प्रीती.. पर्व दुसरे! भाग -२१

प्रीतीच्या प्रयत्नांना येईल का यश? सोनिया बरी होईल का?

प्रीती.. पर्व दुसरे!

भाग -एकवीस.

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)


नर्सने दिलेले इंजेक्शन टोचायच्या आधीच सोनियाचे हृदय बंद झाले होते. जणू काही मोहनविषयीच बोलायला ती शुद्धीवर आली होती.

नव्या वाटेवर उभ्या असलेल्या आप्पा आणि आईसाहेबांच्या सोबतीने तिचे प्राण आता पुढच्या प्रवासाला निघाणार होते.


"प्रीती मॅडम, तुम्ही बाजूला व्हा. तुमच्या आई प्रतिसाद देत नाही आहेत." नर्स तिला बाजूला करत म्हणाली.

"प्रतिसाद देत नाहीये म्हणजे? काय म्हणायचंय तुम्हाला? ती आत्ताच बोलली ना माझ्याशी?"

"कधी कधी होतं असं. शेवटच्या क्षणी आपल्या प्रिय व्यक्तिमध्ये जीव अडकला असतो तेव्हा असे घडू शकते." डॉक्टर.

"शेवटच्या क्षणी? व्हाट आर यू सेईंग डॉक्टर?" ती भडकलीच.


"त्या आता आपल्यात नाहीयेत. प्रीती, अँड धिज इज फॅक्ट!"

"काय? असे नाही होऊ शकत. माई मला सोडून कुठेच जाणार नाही."

"माई.. माईऽऽ" तिने हंबरडा फोडला.


सोनियाचा तो थंड देह तिच्यासमोर होता. पंधरा वीस सेकंदाचा तो कालावधी.. काय घडत आहे हे प्रीतीच्या समजण्यापलीकडे होते, सोनिया आपल्याला सोडून जाऊ नये हीच आस होती.

डॉक्टर सोनियाला लावलेले मॉनिटर काढण्याच्या तयारीत होते आणि प्रीतीने पुन्हा जोराचा हंबरडा फोडला.

"माईऽऽ.."

आप्पासाहेब आणि आईसाहेबांच्या सोबतीने प्रवासाला निघालेल्या सोनियाच्या प्राणपाखराने ती साद जणू ऐकली. ज्या लेकीसाठी ती सर्वांना सोडून गेली होती तिच्याचसाठी परत एकदा ती माघारी वळली.


बीप.. बीप..

नर्स मॉनिटर काढत असताना ते परत एकदा आवाज करायला लागले.

"सरऽ" सिस्टर ओरडली.

 एव्हाना तो आवाज डॉक्टरांच्याही कानावर पडला.

"सिस्टर, इंजेक्शन. क्विक!" नर्सच्या हातात असलेले इंजेक्शन डॉक्टरांनी सोनियाच्या छातीत टोचले.

मॉनिटरचा हळू झालेला आवाज आता वाढला होता. हळूहळू सुरू असलेले हृदयाचे ठोके वाढले होते. डॉक्टरांनी आपलली टीम आणि पुण्यातील डॉक्टरांशी फोन करून चर्चा केली. मॉनिटरवरच्या रिडींग्स नार्मल यायला लागल्या होत्या.


"डॉक्टर.."

प्रीती हात जोडून त्यांच्यासमोर उभी होती. निःशब्द! तिच्या डोळ्यातील अश्रू तिच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचल्या होत्या.

त्यांनी तिचे हात हातात घेतले. "प्रीती मॅडम, इट्स अ मिरॅकल! तुमच्या प्रेमाने जवळ जवळ त्यांचे गेलेले प्राण परत आले. कधी कधी होतं असं. काही क्षणासाठी हृदय बंद पडतं आणि आपण आशा सोडून देतो. बट हॅट्स ऑफ यू. तुमच्यामुळे तुमच्या माई परत आल्या."

"नो डॉक्टर. तुम्ही प्रयत्न केलेत म्हणून तर हे शक्य झाले ना? देवावर फारसा विश्वास नाही माझा, पण आज मला तुमच्यात देव भेटला."

"चला, बाहेर बोलूया. बाहेर सगळी वाट बघत आहेत नि इथे सिस्टरांच्या कामात अडथळा येईल." डॉक्टर तिला बाहेर घेऊन आले.


सोनियाला शुद्ध आली असे समजून समीरने मिहीर आणि राधामावशीला फोन करून बोलावून घेतले होते. प्रीती आयसीयुतून बाहेर आली तेव्हा सर्वच मंडळी अधीरतेने वाट बघत असलेली दिसली.


