प्रीती पर्व दुसरे! भाग -१८

प्रीतीला सोनियाच्या अपघाताबद्दल कळलेय. काय होईल पुढे??
प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -अठरा.

'हे काय? तिचा चेहरा माझ्यासारखा का दिसतोय? अरे! ही तर मीच आहे! बालपणीची मी. म्हणजे? उभे असलेले ते आप्पा आणि आईसाहेब?'
तिच्या मनीचे सारे खेळ अन डोळ्यासमोर झळकणारे तिचे लाडके आप्पा.

"आप्पाऽऽ.."
तिच्या तोंडून अस्पष्ट किंकाळी बाहेर पडली. ब्रेक दाबताना कार रस्त्याच्या विरुद्ध कलली होती आणि कडेला असलेल्या मोठया झाडाला जोरात धडकली होती.
*******

"राधाई, आता हे पुरे झाले हं. पाच वेळा कॉल करूनदेखील माई उचलत नाहीये." घरी प्रीतीची चिडचिड सुरू होती.

"अगं बाई, ती कामात असेल. काम झाल्यावर स्वतःच तुला फोन करेल की नाही ते बघ." राधामावशी तिच्या हातात चहाचा कप देत म्हणाली.

"अगं पण तासातासाला अपडेट देत राहायचं म्हणून आमचं ठरलं होतं ना." चहाचा घोट घेत प्रीती.

"वेडाबाई, ते कोल्हापूरला जाताना ठरलं होतं. कोल्हापूर फिरताना नाही." तिच्या डोक्यावर टपली मारून राधामावशी म्हणाली.

"हो, अगं ते ठीक आहे. पण आता एकतरी फोन तिने करायला हवा ना. ती सोबत नसली की बघ कशी सैरभैर झाल्यासारखं होतं मला." ती खट्टू झाली होती.
"आणि तूच सांग. कॉन्फरन्स झाली, सगळं आटोपलं. आता ती कोणत्या कामात गुंतली असेल? त्या अनोळखी कोल्हापूरात कसलं काम काढलंय तिने?"

"आहे एक काम. तुमचा बिझनेस, मिटींगा, कॉन्फरन्स.. या सगळ्यापेक्षा खूप महत्त्वाचे काम आहे तिला." राधामावशी तिच्याकडे बघत म्हणाली.

"राधाई? तुमचं सिक्रेट आहे? माई कोणत्या कामाला गेलीये हे तुला माहिती आहे ?" प्रीतीचे प्रश्नावर प्रश्न विचारणे सुरू झाले.

"हम्म! पूर्णपणे नाही पण ठाऊक आहे मला." राधामावशी हसली खरी इकडे प्रीती मात्र जाम चिडली.

"असं गं कसं? घरात आपण इन मिन तीन माणसं आणि तरीही तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवत असता?" तिचा नाकाचा शेंडा लाल झाला.

"अगं माझी लाडोबा! लगेच चिडलीस तर? नाक बघ कसं लाल झालंय." राधामावशी स्मितवदनाने बोलत होती.

"राधाई.."

"बस! केवळ आजचचा दिवस वाट बघ. कोल्हापूरहून परत आल्यावर सोनिया स्वतःच तुला सारं काही सांगणार आहे." तिच्या लाल नाकाच्या शेंड्याला हात लावत राधाई.

"नाही. मला आत्ताच जाणून घ्यायचे आहे. तुम्ही दोघी माझ्यापासून बरंच काही लपवत असता असं दिसतेय." तिने हातात मोबाईल घेऊन कानाला लावला. "परत तेच. रिंग जातेय पण ती उचलतच नाहीये."

"ही एक गोष्ट सोडली तर आमचं काहीच सिक्रेट नाही बरं." राधामावशी तिच्याकडे खोटेखोटे डोळे मोठे करून म्हणाली. "आणि तिचे काम झाले की ती स्वतःच फोन करेल. सोनप्रीतची बॉस आहे ती. शब्दाला जागणारी. एकदा जर बोलली तर कधीच शब्द फिरवणार नाही."

"अरे बापरे! राधाई, माईसाठी एकदम लगेच स्टॅंड घेतेस हं तू. आवडलं मला. तुमच्या दोघींचे हे नाते असेच राहू दे." तिच्या गळ्यात हात गुंफत प्रीती म्हणाली. तसा राधामावशीचा राग जरा निवळला.

