प्रीती पर्व दुसरे! भाग -२

प्रीतीच्या वाढदिवशी सोनियाने केलीय एक खास अनाउंसमेंट!


प्रीती पर्व दुसरे!
भाग - दोन.


मावशी, मिहीरला मी आवडत असेल. कदाचित मलाही तो आवडत असेल पण हे आवडणे वेगळे आहे गं. हे प्रेम नव्हे. किमान माझ्या बाजूने तरी नाहीच नाही. खरे प्रेम एकदाच होते अगं. जे प्रेम मोहनसाठी होते, दुसऱ्या कोणासाठी कधीच वाटणार नाही."


"बरं बाई, चुकले माझे. झोप तू." राधामावशीने तिच्या केसातून पुन्हा हात फिरवायला सुरुवात केली.


"ओए गर्ल्स गँग, एक कॅन्डीडेट कमी असताना तुम्ही चंपी प्रोग्राम कसा सुरू केला हं? राधाई, इट इज नॉट फेअर!" आपल्या खोलीतून बाहेर येत प्रीती म्हणाली.


"अगंबाई, तुही जागीच आहेस होय? ये तुलाही मस्त मालिश करून देते." हातावर तेल घेत राधमावशी म्हणाली.


"आहाहा! आता कसं मस्त वाटतंय. राधाई तुझ्या बोटात काय जादू आहे गं. एकदम दुसऱ्या जगात गेल्यासारखं वाटतं." प्रीती म्हणाली त्यावर राधामावशी हसली.


"हो ना? मग दुसऱ्या जगाची सैर करून ये. तोवर मी आणि मावशी झोपायला जातो." सोनिया.

"नाही. मी या जगात परत आले. तुम्हा दोघींशिवाय मी एकटी कशी जाणार ना?" ती नाटकीपणे म्हणाली.


"नौटंकीपणा सुरू झालाय." तोंडाला पदर लावून राधामावशी हसायला लागली.


"राधाई, तू हसू नको गं. ए माई, कसली अनाउंसमेंट करणार आहेस ते सांग ना." ती आपले निळे डोळे सोनिया कडे वळवत म्हणाली.


"अच्छा! त्यासाठी मस्का पॉलिश सुरू आहे तर! ये तुझ्या कानात सांगते." असं म्हणून सोनियाने तिचा कान ओढला.
"हे सरप्राईज ना तुझ्या वाढदिवसालाच सांगणार आहे." ती हळूच तिच्या कानात म्हणाली.


"माई ऽ, काय गं हे?" ती खट्टू होत म्हणाली.


" सरप्राईज इज सरप्राईज. मध्येच कसे सांगू? चला गुडनाईट." सोनिया जायला उठली.


"राधाईऽऽ!" प्रीती आशाळभूत नजरेने तिच्याकडे पाहत होती.

राधामावशीने खांदे उडवले.

"तुही तिच्याच गोटात सामील आहेस ना? तुम्ही दोघी मिळून मला बिचारीला एकटं पाडलंत ना?" ती खोटं खोटं रडायला लागली.


"तसे नाही गं. पण ते काय म्हणतात ना? हां, बॉस इज अल्वेज राईट. तसे आहे. " राधामावशी.


"ती बॉसागिरी ऑफिसमध्ये. इथे माझी माई आहे ना गं." प्रीती.


"हो, पण जिद्दी आहे ना. एकदा जे बोलणार तेच करणार." राधामावशी.


"जिद्दी? खडूस आहे ती. एक नंबरची हट्टी आहे." प्रीती जराशा चढया आवाजात म्हणाली.


"त्या हट्टामुळेच तर ती हे साम्राज्य उभे करू शकली ना? प्रीती,तू भाग्यशाली आहेस तुला अशी आई मिळाली." राधामावशी तिला गोंजारत म्हणाली.


"हं ते तर आहेच. माझी माई आहेच मुळी जगावेगळी. आय एम व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ हर!" ती म्हणाली.


"हं, माझे गुणगान गाऊन झाले असतील तर दोघीही झोपायला जा." आतून सोनियाचा आवाज आला.


"बघितलं कशी खडूस आहे तर? स्वतःच कौतुक सुद्धा ऐकू शकत नाही." प्रीती.


"मला सारं ऐकू येतंय." सोनिया.


"मी झोपायला गेलेय. राधाई एकटीच इथे आहे." म्हणत प्रीती आपल्या खोलीत गेली.


