प्रीती पर्व दुसरे! भाग -८

सोनियाला हा जॉब मिळेल का?


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -आठ.


बारा वाजता मुलाखत म्हणजे घरून दहालाच निघायला हवे होते. निघताना सोबत लागणाऱ्या कागदपत्रांची फाईल तिने घेतली. चेहऱ्यावरून फिरवलेला पावडरचा हात, डोळ्यात काजळ. लांबसडक केसांचा वेणी गुंफुन सोडलेला शेपटा, अशा तयारीत ती घराबाहेर पडली.
जाताना राधामावशीने तिच्या कानामागे काजळाचे तीट लावले.

"नीट जा गं. ही नोकरी तुलाच मिळणार आणि नाहीच मिळाली तरी हताश होऊ नकोस." राधामावशी तिला सांगत होती.
तिने हसून होकार भरला.
हातात कागदपत्रांची फाईल अन चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास! तिलाच आज खूप भारी वाटत होते. ती रिक्शात बसली आणि नकळत कॉलेजचे दिवस तिला आठवले. तिला कॉलेजला जाण्यासाठी मुद्दाम दारात तैनात असलेली चारचाकी. आपल्या लाडक्या लेकीला दुःखाची छोटीशी झळदेखील कधी लागू नये म्हणून नेहमीच जपणारे आप्पा. मुलीच्या जातीने मुलीसारखे वागावे, जग खूप वाईट आहे त्या वाईट जगरहाटीत आपल्या सोनाने कधी चुकूनही पाय टाकू नये म्हणून घराण्याच्या इज्जतीला स्वतःच्या लेकरांपेक्षा जपणाऱ्या आईसाहेब तिला आठवल्या.

"मॅडम, तुमच्या पत्त्यावर आलोय आपण." रिक्शावाल्याने आरशातून तिच्याकडे पाहत म्हटले. आईसाहेब आणि आप्पासाहेबांच्या आठवणीने आक्रंदलेल्या मनाला शांत करत ती रिक्शातून खाली उतरली. त्याला पैसे देऊन ओठावर एक गोड हसू घेऊन ती मुलाखतीच्या ठिकाणी पोहचली.

तिचा आकर्षक चेहरा आणि त्यावरचा आत्मविश्वास पाहून तिथे आलेल्या उमेदवार मुलींच्या मनात एक अढी निर्माण झाली होती. तिथल्या मुलींनी चांगल्यातला चांगला पंजाबी ड्रेस परिधान केला होता. साडी नेसलेली ही एकटीच. त्यांनी मस्तपैकी चेहऱ्यावर मेकअप चढवून ओठावर लालीही रंगवली होती. साधीशी पावडर अन निसर्गत: गुलाबी ओठांचीही ही एकटीच होती. तिला तशा साध्याशा साडीत बघून त्या मुलींना हसत होत्या तर काही तिचे सौंदर्य बघून असुयेने तिच्याकडे बघत होत्या. त्यांच्यापैकी सगळ्या तिच्या पेक्षा जास्त शिकलेल्या आणि काही अनुभवी सुद्धा. त्यामुळे ही नोकरी आपल्याला मिळेल की नाही याची सांशकता तिच्या मनात निर्माण झाली होती.

मुलाखत सुरू झाली. तिथले एच आर. मॅनेजर स्वतः मुलाखत घेत होते. तिचा नंबर सगळ्यात शेवटी होता. मनात घालमेल सुरू झाली होती. कॉलेजच्या परीक्षेला कधी न घाबरणारी ती आता जराशी भांबावली होती.


एकेक उमेदवार मुलाखत देऊन बाहेर येत होते. मुलाखती पेक्षा मुलाखत घेणारा किती हँडसम आहे याबाबत त्यांच्या चर्चा रंगत होत्या. प्रत्येकीला त्याच्यासोबत काम करायचे होते. मग पगार थोडा कमी असला तरी काही फरक पडणार नव्हता.


ट्रिंग ट्रिंग..
रिसेप्शनवरचा फोन खणखणला.

"पूर्ण कॅन्डीडेट्स झालेत ना?" केबिनमधून सरांचा फोन होता.

"हो सर. फक्त एक कॅन्डीडेट उरली आहे." रिसेप्शनीस्टचे उत्तर.

