प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -बावीस.
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
तिने उत्सुकतेपोटी नंबर डायल केला कारण तो नंबर त्यांच्या क्लाईंटपैकी कुणाचाच नव्हता.
पलीकडून फोन उचलल्या गेला. ती व्यक्ती जे बोलली, ते ऐकून तिच्या मनात एक वेगळीच अस्वस्थता निर्माण झाली.
"हां, छोट्या मालकीण, बोला की." पलीकडून आवाज होता.
"छोटया मालकीण? तुम्ही कोण बोलत आहात?" आश्चर्याने प्रीतीने विचारले.
"अहो, मी गायत्री. ओळखलं नाही होय? थांबा, आमच्या म्हाताऱ्याला फोन देते."
त्यानंतर प्रीतीच्या कानावर अस्पष्ट आलेला आवाज आणि मग एका वृद्धाचे बोलणे.. "सोनाबेबी, म्या महादू.. तुमचा माळीकाका. ठीक आहे नव्ह समदं?"
त्या प्रश्नावर काय बोलावे हे न कळून प्रीतीने कॉल कट केला.
'कोण गायत्री? कोण महादू? आणि छोट्या मालकीण.. सोनाबेबी.. काय होतं हे सगळं?'
फोनवरचा संवाद आठवून प्रीतीची अस्वस्थता आणखीनच वाढत होती.
'सोनाबेबी म्हणजे सोनियाचा शॉर्टफॉर्म असावा का? म्हणजे माईला सोनाबेबी म्हटलंय? कोण आहेत ही लोकं? कोणाचा नंबर असेल हा?'
ती डोके गच्च पकडून बसली. या प्रश्नांची उत्तरं एकच व्यक्ती देऊ शकणार होती, ती म्हणजे तिची माई. पण आता ती ज्या अवस्थेत होती, प्रीती तिला काय विचारणार?
'मग कोण? राधाई? राधाईला माहीत असेल का याबद्दल?'
"एक स्ट्रॉंग कॉफी." तिने रिसेप्शन वर कॉल केला.
'या नंबरचे कोल्हापूरशी काही संबंध असेल का?' कॉफीच्या प्रत्येक घोटासरशी तिचे डोके गतीने फिरत होते. कोल्हापूरचे नाव डोक्यात आले नी डोळ्यासमोर सगळ्यात पहिले आला तो इन्स्पेक्टर कृष्णा.
'येस! ही इज अ राईट पर्सन, ज्याच्याकडून मला काही कळू शकेल.'
डोक्यातील विचार संपण्यापूर्वी तिने त्याला फोन लावला.
मोबाईलवर प्रीतीचे नाव झळकले तसे कृष्णाने झटक्यात कॉल रिसिव्ह करण्यासाठी मोबाईल हातात घेतला, पण हा उतावीळपणा बरा नाही म्हणून मग त्याने दोनचार रिंग्स परत वाजू दिल्या.
"हॅलो, कृष्णा हिअर!" त्याचा कडक आवाज प्रीतीला कॉफीच्या कडक घोटाप्रमाणे वाटला.
"हॅलो, मी प्रीती..पुण्याहून. "
"ओह! बोला ना मॅम. तुमच्या माई ठिक आहेत ना?" त्याचा प्रश्न.
"माई पूर्वीसारखीच आहे. ॲक्च्युअली मला तुमची एक मदत हवी होती." ती.
तिला मदत करायला कृष्णा एका पायावर तयार होता. तिने दिलेला नंबर कुणाचा आणि कुठला आहे याची चौकशी तेवढी करायची होती.
"ओके! मी थोड्यावेळाने सांगतो." त्याने तिला शब्द देऊन फोन ठेवला.
त्याच्याशी तेवढ्या बोलण्यानेही तिला बरे वाटले.
"नंबर गायत्री नावाच्या महिलेचा आहे. वय वर्ष सव्वीस. नवऱ्याचे नाव विलास. तो माळीकाम करतो. घरात तीन माणसं. तो, बायको आणि त्याचे आजोबा. महादू नाव त्यांचं. अंथरुणात खिळून आहेत. पूर्वी ते देखील माळीकाम करायचे." थोड्याच वेळात कृष्णाने संपूर्ण कुंडली प्रीतीसमोर ठेवली.
"आणखी काही?" त्याने विचारले.
"नाही. एवढं पुरेसं आहे. थँक यू सो मच!" ती.
