प्रीती पर्व दुसरे! भाग -13

गोष्ट ध्येयवेड्या सोनियाची.

प्रीती.. पर्व दुसरे!

भाग -तेरा.


(मागील भागात :-


मिहीर सोनियाला प्रपोज करतो पण ती नम्रपणे त्याला नकार देते. बिझनेस मध्ये पार्टनर करायला आवडेल पण लाईफ पार्टनर नको. प्रेम हे एकदाच होते असे ती म्हणते. बोलताना तिला मुलगी आहे म्हणजे ती मॅरीड आहे हे त्याला कळते पण तिच्या आयुष्याची काळी बाजू ती त्याला सांगत नाही. हॉटेलच्या बिलाचे तिचे पैसे तीच देणार असे ती म्हणते, पण तेवढे पैसे तिच्याकडे नसतात.

आता पुढे.)


"इट्स ओके! तुझ्या पगारातून मी पैसे कापून घेईन मग तर झालं ना?" त्याच्या बोलण्यावर ती हसली.. निखळ!


“तुला कसला बिझनेस सुरू करायचा आहे?” कार चालवताना तो विचारत होता.


“अजून ठरलं नाहीये पण लवकरच ठरवेल. मला सांगा आपल्या ऑफिसमधला चहा तुम्हाला कसा वाटला? कधी पिऊन बघितलंत का?” तिने त्याला विचारले.


“चहा भारी आहे म्हणून तर तो आपल्या ऑफिससाठी येतो. मला एक लक्षात येतेय, तुला तो चहा जरा जास्तच आवडतो.कायम चहाचे कौतुक करत असतेस. एम आय राईट?” तिच्याकडे कटाक्ष टाकत मिहीर.


“एक्झाक्टली! आपल्या कंपनीतील मालाची गुणवत्ता आपल्याला ठाऊक असते. मग त्याचे कौतुक आपण करायचे ना?” सोनिया उत्तरली.


“म्हणजे? मी समजलो नाही.” तो.


“आपल्या ऑफिसचा चहा माझ्या घरून येतो. माझी मावशी बनवते.” ती म्हणाली.


“काय?” त्याने आश्चर्याने विचारले.


“तुम्हाला एवढं का आश्चर्य वाटतंय?” हसून ती.


 “तू त्या मावशीची मुलगी आहेस?” तो.


सोनियाने उत्तरादाखल स्मित केले.


“तरीच. पक्की व्यवहारिक आहेस तू. मी त्या मावशीना म्हणालो होतो की तुमची लेक मोठी उद्योजिका बनणार म्हणून.” तो ही हसला.


“माणसात काही गुण जन्मजात असतात.” हळवे होत ती हळुवार म्हणाली.


“म्हणजे?” तो.


“कुठे काय?” तिने विषय टाळला.


“सोनिया, तू म्हणजे ना न उलगडणारे कोडे आहेस. दिसतेस त्याहून फार निराळी आहेस तू. नेमकी कोण आहेस तू? तुझ्यात का गुंततोय तेच मला कळत नाहीये.” तिच्याकडे न बघता तो बोलत होता.


“सध्यातरी तुमच्या ऑफिसची स्टॉफमेंबर आहे. सगळं सुरळीत चालले तर काही वर्षांनी आपण बिझनेस पार्टनर असू.” ती पुन्हा स्वच्छ हसली. “सर, एक सांगू? मनात एक नि ओठात दुसरं असं नसतं माझं. जे आहे ते सरळसोट आहे. साधी सरळमार्गी मुलगी आहे मी. मनात जपून ठेवलेले एक स्वप्न आहे, ते पुरे करायचे आहे. खूप मोठं होऊन नाव कमवायचे आहे.” बोलताना चेहऱ्यावर एक वेगळेच तेज झळकत होते.


“तथास्तु!” तो हसून म्हणाला. ती ही हसली. आज पहिल्यांदा कोणाशी तरी ती इतकं भरभरून बोलत होती.


“कुठे सोडू तुला?” त्याने प्रश्न केला.


“ऑफिसजवळच्या रिक्षास्टॅंडजवळ. आधीच उशीर झालाय.”


“मग घरीच सोडतो.”


“नाही, नको.” ती झटक्याने म्हणाली.


रिक्षास्टॅंडजवळ त्याने कार थांबवली. “थँक्स” म्हणून ती खाली उतरली.


“सोनियाऽऽ” त्याने दिलेल्या हाकेने ती वळली. “काय?” तिने नजरेनेच विचारलेला प्रश्न.


सायंकाळची वेळ, मंद सुटलेला वारा. ती वळली तसे वाऱ्याने चेहऱ्यावर आलेले केस. पुन्हा पुन्हा तिच्याकडे त्याचे मोहवणे आणि ती आपली नाहीच हे जाणून आपल्या विश्वात परत येणे! केव्हाचे तेच चालले होते.


