Feb 23, 2024
प्रेम

प्रीती.. पर्व दुसरे! भाग -२४

Read Later
प्रीती.. पर्व दुसरे! भाग -२४


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -चोवीस.

आजवर सोनियाला कधी जिंकलो नाही तर तुला कसा जिंकेन? तिचीच प्रतिकृती तू." त्याने तिला हग केले.
"अगदी बिनधास्तपणे जा. इथली काळजी करू नकोस. मी आहे इथे." त्याने तिला आश्वस्त केले.

प्रीतीने सोनियाच्या पायाला स्पर्श केला. तिच्या आशीर्वादाची पुरचुंडी सोबतीला घेऊन ती एका अनोख्या प्रवासाला निघाली होती.

मुद्दामच कार घेऊन ती निघाली. जाताना सोनियाने जे अनुभवले होते ते तिलाही अनुभवायचे होते. आजूबाजूला निसर्गाने केलेली उधळण! पहिल्यांदाच त्या रस्त्याने जात असली तरी एक आपलेपणाची जाणीव.

का होत होते हे असे? कोल्हापूरच्या वाटेवररून जाताना सोनियाच्या मनात जो आनंद होता त्याचा लवलेशदेखील प्रीतीच्या मनात नव्हता. ज्यांच्याबद्दल जाणून घ्यायला ती निघाली होती त्यांना ना तिने कधी पाहिले होते ना ही भेटण्याची कसली आतुरता होती. उलट होता तो फक्त राग! तिच्या माईशी प्रतारणा करणाऱ्याविषयीचा राग. माईला झिडकारणाऱ्या लोकांचा राग! रागाचा नुसता उसळलेला डोंब अन तरीही तिथे जायची एक अनामिक ओढ. का? केवळ ती सोनियाची लेक होती म्हणून की कोल्हापूरातल्या त्या लाल मातीशी तिचेही ऋणानुबंध जुळले होते?


कधी न पाहिलेला अनोळखी रस्ता. ती जरा सावधागिरीनेच कार चालवत होती. चार तासात कोल्हापूर आले. त्या चार तासात राधाईशी चारदा बोलणेही झाले. हॉटेल सयाजीमध्ये ती पोहचली. दुपारचे दोन वाजले होते. दुपारचे जेवण आणि थोडीशी विश्रांती घ्यायचे ठरवून ती आपल्या खोलीत आली. आतायाईपणे वागून चालणार नव्हते. तिथल्या मऊशार गादीवर तिने अंग टाकले खरे पण डोळे मिटायला तयार होईनात. तिच्या राधाईने सांगितलेला सोनियाचा भूतकाळ आठवून तिच्या डोळ्यात पाण्याचे थेंब हलकेच डोकावले.

इन्स्पेक्टर कृष्णाने गायत्रीच्या घराचा पत्ता तिला पाठवला होता. तिने त्यावरून एक नजर टाकली. त्या गल्ल्या, रस्ते तिला तरी कुठे ठाऊक होते? गुगल मॅप सोबतीला होताच पण तिने रिक्षाने जायचे ठरवले. हॉटेल पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर ते ठिकाण होते. एका चिंचोळ्या गल्लीत पोचल्यावर रिक्षा थांबली.

"मॅडम, आता इथून सरळ जा. तुम्हाला घर मिळून जाईल." प्रीतीने त्याचे पैसे दिले आणि 'थँक यू!' म्हणून ती उतरली.
दोन चार मिनिटे चालल्यानंतर ती कृष्णाने दिलेल्या पत्त्यावर पोहचली होती.

दरवाजा ठोठावणार त्याआधीच दरवाजा उघडल्या गेला. सावळीशीच, जराशी बुटक्या बांध्याची, कपाळावर उठून दिसणारी टिकली लावलेली गायत्री दारात उभी होती. कदाचित तिचे वय प्रीतीएवढे असावे.

"गायत्री? तू गायत्रीच ना?" प्रीतीने तर्क लावला.

"हो. पण तुम्ही कोण म्हणायच्या?" तिने आश्चर्याने विचारले.

"मी प्रीती. सोनियाची मुलगी."

"सोनिया?" तिच्या चेहऱ्यावर अजूनही आश्चर्य होते.

"सोनिया मॅडम? पुण्याला राहतात त्या? आठवल्या का? काय म्हणाली होतीस तू, छोट्या मालकीण! बरोबर ना?" प्रीतीने ओळख वाढवून सांगितली.