"यू आर मोस्ट वेलकम! काही वाटलं तर सांगा. आय एम आल्वेज देअर." तो म्हणाला तसे तिने परत त्याला 'थँक यू' म्हणून फोन ठेवला.
'जरा जास्तच बोललो का मी?' कृष्णा स्वतःलाच विचारत होता.
खरे तर प्रीतीला पहिल्यांदा पाहताक्षणीच त्याच्या हृदयात काहीतरी क्लिक झाले होते. ती वेळ तशी नव्हती. पण त्याच्या हातात नव्हता ना ते. निळ्या डोळ्यांची ती गुलाबकळी बघताक्षणीच त्याच्या हृदयात वसली ह्यात त्याचा काय दोष?
त्या दिवशी रात्री मुद्दामच तर तो हॉस्पिटलला आला होता. तिचे रडून रडून सुजलेले डोळे, माईसाठी चाललेली धडपड बघून त्याच्याच हृदयाची कालवाकालव होत होती. तिच्याशी काहीतरी खास कनेक्शन आहे असा विचार डोक्यात यायचा अवकाश नि तिथे त्याला समीर भेटला.
'समीर..! किती काळजी घेत होता तो तिची. नक्कीच दोघात काही बॉण्ड असावा.' समीरच्या आठवणीने त्याचे मन खट्टू झाले.
'त्यांच्यात काही असले तरी प्रीतीत माझा जीव गुंतलाय हेही तेवढेच खरे आहे. प्रीती.. नाव तरी कसलं गोड! तिच्या नावातच प्रेम आहे आणि तिचे ते डोळे? असे वाटत होते की निळाशार समुद्रालाच जणू काही भरती आलीय.' तो हसला स्वतःशीच.
कसले कसले विचार डोक्यात येत आहेत याचे त्यालाच हसू आले. आजवर कोणत्याच मुलीकडे बघून त्याला असे झाले नव्हते.
'जाधव, भल्याभल्यांची विकेट घेता तुम्ही. इथे तुमचीच विकेट पडली ना राव!' डोक्याला टपली मारून तो कामाला लागला.
******
"राधाई, एक विचारू?" रात्री सोनियाच्या खोलीत जाण्यापूर्वी प्रीतीने राधामावशीला गाठले.
राधामावशीची प्रश्नार्थक नजर प्रीतीवर खिळली.
"माई कोल्हापूरला नेमके कशासाठी गेली होती याचे उत्तर मिळेल का गं मला?" प्रीतीच्या आवाजात एक ओल जाणवत होता.
"प्रीती.." काय बोलावे ते राधामावशीला समजेना.
सोनिया कोल्हापूरहून परतल्यावर सारे काही सांगणार होतीच पण आता तिचे सत्य प्रीतीला कसे सांगावे हा प्रश्न राधामावशीला पडला.
"राधाई, जे आहे ते मला कळू दे. कदाचित माईच्या या परिस्थितीला ते कारणही जबाबदार असू शकेल गं." प्रीतीच्या डोळ्यात पाणी होते.
"हो, हे माझ्या लक्षातच आले नाही. सोना कोल्हापूरला गेली नि पुढे काय झाले ते तर कळलेच नाही गं आपल्याला." राधामावशी बोलून गेली.
प्रीतीच्या कानात राधामावशीचा 'सोना' हा शब्द लगेच घुसला आणि महादुच्या 'सोनाबेबी' या शब्दाची आठवण झाली.
"राधाई, माईला तुझ्या व्यतिरिक्त आणखी कोणी सोना म्हणायचे का गं?" प्रीतीने प्रश्न केला.
राधामावशीने खाली नजर टाकली. तिचे डोळे पाण्याने गच्च भरून आले होते. भरल्या डोळ्यांनी तिने एकवार प्रीतीकडे पाहिले.
"बाळा, तू बैस. मी आपल्यासाठी चहा घेऊन येते. मग निवांत बोलू." असे म्हणून ती आत गेली.
प्रीतीला एक ना एक दिवस सोनियाचा भूतकाळ सांगावा लागणार होताच. तिच्या जन्माची कथाही सांगायची होती. फक्त सुरुवात कुठून करायची आणि सोनियाबद्दल ऐकल्यावर तिची प्रतिक्रिया काय असेल हे कळणे कठीण होते. शब्दांची जुळवाजुळव करून चहा घेऊन ती हॉलमध्ये प्रवेशली.
