प्रीती पर्व दुसरे! भाग -12

मिहीर करणार सोनियाला प्रपोज! काय असेल तिचे उत्तर?

प्रीती.. पर्व दुसरे!

भाग -बारा.


सर, मला बोलवलत?" केबिनच्या दारातूनच सोनियाने विचारले.

"हम्म. प्लीज कम इन!" मुखावरची अस्वस्थता लपवत त्याने तिला आत बोलावले.

"काही काम होतं का सर?" तिच्या मंजुळ वाणीने थोडावेळ पसरलेली शांतता भंगली.

"हो. आज सायंकाळी चार वाजता एक मिटिंग आहे. बाहेर जायचंय. तयार रहा." त्याने आपल्या बॉसी आवाजात सांगितले.

"मी? मीटिंगला?" तिने आश्चर्याने विचारले.

"हो, तुम्हीच. आता जी व्यक्ती कॅपेबल असेल तिलाच नेणार ना?" त्याच्या भारदस्त आवाजापुढे ती गप्प झाली. मनात गोंधळ मात्र होता.

"आता निघा. जी फाईल पूर्ण करत आहात ती लवकर आटोपा. ऑफिसचे कोणतेही काम अपुरे असलेले मला आवडत नाही." त्याचे रुड बोलणे ऐकून ती लगेच उठून आपल्या जागेवर येऊन बसली.


ती गेल्यावर त्याने एक लांब श्वास सोडला. 'हिच्याशी असे वागणे मला अजिबात जमत नाही. आजवर प्रत्येक स्टॉफशी मी असाच बोलायचो तेव्हा त्यांना माझा राग येत असेल का?' तिला न्याहाळताना मनाशी त्याचे हितगुज चालू होते. ती त्याला समोर हवी तर होती पण कसे बोलणार? स्वतःशी हसून त्याने फोन फिरवला. एका नामांकित हॉटेलमध्ये चार वाजेपासून दोन तास एक टेबल बुक करून ठेवला.


"निघायचं?" चारला पंधरा मिनिटं कमी असतानाच तो तिच्या डेस्कसमोर येऊन उभा राहिला. ती जराशी गोंधळली. बाजूच्या नजरा तिच्याकडे वळल्या होत्या.

"सर चहा पिऊन निघूया?"

"तिकडे मिळेलच की चहा." तो.

"हो, पण इथल्या चहाची चव तिथे नसेल ना." ती हळुवारपणे बोलत होती.

आपले म्हणणे समोरच्याला पटवून देण्यात तिचा हातखंडा आहे हे आतापर्यंत त्याच्या लक्षात आले होते. तेवढ्यात चहा आला.

"लास्ट फाईव्ह मिनिट" म्हणून तो परत केबिनमध्ये जाऊन बसला.


"स्निग्धाऽऽ"  बेल वाजल्याबरोबर स्निग्धा आत आली.

"येस बॉस?" हात बांधून ती त्याच्यासमोर उभी होती.

"आम्ही एका अर्जंट मीटिंगला जात आहोत. तेव्हा नो कॉल्स अँड नथिंग. ओके?"

"पण बॉस, आज अशी कोणतीच मिटिंग शेड्युल केलेली नाहीये ना?"

"व्हॉट आय सेड? अर्जंट मिटिंग. अर्जंट मिटींग्स शेड्युल्ड नसतात हे अजूनपर्यंत कळलं नाही का तुला?"

"सॉरी बॉस." तिने कान पकडले. 

तो दार उघडून बाहेर गेला. तीही त्याच्या मागोमाग बाहेर आली.


"आय एम रेडी सर." त्याला बाहेर बघून सोनिया आपली पर्स सांभाळत उठली. हातात फाईल होतीच.

"ओके, लेट्स गो." तो चालायला लागला.

"आज अचानक हिला घेऊन बॉस कुठे गेले?"  स्निग्धाला सगळे विचारत होते.

"एक अर्जंट मिटिंग आहे, तिथे गेलेत." ती.

"हो पण मिटिंग साठी सेक्रेटरीला सोडून दुसरंच कोणीतरी सोबत गेली बरं." एकीने दुसरीला टाळी देत म्हटले.

"सोनिया एक चांगली मुलगी आहे. तिच्याबद्दल काहीही बरळू नका." तेजस त्यांचा सहकारी म्हणाला.

"आम्ही कुठे काय बोललो, नि तुला भारीच पुळका रे. आठ दिवसात ती बया बॉससोबत मीटिंगला जाते काय नि आपण राहिलो इथेच. आता महिन्याभरात प्रमोशन होते की काय कुणास ठाऊक?" दोघी पुन्हा हसायला लागल्या.

"होईल तर होऊ दे. ती कामही तशीच मन लावून करते. तुमच्यासारखी चकाट्या पिटत बसत नाही." तेजस म्हणाला.

"नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय हं." त्याच्याकडे बघून पहिली बोलली आणि पुन्हा हास्याचे फवारे उडू लागले.