“सर, काही सांगायचंय का?” तिच्या प्रश्नाने त्याची साखळी तुटली.


“हं.” तो जरासा बावरला. “हेच की मला सर नको म्हणूस. केवळ मिहीर म्हणालीस तरी चालेल.” तो म्हणाला.


“नो सर. तुम्ही माझे बॉस आहात. नावाने कशी बोलू ना?” आपले केस सावरत ती म्हणाली.


“आत्ता आपण ऑफिसमध्ये कुठे आहोत? प्रियकर, नवरा ही बिरूदं तुझ्याकडून मला कधीच मिळणार नाहीत हे माहितीय मला. किमान एक मित्र, सखा तरी बनू शकेल ना?” त्याच्या डोळ्यात एक आर्जव होते.


“मैत्रीचे शुद्ध नाते निभावणे सगळ्यात कठीण असते. जमेल तुम्हाला?” तिने हसून विचारले.


“न जमायला काय झालं?” त्याने हसत तिलाच प्रतिप्रश्न केला.


“फ्रेंड्स?” त्याने मैत्रीचा हात समोर केला.


तिने एकवार त्याच्याकडे पाहिले. तसे त्याचे मन निर्मळ आहे, उगीचच मुलगी बघून फ्लर्ट करण्याऱ्यातला तो नाहीय याची तिला जाणीव झाली होती.

त्याचा मैत्रीचा हात तिने हातात घेतला. 


********


“सोनिया, झोपायचे नाही का बाळा?” राधामावशीचा हात खांद्यावर पडला.


“मावशी, तूही जागीच अजून?” मागे न वळता तिने विचारले.


“ह्या वयात झोपेचे खोबरे व्हायचेच गं. तू का जागी आहेस? एवढी उतुंग भरारी घेतलीस. प्रीतीला वाढदिवसाचे इतके सुंदर गिफ्ट दिलेस. समाधानी नाहीयेस का बाळा तू?” राधामावशीच्या प्रश्नाने तिला भरून आले.


“आकाशातले तारे बघायला किती छान वाटतात ना? चंद्राच्या शीतल चांदण्यात निव्वळ पडून राहावं. त्याचं लोभसवाणं रूप केवळ न्याहाळत राहावं. हो ना मावशी?” ती खिडकीतून बाहेर बघत बोलली.


“अशी कोड्यात काय बोलतेस अगं? मला समजेल असं सांग ना.” राधामावशी.


“ह्या चमचमणाऱ्या तारकांना स्वतःजवळ खेचण्याचा विचार मूर्खपणाचा नाही का गं? त्यांच्या जेवढे जवळ जाऊ तितके त्यांच्या दाहकतेने आपण पोळले जाऊ हे का कळत नसते वेड्या मनाला?”


“सोना?”


“मोहनच्या मागे लागून माझे आयुष्य असेच पोळले ना गं राधामावशी?” राधामावशीकडे वळून ती म्हणाली.


“एवढं मोठं साम्राज्य मी निर्माण केले पण मला काय मिळालं गं? घरच्यांपासून दुरावले ते कायमचेच. आजवर साधं कोणी माझी विचारपूस करायला देखील आले नाही. मोहन कुठे आहे तेही कधी कळलं नाही. आयुष्याचा डाव हरले का गं मी?” तिच्या डोळ्यातील पाणी हेलकावले.

राधामावशीने तिचा हात हातात घेतला.


“नाही सोना. तू या साम्राज्याची राणी आहेस. तुला हरून कसे चालेल ना? आपल्या कंपनीतील तुझ्यावर विसंबून असणारे कितीतरी कर्मचारी, मिहीरसारखा मित्र, एवढी गोड लेक हे सगळे असताना तू कशी हरणार?”


“मोहनला कधी माझी आठवण झाली नसेल का गं? मला बाळ होणार आहे हे सुद्धा तो विसरला असेल का? का असा वागला असेल तो माझ्याशी? मी त्याला कधीच विसरु शकले नाही. त्याला विसरणे शक्यच नाही. माझं सोड, पण प्रीतीसाठी तरी त्याने परत यायला हवे होते ना गं. जिने त्याला प्रत्यक्षात कधी बघितले नाही त्याचेच स्केच तिने मला रिटर्न गिफ्ट म्हणून द्यावे.. कसली शोकांतिका आहे गं मावशी ही? तिचा काय दोष होता? का वडिलांच्या प्रेमाला तिला पारखं व्हावं लागलं?” सोनियाचा स्वर भिजला होता.


“राग नको येऊ देऊस, पण सोनिया तू तरी त्याला कुठे शोधलेस?”


“मी का शोधू मावशी? उदरात वाढणाऱ्या गोळ्यासाठी मी माझे घर सोडले. आणखी काय करायला हवे होते?तोही तेव्हा होताच की सोबत. मध्येच त्यानं अशी अचानक पाठ फिरवली तरी पुन्हा मीच का त्याचा शोध घ्यायचा?”