"तसं नाही गं. पण सोनियाकडे कोणी चुकीचे बोट दाखवले तर मला नाही सहन होत. मग ती तिचीच मुलगी असेल तरीसुद्धा!"

"हो गं माझे आजी. मलादेखील माझ्या माईला कोणी काही म्हटलेलं आवडत नाही." राधामावशीचा गालगुच्चा घेत प्रीती म्हणाली. "राधाई.. ऐक ना तरी सुद्धा माईला एक कॉल करून बघू का?"
तिच्या अशा निरागसपणे विचारण्यावर ती हसली. चेहऱ्यावरच्या सुरुकुत्या रुंदावल्या.

"कर बाई. तू तुझ्या माईशी बोलल्याशिवाय राहू शकतेस होय? पण हा शेवटचा कॉल हं. आत्ताही जर उचलला नाही तर मग मात्र तिच्या फोनची वाट पाहायची."

"ओके!" म्हणत तिने परत मोबाईल हातात घेतला. ह्यावेळेस देखील रिंग वाजत होती आणि आता कॉल कट होणार त्या शेवटच्या क्षणाला रिसिव्ह झाला.

"हॅलो माई.. काय गं हे? केव्हाची कॉल करतेय. तू उचलत देखील नाहीयेस. तुझे काम झालेच नाही का? परत केव्हा निघणार आहेस? तुझी खूप आठवण येत आहे गं. तू इथे नाहीस तर.."

"हॅलो वेट वेट. जरा थांबता का? मला बोलायचे आहे." प्रीतीचे बोलणे मध्येच थांबवत पलीकडून एक पुरुषी आवाज आला.

"हॅलो! कोण बोलतंय? मी तर माईला कॉल केला होता. रॉंग नंबर लागला का?" ती जराशी गोंधळली.

"नाही, रॉंग नंबर नाहीये. तुम्ही प्रीत बोलत आहात का?" त्याने विचारले. सोनियाच्या मोबाईलमध्ये तिचा नंबर प्रीत या नावाने सेव्ह होता. स्क्रीनवर त्याने तेच नाव वाचले होते.

"हो, मी प्रीत.. आय मिन प्रीती बोलतेय. माझी माई कुठे आहे? आणि तुम्ही कोण बोलत आहात? माईचा मोबाईल तुमच्याकडे कसा?" तिच्या छातीची धडधड वाढली होती.

"काय झालंय गं?" तिचे बोलणे ऐकून राधामावशीने जवळ येत विचारले. प्रीतीने खुणेनेच तिला शांत बसायला सांगितले आणि ती पलीकडचे बोलणे ऐकू लागली.

"हे बघा, असे एकदम हायपर होऊ नका. मी इन्स्पेक्टर जाधव बोलतोय. मॅडमचा ॲक्सिडेंट झालाय. त्यांना कोल्हापूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे."

"ॲक्सिडेंट..? इन्स्पेक्टर काय बोलताय? माझ्या माईला काही झाले तर नाही ना?" तिचा स्वरात भीती होती.

"हे बघा, त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे. ॲक्सिडेंटची केस असल्यामुळे आम्हाला यावे लागले. तुम्ही लगेच येऊन जा."

"अं? हो. हो. मी लगेच येते." कापऱ्या आवाजात ती बोलत होती.

"मॅडम, असे पॅनिक होऊ नका. सगळं ठीक होईल. बाय द वे, तुम्ही कुठे असता?"

"पुणे. पुण्याहून बोलतेय मी आणि लगेच निघत देखील आहे."

"ओह! बरेच लांब आहे की. पण डोन्ट वरी. हॉस्पिटलचा स्टाफ त्यांची काळजी घेईल. डॉक्टर आले की तुमच्याशी बोलायला लावेल मी. घाबरू नका."

"हम्म." ती मटकन खाली बसली.

"प्रीती, माझा जीव घाबरतोय. काय झाले सोनियाला?" राधामावशीच्या डोळ्यात पाणी होते.

"अगं काही नाही. छोटासा अपघात झालाय. बाकी काही नाही." आपले अश्रू लपवत ती म्हणाली.

"मग ती का बोलली नाही? आणि पोलीस? पोलीस का होते तिच्यासोबत?" राधामावशी.

