Feb 29, 2024
प्रेम

प्रीती पर्व दुसरे! भाग -४

Read Later
प्रीती पर्व दुसरे! भाग -४
प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -चार."माई आज माझा वाढदिवस तसाच तुझाही आहेच की. मला तू नव्या जगात आणलेस त्या बरोबरच आईपणाच्या नव्या भूमिकेत तू गेलीस. एक आई म्हणून तुझा आज वाढदिवस! त्यासाठी हे स्पेशल गिफ्ट!"
सोनियाच्या डोळ्यावरील पट्टी सोडत ती हळुवार बोलत होती.

सोनियाने हलकेच डोळे उघडले, समोर जे होते ते बघून ती स्तब्ध झाली.

समोर होते एक सुंदर पोर्ट्रेट! प्रीतीने आपल्या नाजूक हाताने रेखाटलेली कलाकृती!

"प्रीती.." सोनियाच्या तोंडून अस्पष्ट उच्चारण बाहेर पडले. काही वेळापूर्वीच तर ती बोलली होती की तिला इमोशनल व्हायला जमत नाही पण या क्षणी मात्र डोळ्यात आभाळ दाटून आल्यागत झाले होते. "कुठे पाहिलेस याला तू? अगदी हुबेहूब कसे रेखाटलेस?" आवंढा गिळत तिने विचारले. तिथे उभी असलेल्या राधामावाशीच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते.

"माई, मी प्रत्यक्षात तर पाहिले नाही पण तुझ्या डोळ्यांच्या निळ्याशार समुद्रात कित्येकदा दिसलाय मला. लहानपणी तुझ्याकडून जेवढं ऐकलं ते मनाच्या कप्प्यात तसेच जपून ठेवले आहे. आठवते तुला? मी एकदा माझ्या बाबाचा फोटो दाखव म्हणून धरलेला हट्ट आणि तू दाखवलेला पासपोर्ट फोटो, आजही तसाच माझ्या स्मरणात आहे. त्यानंतर तू मला शपथ घातलीस की यापुढे कधीच बाबाबद्दल बोलायचे नाही. शहाण्यासारखे मीही ते ऐकले. तू त्याच्याबदल जेव्हा सांगशील तेव्हाच मी विचारेन हे स्वतःला पटवलं. पण माई जेव्हा कधी तुला पुरस्कार मिळतो, यशाची नवी पायरी तू चढतेस तेव्हा त्या आनंदाच्या क्षणी तुझ्या डोळ्यात तुझ्या मोहनच्या आठवणीने माजलेले काहूर प्रत्येकवेळेस बघितलेय मी. मिहीर अंकलनी तुला लग्नाची मागणी घातली तेव्हा तुझ्या मनात माझ्या बाबाशिवाय दुसरा कोणी कधीच असणार नाही हे सांगताना तुझ्या डोळ्यातील बाबाबद्दलचे प्रेम पाहिलेय मी. म्हणून आजच्या दिवशी तुला काहीतरी युनिक गिफ्ट द्यावे हे ठरवून बाबाचे रेखाटलेले चित्र तुला देत आहे. हा तुझा मोहन, तू हृदयात जपलेस अगदी तसाच!" बोलताना प्रीतीला भरून आले होते.


"मावशी, मी नेहमी म्हणते ना की आपली प्रीती मोठी झालीय. खरंच मोठी झालीय ती." प्रीतीला कवेत घेत सोनिया म्हणाली.


"आय प्रॉमिस यू, तुझ्या मोहनला नक्कीच शोधून काढेन मी." तिच्या मिठीत विसावत प्रीती म्हणाली.

सोनियाने तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि ती आपल्या खोलीत निघून गेली.

"राधाई, काय झाले? माई चिडली का गं?" प्रीतीच्या डोळ्यात काळजी होती.


"नाही गं, चिडेल कशाला? हं, तिचा भूतकाळ मात्र नक्कीच डोळ्यासमोर आला असेल. नको काळजी करू. काही होणार नाही. तेवढी खमकी आहे ती." तिला समजावत राधामावशी तिच्या खोलीत घेऊन गेली.

नेहमीप्रमाणे आजही झोपेने सोनियाची सोबत सोडली होती. उठून ती प्रीतीच्या आर्टरूम मध्ये गेली. प्रीतीने काढलेल्या त्या चित्रावरून तिने अलगद हात फिरवला. प्रीती आठ एक वर्षांची असताना तिने त्याचा पासपोर्ट फोटो दाखवला होता, अगदी तसेच तिने रेखाटन केले होते.

