Feb 23, 2024
प्रेम

प्रीती.. पर्व दुसरे! भाग -२5

Read Later
प्रीती.. पर्व दुसरे! भाग -२5


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -पंचवीस.


ती रिक्षात बसून हॉटेलकडे निघाली. गायत्री घरी परतली होती. जाताना सिग्नलवर तिची रिक्षा थांबली आणि तिच्या ध्यानीमनी नसताना बाजूलाच बाईकवर असलेली एक नजर तिच्यावर खिळली.

'प्रीती..? नक्कीच ती प्रीती आहे. पण ती इथे काय करतेय?' त्या नजरेने तिला अलगद अचूक टिपले.
बाईक बाजूला लाऊन त्याने तिचा नंबर डायल केला.

'कृष्णा? तो का मला कॉल करतोय?'
विचारातच तिने कानाला मोबाईल लावला.

"हॅलोऽऽ." कानावर आलेला तिचा मधुर स्वर नि तिच्या चेहऱ्यावरचे त्याने दुरूनच न्याहाळलेले भाव!

'कसली गोड आहे यार ही! तिला पाहताक्षणीच हृदयाची तार आपोआप झंकारायला लागते. त्या निळ्या डोळ्यात हरवायला होतं. असं वाटतं जणू..
"हॅलो, इन्स्पेक्टर बोला ना." तिच्या आवाजाने तो आपल्या मनोराज्यातून बाहेर आला. बघतो तर सिग्नलवरचा लाल दिवा जाऊन हिरवा दिवा लागला होता आणि प्रीतीची रिक्षा निघून गेली होती.

'अरेच्चा! इथेच तर होती ही? गेली कुठे?'
"हॅलोऽऽ.." तोच तिचा मधुर आवाज.

"हॅलो, मी इन्स्पेक्टर कृष्णा बोलतोय." तो आपला आवाज नीट करत म्हणाला.

"तुमचा नंबर मोबाईल मध्ये सेव्ह आहे हो." तिच्या चेहऱ्यावर उमटलेली हास्यलकेर त्याच्या मन:चक्षुने टिपली अन अंगावर होणाऱ्या प्राजक्तफुलांच्या वर्षावात तो न्हाऊन निघाला.

"हॅलो, तुमचा आवाज ना मला नीट येत नाहीये. कदाचित ट्रॅफिकमुळे असेल. मी लगेच दहा मिनिटांनी तुम्हाला कॉलबॅक करते. चालेल ना?"

तिचा कॉल कट झाला तसा तो भानावर आला.
'कृष्णा, काय हे? प्राजक्त पहाटेच उमलतो रे. आता संध्याकाळ झालीये नि कुठल्या प्राजक्ताफुलांच्या वर्षावाची कल्पना करतोस?' त्याने डोक्यावर हात मारून घेतला.

दहाच मिनिटांची गोष्ट होती. इथेच कुठेतरी थांबावे म्हणून तो तिथल्याच चहाच्या टपरीवर गेला. आज ऑनड्युटी नसल्यामुळे तो युनिफॉर्मवर नव्हता त्यामुळे त्याला फारसे कोणी ओळखतील असे वाटले नाही.

"या साहेब, बसा ना." तिथल्या पोऱ्याने खुर्ची आणून दिली. तो त्याच्याकडे बघून हसला.

"अरे, साहेबांना कडक चहा दे रे." टपरीवाला त्या मुलाला म्हणताच कृष्णा उठून उभा झाला.

"साहेब, बसा ना. लागलीच चहा देतो."

"काका, तुमच्या दुकानात एवढे गिऱ्हाइक आहेत. मग मला पहिले का चहा देताय? माझा नंबर येईल तेव्हा द्या ना."

"अहो, गरीबाची काय थट्टा करताय? पोलीस लोक तुम्ही. तुमचा नंबर पहिला असेल ना?" हसून तो म्हणाला.

"तुम्ही ओळखता मला?" आश्चर्याने कृष्णा.

"व्हय जी. तुम्हाला कोण ओळखणार नाही? तुमच्यासारखी माणसं पोलिसात आहेत म्हणून तर आमच्यासारख्यांचे रक्षण होते ना? घ्या. हा स्पेशल चहा तुमच्यासाठी."

कृष्णाने चहा घेतला. आणि चहा संपल्यावर शंभरची नोट त्याला दिली.

"अहो साहेब, पैसे कशाला? आणि एवढी चिल्लर कुठून परत करू?"