"अच्छा! मागे एकदा ज्या आल्या होत्या त्यांच्या तुम्ही मुलगी आहात होय? या ना ताई, आत या." तिने आदरतिथ्याने प्रीतीला आत घेतले.

"अगं, ताई काय म्हणतेस? तुझ्याचएवढी आहे मी. मला प्रीती म्हटलेस तरी चालेल." ती.

"ताई, तुम्ही मोठी माणसं. तुम्हाला मानाने बोलायला हवं. थांबा मी आमच्या म्हाताऱ्याला सांगते." ती आत महादुला उठवायला गेली.
गायत्रीने दोघांची ओळख करून दिली.

"तुम्ही आमच्या सोनाबेबीची लेक आहात होय?" महादुचे डोळे लकाकले. "आक्शी त्यांच्यासारख्याच दिसता बघा. तुमी कशा काय आलात? आणि आमच्या सोनाबेबी कशा आहेत?" किती आपुलकी होती त्यांच्या बोलण्यात! प्रीतीचे डोळे भरून आले.

"आजोबा, मला तुमच्याशी बोलायचे आहे." महादूजवळ बसत ती म्हणाली.

"आजोबा, मला तुमच्या सोनाबेबीविषयी सांगा ना. लहानपणी ती कशी होती? तिचे घर, तिचे कुटुंबीय.. कुठे आहेत सगळे? मला सांगा ना.
आणि तिने तुम्हाला का फोन केला होता?" त्याच्याकडे आशाळभूत नजरेने बघत ती विचारत होती.

"म्हणजे? तुम्हाला काय बी माहिती नाही? मागच्यावेळी सोनाबेबी इथे आल्या होत्या." गायत्री चहाचे कप घेऊन येत म्हणाली.

"इथे?"

"हां. त्या बंगल्यावर गेल्या होत्या. तिथे कोणीच गावलं नाही. मग आमच्या ह्यांनी घरचा पत्ता दिला अन त्या इकडं आल्या. जाताना म्याच म्हणलं नंबर द्या तेव्हा त्यांनी माझ्या नंबरवर फोन केला न मी तो नंबर सेव्ह करून ठिवला." गायत्रीने बोलता बोलता सोनियाच्या कॉललिस्ट मध्ये तिचा नंबर कसा आला हे ही सांगून टाकले.

"मला नीट सांगाल का? माई तुमच्याकडे का आली होती?" प्रीती ऐकायला व्याकुळ झाली होती.

"म्हणलं ना कि बंगल्यावर कोणी गावलं नाही म्हणून इथं आलत्या. म्हाताऱ्याला भेटायला." गायत्री.

"आजोबा? माई तुम्हाला का भेटायला आली?" तिच्या प्रश्नाला अजूनही उत्तर मिळाले नव्हते.

"म्या सांगतो. मी आप्पासाहेबांकडे माळी म्हणून काम करायचो. सोनाबेबी मला माळीकाका म्हणायच्या. लय चांगल्या आहेत त्या. पण पंचवीस वर्षापूर्वी त्या कोल्हापूर सोडून गेल्या आणि सर्व चित्र बदललं बघा." बोलता बोलता महादू क्षणभर थांबला.

"म्हणजे?"

"म्हणजे काय सांगू तुम्हाला? आमच्या सोनाबेबी म्हणजे साक्षात लक्ष्मीचे रूप आहेत. लक्ष्मी घराबाहेर जाईल तर काय होईल?" डोळ्यात पाणी घेऊन महादुने अप्पासाहेब, आईसाहेब यांच्या मृत्यूची खबर तिला सुनावली.

इथे येताना प्रीती मनात राग घेऊन आली होती. तिच्या माईशी असे का वागलात याचा ती सर्वांना जाब विचारणार होती. पण माळीकाकानी जे सांगितले ते ऐकून तिचे हृदय द्रवले. इतके काही घडून गेले होते नि इतकी वर्ष या सगळ्यांपासून माई अनभिज्ञ होती, हाय रे दुर्दैव!

"माझ्या माईला हे माहितीये?" तिने कापऱ्या आवाजात विचारले.

"हो, मागच्या टायमाला आलत्या तेव्हा मी सांगितलं होतं."

"आणि त्यामुळेच तिचा ॲक्सिडेंट झाला. मनावर आधीच आघात झालेला, आता शरीरानेही ती जखमी झाली आहे."