"स्टॉप नॉन्सेन्स अँड गो बॅक टु युअर वर्क!" एक करारी आवाज कानावर आला. तो हेमंत होता. त्याला बघून सगळे खाली मान घालून कामाला लागले. 

*******


"वेलकम सर, वेलकम मॅडम!" एका पंचतारांकित हॉटेल मध्ये प्रवेश करताना तिथल्या मॅनेजरने मिहीर आणि सोनियाला ग्रीट केले.

"तुमचे टेबल तिकडे कॉर्नरला आहे." तो

पुन्हा अदबीने म्हणाला.

"ओके." म्हणून मिहीर सोनियासह आत आला.

खुर्चीवर बसताना ती थोडी बुचकाळ्यात पडल्यासारखी झाली होती.

"प्लीज सीट अँड बी कॉन्फर्टेबल." तिला म्हणत मिहीर खुर्चीवर बसला. खरं तर एखाद्या आशिकाप्रमाणे तिची खुर्ची मागे ओढून तिचा हात हातात घेऊन अदबीने तिला बसवावे, असे त्याच्या मनात आले होते पण त्याने स्वतःला आवरले.

"आपण दोघेच? दुसऱ्या पार्टीची माणसं कुठे आहेत?" तिने आजूबाजूला बघत विचारले.

"आधी काय खाणार ते सांगा ना. आपण ऑर्डर देऊ या." त्याच्या बोलण्याने ती पुन्हा भांबावली.

तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ त्याने टिपला आणि त्याचे त्यालाच वाईट वाटले. 'एवढया मोठया हॉटेलमध्ये येण्याची हिची पहिलीच वेळ असावी. चुकलंच आपलं.' त्याच्या मनात आले. 


तिने हातात मेनुकार्ड घेतला. त्याच्यावरच्या वेगवेगळ्या डिशेश आणि त्यांचे भाव पाहून तिला आप्पासाहेबांची आठवण झाली. कुटुंबासोबत ते कुठे बाहेर गेले की नेहमी मेनुकार्ड तिच्यासमोर धरत आणि तिला ऑर्डर द्यायला सांगायचे. ती मग अशीच मेनुकार्ड आणि त्यावरील भाव बघून मनात हिशोब करत बसायची.

"सोनिया, एका बिझनेसमनची मुलगी आहात तुम्ही. अशी भावबाजी करायची नसते." आईसाहेब नेहमीच ठणकावायच्या. रजत, विरेन, विश्वास त्यांच्या गमती बघून तोंडातल्या तोंडात हसत बसायचे.

"करू द्या हो भाव. खऱ्या उद्योजकाची तीच तर खासियत असते. आपला हिरा तयार होत आहे बरं." सोनियाचा डोक्यावर नेहमीच त्यांचा विश्वासाचा हात असायचा. 


"मी करू का ऑर्डर?" तिच्याकडून मेनूकार्ड घेत तो म्हणाला.

ती किंचितशी हसली. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तिलाही कळले होते.

त्याने ऑर्डर दिली. दोघांचे खाणे सूरू होते. तिचे निगुतीने खाणे, टेबल मॅनर्स तो पुन्हा पुन्हा तिच्या गुणांनी प्रभावित होत होता.

"कसली मिटिंग आहे काही कळेल का?" टिशूपेपरने हात पुसत ती म्हणाली.

"मिटिंग तर सुरूच आहे." तो मिश्किल हसत म्हणाला.

तिच्या चेहऱ्यावरचा प्रश्नचिन्ह बघून तो थोडा सावरला.

"म्हणजे तुम्ही मागे म्हणाला होतात ना की तुम्ही तुमचे स्टार्टअप करणार आहात. तर तिथली पार्टनरशिप मला मिळेल का?" त्याच्या बोलण्याने ती खळखळून हसली. जणू पांढरेशुभ्र मोती निखळून पडताहेत असा त्याला भास होत होता.

"खरंच सर, हे विचारायला तुम्ही मला इथे घेऊन आलात?" तिने हसत हसत विचारले.

"नाही, फक्त हेच नाही." तो हिंमत करून म्हणाला.

"मग?" ती. ओठावर हसू होतेच.

"सोनिया, स्पष्टच बोलतो. तुझ्या बिझनेसमध्ये तू मला पार्टनरशिप दे किंवा नको देऊस पण माझी आयुष्यभराची पार्टनरशिप स्वीकारशील का? मला जीवनभरासाठी साथ देशील? लग्न करशील माझ्याशी?"

गुडघ्यावर बसत त्याने तिला विचारले.

क्षणभरासाठी ती स्तिमित होऊन त्याच्याकडे बघत होती.एवढा मोठा प्रसिद्ध माणूस आज चक्क तिला प्रपोज करत होता. 

"म्हणजे बघ हं. तू विचार करून निर्णय दे. तुला पहिल्यांदा पाहिलं नि तेव्हाच माझ्या हृदयाची तार झंकारली. दोन दिवसांपासून तू दिसली नाहीस तर मला अगदी कासावीस व्हायला झाले. मी तुझ्या प्रेमात पडलोय हे जाणवत होतं पण कसं सांगू ते कळत नव्हतं. म्हणून मग ह्या मिटिंगचा आसरा घ्यावा लागला." तो बोलत होता.

