सर म्हणाले तशी ती खट्टू झाली.
"पण मी तुम्हाला मदत करू शकतो. कारण मीदेखील याच कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे. कॉमर्स ब्रँच आणि बावीस वर्षांपूर्वीचीच बॅच." ते किंचित हसून म्हणाले.
त्यांचे बोलणे ऐकून तिचा चेहरा फुलला.

"नाव काय म्हणालात?"

"मोहन. मोहन पाटील."
नाव ऐकून सरांच्या चेहऱ्यावर एक स्फूट हसू उमटले.

"मोहन म्हणजे मोहन्याच ना?"

तुम्ही त्यांना ओळखता?" डोळे मोठे करून ती.

"हो, अगदी चांगल्याप्रकारे ओळखतो. तुम्ही कोण म्हणायच्या? नि त्याच्याबद्दल कसली माहिती हवीय?"

"खरे तर मी कोण हा प्रश्नच आहे." खिन्न हसून ती म्हणाली. "तुम्ही त्यांना कसे ओळखता ते सांगा ना?"

"मी शरद." तिच्याकडे एक नजर टाकून ते म्हणाले. "शिकत असताना मी आणि मोहन रूमपार्टनर्स होतो. फायनल इयरच्या परीक्षा आटोपल्या म्हणून मी दोन दिवसासाठी गावाला गेलो होतो. परतल्यावर कळले की तो कुठेतरी निघून गेलाय. तसे त्याने एक लेटर लिहून ठेवले होते. पण तो कुठे गेला नि का? मला कधी समजलेच नाही."
ते बोलता बोलता थांबले.
"आणि एकदिवस कानावर आले की त्याने लग्न केले."

"कोणाशी?" ती अधीरतेने म्हणाली.

"शालिनी.. त्याच्या मामाची मुलगी. पण त्याने कोणालाच बोलावले नव्हते. मलाही नाही."

"नंतर तुम्ही कधी त्यांना भेटलात?"
"
नेव्हर! तो कोल्हापूरला कधी आला की नाही माहीत नाही. पण आमची भेट आजवर कधीच झाली नाही."

"त्यांचे गाव कोणते? काही कळेल का?"

"पुनाळ. इथून तसे फार लांब नाहीये. पण तो तिथे राहत नसावा कारण तिथे असता तर एकदातरी इकडे फिरकला असता."

शरदचे बोलणे ऐकून प्रीती उठली. "थँक यू सर. तुमची खूप मदत झाली."

"यू आर वेलकम! पण तुम्ही कोण आहात? ते नाही सांगितले." ते.

"मी प्रीती. सध्या माझी ओळख एवढीच सांगू शकते." नम्रपणे दोन्ही हात जोडून तिने शरदला धन्यवाद दिले आणि ती तिथून बाहेर पडली.

कदाचित सोनिया आणि मोहनच्या नात्याविषयी त्याला काही ठाऊक असेल अशी तिला आशा होती पण मोहनचे एका वेगळ्याच मुलीशी लग्न झाले हे ऐकून ती ते विचारूच शकली नाही.

उद्विग्न मनाने ती कॉलेजबाहेर रिक्षाची वाट बघत थांबून होती. पाचएक मिनिटांनी समोर गेलेली बाईक परत तिच्याजवळ येऊन उभी राहिली.

"मिस प्रीती? मला वाटले की मला भासच झालाय." तो कृष्णा होता.

कडक इस्त्री असलेल्या युनिफॉर्ममध्ये तोही अगदी कडक दिसत होता.

"हॅलो ऑफिसर!" ती मंद हसली.
तिचे मंद हसू झूळझूळणाऱ्या वाऱ्यासवे त्याला पुन्हा प्राजक्ताच्या वर्षावात घेऊन गेले. त्याचेही ओठ आपसूकच रुंदावले.

"इकडे कुठे?" त्याने विचारले.

"एका कामानिमित्त या कॉलेजला आले होते. आता परत जातेय." ती उत्तरली.

"चला, मग मी सोडून देतो की." तो आनंदाने म्हणाला. "म्हणजे इफ यू डोन्ट माइंड!" त्याने लगेच स्वतःला सावरले.

"तुम्हाला उशीर होईल ना?" ती.

"अहो नाही. तुमच्या हॉटेलकडूनच मला जायचे आहे. सो प्लीज."

थोडे समोर सरकून त्याने तिला जागा दिली. त्याच्या मागे ती बसली खरी, पण जराशी अवघडूनच. असे दुचाकीवर एखाद्याच्या मागे बसायचा तिला आजवर कधी अनुभव नव्हता. हॉटेल येईपर्यंत ती फारशी बोललीही नाही. तिला असे अवघडलेले बघून कृष्णाच्या ओठावर स्मित उमटले.

"सो, मग आज सायंकाळी भेटूयात. मी इथेच तुम्हाला पिक करायला येईल. चालेल ना?" हॉटेल सयाजीसमोर बाईक थांबवत कृष्णा म्हणाला.

"आता भेटलोच की आपण. आणखी परत का भेटायचं?" नितळ हसून ती.

"धिज इज नॉट फेअर हं! आपलं कालच ठरलं होतं. मी येतोय. बी रेडी!" 
बाईकला किक मारून तो निघून देखील गेला.

