Mar 04, 2024
प्रेम

प्रीती पर्व दुसरे! भाग -१६

Read Later
प्रीती पर्व दुसरे! भाग -१६

प्रीती.. पर्व दुसरे!

भाग -सोळा.


"प्रीत, हा गंध आपल्या श्वासात भारून ठेव आणि हा चेहरा आपल्या डोळ्यात. हा मोहन. तुझा बाबा. शरीराने कुठे आहे ते मला माहीत नाही. मनाने मात्र आपल्याजवळ आहे असे सतत वाटते. हा विषय इथेच संपलाय. यापुढे मला हा प्रश्न विचारायचा नाही." तो शर्ट आणि त्याचा फोटो पुन्हा त्या ट्रन्केमध्ये ठेवत ती म्हणाली.

********


'दिवस कसे भुर्रकन उडून गेले.' सोनियाच्या मनात आले.

'त्या दिवसानंतर प्रीतीने मला पुन्हा कधी मोहनबद्दल विचारले नाही पण त्याचा चेहरा मात्र तिच्या हृदयपटलावर कायमचा कोरला गेला होता. म्हणूनच तर तिने तिच्या या बर्थडेला रिटर्न गिफ्ट म्हणून त्याचे स्केच गिफ्ट केले होते. काय तर म्हणे, आज स्केच गिफ्ट केलेय. एक दिवस बाबाला तुझ्यासमोर उभे करेन.'

ती खिन्नशी हसली.

'प्रीत, या पंचवीस वर्षात एकदाही दिसला नाही गं तो. तू कुठे शोधशील त्याला?'

'तो परत भेटणार की नाही माहीत नाही. पण आता आप्पा आणि आईसाहेब यांची तरी भेट होईल.'


सोनियाच्या डोळ्यात एकाच वेळी आसू आणि हसू देखील होते. घरी जाण्याचा आनंद.. आपल्या माणसांच्या भेटीची ओढ.. रात्रभर झोप लागणार नाही हे स्पष्टच होते. बळजबरीने तिने खोलीतील मऊशार गादीवर अंग टाकले. तो मऊ बिछाना देखील आता तिला टोचायला लागला होता.


ती खुदकन हसली. मन कसं पाखरू झालं होतं. एवढया मोठया कंपनीची ती सीईओ! सगळ्या स्टॉफला आपल्या ईशाऱ्यावर सांभाळणारी ती आज स्वतःच्या मनावर मात्र आवर घालू शकत नव्हती.

मन पाखरू होऊन उडतच होते.. कधी त्यांच्या बंगल्यातील हॉलमध्ये, कधी भल्यामोठ्या स्वयंपाकघरात. कधी आप्पासाहेबांच्या मांडीवर तर कधी आईसाहेबांच्या गळ्यात. कधी दादांसोबत केलेल्या दंगामस्तीत तर कधी अंगणातल्या बागेत.


'वेडी गं बाई मी! का या खट्याळ मनाच्या मागे लागलेय?' हसून तिने मिटलेल्या डोळ्यावर एक उशी ठेवली. बंद डोळे आणखी बंद झाले पण मनचक्षुचे काय? त्यांना ती कसे मिटणार होती?


पहाटे उशिरा केव्हा तरी तिचा डोळा लागला आणि तरीही सकाळी ती एकदम फ्रेश उठली. कॉन्फरन्स बारा वाजता होती. ती आपले आवरून दहा वाजताच तयार झाली. मिनिटा मिनिटाला हातातील घड्याळ बघणे चालू होते. ते दोन तास दोन वर्षासारखे तिला वाटत होते.


अर्ध्या तासाची कॉन्फरन्स त्यानंतर लंच.. दोन वाजून गेले. क्षणाक्षणाला वाढणारी तिची हुरहूर, तिच्या मनातलं बाहेर येऊ पाहणार लहान लेकरू.. तिने स्वतःवर कसाबसा आवर घातला. शेवटी तीन वाजता ती पूर्णपणे फ्री झाली. तिने एक मोकळा श्वास घेतला. आता ती फक्त ती होती.. सोनिया! कुणाची आई नाही कुठल्या कंपनीची मालकीण नाही. खोलीतून निघताना तिने एकदा आरशात पाहिले. पंचवीस वर्षांपूर्वी घरून निघाली तेव्हा अंगावर सलवार कमीज होती. आता परत जातेय तर साडी नेसून.