"आत ये." त्याने रागात फोन ठेवला.

"इथे तर चौदा उमेदवारांचीच नावे आहेत. मग ही शेवटची एक कुठून आली?" तो तिच्यावर ओरडत होता. मुळात तो चिडका नव्हताच पण एकाही उमेदवाराची मुलाखत त्याच्या मनासारखी झाली नव्हती म्हणून तो चिडचिड करत होता.

"त्या मुलीने काल फोन केला. गरजू वाटली म्हणून मी तिला बोलावून घेतले." खाली मान घालून ती बोलत होती.

"मग तूच तिची मुलाखत घे. तूच बोलावले आहेस ना? आणि तसाही माझा मूड गेलाय." त्याचा चिडका स्वर कायम होता.

"सर..! तिच्या नजरेत अर्जव होते.

"ठीक आहे, एक कडक कॉफी आणि तिला पाठवून दे." तसा तिच्या ओठावर स्मित आले. "आणि ऐक, हे शेवटचे. ह्यापुढे असला आगाऊपणा केलास तर पहिले तुझी जागा रिकामी होईल. कळतंय का?"

"सॉरी सर." ती मान खाली घालून उभी होती.

"आता इथेच उभी राहणार आहेस का?" तो गरजला तशी ती बाहेर पळाली.

"सर मी आत येऊ का?" एक मंजुळ स्वर कानावर आला तसे त्याने समोर पडलेल्या फाईलमधून डोके वर केले. आतापर्यंत 'मे आय कम इन' ची सवय असलेल्या त्याने जराशा नाखुशीनेच तिला आत यायची खुण केली. आत्तापर्यंत पंजाबी ड्रेस मध्ये आलेल्या चौदाजणी आणि ही साडीतील काकूबाई सारखी एक. त्याच्या डोक्यावरची रेष अधिकच गडद झाली. मनातच त्याने तिला रिजेक्ट करून टाकले.

"शिक्षण काय तुमचं?" विचारावे म्हणून त्याने प्रश्न केला.
सोनियाने आपली फाईल पुढे केली. बी. कॉम. ती चांगल्या मार्कांनी पास झाली होती.

"कुठे काही अनुभव?" त्याने पुढचा प्रश्न केला. तिने नकारार्थी मान हलवली.

"सॉरी मिस. हा जॉब तुम्हाला मिळू शकणार नाही." तिची फाईल तिच्याकडे सरकवत तो म्हणाला.

"कारण कळू शकेल का?" कदाचित त्याला असा उलटा जबाब विचारणारी ती पहिलीच असावी कारण त्याच्या चेहऱ्यावर एक अढी स्पष्ट दिसत होती.

"ही माझी कंपनी आहे. कोणाला नोकरीवर ठेवायचे नि कोणाला नाही हे सर्वस्वी मी ठरवणार." काहीशा रागानेच तो बोलला.

"हो सर पण मला नाकारण्याचे कारण तरी कळू द्या ना." सोनिया आपल्या मुद्यावर ठाम होती.

"कारण ऐकायचेच तर सांगतो. तुमच्याकडे एकही अनुभव नाहीये. केवळ परीक्षेत चांगले मार्क्स असले तर चालत नाही ना? एवढी मोठी कंपनी चालवायला मला अनुभवी लोकं लागतात. गॉट इट? नॉऊ यू कॅन लिव्ह." दरवाज्याकडे बोट दाखवत तो म्हणाला.

"अनुभवी लोकांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यात कधीतरी पहिल्यांदाच काम केले असेल ना?" त्याच्या डोळयात बघत ती म्हणाली. तिच्या निळ्याशार डोळ्यात त्याने पहिल्यांदाच डोकावले. तिचा राग तर येत होता पण यावेळी त्याने स्वतःला कंट्रोल केले.
"तेव्हा त्यांना कुठला अनुभव असतो? इतरांचे सोडा. तुम्ही स्वतः एवढया मोठया कंपनीच्या मॅनेजरपदी आहात. तुम्हीसुद्धा कुठेतरी पहिल्यांदाच काम केले असेल की?" तिने थेट त्याच्यावरच बोट ठेवले.

"हॉऊ डेअर यू टू टॉक विथ मी लाईक धिस?" त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला. इतका वेळ कंट्रोल केलेला राग उफाळून आला होता.