"अहो काका, पोलीस असलो तरीही सामान्य माणूसच आहे मी. इथे इतकी लोकं असताना तुम्ही मला सर्वांच्या आधी स्पेशल चहा पाजलात, मग मलाही त्या स्पेशल चहाची स्पेशल रक्कम द्यावीच लागेल ना?" तो हसून म्हणाला.

पुन्हा तो काही बोलणार तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर प्रीतीचे नाव झळकले. "बरं, येतो हं काका." म्हणून तो बाईकशेजारी येऊन सीटला रेलून उभा राहिला.

"वेगळेच साहेब आहेत हे." चहावाल्याने कृष्णाने दिलेली नोट पाकिटात जपून ठेवत म्हटले. टपरीवरच्या गर्दीनेही पोलिसातला साधा माणूस आज पाहिला होता.

'वेळेची अगदी पंक्च्युअल दिसते ही.' त्याने मोबाईलकडे पाहिले. बरोबर दहा मिनिटे झाली होती.

"हॅलो मिस प्रीती! कशा आहात?" काय बोलावे न कळून त्याने पहिला प्रश्न खुशालीचा विचारला.

"आय एम फाईन इन्स्पेक्टर! तुम्ही सांगा." ती आरामखुर्चीवर डोके टेकवून बसत म्हणाली.

"आवाज तर जड येतोय. एनी प्रॉब्लेम?"

'मनकवडा आहे का हा?' तिच्या मनात आले. महादूच्या घरून निघाल्यापासून डोके ठिकाणावर कुठे होते तिचे? दोन दिवसांपासून धक्क्यावर धक्केच तर बसत होते. माईचा भूतकाळ तिला कळतो काय नि मग तिच्या जन्माची कथा, अन आता इथे आल्यावर आप्पासाहेब आणि आईसाहेबांचे सत्य!

"हॅलो, मिस प्रीती.. आर यू ओके?" ती काहीच बोलली नाही म्हणून मग त्यानेच पुन्हा विचारले.

त्याचे ते हळुवार मुलायम बोलणे ऐकून तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले.

"हम्म! या! आय एम ऑलराईट." स्वतःवर शक्य तेवढे नियंत्रण ठेवून ठेवत ती म्हणाली.

"तुम्ही रडताय?" तिचा आवाज ऐकून तो.

"नो. मी का रडेन?" ती खोटे हसून म्हणाली.

"सांगायचे नसेल तर नका सांगू, पण खोटं बोलू नका. मिस प्रीती, तुम्हाला खोटं बोलता नाही येत हो." त्याचा स्वर मृदू होता.

"इन्स्पेक्टर, तुम्ही माझ्यावर वॉच ठेवून आहात का?" डोळ्यातील पाणी पुसून हलके हसत ती म्हणाली.
तिच्या त्या छोटुशा स्मितहास्याने सुद्धा त्याला फार बरे वाटले.

"हम्म. तसेच काही समजा." तो हसून म्हणाला.

"हो काय? मग मी कुठे आहे ते सांगा बघू?" त्याची फिरकी घेत ती.

"आमच्या कोल्हापुरात!" तो क्षणात उत्तरला. तशी ती आरामखुर्चीवरून खाली उतरली. खोलीच्या खिडकीतून बाहेर नजर टाकून पाहिले, तिला तो कोठेच दिसला नाही.
"राधाईने तुम्हाला फोन केला होता का? पण मी तर तिला तुमचा नंबर दिलाच नव्हता. मग तुम्हाला कसे कळले?" तिच्या चेहऱ्यावर आता आश्चर्याचे भाव होते.

तो निखळ हसला. "मिस प्रीती, अहो तुम्ही मला काही वेळापूर्वी रिक्षामध्ये दिसलात, म्हणून मी तुम्हाला कॉल केला. इथे कशा काय आलात? काही प्रॉब्लेम तर नाहीये ना?"

"नाही हो इन्स्पेक्टर. तुमच्या कोल्हापुरात पुणेकरांना येण्यास बंदी आहे का?" ती ही हसली.

"इफ यू डोन्ट माईंड, आपण भेटू शकतो का?" त्याने भीतभीत पण थेट विचारलेच.

"असे अचानक?" ती.

"का? कारणशिवाय पुणेकर अचानक कुणाला भेटू शकत नाहीत का?"
त्याने तिच्यावर कोटी केली. "जोक्स अपार्ट, मला खरंच तुम्हाला भेटायचे होते."

"उद्या सायंकाळी चालेल का?"

'चालेल काय? धावेल.' तो मनात म्हणाला.
"शुअर!" तो.

