प्रीती पर्व दुसरे! भाग -१४

सोनिया निघालीय कोल्हापूरला. काय होईल पुढे?

प्रीती.. पर्व दुसरे!

भाग -चौदा.


(मागील भागात :-

मिहीर कोल्हापूरला असणाऱ्या एका कॉन्फरन्स मिटिंगला तू जाशील का? असे मिहीर प्रीतीला विचारतो. त्यावर तिथे जाण्यासाठी सोनिया तयार होते. त्यामागे असणारे कारण प्रीतीला ठाऊक नसल्याने तिची चिडचिड होत असते. आता पुढे.) 



सोनियाचे वागणे प्रीतीसाठी एक कोडे होते. ते तिच्यासमोर उलगडणार की काही वेगळेच वादळ तिच्या आयुष्यात डोकावणार हे येणारा काळच सांगू शकणार होता.


"राधाई, माई कधी कुणाचं ऐकतच नाही का गं?" प्रीती तणतणत आत आली. हातातील बॅग तिने तशीच सोफ्यावर टाकली आणि तिथेच ती बसली.


"आधी हातपाय धुवून घे. फ्रेश हो नंतर आपण बोलूया." राधामावशी तिला म्हणाली.


"नाही मला आत्ताच बोलायचे आहे." नाक फुगवून ती.


"म्हणजे ऑफिसमध्ये आज तुम्हा दोघींची चांगलीच  जुम्पली म्हणायची." बाहेरून आत येणाऱ्या सोनियाकडे बघून राधामावशी.


"मावशी,एक कप मस्त कडक चहा दे गं." सोनिया आत येत म्हणाली.


"राधाई, मला एक कॉफी." सोनियाकडे डोळ्याच्या कोनातून बघत प्रीती. "ती ही स्ट्रॉंग हवी, बरं का?" 'स्ट्रॉंग' शब्दावर तिने जास्तच जोर दिला.


"काय चाललंय दोघी मायलेकीचे? असा उंदरामांजराचा खेळ का खेळताय?" दोघींना त्यांचे पेय देत राधामावशीने हसून विचारले.


"ही तुझी लाडकी ना? मग तिलाच विचार. तसेही माझे कुठे काही ऐकते?" कॉफीचा घोट घेत प्रीती.


"काय चाललंय मला कळेल का?" राधामावशीने जरा चढ्या आवाजात विचारले.


मावशी, पुढच्या आठवड्यात मी कोल्हापूरला जाणार आहे." सोनिया चहा पीत शांतपणे म्हणाली.

"कोल्हापूर?" राधामावशीच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले.


"तू पण शॉक झालीस ना? राधाई हे काहीच नाहीये. मॅडम कशाने चालल्यात ते तरी विचार. मीच सांगते. तुझी सोना कारने जाणार आहे. ते सुद्धा स्वतः ड्राईव्ह करत." प्रीतीने बॉम्ब टाकला.


"प्रीती.." सोनियाने कप खाली ठेवला.


"माई, मला काळजी वाटते म्हणून सांगतेय ना गं. तुला तर माझं ऐकायचंच नसतं." तिच्या डोळ्यात पाणी आले.


"ओ,रडूबाई! अगं मी काही कन्याकुमारीला नाही चाललेय. कोल्हापूरलाच जातेय. मला एकटीला जायचे आहे आणि निसर्गाचा आनंद लुटत जायचेय म्हणून कारने चाललेय." तिला समजावत सोनिया.


"पण एकटीच का? तुझ्यासोबत मी का येऊ शकत नाही?" प्रीतीने प्रश्न केला.


"त्याचे उत्तर आता नाही पण आल्यावर मात्र नक्की देईन."


"प्रॉमिस?" प्रीतीने डोळे बारीक करून विचारले.


"पक्का प्रॉमिस! खूष?" सोनियाने तिच्या हातावर हात ठेवला नि प्रीती लगेच तिच्या मिठीत विसावली.


"माई मला तुझी काळजी वाटते गं म्हणून तसे रिॲक्ट झाले. सॉरी." आपला चेहरा छोटुसा करत ती म्हणाली.


"प्रीत, तुझी काळजी कळतेय गं राजा. मलाही माझी काळजी आहेच ना? मी तुला माझे अपडेट्स देत राहीन, मग तर झालं?" तिच्या केसावरून हात फिरवत सोनिया म्हणाली.


*******

"सोनिया, एक विचारायचं होतं." रात्री झोपायची तयारी करत असताना राधामावशी आत येत म्हणाली.


"माझ्या जाण्याबद्दल बोलणारेस ना?" उशांची अभ्रे नीट करत सोनिया.


"हो, तेच विचारणार होते. अशी अचानक तू तयार कशी झालीस?"


"मावशी, कोल्हापूर सोडले तेव्हा एकवीस वर्षाची तरुणी होते मी. ज्या कारणासाठी घर सोडले होते ते कारण कुठे उरलेय आता? बिझनेस इंडस्ट्री मध्ये माझं एक मोठे नाव आहे. आईसाहेब आणि आप्पांना भेटायची ही वेळ आहे असे मला वाटतेय. एकदा भेटून मोकळे व्हायचे आहे. त्यांना सांगायचे आहे की त्यांची सोनिया चुकीची नव्हतीच कधी."


