प्रीती पर्व दुसरे! भाग -१७

सोनियाला कळणार एक भयानक सत्य. कशी सावरेल ती स्वतःला??

प्रीती.. पर्व दुसरे!

भाग सतरा.


"माळीकाका, चहाचे सोडा. मला सांगा आईसाहेब -आप्पा, दादा.. सारी कुठे आहेत? आणि आपला बंगला? तो का विकला?" सोनियाने प्रश्नांची मंदीयाळी सुरू केली. तिच्या प्रश्नाने त्याचे डोळे डबडबले.


"तुम्ही यायला खूप उशीर केलाय सोनाबेबी. खूप उशीर केला. सगळं संपलय." महादू रडत रडत बोलत होता.


"म्हणजे?" तिच्या नजरेत प्रश्नासोबतच उत्तर जाणून घ्यायची अधीरता होती.


"वाईच बसा तुम्ही." डोळे पुसत महादू म्हणाला.

गायत्रीने बसायला खुर्ची आणून दिली. हातात चहाचा कप होता.


"खरंच चहा नकोय मला." सोनिया बळेच हसली.


"घ्या थोडासा. गरीबाच्या घराला पहिल्यांदा तुमचे पाय लागले. नाही म्हणू नका." महादू.


"माळीकाका, अहो मी कोणी परकी आहे का? आपल्या बागेतल्या कितीतरी गोष्टी तुमच्याकडूनच तर मी शिकले." चहाचा घोट घेत ती म्हणाली.


"हो. तुम्ही सगळ्यापेक्षा वेगळ्या होत्या. बागेतील फुलझाडावर तुमचं लै प्रेम होतं. सगळ्यांच्या लाडक्या होतात तुम्ही सोनाबेबी. का मग सगळं एका झटक्यात सोडून निघून गेलात?" त्याचा स्वर पुन्हा दाटला.


"माळीकाका.."


"गेलात तर गेलात. परत तरी कधी आलात? दोन तपं उलटल्यावर. सगळं काही संपल्यावर." त्याच्या आवाजात थरथर होती.


"मला नीट समजेल असे सांगा ना. काय झालंय माळीकाका? सगळं संपलं म्हणजे काय? आणि तुम्ही माझ्या प्रश्नाला उत्तर दिलेच नाही. आपला बंगला का विकला?" दोन घोट घेऊन तिने चहाचा कप बाजूला ठेवला. "आप्पासाहेब-आईसाहेब कुठे आहेत?" तिची अस्वस्थता वाढत होती.


"सोनाबेबी, आता कसं सांगू? तुम्ही म्हणजे त्या बंगल्याची शान होतात. तुम्ही घर सोडले नि साऱ्या घराचे वासे उलटे फिरायला लागले. आप्पासाहेब नेहमी म्हणायचे तुम्ही म्हणजे साक्षात लक्ष्मी आहात. तुम्ही गेल्याचे साहेबांना कळले आणि.." त्याचा हुंदका दाटून आला.


"आणि काय माळीकाका?"


"आणि साहेबांना जोरात झटका बसला. तुमच्या जाण्याचे दुःख ते पचवू शकले नाहीत. दवाखान्यातच त्यांचा जीव गेला." तो लहान मुलासारखा रडत होता.


सोनिया.. ती एकदम स्तब्ध झाली. आत्तापर्यंत उतावीळ असलेली ती अचानक शांत झाली. आपल्यामुळे आप्पा गेले हे तिच्या गावीही नव्हते. इतके दिवस ती ज्या आप्पांच्या आठवणीत झुरत होती ते आप्पाच राहिले नव्हते.


"..पेपरामधी छापून आलं की त्यांच्या बिझनेसची डील हातातून गेल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता पण ते खरं कारण नव्हतं जी."त्याने एक हुंदका दिला.

"आप्पासाहेब गेले नि घराला उतरती कळा लागली. तुमच्या रूपात आधीच लक्ष्मीने घराबाहेर पाऊल टाकले होते त्यात साहेबांचे असे अचानक जाणे.. मालकीणबाई एकदम कोलमडून गेल्या. ज्यांचा शब्द म्हणजे प्रमाण असायचा त्यांना त्यांचीच लेकरं दाद देईनाशी झाली.


मोठे दादा अन रजत दादांनी भांडून कंपनीची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यांच्यात आप्पासाहेबांचा गुण नव्हता का लक्ष्मीचा रोष होता माहीत नाही पण हळूहळू कंपनीचे दिवाळे निघायला लागले. मालकीणबाई पार खचल्या. नेहमी त्यांचा शब्द झेलणारे पोरं स्वैरवैर वागायला लागली होती. काही वर्षांनी दोन्ही दादांची लग्न झाली आणि ते दोघंबी हे शहर सोडून गेले. काही दिवसांनी कळलं की त्यांनी आपला देश सोडून फारेन का काही म्हणत्यात तिथे आपली बिऱ्हाड घेऊन गेली."

