Mar 04, 2024
प्रेम

प्रीती.. पर्व दुसरे! भाग -२०

Read Later
प्रीती.. पर्व दुसरे! भाग -२०

प्रीती.. पर्व दुसरे!

भाग -वीस. 

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)


समीरचे म्हणणे प्रीतीला पटले. ती तिच्या माईला सोडून कुठेच जाणार नव्हती. तीच काय मिहीर, राधामावशी सगळ्यांनाच तिथे थांबायचे होते. पण शेवटी हॉस्पिटलच्या नियमांपुढे त्यांचे काय चालणार?

मिहीर आणि राधामावशी हॉटेल सयाजीला निघून गेले. इथे रुग्णालयात प्रीती आणि समीर दोघेच होते. एकदा तरी माई डोळे उघडेल आणि आपल्याशी काहीतरी बोलेल या भोळ्या आशेवर प्रीती दाराच्या काचेतून सोनियाकडे टक लाऊन बघत होती.

"प्रीती, अशी किती वेळ उभीच राहणार आहेस? बस इथे." समीर म्हणाला.

"नाही, नको रे. माईच्या चेहऱ्यावरून मला नजर हटवण्याचे देखील धाडस होत नाहीये. तिला शुद्ध आली तर आपल्याला कळायला हवे ना?"

तिच्या उत्तराने, चेहऱ्यावरील निरागस भावाने त्याला शाळेत असतानाची छोटी प्रीती आठवली. अर्थात तोही तेव्हा लहानच होता पण तिच्यापेक्षा एका वर्गाने पुढे म्हणजे तिच्या रक्षणाची जबाबदारी आपलीच, असेच त्याला वाटायचे.

एकदा शाळेत तिला कोणीतरी तुझे बाबा कुठे असतात म्हणून विचारले होते. बाबाविषयी अनभिज्ञ असणारी ती, त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकली नव्हती. मग मुले चिडवायला लागली. आठ वर्षांची चिमूरडी पार गोंधळून गेली होती. रडून नाक लाल झालेले, गोबरे गुलाबी गाल आणखीनच गुलाबी झाले होते. तिच्या रडण्याचे कारण त्याला कळले तसे त्यालाही फार वाईट वाटले होते.

"समीर, माझे बाबा कुठे आहेत ते मलाच माहीत नाही मग मी कसे उत्तर देऊ रे?" 

तो फार मोठा नव्हताच पण जबाबदारीने तो उठला. तिचे डोळे पुसून तिला धीर दिला. "प्रीत, रडायचे कशाला? सरळ सांगायचे, माझे बाबा फॉरेनला असतात म्हणून. मग कोणीही चिडवणार नाहीत बघ." तेवढ्यापुरते त्याने तिला सांभाळून घेतले होते.

आत्ताही ती माईबद्दल बोलत असताना त्याला तीच निरागस छोटीशी प्रीत आठवत होती. त्याने तिच्या दंडाला पकडून बाकावर आपल्या शेजारी बसवले.

"समीर, मला माईला इथे ठेवायचे नाही रे. उद्या सकाळीच आपण तिला पुण्याला घेऊन जाऊ." प्रीती हुंदके देत म्हणाली.

"प्रीती, पुण्यातील नामांकित डॉक्टर इथल्या डॉक्टरांशी सतत संपर्कात आहेत. परत दुसरीही टीम आहे. सर्व मिळून आँटीवर ट्रीटमेंट करत आहेत. त्यामुळे तू काळजी करू नकोस." तो तिला समजावत होता.

"होईल ना रे माई बरी?" तिच्या प्रश्नाला डोळे भिडवून उत्तर द्यायची त्याची हिंमत झाली नाही तरी तिला धीर द्यायचे काम तो करत होता.


मध्यरात्र उलटून गेली होती. बसल्या बसल्या प्रीतीने समीरच्या खांद्यावर डोके टेकले आणि दोन क्षणासाठी तिचा डोळा लागला. समीर तर आधीच झोपी गेला होता. पुणे कोल्हापूरचा कारचा प्रवास आणि झालेल्या दगदगीने तो थकला होता.