"चमत्कारच घडला म्हणायचा. काही सेकंदासाठी त्यांचे हृदय बंद पडले होते, पण यांनी घातलेल्या सादेने ते परत सुरू झाले." डॉक्टर सांगत होते. राधामावशीने प्रीतीला घट्ट मिठीत घेतले. दोघींचेही डोळे झरत होते.

"आता कशी आहे ती?" मिहीरने पुढे येत विचारले.

"आतादेखील पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेतच आहेत. पुढील चोवीस तासात तर शुद्ध यायला हवी. लेट्स सी! पण एक गोष्ट, हिंमत खचून चालणार नाही. आम्ही आमचे प्रयत्न करतोय. तुम्हीही देवाची प्रार्थना करा. चमत्कार एकदाच होऊ शकतो. वारंवार शक्य नाही."

डॉक्टर निघून गेले.

"सोना तुझ्याशी बोलली म्हणतेस ना? काय म्हणाली ती? सांग ना." राधामावशी विचारत होती.


प्रीतीला सोनियाचे शब्द आठवले. 'मोहनला माफ कर.' असे ती म्हणत होती. ती असे का म्हणाली असावी हे तिला उमगत नव्हते आणि सगळयांसमोर राधामावशीला सांगावे हेही योग्य वाटत नव्हते.

"राधाई, कदाचित मला भास झाला असावा गं." ती डोळे पुसत म्हणाली. "पण मला खात्री आहे, माई लवकरच बरी होईल."


"येस! दॅट्स द स्पिरिट. सोनप्रीतला सोनिया आणि प्रीती दोघींचीही नितांत गरज आहे. तुमच्याशिवाय शोभा नाही, सो, आँटी लवकरच बऱ्या होतील आणि सगळं ठीक होईल. बी पॉजिटीव्ह!"

समीर तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.


सगळ्यांनी तिथल्याच गणपती च्या मूर्तिसमोर हात जोडले.

तिथे उभ्या असलेल्या इन्स्पेक्टर शिवचेही हात आपोआपच जुळले.

*******

चोवीस तास उलटले होते. सोनिया अजूनही शुद्धीवर आली नव्हती. पुन्हा एक दिवस तिथेच रहायचे त्यांनी ठरवले. त्याचा काहीच उपयोग झाला नाही. जमेची एकच बाजू म्हणजे ती शुद्धीत नसली तरी धोक्याच्या बाहेर होती. इतर ट्रीटमेंटला प्रतिसाद द्यायला सुरुवात झाली होती.


कोल्हापूरहून सोनियाला पुण्यात शिफ्ट केले गेले. तिथल्या प्रख्यात न्युरोसर्जनकडे तिची फॉलोअपची ट्रीटमेंट सुरू झाली. तसेही हे डॉक्टर सुरुवातीपासूनच कोल्हापूरच्या डॉक्टरांच्या संपर्कात होते. त्यामुळे त्यांना संपूर्ण केस हिस्टरी ठाऊक होती.

आठ दिवस ती ऍडमिट होती. आता बाह्य जखमा बऱ्या होऊ लागल्या होत्या.

"मला एक सांगायचे आहे." समोरच्या खुर्चीवर बसलेल्या प्रीती आणि मिहीरकडे बघत डॉक्टर बोलत होते.

प्रीतीने आशाळभूत नजरेने त्यांच्याकडे पाहिले.

"इथे जी आवश्यक होती ती सर्व ट्रीटमेंट अगदी योग्यरीतीने पार पडली आहे. जखमा बऱ्या होत असल्या, आणि सोनिया मॅडम ट्रीटमेंटला प्रतिसाद देत असल्या तरी त्या कोमातून कधी बाहेर पडतील सांगता येणार नाही.

"डॉक्टर.." प्रीती भावूक झाली होती. 

"प्रीती, त्यांना तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. हॉस्पिटलमध्ये ठेवण्यापेक्षा घरच्या माणसांच्या सहवासात राहतील तर कदाचित यातून लवकर बाहेर पडतील." डॉक्टर.

"पण डॉक्टर, ती केव्हा नॉर्मल होईल?" तिचा अधीर प्रश्न.