"जगावेगळ्या मायलेकी आहेत रे. खूप चांगल्या आहेत. पांडुरंगा,दोघींना असेच आनंदी ठेव." देव्हारातल्या विठ्ठलाकडे पाहून राधामावशीने हात जोडले आणि तिही झोपायला गेली.

******

"हॅपी बर्थडे प्रिन्सेस!" सकाळी सहा वाजता प्रीतीच्या माथ्यावर ओठ टेकवत सोनियाने तिला शुभेच्छा दिल्या.


"माई, एवढया पहाटे कोणी उठवतं का गं?" आळसावलेल्या आवाजात प्रीती म्हणाली.


"पहाट? बाईसाहेब सकाळचे आठ वाजलेत. चला उठा आता." एक फटका देत सोनिया.


"आऊच! बड्डे गर्लला असं कोणी मारतं का?" उठून बसत ती. " हे सरप्राईज होतं का माझ्या वाढदिवसाचं?" लटक्या रागाने ती.


"गप गं. आज तुझा दिवस आहे. तुझे मित्र मैत्रीण, पार्ट्या, पार्लर.. सगळं सगळं आटोपून बरोबर सातच्या ठोक्याला तू मला एनडी हॉटेलमध्ये हवी आहेस." सोनिया.


"हे काय गं माई, तू तर टिपिकल सातच्या आत घरात सारखी म्हणते आहेत." प्रीती.


"सातच्या आत घरात नव्हे, सात वाजता हॉटेल मध्ये बोलावत आहे." राधामावशी आत येत म्हणाली.
"वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!" अंगणात फुललेला पारिजात तिच्या ओंजळीत रिचवत ती म्हणाली.


"थँक यू सो मच राधाई!" तिने नाकाजवळ ओंजळ नेऊन मन भरून तो सुगंध श्वासात भारला.
आहाहा! या सुगंधाने सकाळ कशी अगदी प्रसन्न झालीय. थँक यू गर्ल्स फॉर लवली बर्थडे विश! मी आवरून आलेच."
म्हणून ती उठली. थोडं थांबून दोघींचीही पप्पी घेत बाथरूम मध्ये पळाली.


"ईऽऽ! नीट ब्रश करून ये गं." सोनिया जोरात म्हणाली, त्यावर राधामावशीला हसू आले.

"अतिलाडाने ना डोक्यावर चढवून ठेवले आहेस तू हिला." बाहेर येत सोनिया.


"असू दे गं, लहान आहे ती." तिच्यासाठी कॉफी घेऊन येत राधामावशी.


"लहान? अगं आज ती पंचेवीस वर्षांची.."

"मुलं कितीही मोठी झाली तरी लहानच वाटतात. मला तर असंच वाटते की आत्ताच तर जन्माला आली ही आणि लगेच मोठी सुद्धा झाली. तिच्या पहिल्या स्पर्शाने झालेला आनंद आणि मनाची घालमेल अजूनही तशीच आहे. तो क्षण असा हृदयात अगदी पक्का होऊन बसलाय गं." सोनियाचे बोलणे मध्येच थांबवत राधामावशीम्हणाली. तिचा आवाज हळवा झाला होता.


"कम ऑन गर्ल्स! नो मेलोड्रामा प्लीज. टुडे इज माय स्पेशल डे."
त्यांच्यात सामील होत प्रीती.

"राधाई, माझी वाढदिवस स्पेशल डिश आण ना गं. जाम भूक लागलीय." राधामावशीच्या गळ्यात हात गुंफत ती.


"हो आणतेच. आधी देवाला नमस्कार तरी कर." राधामावशी.


"माझा देव तर नेहमी माझ्या पाठीशी असतो. आजच काय तेवढा नमस्कार करायचं? पण तू म्हणतेस तर करते."
असं म्हणून ती उठली. सोनियाच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली.


"माई, नमस्कार करू दे." ती.


"अगं, देवाला नमस्कार करायचा असं सांगितलंय." सोनिया.


"तेच तर करतेय. जगात देव आहे की नाही माहीत नाही पण माई माझ्यासाठी तर तू खरी देवता आहेस. तुझ्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ मिळालाय. लव्ह यू सो मच!" तिला नमस्कार करून घट्ट मिठी मारत प्रीती म्हणाली.


"लव्ह यू टू बेटू!" तिच्या माथ्यावर ओठ टेकवत सोनिया.


"हं, हं! मी राहिलेच की." प्रीतीकडे बघत राधामावशी.


