प्रीती पर्व दुसरे! भाग -९

सोनिया आणि मिहीर! काय असेल मिहीरचा भूतकाळ?


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -नऊ.

गटकण कॉफी गळ्याखाली रिचवून तो डोळे मिटून खुर्चीला रेलून बसला. कोणास ठाऊक का? पण त्याच्या बंद नजरेसमोर सोनियाचे निळेशार डोळे फेर धरत होते. अंगावरची गुलाबी साडी आणि त्याला मॅच होणारे तीचे गुलाबी ओठ उगाचच नजरेसमोर येऊ लागले. आणि तिच्याऐवजी दुसऱ्याच कोणाचा त्याला भास होऊ लागला.

ते निळे डोळे काळ्याभोर नयनात बदलू लागले. गोऱ्यापान चेहऱ्याऐवजी गव्हाळ चेहरा उमटू लागला. बाकी ओठांची गुलाबकळी तीच अन गालावर उमटलेली खळीही तशीच! ती होती त्याची शैली.


शैली! त्याची मैत्रिण. मैत्रीण कसली? त्याच्यासोबत तर लग्न करायचे होते तिला. कॉलेजपासून दोघे एकत्र होते. तो श्रीमंत, त्यात कॉलेजचा चॉकलेट बॉय! त्याच्या मागे कितीतरी मुली लागलेल्या. त्याला मात्र गव्हाळ वर्णाची शैली भावली. कॉलेजची चार वर्ष एकत्र घालवल्यावर त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. घरचांकडून मान्यता नव्हतीच तशी पण एकुलत्या एक मुलापुढे त्यांचे काही चालले नाही आणि त्यांच्याकडून होकार मिळवल्याशिवाय तोही स्वस्थ बसला नाही.

लग्न ठरले. लग्नाआधीचे सगळे विधी सुरु झाले. नववधूच्या वेशात शैलीचे सौदर्य अधिकच खुलून आले होते. गाल्यावरच्या खळीने शेखरचे हृदय जणू बाहेरच आल्यासारखे होत होते. आंतरपट बाजूला सरला. दोघांची नजरानजर झाली आणि ती गोड लाजली. तिच्या काळ्या डोळ्यातील त्याच्यासाठी ओतपोत भारलेले प्रेम आणि त्याची प्रेयसी पुढच्या क्षणी बायको होणार या विचाराने फुललेला तो! आणि अचानक त्याच्या काळजाचा ठोका चुकला. त्याच्या पुढ्यात उभी असलेली शैली अचानक खाली कोसळली.


"शैलीऽऽ.." त्याने मारलेली किंकाळी आणि त्याच्या हातात असलेला तिचा निष्प्राण देह!


पोस्टमार्टममध्ये कळले की तिला हृदयविकाराचा झटका आला होता. आधीही छातीत दुखत असेल कदाचित, पण लग्नाच्या आनंदात तिने त्याकडे लक्ष नव्हते.

शैली गेली आणि मिहीर पार कोलमडून गेला. त्याने स्वतःला पूर्णपणे कामात गुंतवून ठेवले. काम, काम आणि फक्त काम! त्याचे फळही त्याला मिळाले. कंपनीच्या प्रगतीचा आलेख दरवर्षी उंचावत होता तो फक्त त्याच्या मेहनतीमुळे. हल्ली मात्र कामाच्या अती ताणामुळे त्याला दमायला होत होते. त्यात सुरू झालेली ही डोकेदुखी आणि त्यावर उपाय म्हणून वारंवार गळ्यात रिचवावी लागणारी कॉफी!

आताही कॉफीचा कप ठेवला आणि शैली त्याच्या नजरेसमोर उभी राहून हसतेय असा त्याला भास झाला. सोनियाच्या निळ्या डोळ्यात त्याला शैलीच्या काळ्या डोळ्यांची झाक दिसली. आजवर कोणत्या मुलीला बघून त्याला शैली आठवली नव्हती कारण ती सदैव त्याच्या मनात होतीच आज मात्र सोनियात ती झळकतेय असे त्याला वाटले. तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि तिचे ठाम बोलणे! तिच्या सौंदर्यापेक्षा डोळ्यातला स्पार्क त्याला जास्त भावला.

रिसेप्शनीस्टला कॉल करून त्याने तिला आत बोलावले. आता परत काय वाढून ठेवले आहे या विचाराने ती भितभीतच आत आली.