"तुझे ऐकतील ते?" राधामावशीने तिचे बोलणे मध्येच तोडले.


"एकदा प्रयत्न तर करू दे. तुला सांगते मावशी, आप्पांना नक्कीच माझा अभिमान वाटेल आणि आईसाहेब, त्या मनाने वाईट नव्हत्या गं. मला बघून त्यांनाही आनंदच होईल. होईल ना गं?" तिने वळून राधामावशीच्या डोळ्यात पाहिले.


"नक्कीच होईल. इतकी वर्ष आपल्या लेकराला न भेटता राहणं त्या माऊलीलाही कठीण गेले असेलच. तुला पाहायला त्यांच्या नजरा देखील नक्कीच आसूसल्या असतील."


"मावशी, तिकडून परतल्यावर प्रीतीला मी सर्व सांगणार आहे. ती समजून घेईल सगळं. नंतर आपण तिघी मिळून कोल्हापूरला जाऊ. तुला सांगू? तिथे काय काय आहे? तिथले महालक्ष्मीचे मंदिर, ज्योतिबाचा डोंगर, रंकाळा तलाव आणि.."


"बस, बस. पुरे आता. तुझी उत्सुकता कळतेय मला. शरीराने इथे असलीस तरी मनाने तिथे पोहचलीस सुद्धा." तिला थांबवत राधामावशी हसून म्हणाली.


"आता निवांत झोप. जायला अजून चार दिवस बाकी आहेत. झोपेत स्वप्नाच्या राज्यात रमायला विसरू नकोस. पाहिलेली सगळी स्वप्न पूरी होऊ देत." राधामावशी आपल्या खोलीत निघून गेली.


राधामावशीने म्हटल्याप्रमाणे सोनिया खरोखरीच मनाने कोल्हापुरात पोहचली होती. तो सोनिया व्हिला, खेळताना तिथे घुमणारा तिच्या भावंडांचा आवाज, तोऱ्यात उभ्या असलेल्या आईसाहेब आणि मलमली सोफ्यावर बसून तिच्यासोबत गप्पा मारणारे आप्पासाहेब!


'आईसाहेब! तुमची सोनिया तुमच्या भेटीला येतेय. तिला पदरात घ्याल ना?' रात्रभर ती त्याच विचारात तळमळत होती. पहाटे केव्हातरी डोळा लागला आणि तेव्हा स्वप्नात देखील तेच दिसत होते. आईसाहेबांनी तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवला आणि तिला धन्य धन्य झाल्यासारखे वाटले.


"आईसाहेबऽऽ.." तिने डोळे उघडले.


एसीचा गार वारा अंगाला झोंबत होता. अंगावर पांघरून घेऊन तिने कुस बदलली. स्वप्नात का होईना पण आईसाहेबांचा प्रेमाचा स्पर्श तिला झाला होता. कित्येक दिवसांनी ती गाढ झोपी गेली. 


*******

"नीट जा गं. नि तासातासाने कुठवर पोहचलीस ते मला कळवत रहा." प्रीती सोनियाला काळजीवजा सूचना देत होती.


"हो गं माझे आई, डोन्ट वरी! नीट जाईन, तुला दर तासाला कळवत राहीन. ओके?" सोनियाने चिमटीत प्रीतीचे नाक पकडले.


"राधामावशी, मला तर आज अगदी छोटूसं बाळ झाल्यासारखं वाटतेय. किती त्या सूचना! तरी मनातून फार बरं वाटतंय गं. आपली काळजी करणारी माणसं असणं याहून दुसरी भाग्याची गोष्ट नाही बघ." नकळत तिच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. तिने प्रीतीला एक घट्ट मिठी मारली अन गालावर आपल्या ओठांची मोहर उमटवली.


"माईऽऽ, मला हे पापी वगैरे नाही आवडत. माहितीये ना तुला?" आपला गाल पुसत प्रीती म्हणाली.


"हो. तरी असू दे. तीन दिवस भेटणार नाहीस ना, मग तेवढीच आठवण." सोनिया गोड हसली.


राधामावशीला आलिंगन देऊन तिला नमस्कार केला.

"तुझ्या मनातील सगळ्या इच्छा पुऱ्या होऊ दे." आशीर्वाद देताना राधामावशीला गहिवरून आले. सोनियाच्या चेहऱ्यावरून हात फिरवून तिने कानामागे बोटे मोडली. सोनियाने आपले डोळे पुसले आणि ती कारमध्ये बसली.


आजचा प्रवास, रात्री आराम, दुसऱ्या दिवशी कॉन्फरन्स आणि त्यानंतर कोल्हापूरातील आपल्या घरी आणि तिसऱ्या दिवशी बॅक टू पुणे. हे सगळे तिने मनात ठरवले होते.

