प्रीती.. पर्व दुसरे! भाग -१९

प्रीतीला कळेल का सोनियाचे सत्य???

प्रीती.. पर्व दुसरे!

भाग -एकोणवीस.


..आणि विमान एकदाचे कोल्हापूरला लँड झाले. प्रीतीचे देवाचे नामस्मरण अधिकच वाढले.

जिल्हा रुग्णालयात पोहचेपर्यंत तिचे चित्त थाऱ्यावर नव्हते.

"सिस्टर, मी प्रीती. सोनिया.. सोनिया मॅडमची मुलगी. कुठे आहेत त्या? कशा आहेत?" रुग्णालयात पोहचल्यावर मात्र तिचा धीर खचला होता.

"त्यांना आयसीयू मध्ये दाखल केले आहे. बाकी डॉक्टर काय ते सांगतीलच." नर्स म्हणाली तशी तिने डॉक्टरांच्या केबिनकडे धाव घेतली.

"प्रीती, इतका वेळ शांत होतीस ना? आता अशी सैरभैर होऊ नकोस." मिहीर तिचा हात पकडत म्हणाला.

"अंकल, माई आयसीयू मध्ये आहे म्हणजे तिला जास्तच लागलंय हो." बाहेर येऊ पाहणाऱ्या आसवांना रोखू पाहत ती म्हणाली.

"रिलॅक्स! आपण डॉक्टरांना भेटतोय ना? ते सांगतीलच की." स्वतःला शक्य तेवढे शांत ठेवण्याचा प्रयत्न करत मिहीर तिला धीर देत होता.


"हा ॲक्सिडेंट खूप भयानक होता. त्यांची कारने पूर्णपणे पलटी मारली होती. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता." डॉक्टर त्यांना पूर्वकल्पना द्यायचा प्रयत्न करत होते.

"कसलाही अंदाज नकोय डॉक्टर. मला माईला भेटायचे आहे. कशी आहे ती? कुठे लागलेय? तिला आयसीयू मध्ये का ठेवलंय? प्लीज सांगा ना." प्रीती रडकुंडीला आली.

"त्यांच्या हातापायला कुठेही इजा झाली नाहीये. पण.."

"पण काय डॉक्टर?"

"पण डोक्याला मात्र जबर मार बसलाय. ट्रीटमेंट सुरू केलीय. एक ऑपरेशनदेखील केलेय." डॉक्टर.

"ऑपरेशन?" मिहीरला धक्का बसला.

"हो. माणुसकीच्या नात्याने इन्स्पेक्टर जाधवांनी सही दिली तेव्हा आम्ही ऑपरेशन केले."

"मी माईला भेटू शकते?" प्रीतीचा स्वर कातर झाला होता.

"सध्यातरी नाही. त्यांची अजुनपर्यंत शुद्ध आली नाहीये. इथे आणले तेव्हाही त्या शुद्धीत नव्हत्या. अपघात होऊन अर्धा-पाऊण तास लोटल्यानंतर त्यांना वैद्यकीय मदत मिळाली. त्यापूर्वी बराच रक्तस्त्राव झाला होता.

पुढचे चोवीस तास खूप इम्पॉर्टन्ट आहेत. जर त्यांना शुद्ध आलीच नाही तर.. तर त्या कोमात जाऊ शकतात." डॉक्टरांनी स्पष्ट केले.

"डॉक्टर, तुम्ही काय बोलताय? असे असेल तर आम्ही आत्ताच तिला चांगल्यातल्या चांगल्या हॉस्पिटलला शिफ्ट करतो. पुण्याला घेऊन जातो." मिहीरच्या चेहऱ्यावर वेदना जाणवत होती.

"हे बघा सर, मी तुम्हाला अंधारात ठेवू शकत नाही. तुम्ही प्रवासात होतात म्हणून मघाशी फोनवर मी तुम्हाला त्यांची कंडिशन सांगितली नव्हती. पण आता तरी सगळं क्लीअर सांगावे लागेल ना? पुण्याला घेऊन गेलात तरी तिथे देखील हीच ट्रीटमेंट देणार जी इथे सुरू आहे. हवे तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलून बघा."

डॉक्टरांचे बोलणे ऐकून प्रीतीचे अवसानच गळाले.

"डॉक्टर आय वान्ट टू मीट माय माई!" ती भरल्या डोळ्यांनी बोलत होती.