"आत्ता जी कॅन्डीडेट बाहेर गेली तिचा काही पत्ता, डिटेल्स, फोन नंबर कुठे आहे?" तिच्याकडे बघत तो म्हणाला.


"त्या चौदाजणींचे सगळे डिटेल्स तुमच्यासमोरच ठेवले आहेत." ती चाचरत म्हणाली.


"जी शेवटची होती, तिच्याबद्दल विचारतोय मी." तो चिडून म्हणाला.


ती त्याच्याकडे पाहतच राहिली. 'मघाशी तिच्याबद्दल बोलले तर केवढी चिडचिड केली आता अचानक काय झाले?' या प्रश्नात ती पडली.


"तिला फोन करून सांगा की तिचे सिलेक्शन झालेय. उद्या मेन ब्रँचला तिला बोलावले आहे." तो.


"पण सर, आपण दोन दिवसांनी निकाल देणार होतो ना? आता लगेच?" तिचा प्रश्न.


"हे बघ, तू माझी पर्सनल सेक्रेटरी बनायला जाऊ नकोस. जेवढं बोलतोय तेवढं कर." तो.
ती 'येस सर' म्हणून तिथून निघाली.


"एक मिनिट थांब. आता फोन करू नकोस. उद्या कळव नि परवा तिला तिकडे पाठव." तो जागेवरून उठत म्हणाला.

******

इकडे मुलाखत झाल्यानंतर सोनिया बाहेर रिक्षाची वाट बघत होती. मुलाखत कशी झाली यापेक्षा बाहेरच्या जगात येऊन न घाबरता, न चाचरता स्वतःचा मुद्दा ती मांडू शकली याचाच तिला आनंद झाला होता. आता ही नोकरी नाही मिळाली तरी चालेल पण बाहेरच्या जगात आत्मविश्वासाने वावरू शकते हेही तिच्यासाठी थोडके नव्हते.

आप्पासाहेब तिला नेहमी म्हणायचे,
"सोना, तुमच्यात जो आत्मविश्वास आहे ना तोच तुमचा खरा दागिना आहे. त्याच्या तेजानेच तुम्ही इतके उजळून निघा की दुसऱ्या अलंकारिक शृंगाराची तुम्हाला कधी गरजच पडणार नाही."

आप्पासाहेबांचे तेव्हाचे बोलणे ऐकून तिला आता हसू आले. स्वतःवर तिने एक नजर टाकली. हातातल्या दोन काचेच्या बांगड्याखेरीज तिच्या अंगावर दुसरा दागिना होताच कुठे? तिला वाटलं, 'आप्पासाहेबांना पुढे घडणाऱ्या गोष्टी आधीच कळायच्या का? मी अशी लंकेची पार्वती असेन हे त्यांना माहीत असावं म्हणून ते असे बोलायचे का?' ओठावरचे हसू डोळ्यातल्या आसूमध्ये बदलले.

'आप्पा, तुम्ही म्हणायचा त्याप्रमाणे माझ्या आत्मविश्वासाच्या अलंकारानेच मी माझी लढाई जिंकेन. तुम्हाला मी तेव्हाच भेटेन.' 

वाऱ्याची थंड झुळूक तिला स्पर्शून गेली. जणू आप्पांचाच प्रेमळ स्पर्श! डोळ्यातील थेंब गालावर आले आणि त्याचवेळी तिच्या हातावर नभातले थेंब विसावले. चमकून तिने वर पाहिले. आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली होती. वारा सुटला होता अन पाऊसदेखील बरसायला लागला होता. पायांनी बाजूला धावत जाऊन विसावा शोधला मनाने मात्र साद घातली, 'अशी कोठवर विसावा शोधत फिरशील? ये, भिजून घे मनसोक्त अन व्यक्त कर स्वतःला!'

नेहमीप्रमाणे तिने याही वेळी मनाचेच ऐकले. मुसळधार पावसात बेधुंद भिजत राहिली. काहीवेळासाठी तिला जगाचा विसर पडला होता. मन कोल्हापुरात केव्हाचेच पोहचले होते. तो गरमागरम भज्यांचा सुगंध, तो वाफाळलेला चहा!

