Mar 02, 2024
प्रेम

प्रीती..पर्व दुसरे! भाग -२३

Read Later
प्रीती..पर्व दुसरे! भाग -२३

प्रीती.. पर्व दुसरे!

भाग -तेवीस.

©®Dr. vrunda F. (वसुंधरा..)


"आईसाहेबांनी माझ्या माईला ठोकरले ते चुकीचे होते. पण मग माझे बाबा? ते का गं मला सोडून गेले? माझे काय चुकले होते? सांग ना गं राधाई."

आज प्रीतीच्या डोळ्यातील पाऊस बरसतच होता.

"तुझी चूक तर नव्हतीच बाळा, पण ज्याच्यावर विश्वास ठेवून सोना आपले घर सोडून आली तिची तरी काय चूक होती?" राधामावशी म्हणाली.

"तू त्यांना बघितलेस ना? माईशी कसे वागायचे गं ते? तिला त्रास द्यायचे का गं?" प्रीती.


"तुझा विश्वास बसेल की नाही, माहीत नाही गं. पण तो सोनाची खूप काळजी घ्यायचा. तिला जपायचा. त्या अख्ख्या चाळीत आपल्या बायकोवर इतकं जीवापाड प्रेम करणारा दुसरा कोणीच नव्हता." मोहन बद्दल बोलताना का कुणास ठाऊक? राधामावशीच्या डोळ्यात एक अभिमान झळकला.


"ते सर्व नाटक असेल गं राधाई. नाहीतर माझ्या माईला असे एकटे कधीच सोडले नसते." तिच्या चेहऱ्यावर रागाची छटा उमटत होती. "आणि तरीही माईला वाटतं की मी त्यांना माफ करावं? का तिला असं वाटतं गं?"


"त्याच्यावरच्या प्रेमामुळे. प्रेम फसवं असतं गं. मोहन कुठे आहे, तो असा का वागला? याची उत्तरं सोनियाकडे नाहीत. तो परत येईल या आशेवर ती थांबलीही नाही. पण त्याच्यावरचे तिचे प्रेम तसूभरही कमी झाले नाहीये. ती त्याच्या प्रेमळ आठवणींना सोबत घेऊन पुण्यात आली. त्यानंतरचा मोहन तिच्या आयुष्यात नाहीच आहे. तसे असते तर ती इतकी खंबीरपणे तिचे जीवन जगूच शकली नसती. मोहनचा शोध घ्यावा असे तिला कधी वाटले नाही. जेव्हा तिला त्याच्या साथीची खरी गरज होती, नेमका तेव्हाच तो नव्हता. कालांतराने वेळ निघून गेल्यावर तिने त्याला का शोधावं?" राधामावशी.


"आणि तरीही अजूनही तिच्या मनात तिचा मोहन आहेच ना गं. का?" प्रीती.


"का?" राधामावशीने डोळे पुसले."

कारण प्रीती तुझ्या माईच्या आयुष्यात तू आहेस. तिच्या काळजाचा तुकडा आहेस गं तू. तू आहेस नि तुझ्यासोबत मोहनचे वलय देखील आहे. त्या दोघांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून तर तिने तुझे नाव प्रीती ठेवले ना. मग कशी विसरेल ती त्याला?"


"मी नाही माफ करणार त्या माणसाला. त्याच्यामुळे माझ्या माईचे अवघे आयुष्यच पालटले गं. ती इतकी वर्ष तिच्या आई आप्पांना भेटली नाही. माईशिवाय क्षणभरही दूर राहिले तरी माझा जीव घाबराघुबरा होतो गं राधाई. माझी माई त्या सर्वांना सोडून कशी राहिली असेल?" बोलताना तिच्या अंतःकरणाला यातना होत होत्या. "आणि आता कोल्हापूरला काय झाले, ती त्यांना भेटली की नाही हे सुद्धा आपल्याला ठाऊक नाहीय."


"प्रीती, शांत हो बाळा. तू तुला त्रास करून घेऊ नकोस. एवढया भयानक ॲक्सिडेंटमधून आपली सोनिया बचावली आणि ती आपल्यासोबत आहे हेच आपल्यासाठी खूप आहे असं मानायचं. भूतकाळातील गोष्टी पुन्हा नव्याने नको उकरून काढायला." राधामावशी तिला समजावत होती.