"प्लीज.." तिने आपले दोन्ही हात जोडले. तिची अवस्था बघून डॉक्टरांचे हृदय द्रवले.

"जा, थोडावेळ भेटून या त्यांना. बट रिमेम्बर हे आयसीयू आहे नि पेशंटची कंडिशन खूप जास्त क्रिटिकल आहे. सो तिथे जास्तवेळ थांबू नका."डॉक्टरांनी प्रीतीला बजावले.

"आणि तुम्ही माझ्यासोबत या. काही फार्मॅलिटिज कराव्या लागतील त्यासाठी जरा को-ऑपरेट करा."

त्यांनी मिहीरकडे पाहिले. मिहीर मान डोलावून डॉक्टरांच्या सोबत गेला.

*********

प्रीती सोनियाच्या बेडशेजारी बसली होती. डोळ्यातील पाणी तसेच हेलकावत होते.

"माई ऊठ ना गं. हे असे झोपून राहणे तुला शोभते का? आपले ऑफिस, आपली कंपनी, तेथील माणसे.. सगळेच तुझी वाट बघत आहेत. तू नाहीस तर बघ ना कुणाचेही कामात नीट लक्ष लागत नाहीये. मिहीर अंकल देखील इथे आले आहेत. ऊठ ना. तुझा आवाज ऐकला नाही तर काहीतरी मिसिंग वाटतं गं." सोनियाच्या चेहऱ्याकडे टक लाऊन ती बोलत होती.

सोनियाच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते. चेहरा निस्तेज दिसत होता. लागल्यामुळे थोडासा सुजलेला होता. डोक्याला बँडेज केले होते. अशी शांत,निश्चल झोपलेली सोनिया बघून प्रीतीचा स्वतःवरचा ताबा सुटला. एक अनावर हुंदका बाहेर पडला.

"मॅम, प्लीज तुम्ही बाहेर थांबा. इथे रडू नका." तेथील नर्स प्रीतीला म्हणाली.

प्रीती मग बाहेरच्या काचेतूनच सोनियावर नजर खिळवून उभी राहिली.


"प्रीती.." तेवढ्यात मिहीर तिच्या पाठीमागे येऊन उभा राहिली.

"अंकल! हे काय झाले हो माईला?" ती रडतच त्याच्या मिठीत शिरली. इतका वेळ मोठी झाल्यासारखे वाटणारी प्रीती त्याला आता लहान लेकरासारखी वाटायला लागली होती.

"होईल गं सगळं नीट. तू नको काळजी करुस." तिच्या पाठीवर हलकेच हात फिरवत तो बोलत होता.


सारे काही नीट तर व्हायलाच हवे होते. त्यालाही वेडी आशा होतीच. देवावर विश्वासही होता. शैलीची त्याच्या आयुष्यातील चटका देणारी झालेली एक्झिट आणि त्यातून सावरणे कठीण वाटत असतानाच त्याला भेटलेली सोनिया. लग्नासाठी सोनियाने भलेही त्याला नकार दिला असला तरी त्याच्या मनाच्या कप्प्यात तिच्याबद्दलच्या भावना होत्याच ना. आता तो सोनियाला या अवस्थेत पाहू शकत नव्हता.

त्याच्या ऑफिसला मुलाखतीसाठी आलेली ती. त्याने तिला प्रपोज केले तेव्हाची ती. स्पष्टपणे नकार देऊनही मैत्रीचा हात हातात घेणारी ती. सोनप्रीत उभी राहिली तेव्हा पार्टनरशिपचा हात समोर करणारी ती..! तिचे अनेक रूपं त्याच्यासमोर उभी होती. तिचे त्याच्या आयुष्यात येण्याने तो सावरला होता. आता तिलाही त्याला गमवायचे नव्हते.


"एक्सक्युज मी! मिस प्रीती?" इन्स्पेक्टर जाधव तिथे आले होते.

"येस, आय एम." मिहीरच्या मिठीतून दूर होत प्रीती उत्तरली.

जाधव तिच्याकडे पाहतच राहिले. रडून रडून लाल झालेला तिचा चेहरा. निळ्याशार डोळ्यात उमटलेली लालसर छटा. केसांची पोनी बांधलेली. एकदम क्युट अशी छोटुशा मुलीसारखी ती त्यांना भासली.

"बोला सर." मिहीरच्या आवाजाने तो भानावर आला.

