Feb 29, 2024
प्रेम

प्रीती पर्व दुसरे! भाग -५

Read Later
प्रीती पर्व दुसरे! भाग -५


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -पाच.

"मावशी, जेव्हा तू सोना म्हणतेस ना तेव्हा आप्पांची खूप आठवण येते गं. त्यांनाही माझी आठवण येत असेल का?"
राधामावशीच्या मांडीवर डोके ठेऊन ती मुसमूसायला लागली.

"शांत हो. प्रीतीला अजून तुझी गरज आहे. दोन एक महिने जाऊ दे. नंतर काय करायचे ते बघू. तोवर मी आहेच की. तुम्ही दोघी मला काही जड नाही." राधामावशी तिच्या केसातून अलगद हात फिरवत म्हणाली.

पुढली दोन महिने अशीच सरली. लोकांच्या सोनियाकडे विचित्र बघण्याच्या नजरा आणखीनच वाढल्या होत्या. त्या नजरांचा सामना करणे सोनियाला जड जाऊ लागले.


"मावशी, मला इथे नाही गं राहायचंय." एके रात्री ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली. "लोकांचा त्रास होतोय मला."


"पोरी, अशा लोकांपासून कुठवर दूर पळशील? जिथे जाशील तिथे ह्या नसल्या तरी अशा दुसऱ्या नजरा असतीलच की. तेव्हा इथे राहूनच त्यांचा सामना करायला शिक." राधामावशी.


"मावशी खरं तर ह्या नजरांना मी घाबरत नाही गं. पण आता इथे नको राहायला. इथे प्रत्येक क्षणी मोहनची आठवण मला छळत असते. ह्या वास्तूत, इथल्या प्रत्येक वस्तूत तो दिसतो. त्याचा जास्त त्रास होतोय मला." ती मनातले बोलली.

"पण.."

"आता पण नाही नि बिन नाही. मला असह्य होतेय सगळे. मावशी, मोहनचे माझ्यावर प्रेम आहे हे मला माहीत आहे पण हा दुरावा माझ्याच्याने नाही गं सोसवत. इथून मला तू घेऊन चल. कुठेही. माझ्या काळजाच्या तुकड्याला वाढवायला मी काहीतरी काम नक्कीच करेन. मोहनला यायचे असेल तर तो येईल, शोधेल मला. मी आयुष्यभर त्याची वाट बघेन. फक्त इथे राहायला नको. मला माझ्या आयुष्याची नवी सुरुवात करायची आहे." सोनियाच्या आवाजात एक दृढ निश्चय होता.


"ठीक आहे. तू म्हणशील तसं. एक लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक निर्णयात मी कायम सोबत आहे." राधामावशी तिच्या खांद्यावर विश्वासाचा हात ठेऊन म्हणाली.

"मावशी ह्याच विश्वासाने मला इथून बाहेर काढ ना गं. तुझ्यासोबत मी कुठेही येईन. इथे नको." तिचा स्वर पुन्हा ओला झाला.


"दोन तीन दिवस दे मला. मी करते काहीतरी सोय." राधामावशी तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली.


राधामावशीचा एक दूरचा भाऊ पुण्यात राहायचा. त्याला फोन करून तिकडे एखादी खोली बघायला तिने सांगितले. त्यानेही एक भाड्याची खोली पाहून दिली. नातेवाईकांनी तसेही तिला अव्हेरलेच होते त्यामुळे त्याने आपल्या घरापासून लांब अंतरावरची खोली शोधली. पुढे कधी तिच्याशी संपर्क नको हा हेतू होताच. मुंबईतील चाळीतील खोली किरायाची होती. आता मुंबई काय नि पुणे काय? भाडे तर दोन्ही ठिकाणी द्यावे लागणार होते. राधामावशीपाशी तिची थोडी जमापुंजी होती. त्यावर काही महिने आरामात निघाले असते पण पुढे काय? हा यक्षप्रश्न होताच. इथे कसेही चार घरी जाऊन ती भांडी घासायची तिथे नव्या शहरात लगेच कोण काम देणार होते?

सोनियावरच्या प्रेमाखातर तिने मुंबई सोडली अन दोघी पुण्यात दाखल झाल्या. ही खोलीसुद्धा मुंबईच्या खोलीसारखीच होती पण तिथल्यापेक्षा सोनियाला इथे बरे वाटत होते.