“मोहनवरचा तुझा राग मी समजू शकते गं.” राधामावशी.


“राग नाही गं मावशी. त्याच्या वागण्याची उकल होत नाहीये हे दुर्भाग्य आहे माझं. मी प्रीतीला एक सुखवस्तू आयुष्य देण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला. पण तिला वडिलांचे प्रेम कधीच लाभले नाही ही खंत वाटते गं.” सोनिया शून्यात पाहत म्हणाली.


“मिहीरशी लग्न केले असतेस तर कदाचित वडील मिळाले असते ना तिला.”


"लग्न!” ती खिन्न हसली. “तुला सांगू मावशी, मोहनबद्दल जे वाटते ना ते दुसऱ्या पुरुषाविषयी कधीच जाणवलं नाही गं मला. मग का करायला हवे होते मी लग्न? ज्याची गुणसूत्र तिच्या शरीरात आहेत तोच हक्काचा बाप तिला सोडून गेला, मग दुसऱ्याच माणसाला वडील म्हणून तिच्यापुढे कसे उभे करणार होते?”


“सोनिया, नको इतका त्रास करून घेऊस. आयुष्यातून तो जाऊन दोन तपं लोटलीत. आतातरी सावर गं यातून.”


“मावशी..” तिने राधामावशीचा हात घट्ट पकडला. “खरंच तो गेलाय का गं माझ्या आयुष्यातून?”

तिच्या चिंब भिजलेल्या प्रश्नाने राधामावशी निरुत्तर झाली.


******

“गुडमॉर्निंग ब्युटीफुल!” प्रीतीच्या पुढ्यात लाल गुलाबाचा बुक्के ठेवत मिहीर म्हणाला.


“गुडमॉर्निंग अंकल. बट डोन्ट कॉल मी ब्युटीफुल. आफ्टरऑल मी आता इथली स्टॉफ मेंबर आहे.” ती हसून म्हणाली.


“अगं म्हणूनच तर तुला तसे म्हणालो. काय आहे ना लेडीजना असं सुंदर वगैरे म्हटलं की काम करायला जास्त उत्साह येतो.” तो.


“ईऽऽय! मला हे असं अजिबात आवडत नाही हं.” ती हसून म्हणाली.


“हं‚ काही अपवाद असतात हं. तुझ्या माईसारखे आणि आता तू सुद्धा!” तो टाळी देत म्हणाला.

“बाय द वे‚ कसं चाललंय? इथे काम करायला मजा येत आहे ना?” तो.


“खूप.” तिने आनंदाने म्हटले.


“पुढच्या आठवड्यात कोल्हापूरला एक कॉन्फरेन्स आहे. दोन दिवसांची. आर यू इंटरेस्टेड फॉर द्याट?”


“आय एम इंटरेस्टेड!” प्रीतीच्या उत्तरापूर्वी सोनिया आत येत म्हणाली. 


मिहीर तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिला. दोघे एकत्र काम करत होती त्याला वीस वर्ष लोटली होती. इतक्या वर्षात कोल्हापूरला जाण्याचे ती दरवेळी काही ना काही बहाणा देऊन टाळायची. आज मात्र स्वतःहून तयार झाली तर त्याला आश्चर्य वाटले नसावे तरच नवल!


“माई, मी देखील सोबत येते ना. तेवढाच मलाही अनुभव मिळेल.” प्रीती उत्साहाने म्हणाली.


“नाही‚ नको. मी एकटीनेच जाऊन येते. तू इथलं सांभाळ.”


“ओके, मग. मी फ्लाईटची तिकिट बुक करायला सांगतो.” मिहीर म्हणाला.


“मिहीर नको. मी ना कारने जाईन म्हणते.” सोनियाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती.


“पुणे - कोल्हापूर जवळ नाहीये मॅडम. कारने ड्राइव्ह करत जायला भरपूर वेळ लागेल.” तो म्हणाला.


“साडेचार तास‚ थांबत गेले तर पाच तास. याहून जास्त वेळ नाही लागणार.” ती उत्तरली.


“पण एवढी उठाठेव कशाला माई? प्लेनने गेलीस तर तेवढाच वेळ वाचेल ना?” प्रीती.


“माझं ठरलंय. आता यावर जास्त डिस्कशन नको.” ती उठत म्हणाली.


“मिहीर अंकल, माईला अचानक काय झाले? का अशी वागतेय?” प्रीतीची प्रश्नांकीत नजर.


“गॉड नोज!” तो उठत म्हणाला.


सोनियाचे वागणे प्रीतीसाठी एक कोडे होते. ते तिच्यासमोर उलगडणार की काही वेगळेच वादळ तिच्या आयुष्यात डोकावणार हे येणारा काळच सांगू शकणार होता.

:

क्रमश :

******** 

पुढील भाग लवकरच!

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )


*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.

********

फोटो गुगल साभार.


🎭 Series Post

View all