"काय बोलताय ताई तुम्ही? छोट्या मालकीणबाईंचा अपघात झालाय?" गायत्रीबरोबर महादूही तिच्याकडे बघत होता.

"हो. ज्या दिवशी ती तुम्हाला भेटायला आली होती त्याच दिवशी तिचा खूप भयानक अपघात झाला." तिला रडू आवरत नव्हते.

तिने त्यांना सोनियाच्या ॲक्सिडेंटबद्दल सांगितले. सोनियाबद्दल ऐकून महादू ढसाढसा रडायला लागला.
"आमच्या सोनाबेबीसोबत लई वंगाळ झाले." त्याचे डोळे वाहत होते.


"मला माईचे इथले घर बघायचे आहे. कोणत्या एरियात आहे ते सांगाल का?" थोड्यावेळाने तिने महादूला विचारले.

"घर काय म्हणता? तो तर मोठ्ठा बंगला आहे. पण तिथे तुमचे ओळखीचे आता कोणीच राहत नाहीत." महादूच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले.

"हो, पण ती वास्तु तर माईच्या ओळखीची असेल ना? ती वास्तु मला बघायची आहे. माई जिथे राहत होती, जिथे ती खेळली, लहानाची मोठी झाली, त्या जागेला मला भेटायचे आहे."

"माझा नातू तिथेच काम करतो. उद्या सकाळी जा त्याच्यासंग." महादू.

"बरं, मी निघू आता?" ती.

"नको." गायत्रीच्या ओठातून शब्द बाहेर पडले.
"म्हणजे असे सांच्याला उपाशी नका जाऊ. मी भाकरी थापायला घेते. तुम्ही जेवण करूनच जा." ती उत्साहात म्हणाली. "म्हणजे आमच्यासारख्या गरीबाच्या घरचं चालेल ना तुम्हाला?"

"का नाही चालणार? पण आता नको गं. मला जायला हवं."

"तुम्ही चालणार बोललेत ना. मी लागलीच सैपाकला लागते. थांबा तुम्ही." गायत्री तिथून उठलीसुद्धा.

"गायत्रीच्या हाताला चव आहे आणि कामाला उरकही आहे. अर्ध्या तासात ती पानं वाढायला घेईल. तुम्ही बसा थोडावेळ." महादू म्हणाला तसे ती परत बसली.
नवख्या ठिकाणी आपलेपणा जपणारी ही माणसं तिला भेटली होती. त्यांचे मन तिला मोडवेना.

"आजोबा, माई कुठल्या कॉलेजला शिकत होती, तुम्हाला माहिती आहे का हो?" तिला अचानक काहीतरी आठवले नि हा प्रश्न तिने महादूला विचारला.

"हो तर. छत्रपतींच्या कॉलेजात सोनाबेबी जायच्या बघा."

"छत्रपती?"

"छत्रपती राजाराम कॉलेज. लईच प्रसिद्ध कॉलेज आहे ताई." आतून गायत्रीचा आवाज आला.

तिचा स्वयंपाक आवरला होता. गरमागरम भाकरी आणि परसातल्या ताज्या वांग्याचे भरीत तिने केले होते. अस्सल गावरान मेनू खाऊन प्रीती तृप्त झाली. मुळात पुणेकर असलेली. त्यामुळे तिखट जरा कमीच खायची पण गायत्रीने प्रेमाने केलेला हा मेनू खाऊन ती सुखावली.

"मी निघू आता?" जेवण आटोपल्यावर निरोप घेत ती म्हणाली.

"प्रीतीताई थांबा, चौकापर्यंत सोडायला मी तुमच्यासोबत येते. माझ्या डोळ्यासमोर रिक्षात बसलात की मोकळ्या मनाने मी घरी येईन."

"किती चांगली आहेस गं तू. अशी प्रेमळ माणसं फक्त कोल्हापूरातच मिळतील." तिच्यासोबत जाताना प्रीती म्हणाली.

गायत्री त्यावर हसली. "आमच्या म्हाताऱ्याच्या साहेबांची नात आहात तुम्ही. तुम्हाला एकटं कसं सोडायचं?" तिच्या उत्तरावर प्रीतीला खिन्न हसू आले.

ती रिक्षात बसून हॉटेलकडे निघाली. गायत्री घरी परतली होती. जाताना सिग्नलवर तिची रिक्षा थांबली आणि तिच्या ध्यानीमनी नसताना बाजूलाच बाईकवर असलेली एक नजर तिच्यावर खिळली.
:
क्रमशः
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )
********
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//