महादू भरल्या गळ्याने सांगत होता.सोनिया मुकपणे ऐकत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हे तिलाच समजले नाही.


".. आणि विरेन दादा?" तिने कापऱ्या आवजात विचारले.


"विरेनदादा त्या दोन दादांपेक्षा वेगळ्या स्वभावाचे होते. जरासे हळवे.. तुमच्याचसारखे." त्याने नजर भरून तिच्याकडे पाहिले.

"त्यांनी मालकीणबाईंची साथ सोडली नाही. त्यांच्यासोबत ते राहिले. शेवटपर्यंत. पण कंपनीत कधीच पाय टाकला नाही. दुसरीकडे नोकरी केली. जो मानमरताब, ऐषाराम होता तो संपला होता. बंगल्यावरील नोकरमाणसांना काढून टाकण्यात आले. फकस्त मी अन स्वयंपाकाच्या बाई दोघेच राहिलो होतो. करारी बाण्याच्या बाईसाहेब पुरत्या खचल्या होत्या. ज्यांच्यावर त्यांचा जास्त जीव होता ते दोनही लेकरं त्यांना सोडून गेले होते."

"कालांतराने त्या आजारी पडल्या. स्मृतीभंश का काय म्हणतात तेही झाले होते. विरेनदादांनी त्यांची शेवटपर्यंत लईच काळजी घेतली."

"अन बाईसाहेब? शेवटपर्यंत त्या तुमचं नाव घेत राहिल्या. त्यांना फकस्त तुमचा ध्यास लागून राहिला होता. कधीतरी तुम्ही परत याल ही त्यांच्या मनाला आस होती. शेवटच्या क्षणी तुमचं नाव घेऊनच त्यांनी मान टाकली. त्यावेळी केवळ विरेनदादा आणि मी त्यांच्याजवळ होतो हो." महादुचा आवाज जड झाला होता.

" या गोष्टीला दहा वर्ष झाली. बाईसाहेब गेल्या नि दादांनी बंगला विकायला काढला. ज्या बंगल्यानं वैभव पाहिलं त्याच्या वाट्याला दुःखाचे भोगही आले. इथं आम्हा नोकराशिवाय होतं तरी कोण? म्हणून बंगला विकून विरेनदादानंही कोल्हापूर सोडलं. बंगल्याच्या नव्या मालकानं म्हातारी माणसं नको म्हणून आम्हालाही कामावरून कमी करून टाकलं.

आता माझा नातू, या गायत्रीचा नवरा तिथं माळी म्हणून कामाला आहे." महादू बोलता बोलता थांबला.


त्याचे बोलणे ऐकताना सोनियाचे काळीज पिळवटून निघत होते.

"तुम्ही गेलात तसे परत यायला हवे होते सोनाबेबी. तुम्ही घर सोडून गेलात नि आप्पासाहेब कायमचे जग सोडून गेले. तुम्ही इथे असता तर तुमच्या कंपनीला तरी वाचवू शकला असतात." महादुच्या शेवटच्या वाक्याचा बाण तिच्या हृदयात आरपार घुसला.आप्पांच्या अशा अवेळी जाण्याला कुठेतरी आपण जबाबदार आहोत हे तिच्या जिव्हारी लागले होते.


"मी निघते." ती जड अंतःकरणाने उठली.


"कुठून आलात नि कुठं जाणार हे तुम्ही सांगितलंच नाही बघा. अन आल्या आल्या असं कसं जाऊ देणार? चार घास पोटात टाका अन मंगच जावा." त्याने गायत्रीकडे पाहिले.


"व्हय जी. म्हातारं म्हणतोय ते बरोबर आहे. मी बिगीबिगी लागते सैपाकाला."


"नाही. नको. मी हॉटेलला थांबलेय. एका मिटिंगसाठी आले होते. आता जायला हवं." ती दारापर्यंत पोहचली देखील.


"सोनाबेबी.." महादुच्या आवाजाने ती थांबली. मनात एक आस. जणू म्हणेल आत्तापर्यंत जे सांगितले तसे काहीच घडले नाही.


"सोनाबेबी, तुम्ही नीट जाल नव्हं? का थांबता इथेच? नातू आला की तो सोडून देईल तुम्हाला." त्याच्या डोळ्यात काळजी होती.