'माझा मोहन! खरंच कुठे आहे तो? मला भेटायला मुंबईला कधी आला असेल का?'

ह्या प्रश्नाने तिची नुसती तगमग होत होती. तिथून उठून ती गॅलरीत आली. समोर पौर्णिमेचा चंद्र शीतल चांदण्यात तिच्याकडे बघून हसत होता. तिचे मन तिला भूतकाळातील काळ्याकुट्ट काळोखात खेचून नेत होते.

तिला आठवला तिचा मोहन. त्याचा किती जीव होता तिच्यावर. त्याच्या प्रेमात नखशिखांत न्हाऊन निघालेली ती अन त्यांनतर प्रेग्नन्सीची आलेली पॉझिटिव्ह रिपोर्ट.

आईसाहेबांनी किती गदारोळ उठवला होता. घर किंवा तिचे बाळ एवढा एकच पर्याय तिच्यापाशी उरला होता तेव्हा तिने जन्माला न आलेल्या आपल्या बाळाला निवडले आणि एका क्षणात सर्व सोडून ती निघून गेली. जाताना शेवटचे आपल्या लाडक्या आप्पाना भेटूही शकली नव्हती.


मोहनसोबत तिचे मुंबईला जाणे, चाळीतला दहा बाय दहाच्या खोलीत थाटलेला संसार, त्याची नोकरी..! सारेच कसे डोळ्यासमोर कालच घडल्यासारखे उभे राहिले. राधामावशी त्याच चाळीत तर तिला भेटली होती. तिची सोबत मिळाली अन एके दिवशी गावी गेलेला मोहन कधी परतलाच नाही. संपूर्ण चाळ राधामावशीला पांढऱ्या पायाची म्हणत असे. खरंच ती पांढऱ्या पायाची होती का? तिचे सोनियाच्या आयुष्यात येणे आणि मोहनचे निघून जाणे यात काय संबंध? उलटपक्षी त्या कठीण दिवसात तिचीच तर साथ सोनियाला लाभली होती.

प्रीतीचा जन्म आठवला आणि सोनियाच्या डोळ्यात एवढा वेळ अडकलेला मोत्याचा थेंब गालावर आला. मोहन अजूनही परत आला नव्हता त्या टेंशनने वाढलेली बीपी आणि आणि तिची अकाली झालेली प्रसूती..! ते दिवस आठवून तिच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. दवाखान्यातून परत आल्यावर सोनिया आणि राधामावशी दोघींनीच मिळून त्या इवल्याशा पिल्याच्या नामकरणाचा घातलेला घाट. तेव्हा त्या कार्यक्रमाला चाळीतील कोणीही फिरकले नव्हते. दोघींनी मिळून त्या बाळाला पाळण्यात घातले. मोहन आणि तिच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून 'प्रीती' नाव ठेवले.

चिमण्या बाळाच्या आगमनाचा आनंद आणि मोहनच्या न येण्याचे दुःख! देव आणखी तिची किती परीक्षा घेणार होता?

एक दिवस अशीच टीपं गाळणाऱ्या तिच्याकडे राधामावशीचे लक्ष गेले. जवळ येऊन तिने सोनियाच्या डोक्यावर हात फिरवला.
"अशीच रडत राहिलीस तर कसं होईल? ह्या लहानशा लेकराला लागणाऱ्या भुकेचे काय? तुझ्या रडण्याच्या परिणामामुळे दूधसुद्धा कमी यायला लागले आहे." राधामावशी तिला समजावत होती.


"मावशी, मोहन कधीच परत येणार नाही का गं? ही चिमणी आता तीन महिन्यांची होईल. इतक्या दिवसात का आला नाही तो?" डोळे पुसत सोनियाने विचारले.


"तू स्वतःलाच विचार ना पोरी. तुला कधी असे वाटले का की तो तुला फसवेल?" राधामावशीने सौम्यपणे तिला विचारले. त्यावर तिने केवळ नाही म्हणून मान हलवली पण तो असा का वागतोय याचा मेळ कधी लागलाच नाही.