'सोबतीला मोहनच नाही तर या काळ्या मण्यांचा काय उपयोग?' असे म्हणून सोनियाने गळ्यातील मंगळसूत्र काढून टाकले.
खूप दिवसांनी आज मोकळा श्वास घेतलाय ह्या विचारानेच मनात एक नवी उभारी आली.


"इथे तर आपण आलोय, पण करायचं काय? कोण मला काम देईल?" राधामावशीने संकोचून विचारले. जवळ असलेली जमा रक्कम त्यांना अशी आणखी किती दिवस पुरणार होती?


"मावशी, सगळ्यात पहिले तू आता दुसऱ्यांची भांडी नाही घासायचीस. आपण काहीतरी नवा व्यवसाय सुरू करूया." सोनियाच्या डोळ्यात चमक होती.


"ह्या नवीन शहरात व्यवसाय कसा काय सुरू करायचा? आणि कोणता? भांडवलाचं काय?" राधामावशीची प्रश्नावली सुरू झाली.


"मावशी तुझ्या हाताला एक वेगळीच चव आहे अगं. तेच आपले भांडवल. इथे नाक्यावर सकाळच्या वेळी तुझ्या हातचा चहा विकूया."


"लोकांना आवडेल?"


"नक्की आवडेल. आणि दिवसभर कुठे दुकान थाटून आपल्याला बसायचे आहे? फक्त सकाळची दोन तास. हे सुरू तर करून बघू. काय म्हणतेस?"


राधामावशीला सोनियाची कल्पना पटली. दुसऱ्या दिवशी सकाळी खास आपल्या पद्धतीने बनवलेला जवळपास वीस कप चहा थर्मासमध्ये घेऊन ती चौकात आली. तिथे सकाळी सकाळी कामाला जाणारी मंडळी, कुणी ऑफिसात जाणारे, कोणी विद्यार्थी असे बरेचजण होते. कुणाच्या घरी जाऊन भांडी घासणे हे वेगळे आणि असं भर चौकात येऊन चहा विकणे वेगळे. तिला तिथे काहीसे ओशाळल्यागत होत होते. तासाभरातच ती परत आली. सोनिया तिची वाट बघत बसली होती.


"मावशी, आवडला का गं लोकांना चहा? पूर्ण विक्री झाली का?" उत्तर ऐकायला तिचे कान अधीर झाले.

'हो' म्हणून मावशीने मान तर डोलावली पण चेहऱ्यावर म्हणावा तसा आनंद नव्हता.

"का गं? काय झाले?" सोनिया.

"काही नाही गं. घराबाहेरच्या जगात जाऊन असे काम कधी केले नाही ना म्हणून जरा विचित्र वाटतंय." राधामावशी उत्तरली.

"मावशी माझ्यामुळे तुझ्यावर ही वेळ आली ना. मला माफ कर गं. एक काम करूया? उद्यापासून ना मी जात जाईन, मग तर चालेल ना?" सोनिया म्हणाली.


"वेडी का खुळी तू?" तिच्या तोंडावर हात ठेवत राधामावशी म्हणाली. अशा तरण्याताठ्या पोरीला चार लोकात चहा विकायला नाही पाठवायची मी. लोकांच्या नजरा खूप वाईट असतात. मुंबई काय नी पुणे काय, इथून तिथून सगळे पुरुष सारखेच. मी आहे तोवर तू घराबाहेर पडायचं सुद्धा नाहीस." राधामावशी तिला रागवत म्हणाली.


"मावशी, कसले ऋणानुबंध आहेत गं आपले? किती जपतेस तू मला?" सोनियाने तिच्या गळ्यात आपले हात गुंफले.


"अशी का बोलतेस? तुझ्यामुळे आईपण जगतेय मी. आई खंबीर असली तर ती आपल्या लेकरावर कोणतेच संकट येऊ देत नाही हे तुझ्याकडूनच तर शिकलेय गं. हं, आता या कामाची सवय नसल्यामुळे जरासं अवघडलेपण येतेय, पण काही दिवसांनी होईल सगळं नीट. तू नको काळजी करू. मी आहे ना?" तिच्या डोळ्यातल्या ममत्वाने सोनियाचा ऊर भरून आला.