प्रीतीने डोळे मिटले आणि सोनिया तिच्याशी बोलतेय असा तिला भास झाला. ती काहीतरी सांगतेय, पण आवाज क्षीण झाल्यामुळे प्रीतीला समजायला येत नव्हते.

"माई, काय म्हणतेस तू? जरा जोरात सांग ना. आणि यापुढे कीतीही हट्ट केलास ना तरी मी तुला एकटीला कुठेही जाऊ देणार नाही. कळलं?" ती तिला दम भरत होती.

तिच्या अशा रागावण्याने सोनिया पुसटशी हसली अन मग हळूहळू अंतर्धान पावली.

"माईऽऽ.." तिने जोरात हाक दिली.

तिच्या आवाजाने समीर दचकून उठला.

"काय झाले?" तो विचारत होता.

"माई. समीर माई होती. आत्ता, इथे." ती आपल्याच गुंगीत होती. चेहऱ्यावर दरदरून घाम फुटला होता.

बाहेर सुरू असलेला पाऊस आणि अशा थंड वातावराणात तिला आलेला घाम बघून तिने काहीतरी वाईट स्वप्न पहिले असावे हे त्याला समजून चुकले.


"रिलॅक्स! अगं तुला स्वप्न पडले असावे. शांत हो. आँटी हॉस्पिटलमध्ये आहेत नि आपणही तिथेच आहोत ना?" तो तिला हळुवारपणे समजावत होता.


थोड्यावेळाने ती भानावर आली पण तिची अस्वस्थता मात्र तशीच होती. तिला बरे वाटावे म्हणून तो कॉफी आणायला गेला. ती भेदरलेल्या कोकरासारखी एकटीच तिथे बसली होती.


"मिस प्रीती.." तिच्या कानावर आलेल्या हाकेने तिने वर पाहिले.

इन्स्पेक्टर जाधव तिथे आले होते.

"तुम्ही?" त्याच्या अनपेक्षित येण्याने ती गोंधळली. सायंकाळी तिने त्याला युनिफॉर्मवर पाहिले होते. आता तो फार्मल कपडे घालून आला होता तर क्षणभरासाठी तिला तो ओळखूच आला नाही.


"अहो, मी इन्स्पेक्टर शिव जाधव."


"ओह आय एम सॉरी! माझ्या लक्षातच आले नाही." ती.


"इट्स ओके. तुम्ही एकट्याच?" त्याचा प्रश्न संपेपर्यंत समीर कॉफी घेऊन आला. समीर आणि शिव दोघांचीही जुजबी ओळख झाली.


कॉफी प्यायल्यावर प्रीतीला थोडी तरतरी आली. "समीर मला माईकडे जायचंय." तिने हट्ट पकडला.

"आपण आत तर जाऊ शकत नाही. पण तू काचेतून बघ ना. त्या झोपल्या आहेत." समीर तिला परत आयसीयूच्या दरवाज्याजवळ घेऊन आला.

त्याने म्हटल्याप्रमाणे सोनिया झोपली होती. झोपली नव्हे अजूनही ती बेशुद्धावस्थेतच होती.

"समीर, बघ. माई डोळे उघडतेय." प्रीती आनंदाने त्याला धक्का देत म्हणाली..

"नाही अगं. त्या तशाच पडल्या आहेत." तो.

"तुझा विश्वास नाहीये ना माझ्यावर? माई बघतेय माझ्याकडे. मला काही सांगण्याची तिची धडपड सुरू आहे रे. आपण आत जाऊया ना." ती केविलवाणी झाली होती.

तिची अवस्था बघून शिवने आयसीयूच्या दारावर थाप दिली.

"काय?" नर्स बाहेर येऊन विचारत होती.

"आमच्या पेशंटची काही प्रोग्रेस आहे का?" शिव विचारत होता.

"नाही सर, त्या अजूनही तशाच आहेत. आम्ही त्यांना कंटिन्यू मॉनिटर करत आहोत."

"माई हालचाल करत आहे. मी पाहिले आहे.सिस्टर तुम्ही बघा ना. डॉक्टरांना बोलवा ना,प्लीज." नर्सला बाजूला करून ती आत जाऊन सोनियाजवळ जाऊन उभी राहिली.