त्याला वाटले त्याचे प्रपोजल ऐकून तिला आनंद होईल किंवा राग तरी येईल पण तिच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. त्याच्याकडे बघून ती केवळ निर्विकार हसली.


"सर, तुम्ही मला पहिला प्रश्न जर खरंच सिरीयसली विचारला असेल तर त्याचे उत्तर हो आहे. जेव्हा मी माझा बिझनेस उभारेन तेव्हा तुम्हाला बिझनेस पार्टनर करायला नक्की आवडेल. तुमच्यासारखा सच्च्या दिलाचा माणूस माझ्या बिझनेसशी जुळला तर माझा फायदाच आहे की." बोलताना क्षणभर ती थांबली.

"राहाता राहिला दुसरा प्रश्न. तर त्याचं उत्तर मात्र ठामपणे नाही असे आहे. मी तुमची लाईफ पार्टनर नाही बनू शकणार. सॉरी!"


'किती स्पष्टपणे बोलतेय ही. तिच्याऐवजी कुणी असती तर आनंदाने नुसती नाचली असती. ऑफिसमध्येच मी एक नजर त्यांच्याकडे टाकावी म्हणून कित्येकजणी कशा आसूसल्या असतात. ही वेगळी आहे, फार फार वेगळी आहे.'

तो हसला. हसताना लाभलेली कारुण्याची झालर तिला दिसलीच.

"आय एम सॉरी सर! तुम्हाला हर्ट करावे असा माझा हेतू नव्हता. पण खरंच हे अशक्य आहे." ती हळुवारपणे म्हणाली.

"अरे, इट्स ओके. मला वाटलं माझ्या आयुष्यातील प्रेम पुन्हा एकदा नव्याने माझ्या पुढ्यात आलेय. ते हरवायचे नव्हते मला म्हणून मी तुला विचारायला घाई केली. आय एम सॉरी!" तो.

"तुम्ही का सॉरी म्हणताय? उलटपक्षी आपल्या मनातील भावना मोकळ्या केल्यात हेच बरं झालं ना. तुमच्या मनात तर आता तसे काही राहणार नाही." ती.

"त्याची शाश्वती तर मी आत्ताच देऊ शकत नाही. पण मला सांग, मला नाकारण्याचे काही खास कारण?"

त्याच्या प्रश्नावर ती हसली.. खिन्नपणे.

"खास कारण असे नाहीच. पण खरे प्रेम एकदाच होते ह्या मताची आहे मी. म्हणजे मला तरी असे वाटते."

"ओह! म्हणजे रिलेशनमध्ये आहेस का?" त्याच्या प्रश्नावर ती पुन्हा हसली. तेव्हा मात्र चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते.

"तुझ्या घरी कोण असतं?"

त्या प्रश्नावर तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला कोल्हापुरातील तो टोलेजंग बंगला. मस्त्या करणारी भावंड, करारी स्वभावाच्या आईसाहेब आणि तिचे लाडके आप्पा!


"मी, मावशी आणि माझी लेक!" ती उत्तरली. तसे त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य दाटून आले.

"म्हणजे लग्न झालेय तुझं?" तिने उत्तरादाखल फक्त स्मित केले.

"मग तुझे मिस्टर?" त्या प्रश्नाने तिची नजर खाली गेली.

"आय एम एक्सट्रीमली सॉरी! मला माहीती नव्हतं." त्याच्या स्वरातील भाव ओळखून तिने झटकन आपली नजर वर केली.

"ओह, मग वेगळे राहता का तुम्ही? डिवोर्स वगैरे झालाय का?" त्याच्या या प्रश्नावर तिचे पुन्हा स्मित.

वरवर दिसते तेवढे हिचे आयुष्य साधे नाहीये याची त्याला कल्पना आली.


"निघायचं? उशीर होईल. मुलगी वाट बघत असेल. दोन दिवस घरी होते तर तिला माझी सवय झाली होती आता आज पुन्हा धिंगाणा घालत असेल." तिचे म्हणणे त्याला पटले. त्याने बिल मागवले.

"माझे पैसे मी देईन." ती पर्समध्ये हात टाकत म्हणाली.

"अगं मी तुला घेऊन आलो तर मीच देतो ना." तो.

"नाही. ही ऑफिस मिटींग असती तर ठीक होतं. ही आपली पर्सनल मिटींग होती. माझे पैसे मीच देणार." ती आपल्या म्हणण्यावर ठाम होती बिलाचा आकडा बघून मात्र डोके चक्रावले. तेवढे पैसे तिच्याकडे नव्हतेच. त्याने बिल दिल्यानंतर दोघे निघाले.

"इट्स ओके! तुझ्या पगारातून मी पैसे कापून घेईन मग तर झालं ना?" त्याच्या बोलण्यावर ती हसली.. निखळ!

:

क्रमश :

********

©®Dr. Vrunda F. (वसुंधरा.. )


*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.

********

फोटो गुगल साभार.


🎭 Series Post

View all