'आईसाहेबांना कौतुक वाटेल ना माझे?' स्वतःच्या प्रश्नावर ती हसली. चेहऱ्यावर पुन्हा पावडर अन ओठावर लिपस्टिकचे एक बोट फिरवून कारची चावी घेऊन ती हॉटेलबाहेर पडली.


पंचेचाळीस वर्षांची ती.. आज पुन्हा एकदा वीस वर्षांची तरुणी झाली होती.


सोनियाची कार कोल्हापूरच्या रस्त्यावरून धावत होती. महालक्ष्मीचे मंदिर बघून तिने मनातच देवीला हात जोडले.


'माते, सगळं नीट झालं की सायंकाळी घरच्या सर्वांसोबत तुझ्या दर्शनासाठी येईन.' मनात तिने ठरवून देखील टाकले.


या पंचवीस वर्षात काय काय बघायचे राहून गेले होते. रंकाळा तलाव, शालिनी पॅलेस, भवानी मंडप, जोतिबा डोंगर.. आणखी बरंच काही! ती कोल्हापूरची रांगडी माती तिला खुणावत होती. तीही भरधाव वेगाने निघाली होती. नव्या इमारती, नवे रस्ते आणि तरीही ती एखाद्या सराईताप्रमाणे रस्ता उडवत होती.


.. आणि तिने कारचा ब्रेक लावला. डोळ्यासमोर तोच टोलेजंग बंगला होता. रंगसंगती बदलली होती. इतक्या वर्षात हा बदल अपेक्षित होता. रंगसंगती बदलली तरी बंगला तोच होता. तिचे डोळे एकदम भरून आले.


कार बाजूला लाऊन सोनिया खाली उतरली. तिची नजर बंगल्याच्या अग्रस्थानी कोरलेल्या नावावर गेली. 'सोनिया व्हिला' पूर्वी किती दिमाखात ते नाव झळकत असायचे. पण हे काय? आता त्या बंगल्यावरून ते नावच हटवण्यात आले होते.


'आईसाहेबांना माझा एवढा राग होता की त्यांनी बंगल्यावरचे माझे अस्तिवसुद्धा नाकारले.' विचारासरशी डोळ्यातील थेंब टचकन गालावर ओघळला.


ती तशीच बंगल्याचा मुख्य फाटक उघडून आत जायला निघाली तर बाहेरच्या बागेमध्ये काम करणारा माळीदादा तिथे आला.


"अहो मॅडम, कोण तुम्ही? आणि इथे काय करताय?" त्याने प्रश्न केला.


"मी या घरची मुलगी आहे. आईसाहेब आणि आप्पांना भेटायला आलेय." एक छानसे गोड स्मित देत ती म्हणाली.


"कोण आईसाहेब नि आप्पा?इथे तसे कोणीच राहत नाहीत. शिरीष सर नि अवनी मॅडम राहतात. ते घरी नाहीयेत. आठवड्याभरासाठी बाहेरगावी गेले आहेत." तो.


"कोण अवनी? कोण शिरीष?" ती विचारात पडली.

"मला जाऊ तर देत." तिने त्याला म्हटले.


"अहो मॅडम घराला मोठे कुलूप आहे, तुम्ही कुठे जाताय? अशाने माझी नोकरी घालवाल." तो घायघुतीला आला.

"मला वाटतं मॅडम तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलात. आता निघा बघू." तो.


किती उल्हासाने ती आली होती. तिच्या आधीच तिचे मन पाखरू होऊन पोहचले होते आणि इथला तर सगळा नजाराच बदलला होता.


"पूर्वी इथे एक माळी काका काम करायचे. महादू त्यांचं नाव. आता ते नाहीत का?" काहीतरी धागा सापडेल म्हणून तिने विचारले.


"त्यो म्हातारा व्हय? मी नातू हाय त्येचा. पाटील साहेब इथे राहत होते तेव्हा तो इथे होता. आता ते कुटुंब पण नाही नि माजा आजा बी नाही." तो म्हणाला.


"म्हणजे?" ती.