"राधाई, माईचा भूतकाळ तिच्या वर्तमानाशी जुळलेला आहे. आज तिची जी अवस्था आहे ना त्याला कुठे ना कुठे तो भूतकाळच जबाबदार आहे. राधाई मी उद्या कोल्हापूरला जातेय. मलाही माईच्या घरच्यांविषयी जाणून घ्यायचे. माझ्या माईशी ते जे वागलेत ना त्याचा जाब विचारायचा आहे."


"प्रीती पुरे ना बाळा. तू, मी आणि सोना आपण तिघे एकमेकांना पुरेसे नाही आहोत का गं? आणि तिथे तू कोणाला ओळखतेस? पुन्हा सगळ्यांच्या जखमेवर मीठ का चोळायचे? तुला शोधायचे असेल तर मोहनला शोध, पण पुन्हा कोल्हापूर नको." राधामावशी.


"मोहन..! राधाई, या नावाचा तिटकारा यायला लागलाय गं मला. पण तरीही या माणसाला माईच्या पुढ्यात एक ना एक दिवस आणेनच मी. पण सुरुवात मात्र कोल्हापूरहूनच करावी लागेल. माईसाठी मला तिथे जावेच लागेल." तिच्या डोळ्यात एक द्वेष दिसत होता.


"प्रीती, मी तुला नाही जाऊ द्यायची. बघतेस ना? माझी सोनिया कुठल्या अवस्थेत आहे ते?आता मला तुला हरवायचे नाहीये गं. बाळा नको जाऊ ना." राधामावशीचा स्वर चिंब झाला होता.


"राधाई, वेडी आहेस का गं तू? मला काहीएक होणार नाही. तुझ्या सोनासारखी थोडेच आहे मी? ती वरून स्वतःला स्ट्रॉंग दाखवत असली तरी आतून मात्र पूर्णपणे तुटून गेली होती. मी तशी नाहीये ना गं. मला माझ्या सगळ्यात आवडत्या व्यक्तींचे भरभरून प्रेम मिळालेय. मला आतून आणि बाहेरून स्ट्रॉंग राहण्यासाठी हे पुरेसं आहे गं. तू माझी काळजी करू नकोस. माईकडे लक्ष दे."


"तरीही तुला नाही जाऊ द्यायची मी. नवख्या शहरात कुठे जाशील? त्यांना कुठे शोधशील?" राधामावशी.

"राधाई, मला एक क्लू मिळालाय. तिथे गेले की सगळे धागेदोरे उलगडतील."


"आता ऐकणार नसशील तर मी काय बोलू? दोघी मायलेकी अगदी सारख्या आहात. एक नंबरच्या हट्टी." राधामावशीने डोळ्याला पदर लावला.


"माझी राधाई गं!" प्रीतीने उठून तिला घट्ट मिठी मारली.

"तुला तुझी सोना बरी व्हायला हवी ना? तिच्याचसाठी चाललेय सगळं. तिच्या जवळच्या लोकांना कळू तर दे की त्यांची सोना म्हणजे नेमके कोण आहे ते." 

प्रीतीने सोनियाच्या तब्येतीचे नाव काढले. त्यापुढे राधामावशी बिच्चारी काय बोलणार? तिने शेवटी कोल्हापूरला जायला होकार दिला.


"तुला मी हो म्हणतेय. पण बाळा एकटीने नको जाऊस गं. मिहीर किंवा समीरला सोबतीला घे." राधाई.


"राधाई, ह्या प्रवासाला माईने सुरुवात केलीय. तो पूर्ण करण्याची जबाबदारी फक्त माझी आहे. त्यात इतरांना का गुंतवू? आणि तसेही माई बेडवरती आहे. मीही नसेन. आणखी एकजण सोबतीला आला तर सोनप्रीतची पूर्ण जबाबदारी दुसऱ्या एकट्यावर पडेल. असं नको व्हायला ना?" प्रीतीचे म्हणणे तिला पटत होते. मन मात्र तिला एकटीला जाऊ द्यायला तयार होत नव्हते.


"बरं, तिथे गेल्यावर तिथल्या इन्स्पेक्टरांची मदत घेईन. चालेल ना?" प्रीतीने दिलासा दिला तेव्हा कुठे राधामावशीच्या हृदयातील काहूर शांत झाले.


"चालेल, फक्त अशी तडकाफडकी जाऊ नकोस. आज आल्यापासून सोनियाशी बोलली देखील नाहीस. उद्याचा दिवस तिच्यासोबत घालव नि मग परवा जा." प्रीतीच्या डोक्यावरून हात फिरवत राधामावशी म्हणाली.