"ओके!बाय. देन सी यू टुमारो." तिने मोबाईल बाजूला ठेवून स्वतःला बेडवर झोकून दिले.

'किती बोलले मी याच्याशी? नि मला रडू आलं ते याला लगेच कसं कळलं?' डोक्यातला प्रश्न बाजूला झिडकारून तिने राधामावशीला कॉल केला. ती सुखरूप आहे हे सांगायचे राहिले होते ना.

*****
बापरे! असे कसे मी डायरेक्ट भेटण्याबद्दल विचारले? ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल? कृष्णा तू पण ना जरा येडपटच आहेस.' बाईक स्टार्ट करत तो मनातल्या मनात पुटपुटत होता.

रात्री झोपतानाही तिचा रिक्षामधला चेहरा, ओठावरचे गोड हसू.. सारे आठवत होते.
'का रडली असावी ती?' त्यांचे संभाषण आठवून त्याला प्रश्न पडला.
'तिच्या निळाशार डोळ्यातील समुद्र डोळ्यांच्या आतच छान दिसतो. त्याला असे उधाण येऊन त्यातले पाणी बाहेर आलेले मला चालणार नाही. तिला रडताना मी नाही बघू शकत.'  छातीवर उशी घट्ट पकडून त्याने कुस बदलली.

त्याच्या गालावर ओलसरपणा जाणवला तसे त्याने गालाला हात लावला. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होते.
'अरे, मी का रडतोय? कृष्णा, एवढे हळवेपण बरे नव्हे रे.' त्याने हातातील उशी आणखी गच्च पकडली.
हृदयात होणारी कालवाकालव थांबता थांबत नव्हती. निळ्या डोळ्यांची प्रीती आणि तिच्या ओठावरचे हसू पुन्हा पुन्हा आठवायला लागले.

त्याने मोबाईल घेऊन तिचा व्हाट्सअप डीपी बघितला. एकदा.. दोनदा.. दहादा..! मोबाईल चालू-बंद, चालू-बंद करून तिचा फोटो पाहणे एवढेच तो करत होता.

'मिस प्रीती, जीव अडकला राव तुमच्यात!' तिच्या निळ्या डोळ्यात बघत तो ओठातल्या ओठात बोलला.

"जरा जोरात बोला की राव! पोलीस खात्यात असून काय पोरींवाणी तोंडातल्या तोंडात पुटपुटताय?" प्रीतीचा मधुर स्वर त्याच्या कानावर पडला.

"आयला? तुम्ही माझ्या घरी आलात? कधी?" तो उठून बसत जोराने म्हणाला.

"हे काय? तुमच्या समोरच तर उभी आहे."
बोर्डावरची बटण दाबल्या गेली. दारात देवकी, त्याची आई उभी होती.

"आई? तू?"

"मग तुला काय वाटलं? माझ्या सुनबाई आहेत?"

"काहीही काय गं?" तो जरासे लाजत म्हणाला.

"कृष्णा? तू प्रेमात पडला आहेस आणि माझ्यापासून लपवतोस होय रे? मला पण फोटो बघू दे ना." त्याच्याजवळ येत ती.

"आई, अगं. काही काय बोलतेस? मी का प्रेमात पडू? आणि तू सांग, तू का माझ्या खोलीत आलीस?"

"बाबोऽऽ.. आता खोलीत यायची पण बंदी का? लग्न झाल्यावर तर घराबाहेरच घालवशील ना."

"आईऽऽ.."

"अरे, तुला दूध द्यायला आले होते. नि काय रे कृष्णा? आज अभ्यास वगैरे नाहीये का?" त्याच्याजवळ बसत ती.

"नाही गं. मन जरा थाऱ्यावर नव्हतं मग म्हटलं, आजच्या दिवस अभ्यासाला गोळी मारूया." दुधाचा ग्लास घेत तो.

"कृष्णा,कोण आहे रे ती?"

"कोण?"

"तुझी चित्तचोर!"

"आई, अजून कशात काही नाही नि तू काही काय बोलतेस?"

"तुझ्या मनात तर ती आहे ना?"

"तू पण ना गं! तुझ्याशी खोटं बोलताच
येत नाही बघ. हा बघ तिचा फोटो. मागे नाही का एका ॲक्सिडेंटबद्दल सांगितले होते, त्या मॅडमची ही मुलगी."

"अगदी नक्षत्रसारखीच आहे रे. खूप छान जोडा शोभेल बघ तुमचा." त्याच्या कपाळावर ओठ टेकवत देवकी म्हणाली.

"आई!" म्हणून तो तिच्या कुशीत विसावला.
:
क्रमश :
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//