कार दिसेनाशी होईपर्यंत दोघी बाहेरच उभ्या होत्या.


"राधाई डोळे पूस बघू. काय रडत असतेस गं? चिल. तुझी लाडकी तीन दिवसात परत येणार आहे."


"तीन दिवस." राधामावशीने लांब सुस्कारा सोडला.


"तिच्यामुळेच झालं सगळं. फ्लाईट ने गेली असती तर एकाच दिवसात परत आली असती. मला वाटलं तू तरी अडवशील पण नाही. तू तर नेहमी तिचीच बाजू घेत असतेस." प्रीती त्रागा करत म्हणाली.


राधामावशीला हसू येत होते. "प्रीती किती गं चिडचिड? तिच्याशिवाय क्षणभरही करमत नाही म्हणून ही चिडचिड होतेय, होय ना?"


"ॲक्च्युअली हो. माईशिवाय रहायचे मी इमॅजिनसुद्धा करू शकत नाही. रिअली आय मिस हर!" राधामावशीच्या मिठीत शिरत ती म्हणाली.


"चल तुझ्यासाठी काहीतरी चांगलं खायला बनवते." तिचे लक्ष दुसरीकडे वळवत राधामावशी.


"अगं नको राधाई. मी आपल्या कॅन्टीनमधून काहीतरी खाऊन घेईन. तू तेवढा तुझ्या हातचा गरमागरम चहा दे. मग मी निघते." ती.


"अगं काहीतर खाऊन जा." चहाचा कप तिच्या हातात देत राधामावशी.


"खरंच नको गं. ऑफिसमध्ये माई नाहीये तर मला लवकर गेलं पाहिजे ना? मी खाऊन घेईन, डोन्ट वरी. तू देखील जेवून घेशील गं." आपली बॅग घेत ती उठलीसुद्धा.


'सोनियासारखीच गोड आहे ही पोरगी. जबाबदारीची जाणीव आहे. सोनियाच्या आई-आप्पानी तिला माफ करू दे. म्हणजे मग माझ्या प्रीतीला हक्काचं आजोळ मिळेल. तिलाही कळेल तिची माई म्हणजे नेमकी कोण आहे ते.' निरंजनातील वात सरळ करत राधामावशीने देवाजवळ हात जोडले.


********


"मिसिंग मॉम?" प्रीतीसमोर बसलेला मिहीर विचारत होता.


"हम्म!" तिने मान डोलावली. "यू टू?" त्याच्या डोळ्यात बघत तिचा प्रश्न.


"हूं." तो हसला. "तुझ्याएवढं नाही, लिटलबीट!"अंगठयाचे बोट तर्जनीला जोडून तो म्हणाला. त्यावर तीसुद्धा हसली.


"मिहीर अंकल, एक विचारू?" त्याच्याकडे एकटक पाहत ती.


"अरे, एक काय? तुला हवे तेवढे विचार. लंचब्रेक मध्ये मी भरपूर गप्पा मारू शकतो." पोळीचा घास तोंडात टाकत तो म्हणाला.


"अजूनही माई तुम्हाला तेवढीच आवडते?" तिने त्याच्यावर नजर खिळवून विचारले. त्या प्रश्नाने तो चमकला. नंतर तिच्याकडे बघून केवळ हसला.


"मग तुम्ही तिला कधी प्रपोज का केलं नाही?" ती.


"केलं होतं ना. फार वर्षांपूर्वीच केलं. जेव्हा पहिल्यांदा मला क्लिक झाले की हिच्यावर जीव जडलाय तेव्हाच तिला प्रपोज करून मोकळा झालो."

पाण्याचा ग्लास ओठाला लावत तो उत्तरला.


"मग ती काय म्हणाली? आज नही कल, कल नही परसो. असं काही बोलली का?" तिची उत्सुकता वाढीला लागली होती.


तो खळखळून हसला. " तुला वाटते तुझी माई ह्या प्रकारात मोडणाऱ्या मुलींसारखी असेल? तिने तेव्हाच मला स्पष्ट नकार दिला. म्हणाली, तू माझा बिझनेस पार्टनर बनू शकतोस, लाईफ पार्टनर नाही." तो सांगत होता.


"खूप हर्ट झाले असेल ना तेव्हा तुम्हाला?" ती लहानसा चेहरा करत म्हणाली.


"हां, थोडासा हर्ट झालो होतो खरा. पण त्यामुळे तिचा सखा तर बनता आलं ना? प्रियकरापेक्षा सखा बनणं कठीण असतं. आमच्यातील नातं खूप नितळ आहे गं. ती आत्ताही आवडते मला. इनफॅक्ट पूर्वीपेक्षा कैक पटीने जास्त आवडते, पण हे आवडणं त्या आवडण्यापेक्षा नक्कीच वेगळे आहे." केकचा तुकडा तोंडात टाकत तो म्हणाला.

:

क्रमश:


पुढील भाग लवकरच!

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )


*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.

********

फोटो गुगल साभार.


🎭 Series Post

View all