"प्रीती, माझ्यात नि सोनियात काय नाते असावे असे तुला वाटते?" राधामावशीने प्रीतीलाच प्रश्न केला.
"राधाई काही काय विचारतेस? तू तर मावशी आहेस ना माईची?" तिच्या प्रश्नावर प्रीतीने प्रतिप्रश्न केला.
"रक्ताची?" राधामावशी.
"राधाई, असं का विचारतेस अगं? मला हा प्रश्न कधीच पडला नाही." प्रीती.
राधामावशी खिन्न हसली.
"कारण त्याची कधी गरजच पडली नाही गं प्रीती. आज तुला सांगते. सोना आणि माझ्यात रक्ताचे नाते नाहीये अगं. पण माणुसकीच्या नात्यातून जन्माला आलेल्या आमच्या नात्याने आमच्यात मायलेकीचे नाते निर्माण झाले. ती मला मावशी म्हणत असली तरी तिच्या नजरेत मला आईचे स्थान मिळाले आणि मला एक मुलगी, तुझ्यासारखी गोड नात मिळाली."
"राधाई, तू काय बोलते आहेस, मला काहीच कळत नाहीये अगं. हे कसे शक्य आहे? माई म्हणजे नेमकी आहे तरी कोण गं? तिचे खरे कुटुंबीय कुठे आहेत?" गोंधळलेल्या नजरेने प्रीती राधामावशीला विचारत होती.
"तेच शोधायला सोना कोल्हापूरला गेली होती." राधामावशीने आवंढा गिळला.
"म्हणजे?" प्रीती एकदम शॉक झाली.
"मला जेवढे माहितीये तेवढे तुला सांगायचा प्रयत्न करते. सोनिया एका खूप मोठ्या बिझनेसमनची मुलगी आहे. आप्पासाहेब म्हणजे तिचे बाबा.. कोल्हापूरचे प्रसिद्ध उद्योगपती होते."
"मग? ते सगळे सोडून आपण इकडे का आलो? नि कधीच कोल्हापूरला का गेलो नाही? मला सगळं जाणून घ्यायचे आहे राधाई, सांग ना गं." प्रीती ऐकायला उतावीळ झाली होती.
"कुठून सुरुवात करू बाळा? पण एक सांगू इच्छिते, प्रेम हे वरवर पाहताना खूप चांगले वाटत असले तरी प्रत्येक वेळी तसे नसते. त्याच प्रेमानं सोनियाची अग्निपरीक्षा घेतली. त्या आगीच्या ज्वाळातून सोना यशस्वी होऊन बाहेर तर पडली पण तोवर सगळ्यांनी तिची साथ सोडली होती." राधामावशी बोलत होती.
आप्पसाहेब -आईसाहेब, मोहन सगळ्याबद्दल तिला जेवढे ठाऊक होते ते सारे तिने प्रीतीला कथन केले.
सोनियाने सोडलेले घर, मुंबईच्या चाळीत थाटलेला संसार अन मग एक दिवस अचानकतिला सोडून गेलेला मोहन..
सोनियाची कहाणी ऐकून प्रीतीच्या डोळ्यातील पाणी वाहू लागले. माई खूप ग्रेट आहे हे तिला ठाऊक होतेच. तिच्या आयुष्याची ही काळी बाजू आज तिला कळली होती.
केवळ माझ्यासाठी माई आपल्या माणसांपासून दुरावली याचे शल्य तिला बोचत होते.
"राधाई, हे सगळं माझ्यामुळे झाले ना गं? मी खूप वाईट आहे राधाई, खूप वाईट आहे." प्रीती ढसाढसा रडायला लागली.
"नाही गं राणी, वाईट तर कोणीच नसतं. तू जर सोनाच्या आयुष्यात नसतीस तर माझ्या जीवनात तरी सोना असती का? हे सगळे प्रत्येकाचे प्राक्तन आहे बाळा. आपण केवळ कठपुतळीप्रमाणे आहोत. आपल्याला वाटतं आपण सगळं करतोय पण कर्ता करविता तर देवच असतो ना?" राधामावशी तिला कुरवाळत म्हणाली.
"आईसाहेबांनी माझ्या माईला ठोकरले ते चुकीचे होते. पण मग माझे बाबा? ते का गं मला सोडून गेले? माझे काय चुकले होते? सांग ना गं राधाई."
आज प्रीतीच्या डोळ्यातील पाऊस बरसतच होता.
:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.