तिथल्या नर्सने मॉनिटरवर बघितले. हृदयाचे ठोके नार्मल दाखवत होते. आतापर्यंत ॲबनॉर्मल असलेल्या सर्व रिडींग्स आटोक्यात आल्या होत्या. नर्सने डॉक्टरांना फोन करून त्यांना तातडीने बोलावून घेतले.

सोनियाच्या हाताची बोटे हलत होती.

"प्रीतऽ.."

पुन्हा कानावर एक अस्पष्ट आवाज आला.

"माईऽऽ, माई मी तुझ्याजवळच आहे." प्रीतीच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या. सोनियाचा हात तिने अलगदपणे आपल्या हातात घेतला.

सोनियाने मोठया कष्टाने आपले डोळे उघडले. प्रीतीचा चेहरा नजरेत समावून घेतला.

"प्रीत.."

"मॅम, तुम्ही जास्त बोलू नका. त्रास होईल." डॉक्टर सोनियाला म्हणत होते.

तिच्या हृदयाची गती अचानक वाढायला लागली.

"प्लीज तुम्ही सर्व बाहेर थांबा. पेशंटला त्रास होतोय." समीर आणि शिवकडे बघत डॉक्टर म्हणाले.


"डॉक्टर, मी कुठेही जाणार नाही. मला इथेच थांबायचे आहे." प्रीतीची अवस्था बघून डॉक्टरांनी तिला होकार दिला.


" प्रीत.." पुन्हा एक क्षीण आवाज आला. शक्य तेवढा जोरात बोलण्याचा प्रयत्न केलेला. डॉक्टर देखील अचंबित झाले. त्यांच्या कारकिर्दीत असा पेशंट पहिल्यांदाच ते बघत होते.


"डॉक्टर बघताय ना? माईला माझ्याशी बोलायचे आहे." प्रीतीच्या डोळ्यात पाणी होते.

डॉक्टरांनी मान हलवून तिला सोनियाशेजारी बसू दिले. त्यांना काहीतरी अंदाज आला असावा.


"माई, मी तुझ्या जवळच आहे गं. तुला काहीच होणार नाही. डॉक्टरांची बेस्ट टीम तुझ्या सेवेत आहे." सोनियाच्या हाताला हलके दाब देत प्रीती हळुवारपणे बोलत होती. तिचा आवाज सोनियाच्या मेंदूपर्यंत पोहचला असावा. कारण उत्तरादाखल तिच्या ओठावरचे स्फूट हसू प्रीतीच्या नजरेला दिसले होते.


प्रीती जराशी घाबरली. असेच हसू तिने आत्ताच तर पाहिले होते. काही वेळापूर्वी तिचा डोळा लागला आणि तिला सोनिया दिसली होती तेव्हा हेच हसू तिच्या ओठावर होते.

"माईऽ" प्रीतीच्या आवाजात एक भीती होती.

"प्री-त, मोहन.. मो-ह -न.. त्याला मा-फ क-र-शी-ल का?" एवढेच बोलायला तिला किती कष्ट घ्यावे लागले होते.

"माई, अशी का बोलते आहेस तू? मी तुझ्या मोहनला तुझ्यासमोर आणण्याचे प्रॉमिस केले आहे ना, मी तुझे प्रॉमिस पूर्ण करेन अगं. तू त्रास नको करून घेऊ ना."


प्रीतीच्या हातात सोनियाचा हात होता. अचानक तो स्पर्श तिला थंडगार असा भासला. मॉनिटरचा बीप बीप होणारा आवाज वाढला होता. डॉक्टर लगेच तिथे आले. मॉनिटरवर उमटलेली प्लेन लाईन बघून नर्सला इंजेक्शनची ऑर्डर देऊन त्यांनी सोनियाच्या छातीला प्रेस करायला सुरुवात केली.

नर्सने दिलेले इंजेक्शन टोचायच्या आधीच सोनियाचे हृदय बंद झाले होते. जणू काही मोहनविषयीच बोलायला ती शुद्धीवर आली होती.

नव्या वाटेवर उभ्या असलेल्या आप्पा आणि आईसाहेबांच्या सोबतीने तिचे प्राण आता पुढच्या प्रवासाला निघाले होते.

:

क्रमश:

पुढील भाग लवकरच!

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//