"अपघातातील तुमची कारचा पंचनामा करायचा होता आणि थोडी माहिती हवी होती. शिवाय हा मॅडमचा फोन." फोन घ्यायला प्रीतीने हात समोर केला.

"थँक यू इन्स्पेक्टर! तुम्ही सही दिली त्यामुळे माईचे ऑपरेशन वेळेत होऊ शकले." तिचा मधुर आवाज त्याच्या कानावर आला.

"इट्स माय ड्युटी!" त्याचे ओठ रुंदावले. "मॅडम कशा आहेत आता?" त्याने विचारले. त्याच्या प्रश्नाने तिचे डोळे परत पाणावले. "होतील त्या बऱ्या." तो म्हणाला आणि मिहीरसोबत पोलीसस्टेशनला गेला.


 काही वेळातच समीर आणि राधामावशी हॉस्पिटलला पोहचले. सोनियाला बघून तिने डोळ्याला पदर लावला. 'किती आनंदात निघाली होती पोर आणि तिचं काय होऊन बसलं?' ती हमसून हमसून रडत होती.


"राधाई शांत हो बघू. अशी रडू नकोस." प्रीती तिला समजवण्याचा असफल प्रयत्न करत म्हणाली.

मिहीर देखील पोलीस स्टेशन मधून परतला होता.

"अंकल, पोलीस काय म्हणाले? कसा झाला ॲक्सिडेंट? काही कळले का?" प्रीती मिहीरला विचारत होती.

"मी सीसीटीव्ही फुटेज पाहिले. सोनियाची कार चुकून झाडाला धडकली." मिहीर सांगत होता.

"असं कसं शक्य आहे अंकल? माई किती चांगली ड्रायव्हिंग करते हे आपल्याला ठाऊक आहे ना." प्रीती रुध्द स्वरात म्हणली.

"हो, पण त्या वेळी पाऊस एवढा भयंकर होता की तिला कदाचित समोरचे काही दिसले नसावे आणि तिचा ब्रेक दाबल्या बरोबर तोल गेला असेल. संशयास्पद असे काहीच नव्हते अगं. पण तुला कुणावर संशय आहे का?" मिहीर.

प्रीतीने एकदा राधामावशीकडे पाहिले आणि नकारार्थी मान हलवली.

"इथल्या कॅन्टीनमधून मी चहा मागवलाय. सो चहा घेऊयात. थोडे फ्रेश वाटेल." समीर म्हणाला.


"मला नकोय काही. जोवर माई बोलणार नाही ना, मी काहीच खाणार-पिणार नाही." प्रीती डोळे पुसत म्हणाली.

"छोट्या बाळासारखा कसला हट्ट हं? चहा घे. तुला बरं वाटेल." राधामावशी तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली.

"राधाई!" प्रीतीने तिचा हात घट्ट पकडला.

"मला माहितीये माझ्यामुळेच हे झालेय. तुम्ही सगळे नको म्हणत असताना मी तिला एकटीला जाऊ दिले. मला माफ कर गं बाळा." राधामावशीचे डोळे भरून आले.

"राधाई अशी नको बोलू ना. असे काही घडणारे हे तुलातरी ठाऊक होतं का?" प्रीती तिचे डोळे पुसत म्हणाली.

चहा झाल्यावर थोडी तरतरी आली. बाहेर पाऊस सुरूच होता.


"प्रीत, तू राधाईसोबत हॉटेलला थांब. इथे मी आणि मामा थांबतो." समीर.

"वेडा आहेस का समीर तू? माईला सोडून मी कुठेच जाणार नाही." प्रीती.

"मीसुद्धा." राधामावशी.

"अगं इथे सगळ्यांना अलाव्ह नाही करणार. ऐक माझं." तो.

"ओके! मी आणि प्रीती थांबतो इथे. तू आणि मावशी जा." मिहीरने तोडगा काढला.

"नाही रे. तू देखील थकला आहेस ना? एक काम करूयात, राधाई आणि तू जा. मी आणि प्रीती इथे थांबतो. काही गरज भासली तर मग कळवतो."


समीरचे म्हणणे प्रीतीला पटले. ती तिच्या माईला सोडून कुठेच जाणार नव्हती. तीच काय मिहीर, राधामावशी सगळ्यांनाच तिथे थांबायचे होते. पण शेवटी हॉस्पिटलच्या नियमांपुढे त्यांचे काय चालणार?

:

क्रमश:

********

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.

********

फोटो गुगल साभार.


🎭 Series Post

View all