"राधाई तू तर माझी जान आहेस, पण माई म्हणजे माझा जीव आहे गं." मावशीला मिठी मारत प्रीती. "लव्ह यू जान!"

"मी जान?आणि तुझी माई म्हणजे जीव होय? वा गं. आम्हा दोघींना एकाचवेळी बटर आणि लोणी लावतेस होय." तिचे कान खेचत राधामावशी.
तशा तिघीही खळखळून हसल्या.

"चला माझ्या लेकराला भूक लागलीय ना? मी खायला आणते." असे म्हणून राधामावशी स्वयंपाकघरात गेली.

******

हॉटेल एनडी! आज खास सजवलेले होते. सोनियाने संपूर्ण हॉटेल बुक केले होते. तिच्या लेकीचा आज पंचेवीसावा वाढदिवस. तिच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय दिवस! आजही त्या दिवसाच्या आठवणीने तिच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. कितीही विसरायचे म्हटले तरी काही आठवणी विसरता येणं शक्य नसतात तसेच सोनियाचे झाले होते.

टेबलवर ठेवलेला भलामोठा केक, आजूबाजूची रोषणाई, तिथे जमलेले आमंत्रित सर्वांच्या नजरा एकाच व्यक्तीसाठी आतुरल्या होत्या. ती होती आजची मुख्य आकर्षण.. प्रीती!

बरोबर सातच्या ठोक्याला सोनिया स्टेजवर आली. गर्द निळ्या रंगाच्या साडीत तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते. तिला बघून मिहीरच्या ओठावर आपोआप एक छानसे हसू उमटले. सोनियाने ईशारा केला तसे राधामावशी प्रीतीला घेऊन आली. नेहमी वेस्टर्न कपड्यात वावरणारी प्रीती आज चक्क साडी नेसून होती. केसांना केलेले कर्ल्स. गालावर पिंगा घालणाऱ्या एक दोन अवखळ बटा. गर्द जांभळ्या साडीत उजळून निघालेले तिचे आरस्पानी सौंदर्य! दोघी जवळ उभ्या होत्या तेव्हा मायलेकींपेक्षा बहिणीच जास्त वाटत होत्या. 'हॅपी बर्थडे टू यू!' च्या गजरात तिने केक कापून सोनियाला पहिला घास भरवला आणि त्यानंतर दुसरा घास राधामावशीला.

वेलकम ड्रिंक, केक त्यानंतर स्टार्टर. सर्व खाण्याचा आस्वाद घेत होते.

"इथे जमलेल्या समस्त प्रियजनहो."

सोनियाने माईक हातात घेतला तसे सगळ्यांचे तिच्याकडे लक्ष वेधले गेले.

"माझे निमंत्रण स्वीकारून आपण सर्व इथे आलात त्याबद्दल सर्वांचे आभार! ही पार्टी म्हणजे आपल्या बिझनेसची सक्सेस पार्टी आहे. तुम्हा सर्वांशिवाय या यशाची मी कल्पनाही करू शकले नसते."


"डाऊन टू अर्थ पर्सनालिटी!" गर्दीतून एकजण कोणीतरी कुजबुजले.


"शिवाय पार्टीला माझी लेक प्रीतीच्या वाढदिवसाची जोड लाभलीय. त्या अनुषंगाने मला आज एक घोषणा करायचीय."
ती काय बोलतेय हे ऐकण्यासाठी सर्वांचे कान आतूर झाले होते.

"आपल्या कंपनीचे एचआर मॅनेजर मिस्टर पाटील नुकतेच रिटायर्ड झालेत तेव्हा त्या पदासाठी मी प्रीतीची निवड केलीय. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही सर्वांनी तोच विश्वास ठेऊन तिला सहकार्य करावे ही अपेक्षा आहे." प्रीतीचा हात हातात घेत ती म्हणाली.

तिच्या निर्णयाचा विरोध करण्याचे कोणालाच धाडस नव्हते कारण ती चुकीचे निर्णय घेणार नाही हे सर्वांना ठाऊक होते. टाळ्यांच्या गजरात सर्वांनी प्रीतीचे स्वागत करून करून सोनियाच्या म्हणण्याला दुजोरा दिला. चहूबाजूने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. ती हसून शुभेच्छा स्विकारत होती पण माईच्या अशा अचानक आणि अनपेक्षित घोषणेने तिला आश्चर्यासोबत रागही आला होता.
.
.
क्रमश:
**********
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )


*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
********

🎭 Series Post

View all