प्रीती.. पर्व दुसरे!

प्रीती.. पर्व दुसरे! उत्तरार्धाच्या प्रारंभापूर्वी..


प्रीती.. पर्व दुसरे!
उत्तरार्धाच्या प्रारंभापूर्वी…

प्रीती.. पर्व दुसरे! प्रारंभापूर्वी मला थोडे पहिल्या पर्वाबद्दल सांगावेसे वाटते.
हे दुसरे पर्व म्हणजे पहिल्या पर्वाचा उत्तरार्ध आहे. प्रारंभ यासाठी की पहिल्या पर्वात ही कथा एका वळणावर आल्यानंतर वेळेच्या अभावी लगेच थांबवावी लागली. तिचाच पुन्हा नव्याने आरंभ करतेय म्हणून तो प्रारंभ.


स्पर्धेच्या कथेनंतर माझी स्वतंत्र अशी पहिली कथामालिका म्हणजे प्रीती ही होती. ही कथा अनेकांना आवडली. कथेतील पात्र म्हणजे सोनिया, मोहन, शालिनी, राधामावशी ह्यांना वाचकांनी भरभरून प्रेम दिले.


प्रीती ही कथा होती सोनिया आणि मोहनच्या प्रेमाची. त्यांच्या प्रीतीची! लग्नाआधीच प्रेग्नन्सी राहिल्यामुळे आईसाहेब म्हणजे सोनियाची आई तिला घर सोडायला भाग पाडते. आपल्या बाळासाठी सोनिया घर सोडते पण तो सर्वस्वी तिचा निर्णय असतो. कारण आईसाहेबांनी बाळ अबोर्ट करणे किंवा सर्वांशी संबंध तोडून घरातून निघून जाणे हे दोन पर्याय तिच्यसमोर ठेवले असतात. सोनिया दुसरा पर्याय निवडते आणि मोहसोबत ती मुंबईला येते. मोहनच्या आईला नुकताच येऊन गेलेला हृदयविकाराचा झटका, त्यामुळे मोहन घरी काहीही सांगत नाही.
कधीकाळी \"सोनिया व्हिला\" मध्ये वावरणारी सगळ्यांची लाडकी सोना मुंबईच्या चाळीत मोहनच्या साथीने आपला संसार सुरू करते. इकडे सोनियाच्या घरातून असे निघून जाण्याने आप्पसाहेबांना अटॅक येऊन त्यांची प्राणज्योत मालवते. सोनियाला याची गंधवार्ता देखील नसते. मुंबईत सगळं सुरळीत सुरू असताना मोहनच्या आईला ऍडमिट केल्याची तार येते आणि त्यामुळे त्याला गावाला परत जावे लागते. गावात लहानपणापासून त्याच्यावर प्रेम करणारी त्याच्या मामाची मुलगी शालिनी हिला त्याच्या आईने आपली सून म्हणून निवडलेली असते. मृत्युच्या दारात असताना आपली शेवटची इच्छा म्हणून आई त्याला शालिनीशी विवाह करण्यास भाग पाडते. इकडे आड तिकडे विहीर या कात्रीत सापडलेला मोहन शालिनीला सोनियाबद्दल पूर्ण कल्पना देतो पण तिलाही आपल्या आईसारख्या आत्याचे मन मोडायचे नसते आणि ती विवाहाला होकार देते. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या आईचा मृत्यू होतो आणि तो मुंबईला परत जाण्याचे पुन्हा लांबणीवर पडते.


इकडे दोन दिवसासाठी गावाला गेलेला मोहन दोन महिने लोटले तरी परतला नाही म्हणून सोनिया अस्वस्थ होते. ती एकटी असताना तिला साथ मिळते चाळीतीलच एका वांझ स्त्रीची. राधामावशीची! मुलबाळ नसल्यामुळे नवऱ्याने तिला सोडली असते. चाळीतील इतर बायकाही तिच्याशी फटकून असतात. पण एकट्या सोनियाला तिचा आधार मिळतो.
टेंशनमूळे वाढलेली बीपी आणि त्यामुळे तारखेअगोदर झालेले सोनियाचे बाळंतपण. राधामावशीने पहिल्यांदा हातात घेतलेले ते पिटुकले बाळ आणि तिला वाटी चमच्याने दूध पाजताना अनुभवलेले मातृत्व या साऱ्यांची सांगड आपल्याला पहिल्या पर्वात वाचायला मिळेल. त्या दोघी मिळून चिमण्या परीचे नामकरण करतात.. प्रीती! तीच आपल्या दुसऱ्या पर्वाची नायिका.


मोहनच्या आईचा मृत्यू आणि सोनियाला झालेले बाळ या वळणावर कथेचे पहिले पर्व संपते. खरे तर एकाच सिझनमध्ये ही कथा संपवायची होती, पण पारिजात लिहायला लागले आणि प्रीती मागे पडली. आता पुन्हा नव्याने सगळ्यांना सोबत घेऊन नव्या पर्वाचा प्रारंभ करतेय. ह्या पर्वालासुद्धा असेच भरभरून प्रेम मिळेल ही आशा आहे.

दुसऱ्या पर्वाच्या सुरुवातीला काळ जरासा पुढे सरकला आहे. काही नवीन पात्र आली आहेत पण मूळ कथा कुठेही भरकटणार नाही याची नक्की काळजी घेईन.

लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहे, कथामालिका, प्रीती.. पर्व दुसरे!
तोपर्यंत खाली दिलेल्या लिंकला क्लिक करून पाहिल्या पर्वाचा आनंद घ्या.

https://www.irablogging.com/blog/seriesview/preeti

🎭 Series Post

View all