"सॉरी सर, तुम्हाला राग यावा असा माझा हेतू नव्हता. बट इफ यू गिव्ह मी अ चान्स टू वर्क विथ यू, आय विल डेफिनेटली प्रूव्ह मायसेल्फ. नॉऊ डिसिजन इज युअर्स!" ती आपली फाईल घेऊन जायला उठली.

"वेट, मला सांगा कोल्हापूरहून नोकरीसाठी तुम्ही पुण्याला कशा आलात?"

"का? असा कुठे नियम आहे का की पुण्यात बाहेरच्या लोकांनी नोकरीसाठी येऊ नये?" त्याच्याकडे एक नजर टाकून तिने बाहेरचा रस्ता धरला. इतर मुली तिच्याकडे पाहतच होत्या. हिच्या हातून तर हा जॉब गेला मग कोणाची वर्दी लागेल याची सगळ्यांना उत्सुकता होती.

"गर्ल्स, हा जॉब कोणाला मिळाला ते दोन दिवसांनी तुम्हाला फोन करून पर्सनली कळवले जाईल. सो तुम्ही आता जाऊ शकता." शक्य तेवढ्या हसऱ्या चेहऱ्याने रिसेप्शनीस्ट सांगत होती. बॉसच्या नजरेत एकही उमेदवार आपली जागा बनवू शकली नाही हे तिला कळून चुकले होते.

डेस्कवरचा फोन पुन्हा वाजला तेव्हा जरासे धास्तावूनच तिने उचलला. "एक स्ट्रॉंग कॉफी!" पलीकडून आवाज आला तसे 'ओके सर' म्हणून ती लगबगीने उठली.


तिने कॉफी त्याच्या टेबलवर आणून ठेवली आणि त्याच्या बोलण्याची वाट न बघता बाहेर आपल्या जागेवर आली. तसेही त्या जमदग्निच्या तोंडाला कोण लागणार?

तो डोके हातात पकडून डोळे मिटून बसला होता. हा तो तोच होता. मिहीर नायकर. नायकर अँड ग्रुप्सचा एकमेव वारसदार. गोरापान, उंच, स्टायलिश. त्याच्यासोबत काम करायला मुलींची नुसती रिघ लागलेली. ऐन तिशीत त्याने वडिलांच्या बिझनेसला एका उंचीवर नेऊन ठेवले होते. अशा या उगवत्या ताऱ्याला सोनिया चॅलेंज करून गेली होती. '

काय तर म्हणे एक चान्स देऊन बघा, मी स्वतःला सिद्ध करून दाखवेन. अरे असे तर सर्वच बोलतात म्हणून का मी सगळ्यांनाच चान्स देत बसू का? त्यासाठी का ही कंपनी चालवतोय मी?'


त्याने आपले डोके आणखी गच्च आवळले. आताशा त्याचा अर्धशिशीचा (मायग्रेन) त्रास चांगलाच बळावला होता. त्यावर कॉफी घेतली की जरा बरे वाटे. डोके उठले की मग चिडचिड, समोरच्याला रागावणे काहीही होई म्हणून मग कॉफीची ऑर्डर आली की समोरचा स्टॉफ मेंबर जरा वचकूनच असे.

गटकण कॉफी गळ्याखाली रिचवून तो डोळे मिटून खुर्चीला रेलून बसला. कोणास ठाऊक का? पण त्याच्या बंद नजरेसमोर सोनियाचे निळेशार डोळे फेर धरत होते. अंगावरची गुलाबी साडी आणि त्याला मॅच होणारे तीचे गुलाबी ओठ उगाचच नजरेसमोर येऊ लागले. आणि तिच्याऐवजी दुसऱ्याच कोणाचा त्याला भास होऊ लागला.
ते निळे डोळे काळ्याभोर नयनात बदलू लागले. गोऱ्यापान चेहऱ्याऐवजी गव्हाळ चेहरा उमटू लागला. बाकी ओठांची गुलाबकळी तीच अन गालावर उमटलेली खळीही तशीच!
:
क्रमश:
*********
कोण होती ती? आणि सोनियाला मिळेल का हा जॉब? कळण्यासाठी वाचा पुढील भाग.

पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
********
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all