"सोना,अजूनही लहान आहात का तुम्ही? चला आत व्हा." आईसाहेबांचा कडक आवाज! आणि "लहानच आहे हो ती. भिजू द्या की. चला तुम्हीही आज पावसाचा आनंद घ्या." असे म्हणत त्यांना पावसात ओढणारे आप्पासाहेब! सगळे डोळ्यासमोर तसेच उभे! त्या सगळ्यांबरोबर पाऊसवेडा मोहनसुद्धा तिचा आठवणीतून समोर उभा ठाकला आणि ती तशीच पावसात स्तब्ध उभी राहिली.


"हॅलो! ओ मिस असे भिजायला हा काही पावसाळ्यातला पाऊस नाहीये. आजारी पडाल." आपल्या कारचा हॉर्न वाजवत तिच्यासमोर कार थांबवत मिहीर म्हणाला.

मोहनच्या आठवणीत ती आधीच हरवली होती त्यात मिहीर तिथे कारची काच खाली करून तिच्याशी बोलत होता त्यामुळे ती गोंधळली.

"मी तुमच्याशी बोलतोय. या अवकाळी पावसात भिजू नका. आजारी पडाल." त्याने पुन्हा हॉर्न वाजवून तिचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले. "या, कारमध्ये बसा. तुम्हाला कुठे जायचे तिथे मी सोडून देतो." तो.

ती अनिमिषपणे त्याच्याचकडे पाहत होती.

"अरे, तुम्हाला कारबद्दल कसे माहीत म्हणा. थांबा मी दरवाजा उघडून देतो." हात लांब करत तो म्हणाला.

ओलीचिंब ती, त्यातही तिला हसू आले. चेहऱ्यावर ओघळलेल्या त्या पावसातदेखील तिच्या गालावरची खळी त्याच्या नेत्रांनी नकळत टिपली.

"कार! आप्पासाहेबांच्या बंगल्यावर खास माझ्या दिमतीला एक नव्हे दोन- दोन कार उभ्या असायच्या." तिचे बोलणे कानावर तर पडले पण त्याला काहीच अंदाज आला नाही.

त्याच्याकडे पाठ फिरवून तिच्या मागून येत असलेल्या रिक्षाला हात दाखवून ती तशीच ओलेत्या अंगाने आत बसली आणि निघूनही गेली. तो मात्र तसाच तिथे थांबून होता. तिच्या गालावरची गोड खळी त्याला पुन्हा पुन्हा शैलीची आठवण ताजी करून देत होती.


'तीही हिच्यासारखीच! पाऊसवेडी.' त्याने मनातच तिला आणि हिला एकत्र बांधून पाहिले आणि कारची काच वर चढवून चेहऱ्यावर उडालेले तुषार पुसून तो पुढे निघाला.

***********

"बाई गं! किती ओली झालीहेस? थांब मोरीत कढत पाणी ठेवते. अंगावर पाणी घेऊनच आत ये." राधामावशीने आधीच गरम करून ठेवलेले पाणी आणि तिची साडी मोरीत नेऊन ठेवली. ती येईपर्यंत अद्रक टाकून चहा उकळून ठेवला. आपले आवरून सोनिया आत आली.

"माई.."
चिमुकली प्रीती तिच्या पायांना विळखा घालून तिला बिलगली. दिवसभराची तिची माई आत्ता कुठे तिला दिसत होती.

"माझं गं पिल्लू ते!" सोनियाने तिला उचलून कवेत घेतले.
राधामावशीच्या स्पेशल चहाने तिला तरतरी आली होती.

"कशी झाली मुलाखत?" मावशीने विचारले.


"काही नाही गं. त्यांना अनुभव असलेली उमेदवार हवी होती. त्यामुळे माझा नंबर तर केव्हाच कट झाला." ती हसून म्हणाली.


"ही नोकरी नाही मिळाली तरी हरकत नाही. तुला मुलाखतीचा अनुभव तर आला ना. तेवढेच ठीक." राधामावशीने तिच्या पाठीवरून हात फिरवून आत गेली. दहाच मिनिटांत गरमागरम भजी असलेली बशी घेऊन ती बाहेर आली.

"नोकरीचे बाजूला राहू दे. आधी ही भजी खा." राधामावशीचे प्रेमाचे शब्द आणि तो बशीतला सुगंध!
न राहवून तिने राधामावशीला मिठी मारली. त्या प्रेमळ मिठीत तिला आपण आपल्या लाडक्या आप्पा आणि आईसाहेबांच्या सानिध्यात आहोत असे वाटले.
:
क्रमश :
********

पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
********
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all