"तू आहेस, या विश्वासावरच तर पुढचं पाऊल उचललेय. आता आपणच दोघी, एकमेकींसाठी." तिने राधामावशीला घट्ट मिठी मारली.
तेवढ्यात बाजूला निजलेल्या प्रीतीने सूर धरला.


"आपण दोघी कुठं? ही आहे ना आपली पार्टनर!" राधामावशीच्या बोलण्यावर सोनिया खुदकन हसली.


"सोना, अशीच हसत रहा. खूप गोड दिसतेस."

तिच्या चेहऱ्यावरून मावशीने मायेने आपला हात फिरवला अन मोहनच्या आठवणीने सोनियाच्या मनात काहूर दाटले. तोही नेहमी हेच म्हणायचा, 'हसत रहा!' आता मात्र तिच्या डोळ्यात पाणी हेलकावत तो निघून गेला होता. कुठे? तिला पत्ताही नव्हता.


हळूहळू राधामावशीची भिड चेपायला लागली. महिन्याभरात वीस कपाची पन्नास कपावर मागणी वाढली. जवळ थोडा पैसा खुळखुळायला लागला. तरी भाड्याच्या घरात एवढ्याने कुठे भागणार होते? पण म्हणतात ना की आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर पाऊल यशाच्या दिशेने आपसूकच वळतात. इथेही तसेच काहीसे घडणार होते.

एका सकाळी असेच चहाचा थर्मास घेऊन उभ्या असलेल्या राधामावशीपुढे एक चकचकीत चारचाकी येऊन उभी राहिली. त्यातून उतरलेला एक गोरागोमटा तिशीतला तरुण तिच्याजवळ आला. एखाद्या साहेबासारखा तो दिसत होता. राधामावशीला वाटले कोणीतरी मोठे साहेब असणार नी आपल्यावर ओरडणार. मात्र तसे काही झाले नाही.


"मावशी, एक कप चहा मिळेल काय?" सौम्यपणे त्याने विचारले. ती मात्र मठ्ठपणे उभी होती. एवढ्या दिवसात तिच्याकडून काही कामगार, कधी कॉलेजची मुलं फार फार तर चव चांगली असते म्हणून तेथील जवळचे विक्रेते चहा प्यायला यायचे. आज हे असे स्पेशल कार थांबवून चहा प्यायला आलेला पहिला गिऱ्हाईक तिला मिळाला होता त्यामुळे ती भांबावली.

"ओ मावशी, साहेब चहा मागत आहेत. लवकर दे की." त्याचा ड्राइव्हर बोलला तसे भानावर येऊन तिने लगेच एका कपात चहा ओतून त्याला दिला. ती चहाची चव त्याच्या जिभेला अगदी तृप्त करून गेली.

"तुम्ही इथेच चहा विकता की आणखी कुठे?" त्याच्या बोलण्यात एक अदब होती.


"नाही साहेब, इथेच विकते." तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ तसाच.


"ठीक आहे. माझी ऑर्डर घेणार का?" तो.

ती न कळून फक्त पाहत होती.

"सकाळी आठ वाजता पन्नास कप आणि सायंकाळी चार वाजता पन्नास कप." तो.


"काय साहेब, उगाच का मस्करी करता? एवढा चहा कोणाला लागतो?" ती.


"ए मावशी, तू यांना ओळखत नाहीस काय? हे मिहीर सर आहेत. केवढी मोठी कंपनी आहे यांची, माहीत नाही तुला?" ड्राईव्हर आश्चर्याने पाहून म्हणाला. तिने नाही म्हणून मान हलवली.


"मावशी, तुम्ही आपल्या घरीच चहा तयार ठेवा. मी ते घ्यायला माझा माणूस पाठवेन. चालेल ना?" मिहीर.


"मी माझ्या मुलीशी बोलते मग ठरवू." तिची ततपप सुरू होती.


"बरं, उद्या परत भेटूया. तुम्ही नक्की विचार करा." म्हणून तो कारमध्ये बसून निघून गेला.
.
.
क्रमश :

*********

पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
********
फोटो गुगल साभार.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//