"अहो दहा वर्षांपूर्वी हा बंगला शिरीष साहेबांना विकला. मग त्यांनी म्हाताऱ्या आज्याला कामावरून कमी केले. तेव्हापासून मी इथे लागलोय."


'आप्पसाहेबांनी बंगला विकला? त्यांच्या स्वप्नाचे घर.. हा सोनिया व्हिला त्यांनी का विकला असावा?' तिला जरासे गरगरल्या सारखे झाले.


"एवढं सगळं खोदून खोदून विचारताय. तुम्ही कोण म्हणायच्या?" त्याने कुतूहलाने विचारले.


"मी सोनिया. आप्पासाहेब पाटीलांची लेक." ती उत्तरली.


"तुम्हीच सोनिया ताई आहात व्हय? आमचा म्हातारा तुमच्याबद्दल सांगत असायचा." तो.


"आप्पांनी हा बंगला का विकला आणि ते सर्व कुठे आहेत मला कळेल का?" ती काकूळतीला आली.


"मला तर फारसं काही ठाव नाही. पण माझ्या आज्याला नक्कीच माहीत असंल." तो.


"कुठे आहे महादू काका? मला त्यांचा पत्ता देशील काय?" तिचा काकूळतीला आलेला जीव.


"हो, हो. देतो की." म्हणत त्याने सोनियाला त्याच्या घराचा पत्ता दिला. ती नीट पोहचायला हवी म्हणून तिथला लहानसहान तपशील देखील दिला. त्याचे आभार मानून ती परत फिरली. येताना मनात असणारी हुरहूर आता काळजीत बदलली होती.


तिने एकवार त्या बंगल्याकडे नजर टाकली. आत्तापर्यंत ओळखीची वाटणारी ती वास्तू आता अनोळखी वाटू लागली होती. जड मनाने तिने कार सुरू केली.


गल्ल्या बोळातून मार्ग काढत माळीदादाने सांगितलेल्या पत्त्यावर सोनिया येऊन पोहचली. ते एक झोपडीवजा घर होते. छोटेसे घर असले तरी बाहेरूनच नीटनेटकेपणाचा अंदाज येत होता. दारावर थाप देणार त्या पूर्वीच दार उघडल्या गेले. दारात तीस बत्तीस वर्षाची स्त्री उभी होती. कदाचित मघाशी बंगल्यावर भेटला त्याची बायको असावी.


"कोण पाहिजे म्हणायचं?" एकाएकी असे तिला दारात बघून त्या स्त्रीने विचारले.


"माळीकाका.. म्हणजे महादू काकांना भेटायला आलेय. आहेत का ते?" सोनियाने अधीरतेने विचारले.


"हो आहेत. या ना." तिने सोनियाला आत घेतले. नजरेत अजूनही अनोळखीपणा होता.


सोनिया आत आली. अंथरुणाला खिळेलेले माळीकाका.. तिने मोठ्या आशेने त्यांच्याकडे पाहिले.


"माळीकाका ऽऽ.." तिने घातलेल्या सादेने त्यांचे कान टवकारले.


"माळीकाका ऽऽ.. " तिने परत साद घातली.


"कोण? सोनाबेबी?" त्यांच्या अंधुकशा नजरेत ती धुसरशी दिसली.


"सोनाबेबी हायसा?" कसेबसे उठून बसत त्याने विचारले.

'सोनाबेबी!' किती काळाने हे शब्द तिच्या कानावर आले.


"माळीकाका.. मीच तुमची सोनाबेबी."


"गायत्री, बेबीसाठी चहा टाक गं." पाणी भरल्या डोळ्यांनी महादुने सुनेला सांगितले.


"माळीकाका, चहाचे सोडा. मला सांगा आईसाहेब -आप्पा, दादा.. सारी कुठे आहेत? आणि आपला बंगला? तो का विकला?" सोनियाने प्रश्नांची मंदीयाळी सुरू केली. तिच्या प्रश्नाने त्याचे डोळे डबडबले.


"तुम्ही यायला खूप उशीर केलाय सोनाबेबी. खूप उशीर केला. आता सगळं संपलय." महादू रडत रडत बोलत होता.

क्रमश:

********

पुढील भाग लवकरच!

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.

********

फोटो गुगल साभार.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//