"ते नाही सांगता येणार. कदाचित आठ तास, कदाचित आठ दिवस, तर कदाचित आठ महिने नि आठ वर्ष सुद्धा! कदाचित कधीच नाही. पण म्हणून हिंमत सोडून कसे चालेल, औषधाबरोबर तुमचे प्रयत्न पण सुरू असणे गरजेचे आहे. त्यांच्या आवडीच्या वस्तू, आवडीच्या गोष्टी समोर आणून बघा. कदाचित त्याचा काही परिणाम होईल. नि प्रीती तुमच्यावर खूप जीव आहे त्यांचा. तुम्ही सतत त्यांचा जवळ राहत चला, बोलत चला. कुणास ठाऊक त्यांचे प्राण तुम्ही परत आणलेत तसे या कंडिशन मधून देखील तुम्हीच बाहेर काढू शकाल."

डॉक्टर तिच्याकडे बघून बोलत होते.

*******


दोन दिवसांनी दारासमोर ऍम्ब्युलन्स उभी राहिली. प्रीती सोनियाला घरी घेऊन आली होती. सोनियाची खोली स्पेशल डिझाईन करून घेतली होती. तिच्या रूममध्ये मिनी दवाखानाच उभारण्यात आला. तिचा वरखाली करता येणारा बेड, मॉनिटर, ऑक्सिजन मास्क, गळ्यात घातलेली नळी.. आणि चोवीस तासांसाठी अपॉइंट केलेली एक नर्स.


ती नर्स त्यांच्याकडेच राहायला आली. तिला एक खोली दिली असली तरी ती सोनियाच्याच रूममध्ये रहायची. तिची पूर्ण सेवा करण्यासाठी ती तैनात होती. सोबतीला राधामावशी होतीच. ती एक क्षणही सोनियाला वेगळे सोडत नव्हती. तिच्याशी काहीतरी बोलत असायची. कधीतरी एखाद्या गोष्टीवर काही रिस्पॉन्स देईल ही वेडी आशा ती मनात बाळगून होती. 


प्रीतीने घरात कामासाठी एक वेगळा स्टॉफ अपॉइंट केला होता. राधामावशीवर आता घरातल्या कामाचा कसलाच लोड राहणार नाही याची तिने पूर्ण काळजी घेतली होती. स्वतःला तिने ऑफिसच्या कामात झोकून दिले होते. 'सोनप्रीत' सोनियाचे स्वप्न होते. त्याने पुन्हा उंच उभारी घेतली तर सोनियाची स्थिती सुधारेल, या वेड्या आशेने ती सतत झटत होती.

एवढे असले तरी शनिवार-रविवार मात्र तिने पूर्णपणे आपल्या माईसाठी राखून ठेवला होता. आठवड्याभरात काय काय झाले हे सगळं ती सोनियाला सांगायची. प्रत्येक आठवड्यातील निरनिराळ्या कहाण्या, रंगवून खुलवून ती सांगायची.

ती लहान असताना सोनिया तिला असेच शनिवार रविवारी आपल्यासोबत ठेवायची. ऑफिसच्या धांदलीत मुलीकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून हे दोन दिवस तिच्यासाठी खास ठेवणीतले असायचे. तेव्हा तिला तरी कुठे माहीत होते की काही वर्षांनी हीच चिमणी प्रीती आपल्याशीही असे वागेल, आईचीच आई होऊन तिची काळजी घेईल.

******

दोन महिने सरत आले होते. सोनियाच्या तब्येतीत तसूभरही फरक पडला नव्हता. रोजचे एकच रुटीन प्रीती आणि राधामावशीच्या अंगवळणी पडले होते.

नर्स आपले काम चोख बजावत होती. सोनिया मात्र तशीच बेडवर निपचित पडून होती.


रोज देवाजवळ हात जोडताना राधामावशी 'सोनियाला बरे होऊ दे.' अशी कामना करायची. प्रत्येक दिवस मात्र एकसारखाच उजाडायचा.


एके दिवशी ऑफिसमध्ये असताना प्रीती सोनियाचा मोबाईल बघत होती. फोनकॉल मध्ये एका अनोळखी नंबरवर तिची नजर खिळली. तिच्या माईच्या मोबाईलवरून तो शेवटचा कॉल होता.

तिने उत्सुकतेपोटी नंबर डायल केला कारण तो नंबर त्यांच्या क्लाईंटपैकी कुणाचाच नव्हता.

पलीकडून फोन उचलल्या गेला. ती व्यक्ती जे बोलली, ते ऐकून तिच्या मनात एक वेगळीच अस्वस्थता निर्माण झाली.

:

क्रमश:

*********

कोणाचा होता तो फोन? वाचा पुढील भागात.


पुढील भाग लवकरच!

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.

********

फोटो गुगल साभार.


🎭 Series Post

View all