"काका.. माझा प्रवास एकटीचाच. सवय झालीय आता. निघते मी." मागे वळून न पाहताच ती झोपडीतून बाहेर पडली.


कारजवळ पोहचेपर्यंत तिचे डोळे बरसायला लागले होते. खूप मोठ्याने रडावे, कुणाच्या तरी कुशीत शिरावे असे तिला वाटत होते. ती कारमध्ये बसली आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

मनात पाऊस.. डोळ्यात पाऊस. बाहेर रस्त्यावरही पाऊसच पाऊस!


'माझ्या बाळासाठी मी घर सोडले आणि माझ्यामुळे आप्पासाहेबांनी हे जग..! माझ्यामुळेच हे घडलं. आप्पा गेले. कंपनी बुडाली. दोन्ही दादा परदेशात. आईसाहेब गेल्या, बंगला गेला. माझा लाडका विरेन दादा कुठे असेल ते ठाऊक नाही..' तिच्या डोळ्यातील पाऊस अविरत बरसत होता.


'मी आईसाहेबांचीच लेक. त्यांच्यासारखा ताठ बाणा मिरवत राहिले नि माझ्याच प्रेमाच्या माणसांना मुकले. पण माझ्या बाळासाठीच मी ते पाऊल उचलले होते ना? मग माझी काय चूक? आईसाहेब मला माफ करा. कदाचित मीच चुकले असेल. शेवटच्या क्षणी तुमच्या मुखात केवळ माझे नाव होते. तुमचे प्रेम मी का ओळखू शकले नाही? प्रीतीच्या जन्मानंतर मला परत यायला हवे होते का?? पण कोणत्या तोंडाने? एकटीच माझ्या बाळाला घेऊन मी आले असते तर तुम्ही माझा स्वीकार केला असता का?' 


प्रश्न... केवळ प्रश्न! एकाही प्रश्नाला उत्तर नव्हते. इथे येताना किती आनंदी होती ती. आता तो उत्साहाचा झरा पूर्णपणे आटला होता. आत्तापर्यंत पाखरू होऊन उडणारे मन परत कोषात येऊन गुरफटून गेले होते. इथे घडलेल्या घटनांची काही माहिती नव्हती तेव्हा स्वतःच्या कल्पनेच्या जगात ती आनंदी होती. आता मात्र अपराधीपणाचे ओझे मनावर येऊन विसावले. ते ओझे तरी एवढे जड की त्याखाली ती पूर्णपणे दबल्या गेली होती.


एखाद्या निर्जीव बाहुलीप्रमाणे तिचे हात कारच्या स्टिरिंगवर होते. ती कुठे जातेय, किती वेगाने.. कसलेही भान राहिले नव्हते. डोळ्यापुढे आईसाहेबांचा चेहरा येत होता. आप्पांसाहेबांच्या इभ्रतीसाठी पोटच्या लेकीला घराचे दरवाजे बंद करणाऱ्या करारी आईसाहेब अन शेवटाला स्मृतिभंशामुळे तिच्याच नावाचा जप करणाऱ्या दीन आईसाहेब.. आईसाहेबांची दोन्ही रूपं तिच्यापुढे रिंगण बनवून उभ्या होत्या. मधूनच आप्पासाहेबांचा हसरा चेहरा, 'सोनाऽऽ' म्हणून त्यांनी घातलेली साद..!


तिचे डोके गरगरायला लागले. बाहेर थैमान घातलेल्या पावसात तिला रस्ताही नीट दिसत नव्हता. डोळ्यातल्या पावसाने तर सारेच धुसर झाले होते. त्या भर पावसात कोणीतरी मध्ये उभे आहे असे तिला भासले. डोळ्यांची उघडझाप करून तिने पाहिले. ते एक जोडपे होते. रस्त्याच्या मधोमध.. आनंदाने जल्लोष करत! जवळ एक छोटीशी गोड परी सुद्धा.

'हे काय? तिचा चेहरा माझ्यासारखा का दिसतोय? अरे! ही तर मीच आहे! बालपणीची मी. म्हणजे? उभे असलेले ते आप्पा आणि आईसाहेब?'

तिच्या मनीचे सारे खेळ अन डोळ्यासमोर झळकणारे तिचे लाडके आप्पा.

"आप्पाऽऽ.."

तिच्या तोंडून अस्पष्ट किंकाळी बाहेर पडली. ब्रेक दाबताना कार रस्त्याच्या विरुद्ध कलली होती आणि कडेला असलेल्या मोठया झाडाला जोरात धडकली होती.

:

क्रमश :

पुढील भाग लवकरच!

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.

********

फोटो गुगल साभार.








🎭 Series Post

View all