प्रीतीला तिचे म्हणणे पटले. तिने आज जर सांगितले नसते तर तिची लाडकी राधाई आणि तिचे नाते रक्ताचे नाहीये हे कधी तिला कळलेच नसते. 'किती काळजी करते ही आमची?' तिच्या मनात आले.


"राधाई.." सोनियाच्या खोलीत जाता जाता तिने तिला एक गच्च आलिंगन दिले.

"तू नसतीस तर आम्हा मायलेकीचे काय झाले असते गं?" ओल्या डोळ्यांनी ती विचारत होती.


"प्रीती, देव जेव्हा एक दरवाजा बंद करतो तेव्हा तोच दुसरा दरवाजा देखील उघडतो. माझे तुमच्या आयुष्यात येणे हे विधिलिखित असेल म्हणून तर आपण भेटलो. वांझोटी म्हणून माझ्या लोकांनी मला नाकारले होते, तेव्हा तुझ्या रूपाने नवाजात बालकाचा कापसासारखा मऊसूत गोळा हातात घ्यायचे भाग्य लाभले." तिच्या मुखाची पापी घेत राधामावशी म्हणाली.


"तरी सुद्धा राधाई, थँक यू सो मच!" तिनेही तिची पापी घेऊन परतफेड केली.


*******

"माई, किती ग्रेट आहेस गं तू! तुझ्याबद्दल जेव्हा जेव्हा काही ऐकते ना, माझ्या डोळ्यातील तुझ्याबद्दल वाटणारा अभिमान आणखीनच दुपटीने वाढत जातो. किती सोसलेस गं तू? सारे घाव केवळ माझ्यासाठी सहन केलेस ना? मी शोधेन तुझ्या कुटूंबियांना. तुझ्या मोहनलाही शोधेनच. तुझ्याशी त्याने प्रतारणा का केली याचे उत्तर मला हवे आहे. त्याशिवाय मला चैन नाही गं पडणार." प्रीती सोनियाचा हात हातात घेऊन बोलत होती.


तिचा हा रोजचाच शिरस्ता होता. ऑफिसमधून घरी आल्यावर तिच्याजवळ बसून किमान तासभर तरी गप्पा मारायची. सोनिया कधीच काही रिस्पॉन्स देत नव्हती पण प्रीतीच्या भाबड्या मनाला वेडी आशा, कधीतरी माई ऐकेल. केव्हातरी ती प्रतिसाद देईल. कधीतरी उठून तिला झप्पी मारेल. कधी तरी प्रेमाने \"प्रीत\" म्हणून साद घालेल. कधी बघेल तिच्याकडे करारी नजरेने. कधी प्रेमभरल्या नजरेने तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करेल.


तिच्या प्रकृतीमध्ये एकही टक्का सुधारणा दिसत नसली तरी एक ना एक दिवस तिची माई नक्कीच बरी होईल प्रीतीला पूर्ण खात्री होती.

*******

"प्रीती, काय वेडेपणा आहे? तू एकटी का निघालीस? आणि तिथे परत जाऊन कसले धागेदोरे शोधणार आहेस?" मिहीर जरासा चिडला होता. "तुला जायचेच असेल तर मीसुद्धा सोबत येतो."


"नाही अंकल. माई अशी बेडरिडन! मी ही इथे नसेल. तेव्हा सोनप्रीतची जबाबदारी तुमच्यावर आली आहे."


"सोनप्रीत तुम्हा दोघींचं आहे प्रीती. ते माझ्यावर सोपवून तू निश्चिन्त नाही राहू शकत. परक्यावर असे इतके विसंबून राहू नये माणसानं."

"तुम्ही परके आहात का अंकल? आणि राहिला प्रश्न विश्वासाचा तर तो तुम्ही कधीच तोडणार  नाही." ती हसून म्हणाली.

"इतके एकदम बिनधास्त राहू नये गं." तो.

"अंकल, कधी विश्वासघात झालाच तर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या सोनियाची लेक आहे मी. तिच्या पावलावर पाऊल टाकत मीही माझे विश्व निर्माण करेन."


"आजवर सोनियाला कधी जिंकलो नाही तर तुला कसा जिंकेन? तिचीच प्रतिकृती तू." त्याने तिला हग केले.

"अगदी बिनधास्तपणे जा. इथली काळजी करू नकोस. मी आहे इथे. त्याने तिला आश्वस्त केले.


प्रीतीने सोनियाच्या पायाला स्पर्श केला. तिच्या आशीर्वादाची पुरचुंडी सोबतीला घेऊन ती एका अनोख्या प्रवासाला निघणार होती.

:

क्रमश :

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.

********

फोटो गुगल साभार.ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//