पुढच्या आठ दिवसांनी तिच्या नावाची मनिऑर्डर आली. हे नेहमीचेच होते. गेल्या चार महिन्यापासून मोहन आला नसला तरी सोनियाच्या नावाची मनिऑर्डर मात्र न चुकता येत होती. आजही ती आली. पोस्टमनजवळच्या कागदावर सही करून हातातील पैसे तिने मोजून घेतले. एखादी चिट्ठी किंवा पत्ता काही काहीच नव्हते सोबतीला. ते बघून पुन्हा डोळ्यात पाणी आलेच. बाहेरच्या बायका तिच्याकडे बघून कुजबुताना तिने ऐकले आणि दाटलेल्या हुंदक्याने हातातील पैसे खोलीतील बिछान्यावर फेकले.

"पैसे असे फेकू नयेत बाय. लक्ष्मी आहे ती." राधामावशी विखूरलेल्या त्या चार नोटा गोळा करत म्हणाली.


"मावशी, त्याला काय वाटते? त्याने पाठवलेल्या पैशांवर मी जगेन? तो नसेल तर मला हा पैसाही नकोय. मी माझं बघून घेईन." ती रडत होती.


"सोना, शेवटी सगळं पैशावरच येऊन थांबतं गं. जवळ पैसा नसेल तर काय करशील तू? कुठून आणशील? ह्या पोरीसाठी लागतोच ना? तिचा दवाखाना, औषधं.. कसे करशील?" राधामावशी तिला समजावत होती.


"पण म्हणून मी अशी कोणाच्या पैशांवर जगू शकत नाही गं मावशी. हे इथं असं राहायचं, महिन्याची मनिऑर्डर घ्यायची, किती विचित्र वाटतं गं सगळं. चाळीतल्या बायकांची नजर बघितलीस? सगळ्या कशा बघतात माझ्याकडे. मला नाही सहन होत गं हे." सोनिया.


"मग तुझं म्हणणं तरी काय आहे? पोस्टात जावून काही माहिती मिळते ते बघायचं का? की कोल्हापूरला परत जायचा विचार आहे?" राधामावशी तिच्याकडे प्रश्नार्थक पाहत होती.


त्यावर ती खिन्नपणे हसली. "कोल्हापूर केव्हाचेच सुटलेय मावशी. तिथे आता मी कधीच जाणार नाही गं. पोस्टात सुद्धा मागे जाऊन आलोच की. आपल्याला येणारी मनिऑर्डर कोल्हापूरहून येतेय, एवढंच तर कळलं होतं." ती.


"मग काय करणार आहेस पोरी?" राधामावशी.


"मावशी, तू तिकडे कामाला जातेस ना, मलाही कामाला लावून दे की. चार घरी मीसुद्धा भांडी घासत जाईन." सोनिया.


"काय बोलतेस बाळा? एवढ्या मोठया उद्योगपतीची मुलगी भांडी घासणार? नाही गं, मी तुला हे करू देणार नाही. हवे तर मी आणखी दुसऱ्या चार घरी काम बघेन पण तुला असे काही करू देणार नाही." राधामावशी.


"मावशी, उद्योगपतीची मुलगी होते गं, आता या चिमुकलीची आई आहे. जिच्यासाठी मी माझ्या जन्मदात्याचे घर सोडले तिला अशा कोणाच्या भिकेच्या चार पैशावर नाही गं वाढवणार आणि कामाची लाज कशाला गं? कोणतेही काम लहान नसते अगं." रडणाऱ्या प्रीतीला छातीशी लावत ती म्हणाली.


"कोणी नाहीए गं बाई तो. तुझ्यावर प्रेम करणारा, तुझ्या लेकीचा बाप आहे तो. तुझा मोहन आहे तो आणि त्याची मदत नको असेल तरी मी अजून जिवंत आहे. सोना, माझी लेक आहेस गं तू. तुला अशी दुसऱ्याच्या दारात भांडी विसळायला मी नाही जाऊ द्यायची."


"मावशी, जेव्हा तू सोना म्हणतेस ना तेव्हा आप्पांची खूप आठवण येते गं. त्यांनाही माझी आठवण येत असेल का?"
राधामावशीच्या मांडीवर डोके ठेऊन ती मुसमूसायला लागली.
.
.
क्रमश :
********
काय वाढून ठेवले होते सोनियाच्या आयुष्यात. वाचा पुढील भागात आणि तोवर हा भाग कसा वाटला ते कळवा.

पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
********
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//