******
'आणि एक दिवस कानावर आले की त्याने लग्न केले.. आपल्याच मामाच्या मुलीशी.' शरदचे बोलणे प्रीतीला पुन्हा पुन्हा आठवत होते.

'असा कसा गं तुझा मोहन माई? तुला सोडून तो दुसऱ्या कुणाशी कसे लग्न करू शकतो? श्शी! माई मला आता 'तुझा मोहन' म्हणायला देखील लाज वाटतेय गं. तो तुझ्या प्रेमाच्या पात्रतेचा नव्हताच मुळी. त्याने तुला फसवलेय अगं. मग तू का मला त्याला माफ करायला लावतेस?'
मोबाईलमधल्या सोनियाच्या फोटोकडे पाहून ती बोलत होती.

तिच्या राधाईला कॉल करून काही सांगावे म्हणून तिने मोबाईल हातात घेतला पण मग सोनियाचा फोटो बघून तिने विचार बाजूला सारला.
'इतक्यात नको सांगायला. ती उगाच टेंशन घेईल.'

मोबाईलच्या गॅलरीतील सोनियाचे फोटो बघून तिच्या ओठावर अलगद हसू येत होते.

'किती सुंदर आहेस गं माई तू! नि आता काय काय होऊन बसलेय? या साऱ्याला कुठे ना कुठे मोहनच जबाबदार आहे ना? आणि तरीही त्याच्यावर तुझा कसलाच राग नाहीये? हे गं तुझे कसे गं आगळे प्रेम?'

प्रीतीचे डोके जाम जड झाले होते. तिने एक कडक कॉफी मागवली. त्या कडक कॉफीच्या घोटाबरोबर मघाशी भेटलेल्या कृष्णाचा कडक अंदाज तिला आठवला.

'भेटावे का त्याला?' दुसरा घोट घेत तिने स्वतःलाच विचारले.

'काय हरकत आहे? तसेही उद्या पुनाळला निघायचे आहे. तिथे काही माहिती मिळाली तर ठीक नाहीतर मग पुण्याला परत जावे लागेल. मिहीर अंकल एकटेच सोनप्रीत सांभाळत आहेत. मलाही आपले कर्तव्य पार पाडावे लागेलच ना.' विचार करत तिने कॉफीचा रिकामा मग बाजूला ठेवला.

******

ड्राइव्हिंग सीटवर बसलेला कृष्णा जरा जास्तच हँडसम दिसत होता. नेहमीची वर्दी अंगावर नव्हती उलट फॉर्मल कपड्यामध्ये तो आणखी डॅशिंग दिसत होता. त्याच्या बाजूला प्रीती बसली होती. तीही फारशी नटली नव्हती. डेनिमची जीन्स आणि गुडघ्यापर्यंत लांबीची फिकट पिवळ्या रंगाची, बारीक फुलांची प्रिंट असलेली कुर्ती तिने घातली होती. मेकअप करायची गरज नव्हतीच तिला पण ओठावर एक हलकी गुलाबी शेड असलेली लिपस्टिक मात्र फिरवली.

"बोला मॅडम, कुठे जायचे?" तिच्याकडे हसरा कटाक्ष टाकून कृष्णाने विचारले.

"आम्ही इथली पाव्हणी माणसं! आम्हालाच काय विचारता?" तिनेही हसून प्रत्युतर दिले.

"बघा हं, इथले पाहुणे आहात हे तुम्हीच कबूल केलंत. मग कोल्हापुरी पाहुणचाराला नाही म्हणायचे नाही बरं का!" कार सुरू करत तो हसला.

कार भरधाव निघाली तेव्हा तिने प्रश्न केलाच, "आपण कुठे निघालोय?"

"महालक्ष्मीला." समोर बघत तो. "इथे येऊन महालक्ष्मीलाच भेटला नाहीत तर काय उपयोग? आणि तसेही चांगल्या कामाची सुरुवात देवीला भेटून करायला हवी ना?" तो.

"तुमचा देवावर विश्वास आहे?" ती त्याच्याचकडे बघत होती.

तो किंचितसा हसला, "खाली उतरा. आपण पोहचलोय." तिचा प्रश्न अनुत्तरीतच राहिला.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.
**********
प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो, कथेचा हा भाग बऱ्याच दिवसानंतर आलाय त्याबद्दल क्षमस्व!
खरे तर पाऊस सुरू झाला की सर्वांच्या आनंदाला उधाण येतो पण ते काही काळापुरतेच. त्यानंतर वेगवेगळ्या आजरांचे निमंत्रण सुरू होतात. सध्या सर्वत्र असेच वायरल इन्फेक्शनचे वातावरण पसरले आहे. पेशन्ट ट्रीट करता करता मीही त्याला बळी पडले. मागच्या चार पाच दिवसापासून आजारपणामुळे लिहू शकले नाही, त्यामुळे पार्ट टाकायला उशीर होतोय. तुम्ही समजून घ्याल ही आशा आहे.
धन्यवाद!
या पावसाळ्यात स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याला जपा. सर्वांनी स्वस्थ रहा.. वाचत रहा!
*******

🎭 Series Post

View all