"राधाई, वेडीच आहेस तू. तिच्यावर उपचार सुरू असताना कशी बोलेल ती? आणि ॲक्सिडेंटल केस असल्यामुळे पोलीस होते. बाकी काही नाही. तू शांत हो. मी कोल्हापूरला जायची तयारी करते."

"प्रीती तू एकटी कुठे निघालीस? मीही सोबत येते आणि आधी मिहीरला फोन करून सांग बघू."

"राधाई अगं तू कुठे येतेस? तू घरी थांब. मी मिहीर अंकलला कॉल करते."

प्रीतीच्या फोन ने मिहीर तडकाफडकी त्यांच्या घरी निघून आला. त्याने इमरजन्सी फ्लाईटची तिकिटं देखील बुक केली.

"मिहीर, मला तुमच्या सोबत यायचे आहे. ती कशी असेल याची खूप भीती वाटतेय रे."

"मावशी तुमची काळजी कळतेय मला. आम्ही तिथे गेलो आणि तशी गरज भासली तर समीर तुम्हाला घ्यायला येईल."
त्याच्या बोलण्यावर ती गप्प झाली.

"राधाई, तुझ्या मनाची अवस्था मी समजू शकते गं. अंकल एक काम करूयात आपण पुढे निघू. राधाई तू आणि समीर कारने निघा. चालेल ना?" तिच्या बोलण्यावर राधामावशीने हुंकार भरला.
*******

पुण्याहून निघताना प्रीतीचे डॉक्टरांशी बोलणे झाले होते. नेमके किती लागलेय हे त्यांनी तिला सांगितलेच नाही. मात्र जेवढ्या लवकर येणे शक्य होईल तेवढ्या लवकर या असा निरोप मात्र दिला.

तिथे पोहचेपर्यंत तिचा जीवात जीव नव्हता. माई आपल्याशी बोलली नाही म्हणजे नक्कीच तिची स्थिती चांगली नाहीये हे तिच्या लक्षात आले होते. जोपर्यंत माईचा चेहरा दिसत नाही तोपर्यंत तिने डोळ्यातील अश्रुंना आवर घातला होता.
मिहीरची अवस्था सुद्धा वाईट होती. वरवर दाखवत नसला तरी मनातून मात्र तोही काळजीत बुडाला होता. इतकी वर्ष कोल्हापूरला जायला टाळणारी ती आत्ताच जाते नि तिचा अपघात होतो हे मनाला पटत नव्हते.

त्याने एकवार प्रीतीकडे पाहिले. ती शांतपणे बसली होती. डोळ्यात बरेच प्रश्न, हृदयात कालवाकालव आणि तरीही ती स्थिर होती. आतापर्यंत चिमूरडी असणारी ही अचानक कशी काय मोठी झाली? दिवसभर चिमणीसारखी चिवचिव करणारी, माई माई करत राहणारी प्रीती एकदम समंजस भासत होती. एक अवाक्षरही न बोलता त्याने डोळे मिटले. डोळ्यातील थेंब अलगद निखळलाच. प्रीतीच्या ते ध्यानात आले. तिने आपला हात मिहीरच्या हातावर ठेवला तसे त्याने डोळे उघडले.

"डोन्ट वरी अंकल! माई विल बी फाईन!" एक कोरडे हसू ओठावर आणून ती म्हणाली.

"या! शी विल बी फाईन. तिला काहीच होणार नाही." तिच्या हातावर त्यानेही हात ठेवला.

'खरंच प्रीती मोठी झालीय. या क्षणी मी तिला सावरायचे तर तीच मला धीर देतेय. सोनिया आय एम सॉरी यार! का तुला एकटीला मी जाऊ दिले?' त्याने परत डोळे मिटून घेतले.

उसणे अवसान आणून प्रीती मिहीरला समजावत होती खरी पण आतून तीही कोलमोडलीच होती. आजवर देवाच्या पहिले तिने सोनियाला नमस्कार केला होता. तिचा देव म्हणजे तिची माई होती. आज मात्र मनात देवाचा धावा चालला होता. तिचे हे उसणे अवसान तिच्या माईला तारून नेणार होते की या अवसानाने प्रीती पूर्णपणे गळून जाणार होती हे कोल्हापूरला पोहचल्यावरच कळणार होते.

..आणि विमान एकदाचे कोल्हापूरला लँड झाले. प्रीतीचे देवाचे नामस्मरण अधिकच वाढले.
:
क्रमशः 
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.

🎭 Series Post

View all